भारताची राजधानी जरी दिल्ली असली तरी आर्थिक राजधानी मुंबई आहे. कारण मुंबईत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली नेहमीच होत असतात. मुंबईतल्या तसंच उपनगरातल्या कोणालाही कुठल्याही प्रकारचं शॉपिंग करायचं असेल तर प्रत्येकाची पहिली पसंती मुंबईच असते. कारण मुंबईच्या जवळपासच्या परिसरातही अनेक चांगली मार्केटस् असल्याचं खूपच कमी लोकांना माहीत आहे. उल्हासनगरमध्ये असंच एक मार्केट आहे. उल्हासनगरमधलं हे मार्केट मुंबईतील बाजारांपेक्षा लहान असलं तरी इथे मुंबईच्या बरोबरीने व्यापार होतो. केवळ उल्हासनगरमधील लोकच नाही तर आसपासच्या परिसरातूनही अनेकजण इथे येऊन खरेदी करणं पसंत करतात.

उल्हासनगर हे खरं तर फर्निचरच्या मार्केटसाठी अधिक प्रसिद्ध आहे. पण त्याचबरोबर उल्हासनगरचं कपड्याचं मार्केटही खूप मोठं, जुनं आणि प्रसिद्ध आहे. हे मार्केट ३५ वर्षं जुनं असून तेव्हापासूनची अनेक कपड्यांची दुकानं आजपर्यंत इथे तग धरून आहेत. उल्हासनगर प्रभाग क्र. दोनमध्ये मोठ्या प्रमाणावर कपड्यांची दुकानं आहेत. इथे व्होलसेलर व्यापार्यांची आणि रिटेलर व्यापार्यांची मिळून जवळपास हजार तरी दुकानं असतील. इथे अनेक दुकानात खूपच कमी किमतीत कपडे मिळतात. त्यामुळे आजकाल कपड्याचं शॉपिंग करण्यासाठी अनेकजण उल्हासनगर गाठतात.

उल्हासनगरच्या या मार्केटमध्ये कपडे तयार केले जात असल्यामुळे इथले दुकानदार मुंबईतील इतर भागातील दुकानांपेक्षा कमी किमतीत माल विकतात. तसंच या मार्केटमधून महाराष्ट्रात आणि देशातील अनेक भागातदेखील माल पुरवला जातो. लग्नाच्या बस्त्यासाठी सोईस्कर आणि प्रसिद्ध असलेल्या या मार्केटमध्ये दूरदूरवरूनही ग्राहक येतात. याच मार्केटमध्ये अनेक वर्षं कपड्यांचं दुकान चालवणार्या अशोक मुलचंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार इथे कमीत कमी १२५ रुपयांच्या साडीपासून ते २५०० पर्यंतच्या वा त्यापेक्षाही महाग किमतीच्या साड्या उपलब्ध आहेत. या मार्केटमध्ये बनारसी, कलकत्ता हॅन्डवर्क असणार्या, विविध प्रकारच्या नेटच्या, विशेष समारंभासाठी ब्राईडल साड्याही मिळतात. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या घागरा चोलीही मिळतात. महाराष्ट्रीय साड्यांमध्ये इथे पैठणी, पेशवाई, नऊवारी, सहावारी साड्या तर मिळतातच. पण याबरोबरच कांजीवरम, धर्मावरम अशा साड्याही मिळतात. त्याचबरोबर पंजाबी ड्रेसेसमध्ये साधा पंजाबी सूट, पटियाला, अनारकली हेदेखील खूप आकर्षक डिझाईन आणि पॅटर्नमध्ये इथे उपलब्ध आहेत. पुरुषांकरता इथे शर्टपीस, पॅन्टपीसपासून रेडीमेड कपडेही खूप स्वस्तात मिळतात.

या मार्केटमध्ये ग्राहकांसाठी अनेक पर्याय खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे इथे येणारा ग्राहक मोकळ्या हातानिशी कधीही परतणार नाही, असं म्हटलं जातं. तसंच या मार्केटचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे या मार्केटमध्ये जर एखाद्या ग्राहकाला काही वेगळं पाहिजे असेल तर त्याच्या पसंतीचा विचार करून तसा ड्रेस बनवूनही दिला जातो. म्हणूनच तर स्वस्तात मस्त कपडे घेण्यासाठी एकदा तरी या मार्केटला जरूर भेट द्या.

 सुजाता शिरसाठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *