देशाला स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्याचा सूर्य दर्याखोर्यात मात्र अजूनही उगवलेला नाही. प्रगत म्हणवणार्या महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे. कोकण आणि सह्याद्रीच्या डोंगर दर्यात राहणारा कातकरी आणि धनगर समाज विदारक अवस्थेत आहे. शिक्षण तिथे पोचलेलं नाही. अशा या उपेक्षित मुलांसाठी एक आगळा प्रयोग ’प्रयोगभूमी‘ म्हणून सुरू झाला. याच ’प्रयोगभूमी‘चा वर्धापन दिन नुकताच पार पडला. त्याचा हा वृत्तांत…

काही दिवसांपूर्वी श्रमिक सहयोग संचालित ’प्रयोगभूमी‘चा वार्षिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वार्षिकोत्सवाला आलेल्या श्रमिक सहयोग परिवाराच्या सदस्यांचं गवती चहाची पात आणि तुळशीचं बी देऊन अनोख्यापद्धतीने स्वागत केलं गेलं. यानंतर डॉ. राजे यांनी पहिल्या सत्राची सुरुवात सर्वेश्वरदयाल सक्सेना यांच्या क से कारिन्दा… या गीताने केली. या गीतात शिक्षणापासून वंचित मुलांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दत्ता सावळे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि नंतर कोळकेवाडी गाव जिथे प्रयोगभूमी आहे तिथले सरपंच रमेश बंगाल यांच्या हस्ते प्रयोगभूमीवर आधारित प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनाच्या माध्यमातून फोटो, वृत्तपत्रीय कात्रणं, मुलांची अभिव्यक्ती व्यक्त करणारं साहित्य, त्यांची मनोगतं, अनुभव आणि सर्वांचे आधारवड दत्ता सावळे यांची माहिती करून देणारे फोटो आणि साहित्य सर्वांना प्रयोगभूमीशी जोडत गेले. यानंतर सुषमा इंदुलकर यांनी दत्तात्रय शंकर सावळे (दत्ता सावळे) यांचा जीवन परिचय करून दिला.

यानंतर पहिल्या सत्रातील दुसर्या कार्यक्रमात ’मोरमित्रांची शाळा‘ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी लेखक मंगेश मोहिते, सविताताई भोसले, राहुल गमरे यांची मनोगतं झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लता प्रतिभा मधुकर, पर्यावरणतज्ज्ञ अर्चना गोडबोले, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलसचिव डॉ. मुळे, जनआंदोलन राष्ट्रीय समन्वयाच्या महाराष्ट्र निमंत्रक सुहास कोल्हेकरताई, श्रमिक सहयोगाचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे या मान्यवरांनी प्रयोगभूमीशी असलेलं आपलं नातं व्यक्त केलं. साप्ताहिक कलमनामाचे संपादक आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष युवराज मोहिते यांच्या हस्ते ’मोरमित्रांची शाळा‘ या राजन इंदुलकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. युवराज मोहिते यांनी या पुस्तकाचं महत्त्व, साहित्यातील स्थान आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी समाज सहभागाची गरज, आजची शिक्षण पद्धती त्यातील त्रुटी आणि प्रयोगभूमीचं शिक्षण क्षेत्रातील योगदान अशा अनेक मुद्यांवर मार्गदर्शन केलं.

दुसरं सत्र मात्र फारच आगळं ठरलं. युवा संवाद या सत्राचा आशय होता परिघाबाहेरचे विचार अर्थात चाकोरी सोडताना… या सत्राची सुरुवात मल्हार इंदुलकर याने स्वराज विद्यापीठ, त्याची निवड करण्यामागची भूमिका त्यासाठी घरच्यांचं पाठबळ हे विषद करत येणार्या जबाबदारीची जाणीव आणि वेगळी पाऊलवाट चोखाळताना मिळणारा आनंद विषद केला. याच विषयावर आधारित एक खेळ घेत त्याने सर्वांना अलगद सामील करून घेतलं. या युवा संवादामध्ये शर्मिष्ठा रोंगे हिने ग्रामीण भागातील मुलींचे प्रश्न मांडले तर असीम हेगशेट्ये याने रत्नागिरी ते अमेरिका असा शैक्षणिक प्रवास रंजक पद्धतीने सांगितला. युवकांशी संवाद साधताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांनी लंडनमधील व्यवसाय सोडून कोकणात येण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली आणि आपल्या आतल्या आवाजाला ऐकत करिअरची निवड करत आनंद घेण्याचा सल्ला दिला. संपूर्ण चर्चासत्राचा विषय आणि त्याचं जीवनातील महत्त्व विकास घारपुरे यांनी समजावलं. यानंतर सत्राचा दुसरा टप्पा सुरूझाला. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक सतीश मन्वर, नाट्य आणि दूरदर्शन मालिका लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांची मुलाखत शरयू इंदुलकर यांनी घेतली. एक कलाकार म्हणून सामाजिक जाणीव, या क्षेत्रातील आव्हानं, सहजीवन इत्यादी अनेक विषयांवर आधारित प्रश्न विचारात त्यांनी या मुलाखतीमध्ये रंजकता आणली. सुनीता गांधी यांनी आई लता प्रतिभा मधुकर आणि मनस्विनी यांच्या हळुवार नातेसंबंधाचा उलगडा आपल्या प्रश्नाद्वारे करून दिला तर उल्का पुरोहित, स्थापत्य विशारद संतोष तावडे आणि उपस्थित युवकांनी प्रश्न विचारत सर्वांना या मुलाखतीत सहभागी केलं.

चहापानानंतर प्रयोगभूमीच्या मुलांनी संगीतातील राग सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. गुजराती, राजस्थानी गीतं सादर केली. डोंगरी शेत माझं गं… या गीताबरोबर सगळ्यांनी ताल धरला. सोबत निर्मलाताई यांनी सुरेल आवाजात गाणं सादर करत सगळ्यांना ठेका धरायला लावला. प्रज्ञा राजे हिचं गाणं आणि न्यू फेलोशिप चर्चच्या वतीने सादर झालेलं सेव्ह इंडिया गीतावरील नृत्य कार्यक्रमाची रंगत वाढवत होतं. हार्मोनियमवर प्रयोगभूमीतील संतोष साथ करत होता तर ढोलकवर साथ करत होते जाधव. अचानक मुलांनी पारंपरिक ढोलताशा आणला आणि सारेजण धनगरी, कातकरी नृत्यामध्ये सामील झाले. ताल बदलत होता तसा नृत्याचा प्रकार बदलत होता. मध्येच मुलानी मांढर हे मातीपासून बनवलेलं गडचिरोलीतील वाद्य आणलं आणि त्यावर नृत्य करू लागले. प्रयोगभूमीच्या चारही बाजूला असलेल्या डोंगरांमध्ये वाद्यांचा आवाज घुमत होता आणि हातात हात घालून नाचणारे सारे एकमेकांना अशीच साथ देण्याची ग्वाही देत होते. सार्यांच्या अंतर्मनामध्ये जणू एकच गीत सुरू होतं- खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावं…

श्रमिक परिवाराने पुढच्या वार्षिकोत्स्वाची तारीखही जाहीर केली. २७ आणि २८ डिसेंबर… तेव्हा सामील होऊया… आम्ही आपली वाट बघत आहोतच…

 राजन इंदुलकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *