दारू तयार करण्यासाठी लागणार्या प्लांटस्चे (डिस्टीलरी मशिनरी) आर्थिक उत्पादन करणार्या कारखान्यात नोकरी करणार्या एका मित्राला विचारलं की, सध्याच्या आर्थिक मंदीचा तुमच्या उद्योगावर कितपत परिणाम झाला? तेव्हा त्याचं उत्तर मजेशीर होतं. तो म्हणाला, ‘जोवर लोक सुखात आणि दुःखात दारू पिणं आवश्यक समजतात तोवर आमच्या उद्योगाला मरण नाही. तोवर दारूचे कारखाने लागतच राहणार आमचे प्लांटस् खपत राहणार!’ त्यांचं म्हणणं खरंच आहे.

याच चालीवर वैद्यकीय क्षेत्राबद्दलही म्हणता येतं. जन्माला येणारा प्रत्येक माणूस कधी ना कधी आजारी पडणार त्याला डॉक्टर लागणार, औषधं लागणार, रुग्णालय लागणार. वैद्यकक्षेत्राचा व्यवसाय सुरूच राहणार. त्यामुळे कितीही तीव्र आर्थिक मंदी जगात सुरू असली तरी डॉक्टर्स, हॉस्पिटल्स्, वैद्यकीय उपकरणं, उत्पादक कंपन्या, औषध उत्पादक कंपन्या आणि या क्षेत्राशी संबंधित अन्य उद्योगांना, व्यवसायांना त्याची कसलीच झळ पोहचत नसते.

या शिवाय वैद्यकक्षेत्राचं आणखी एक वैशिष्ट्य दिसतं. या क्षेत्रात- विशेषतः वैद्यकीय व्यवसाय करणार्या व्यावसायिकांत साधारणपणे सहकार्याचं आणि सौहार्दाचं वातावरण असतं. म्हणजे जी.पी. मंडळींचं स्पेशालिस्ट डॉक्टरांशी ज्युनिअर-सिनिअर्सचं नातं तर असतंच. पण अनेकवेळा जी.पी.ना या सिनिअर्सचा त्यांच्या व्यवसायात आधारही वाटतो. ते एकमेकांना कसं सांभाळून घेतात याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. इतकंच नाही तर शहरांमधील मोठमोठ्या रुग्णालयांत काम करणारे तज्ज्ञ एकाचवेळी शहरातील अनेक रुग्णालयांशी जोडलेले ‘अॅटॅच्ड’ असतात. एकूण वैद्यकीय व्यावसायिकांत भ्रातृभावाचे संबंध (फॅ्रटर्नल फिलिंग) असतं.

या वैद्यकीय व्यवसायांत कट थ्रोट कॉम्पिटिशन- जीवघेणी स्पर्धा नसते. वैद्यकीय उपकरणं उत्पादित करणार्या कंपन्यांत स्पर्धा असते. मात्र प्रत्यक्ष रुग्णांबरोबर संबंध असणार्या व्यावसायिकांत अशी स्पर्धा नसते. तर उलट मैत्रीचं- सहकार्याचं वातावरण असतात.

हे चांगलंच लक्षण आहे. डॉक्टरांमध्ये निरोगी व्यावसायिक नातं असणं रुग्णांच्या हिताचंच असतं. एखाद्या रुग्णाच्या उपचारांबाबत चार डॉक्टर एकत्रित विचारविनिमय करून योग्य निर्णय घेऊ शकतात किंवा एखाद्या गंभीर सामाजिक परिस्थितीमध्ये व्यापक समाजहितासाठी एकत्रित काम करू शकतात.

परंतु आज दिसणारं वैद्यकीय व्यावसायिकांतील सहकार्याचं वातावरण रुग्णहितासाठीच असतं का? त्या सहकार्याचा हेतू ‘स्वहित’ व्यावसायिक हित रक्षण हा असतो? म्हणजे ‘आपण सगळे भाऊ भाऊ मिळून सर्व खाऊ!’ यासाठी हे सहकार्य ही अनिवार्य अट आहे, असा प्रश्न पडतो.

कारण वैद्यक व्यवसायातील सहकार्य केवळ भारतातील वैद्यकीय व्यावसायिकांतच नव्हे तर जगातील सर्व देशात दिसतं. नवीन वैद्यकीय उपचारांबाबतचं संशोधन, नवे उपचार यांची देवाणघेवाण होते. या सहकार्याचा सामान्य नागरिकांना फायदाही होतो. परंतु दुसर्या बाजूला अनावश्यक उपचार, अनावश्यक औषधं यांचा मारा करून नफेखोरीला चालना देण्यासाठीही या सहकार्याचा उपयोग केला जातो. उच्चवैद्यकीय तंत्रज्ञान हे प्रचंड भांडवल गुंतवणुकीविना रुग्णांपर्यंत पोहचू शकत नाही. मोठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयं उभारणं, त्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, सरकारी सोयी-सवलतींचा वापर आणि एक व्यापक गुंतागुंतीची आर्थिक उलाढाल हे अनिवार्य बनलं आहे. मग ही यंत्रणा सुरळीत सुरू राहून त्यातून योग्य आर्थिक परतवा हे वैद्यकीय व्यवसायासाठी अपरिहार्य होतं. रुग्ण आणि रुग्णांवरील उपचार हे मोठ्या पंचतारांकित हॉटेल्स्च्या ग्राहकांप्रमाणे या रुग्णालयांच्या अस्तित्वसाठी आवश्यक क्लायंटस् ठरत जातात. मग याचा पुढचा टप्पा म्हणजे नियमित रुग्णांचा ओघ टिकवणं यासाठी नवनवीन योजना, स्किम्स्!

मध्यंतरी आमच्या एका डॉक्टर मित्राने जळगावमधील स्त्रीरोग तज्ज्ञाच्या रुग्णालयातील एक अशीच ‘अभिनव’ स्किम सांगितली. तो सांगत होता की, बाळंतपणासाठी येणार्या स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आयत्यावेळी सिझेरियन करावं लागणार असं सांगितलं तर ताण येतो. आर्थिक अडचण वाटते. त्या डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, जळगाव, खान्देशात सिझेरियन शस्त्रक्रियेचं प्रमाण खूप जास्त आहे. सहसा नवीन रुग्णालयात सिझेरियन करण्याकडे डॉक्टरांचा कल असतो. याचा परिणाम असा होतो की, बाळंतपणासाठी दाखल होणार्या महिलेच्या कुटुंबीयांना अशी शंका येते की, डॉक्टर गरज नसताना सिझेरियन करून अधिक पैसे उकळतात. यावर उपाय म्हणून या नव्या डॉक्टरने एक स्किम राबवली. ती अशी की, बाळंतपणाच्या खर्चाचं पॅकेज १५,००० रुपये. सामान्य बाळंतपण झालं तर स्पेशल रूमसहित सात दिवस रुग्णालयातील निवास आणि सिझेरियन झालं तरी १५,००० रुपये कॉमन वॉर्ड आणि सात दिवस निवास. ही स्किम केल्यामुळे खरोखरच आवश्यक असेल तेव्हाच सिझेरियन केलं जातं. थोडक्यात एका दृष्टीने रुग्णाचं हितही सांभाळलं जातं. (अनावश्यक सिझेरियन टाळलं जातं) आणि डॉक्टरांचं आर्थिक हित आपोआपच साधतं! ही त्यांची योजना किती यशस्वी ठरली माहीत नाही.

पण एवढं मात्र खरं की, वैद्यकीय व्यावसायिकांतील सहकार्य आजकाल नफेखोरीसाठी वापरलं जातं. अगदी एखादा मोठा कट केल्याप्रमाणे! असं सिद्ध करणार्या अनेक घटना वारंवार पुढे येत असतात.

अलीकडेच फिनलंडमधील दोघा संशोधकांनी अमेरिका आणि युरोपमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेल्या गुडघ्यांवरील कॉमन ऑपरेशनच्या परिणामकारकतेचा अभ्यास केला. या अभ्यासाचे निष्कर्ष न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालं आहे.

वयोमानानुसार माणसाची गुडघेदुखी सुरू होणं हा सार्वत्रिक अनुभव आहे. गुडघ्याच्या सांध्याची झीज होते त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. या दुखण्याला साधारणपणे वयोमानानुसार असं होणारच असं म्हटलं जातं. विकसित श्रीमंत देशात माणसाचं सरासरी आयुष्य वाढल्यामुळे अशा आजारांवरील उपचारांना अतोनात महत्त्व प्राप्त झालं आहे. गुडघेदुखी आणि गुडघ्यांच्या सांध्यांच्या हालचाली मर्यादित होण्याच्या आजारांवर उपाय म्हणून ‘मेनिस्कल रिपेअर’ ही छोटेखानी शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया एवढी लोकप्रिय झाली आहे की अमेरिकेत सरासरी सात लाख रुग्णांवर दरवर्षी ही शस्त्रक्रिया करण्यात येते. या शस्त्रक्रियेला मेनिसेक्टॉमी असं नाव आहे.

तर या मेनिसेक्टॉमी शस्त्रक्रियेची परिणामकारकता किती आहे याचाच अभ्यास फिनलंडच्या अभ्यासकांनी केला. त्यांनी १४६ रुग्णांवर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेचा अभ्यास केला असता असं लक्षात आलं की किमान ९३ टक्के रुग्णांना या शस्त्रक्रियेचा काहीही फायदा झाला नाही. तर उर्वरित सात टक्के रुग्णांना अंशतः फायदा झाला. उलट शस्त्रक्रियेनंतर तीन ते पाच महिन्यांनी बर्याच रुग्णांना आणखी तीव्र वेदना सुरू झाल्या.

या अभ्यासाची पद्धत आणि रचना लक्षात घेण्यासारखी होती. यातील एकूण १४६ रुग्णांपैकी ७० रुग्णांवर मेनिसेक्टॉमी शस्त्रक्रिया प्रत्यक्ष करण्यात आली. तर ७६ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्व पूर्व प्रक्रिया केली गेली. पण प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केली गेलीच नाही. शस्त्रक्रिया केल्याचं भासवण्यात आलं होतं. या रुग्णांचीही पक्की खात्री झाली होती की आपल्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. या दोन्ही गटांच्या रुग्णांचा पुढील वर्षभर फॉलोअप ठेवण्यात आला. तेव्हा दोन्ही गटातील रुग्णांनी आपल्या वेदना ३० टक्क्यांनी कमी झाल्याचं सांगितलं. उलट खोट्या शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांमध्ये ‘शस्त्रक्रियेचा आपल्याला खूपच फायदा झाला’ असं सांगणार्या रुग्णांचं प्रमाण प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यात केलेल्या रुग्ण गटांपेक्षा खूपच अधिक होतं. खोट्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या गटातील रुग्णांना आपल्यावर उपचार झालेत या भावनेमुळेच बरं वाटू लागलं. (यालाच प्लासिबो इफेक्ट म्हणतात.)

तर या अभ्यासामुळे एवढं नक्की सिद्ध झालं की ‘मेनिसेक्टॉमी शस्त्रक्रिया’ निरुपयोगी आहे. या शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत सरासरी ३००० ते ६००० डॉलर्स इतका खर्च येतो. तर दरवर्षी सात लाख रुग्ण ही शस्त्रक्रिया करून घेतात. म्हणजे सरासरी ४०० कोटी डॉलर्सची उलाढाल या शस्त्रक्रिया उपचारांमधून होत असते.

अमेरिकेतील ऑर्थोपेडिक डॉक्टर्सच्या संघटनांनी या संशोधनाला मान्यता देण्यास नकार दिला आहे. (व्यावसायिक सहकार्य?) त्यांचं म्हणणं आहे की, या अभ्यासासाठी निवडलेला सॅम्पल साईज फारच छोटा आहे. त्यावरून सर्वसाधारण निष्कर्ष काढणं धोक्याचं ठरेल. एकवेळ हे मान्य करू. पण मेनिसेक्टॉमी ही शस्त्रक्रिया तितकीशी परिणामकारक नाही एवढं मान्य करून रुग्णांना त्याची कल्पना देणं नक्कीच उचित ठरेल. या शस्त्रक्रियेच्या परिणामकारकतेचा व्यापक निष्पक्ष अभ्यास करून त्याचे निष्कर्ष लवकरच जाहीर होतील अशी अपेक्षा करू. परंतु, ऑर्थोपेडिक सर्जन्स् असं काही म्हणताना दिसत नाहीत.

अनेक वैद्यकीय उपचारांच्याबाबत अशा शंका आज घेतल्या जात आहेत. नफेखोरीसाठी वैद्यकीय व्यवसाय असं एकदा मान्य झालं की वेगळं काय घडणार?

जोवर माणसं जन्माला येणार तोवर त्यांना आजार होणार, डॉक्टर लागणार, उपचार लागणार, रुग्णालयं लागणार. वैद्यक व्यवसायाला मरण नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *