महाराष्ट्रात सध्या राजकीय वारे अगदी जोराने वाहत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातले सर्वच राजकीय पक्ष अगदी जोमाने तयारीला लागले आहेत. अशातच आता मुंबई विद्यापीठाची स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्ष आणि सचिवपदाची निवडणूकही येऊन ठेपलेली आहे. ही निवडणूकदेखील अतिशय प्रतिष्ठेची आणि वादग्रस्त ठरत आहे. १५ जानेवारी २०१४ रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे. मनसेप्रणित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अर्थात मनविसे, शिवसेनाप्रणित युवासेना, काँग्रेसप्रणित एनएसयुआय या मुंबईतील महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी स्वतःच्या संघटनांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरून रणनीती आखली आहे. ही निवडणूक राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण अनेक तरुण राजकीय नेतृत्व यांसारख्याच निवडणुकीतून तयार होत असतात. इतकंच नाही तर अनेक तरुण कार्यकर्ते याच निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पक्षाशी जोडले जात असतात. भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि महाराष्ट्रात आजघडीला तरुणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांसारख्या दिग्गज राजकारण्यांचा राजकारणातला प्रवेश अशाच विद्यार्थीदशेतील निवडणुकीतून झालेला आहे.

विद्यापीठातील निवडणुकांना राजकीय पार्श्वभूमी लाभलेली असल्यामुळे जे जे प्रकार राजकीय पक्षांच्या निवडणुकांमध्ये घडतात ते सारे प्रकार याही निवडणुकांमध्ये घडतात. मग ते विरोधी पक्षाच्या उमेदवाराला धमकावणं असो, त्याला पैशांचं अमिष दाखवणं असो, त्याचं अपहरण करून त्याच्यावर दबाव टाकणं असो किंवा मग अगदी एखाद्या उमेदवाराची हत्या करणं असो… असे सगळेच गैरप्रकार विद्यापीठांच्याही निवडणुकांमध्ये घडतात. १९९०-९१ साली याच मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीत भवन्स महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येची तेव्हा विद्यापीठाने आणि सरकारने गंभीर दखल घेतली होती. इतकंच नाही तर या हत्येनंतरच मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारने या निवडणुकींवर बंदी आणली. त्याचा फटका अनेक राजकीय पक्षांना बसला. त्यानंतर या निवडणुकीवरील बंदी उठवून निवडणुकीचं स्वरूप बदलून निवडणुका पुन्हा सुरू झाल्या. पूर्वी ही निवडणूक निवडणूक आयोगाच्या निवडणूक पद्धतीने व्हायची. विद्यार्थी मतदार त्यांना मान्य असलेल्या विद्यार्थी उमेदवाराला मतदान करत असत. प्रत्येक महाविद्यालयात मतदान केंद्र उभारून ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जात असे. मात्र आता या निवडणुकांचं स्वरूप बदलवून महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थीच केवळ या निवडणुकीत मतदान करतात. साधारण महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई विद्यापीठाअंर्तगत येणार्या महाविद्यालयात जीएस (विद्यार्थी सचिवपद) पदाची निवडणूक होते. या पदासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग (कल्चरल डिपार्टमेंट) खेळ विभाग, एनएसएस, एनसीसी या विभागाचे विद्यार्थी, सचिव आणि गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात आणि या निवडणुकीत कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेतून गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी तसंच संस्कृती, खेळ, एनएसएस, एनसीसी या विभागाचे विद्यार्थी सचिव मतदान करतात. मतदानानंतर या निवडणुकीतून विजयी झालेल्या उमेदवारांची प्रत्येक जिल्ह्याचे दोन प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली जाते. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांची सचिव म्हणून मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलमध्ये निवड करण्यात येते. एकूण १४ सदस्यांची निवड या स्टुडंट कौन्सिलमध्ये करण्यात येते. हेच १४ सदस्य स्टुडंट कौन्सिलमधील अध्यक्ष आणि सचिवपदासाठी उभे असलेल्या उमेदवाराला मतदान करतात. खरंतर हे अध्यक्षपद विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं पण सगळेच राजकीय पक्ष आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी, आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातात. शिवसेनेचे तर सुभाष देसाई, सदा सरवणकर, बाळा सावंत असे अनेक महत्त्वाचे नेते या निवडणुकीत विशेष लक्ष घालतात. पूर्वी या निवडणुकीत बरीच राडेबाजी, मारामारी व्हायची, आता मात्र अनेक सदस्यांना अमिषं, धमक्या दिल्या जाताहेत. वेळप्रसंगी त्यांचं अपहरणदेखील केलं जातंय. काही पक्षांनी तर सावधानतेचा उपाय म्हणून आपल्या सदस्यांना स्वसंरक्षणात बंदिवान करून ठेवल्याचीही कुजबूज विद्यापीठ संकुलात ऐकू येतेय.

साधारणपणे ही निवडणूक जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात होते. डिसेंबर महिन्यात अर्ज भरून घेण्यात येतात, मग त्या अर्जांची छाननी होते आणि मग त्यातूनच अधिकृत आणि पात्र उमेदवार घोषित केले जातात. २०१४ या शैक्षणिक वर्षामध्ये होणार्या स्टुडंट कौन्सिलच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेला चारीमुंड्या चित करून मनविसेने अनेक महाविद्यलयात आपले जीएस निवडून आणलेत. पण युवासेनेने सदस्यसंख्येच्या कमतरतेमुळे या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे मनविसेच्या रेश्मा पाटील हिने अध्यक्षपदासाठी आणि पियुष झेंडे याने सचिवपदासाठी तर एनएसयुआयच्या स्वामी नंदीनी हिने अध्यक्षपदासाठी आणि प्रणव भट याने सचिवपदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या निवडणुकीत मतदान करणार्या काही जीएसना राजकीय पक्षांकडून धमक्या आल्यात. त्यामुळे त्या जीएसनी या निवडणूक प्रक्रियेमधून माघार घेतली आहे. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या भाग्यश्री सावंत आणि इतर दोन जीएस सदस्य विद्यार्थिनींनी तर या प्रकरणाची तक्रार थेट मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. राजन वेळूकर यांना पत्र लिहून केली आहे. या जीएसच्या तक्रारीमुळे विद्यापीठाला जबर धक्का बसला असून कुलगुरूंनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थी विकास केंद्राचे संचालक डॉ. मृदल निळे यांनी या तिन्ही जीएसना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. इतकंच नाही तर या जीएसच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मृदल निळे यांनी पत्र पाठवून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितलं आहे.

मात्र या तिन्ही जीएसनी यंदाच्या या निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून ११ सदस्य आता या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यातच दोन्ही विद्यार्थी संघटनांनकडे पाच पाच असं विद्यार्थी सचिवांचं संख्याबळ असून सहाची मॅजिक फिगर गाठण्यासाठी या दोन्ही विद्यार्थी संघटनांनमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच या निवडणुकीत एका जीएसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याचं सांगण्यात येतंय. पण येत्या

१५ जानेवारीला ही निवडणूक पार पडल्यानंतर स्टुडंट कौन्सिलचं अध्यक्षपद नेमकं कोणाच्या पदरात पडतंय हे स्पष्ट होईलच.

 

२००८ सालापासून आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. पण विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवलेच जात नाहीत. त्यामुळे आम्ही पुन्हा ही निवडणूक लढवत आहोत.

– सुरज सिंह ठाकूर,

अध्यक्ष, एनएसयूआय

 

आमच्याकडे पुरेसं संख्याबळ असून आम्ही कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करत नाही. आणि ही निवडणूक आम्हीच जिंकू.

– सुधाकर तांबेळी, सिनेट सदस्य मनविसे

 

मनविसेचे निवडून आलेले जीएस

रूपारेल महाविद्यालय

– चैतन्य पवार

कीर्ती महाविद्यालय

– अस्मिता रावले

चेतना महाविद्यालय

– अतुल चव्हाण

पाटकर महाविद्यालय

– सूरज पाटील

साठ्ये महाविद्यालय

– शाम माने

सराफ महाविद्यालय

– नेहा शर्मा

दालमिया महाविद्यालय

– रेश्मा पाटील

संस्कारधाम महाविद्यालय

– तृप्ती येरेकर

 

युवा सेनाचे जीएस

लाला लजपतराय महाविद्यालय

– प्रणव कदम

– निलेश गोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *