९.

निसर्गाने नेमलेला माणूस हा निव्वळ प्राणी आहे. निसर्गाने माणसाला दिलेली जी गृहीत कर्मं आहेत ती केवळ प्राण्याचीच आहेत. उदरभरण, निद्रा, भय आणि मैथुन ही माणूसप्राण्याची खरी कर्मं आहेत. पण आज जेव्हा आपण माणूसजातीचा आढावा घेतो तेव्हा तो फक्त याच कर्मांमध्ये अडकून पडलेला नाही असं दिसतं. म्हणजे ती कर्मं तर तो करतोच, पण त्यांच्याबाहेरही त्याचं जगणं आहे असंही दिसतं. ते जगणं निव्वळ प्राणिजात नाही, तर त्याच्याही वर जाणारं आहे आणि ते माणसाने स्वतः विकसित करत नेलं आहे. आजचा, वर्तमान माणूसही त्या विकसनाच्या प्रक्रियेतलाच आहे आणि त्याला जे त्यातून साध्य करायचं आहे, ते कुठे तरी भविष्यात दडून बसलेलं आहे.

अर्थात माणसाची ही विकसन-प्रक्रिया निसर्गाने त्याला नेमून दिलेल्या विहीत कर्मांवरच आधारलेली आहे, हेही खरं. त्या कर्मांसाठी निसर्गाने त्याला आखून दिलेल्या मार्गांपेक्षा माणसाने आणखी काही वेगळे मार्ग चोखाळलेले या प्रक्रियेत निश्चितच दिसतात. ते समजून घ्यायला आदिम काळातला माणूस थोडा जाणून घ्यावा लागेल.

माणूस चार पायांवर चालायचा, त्याला सुळे-शेपूट-नख्या होत्या, तो शिकार करायचा किंवा झाडपाला खायचा, वगैरे गोष्टी आपण ऐकतो. तो दोन पायांवर ताठ उभा राहून चालायला शिकला, तिथून त्याची खरी माणूस होण्याची कहाणी सुरू झाली. कुणी तरी अशी गोष्ट सांगतं की, माणूस पूर्वी म्हणे झोपायचा नाही. पण जगावर अंधार पडायचा, माणसाला दिसायचं नाही, त्यामुळे तो एका ठिकाणी बसून राहायचा. त्या बसून राहण्यातून त्याच्या पेशींना शैथिल्य यायला लागलं न् तो झोपायला लागला. ही गोष्ट खरी असेल तर माणसाने निद्रा मिळवली आणि आज अवस्था अशी आहे की, माणूस निद्रेशिवाय जगू शकत नाही. निद्रेचं त्याने विकसन आणि नियोजन केलंय. शास्त्रही बनवलंय.

आदिम माणसाच्या जगण्याला कसलीही नियमावली नव्हती. भाषा नव्हती. दोन पायांवर चालायला लागलेला माणूसही प्राणिजातच होता. त्याच्यात एकमेकांत नातेसंबंध नव्हते न् एकोपाही नव्हता. तो एकेकटा जगायचा. नर-मादीत फक्त उद्दिपनाचं नातं होतं. उद्दिपन आलं की समागम करायचा न् बाजूला व्हायचं. पुन्हा त्याच नर-मादीची एकमेकांशी भेट होईल याची खात्री नाही. कुठलेही नर-मादी कुठल्याही आणि कितीही नर-माद्यांशी जुगायचे. त्यातून प्रजनन व्हायचं पण संगोपन नाही. मी तर ऐकलंय की, झालेलं अपत्य मादी जागच्या जागी सोडून जायची. ते मग आपोआप वाढायचं किंवा तिथंच मरून जायचं. (हे आज पटणं जरा अवघड आहे.) तेव्हाचा माणूस उघड्यावरच राहायचा. कुठल्याही प्राण्याची शिकार व्हायचा किंवा जमेल त्या प्राण्याची शिकार करायचा. ती खायचा. झाडपालाही खायचा. एवढंच नाही तर एकमेकांनासुद्धा मारून खायचा. त्याच्यापेक्षा प्रबळ असलेल्या प्राण्यांची शिकार होणं, थंडीवारा-पाऊस-ऊन सोसणं, निसर्गाची विविध संकटं झेलणं हे माणसाचं जगणं होतं न् त्यांचं त्याला भय वाटायचं. तो स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कसंबसं लढत असायचा.

भय ही माणसाच्या मेंदूतली पहिली भावना आहे. आणि निसर्गाने नेमून दिलेलं ते एक त्याचं कर्मच आहे. भयाची भावना न् पोटाची भूक या दोन गोष्टींनी माणसाचं माणूस म्हणून विकसन करत नेलं. (त्याने भुकेचंही भयच बाळगलं.) आजचा माणूस घडायला त्याच्यातली भीतीच त्याला सर्वात जास्त उपयोगी ठरली आहे. भय या भावनेनेच त्याचा सर्वच्या सर्व प्रकारचा विकास घडवला आहे. (आजही त्याचं जगणं त्या भयाच्या भावनेनंच प्रेरित आहे न् मला असं वाटतं की, आधी मी जे म्हणालो, भविष्यात माणसाला ‘माणूस’ होण्याची इच्छा आहे, तर ते ‘माणूस’ होण्यात माणसाला भयमुक्त होणं, सर्वार्थाने स्वतःतली भीती काढून टाकणं ही गोष्ट अभिप्रेत असावी. अजिबातच कशाचंही आणि कणाचंही भय नसलेली माणूसजात पृथ्वीतलावर अस्तित्वात येईल, त्या दिवशी माणसाची ‘माणूस’ होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, त्याचं विकसन पूर्णत्वाला पोचेल असं वाटतं.)

भयाने माणसाचा मेंदू विकसित करत नेला. त्याला विचार करायची सवय लावली. विचार, खोल विचार, अधिक खोल विचार अशी प्रक्रिया त्याच्या मेंदूत घडवत नेली. मग त्या विचारप्रक्रियेने माणूस स्वतःला सुरक्षित करण्याचा विचार करू लागला न् मग त्याचं आयुष्य सुरक्षित करणारे एकेक शोध त्याला लागत गेले. माणूस थंडी, वारा, ऊन, पाऊस, श्वापदं यांच्यापासून वाचण्यासाठी गुहेत राहू लागला. श्वापदांपासून वाचण्यासाठी आणि शिकार किंवा वनस्पती तोडून खाण्यासाठी माणसाने शस्त्रं शोधून काढली. मग माणसाने आग हाताळायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने शेतीचा शोध लावला. म्हणजे गुहा, शस्त्र, आग आणि शेती हे माणसाच्या विकासाचे मुख्य टप्पे ठरले. या टप्प्यांच्या आधारावरच त्याने स्वतःत क्रांतिकारक बदल करत नेले. पण आणखी एक महत्त्वाचा टप्पा त्याने शोधून काढला तो, माणसामाणसांनी एकत्र राहण्याचा. या टप्प्याने त्याच्यातल्या विकसनाचा खरा इतिहास रचला. आज माणसाला जेवढीही सृष्टी दिसते न् ती जशी दिसते त्यासाठी माणसाने शोधून काढलेले हे पाच टप्पे कारणीभूत आहेत. (आणि त्यांच्यामागे केवळ भय ही भावना आहे.)

माणसाने घरं बनवली. अवजारं बनवली. शेती रचली. (तो स्वतःला हवा तो अचल सजीव जन्माला घालू लागला.) माणूस पदार्थ भाजून खाऊ लागला. त्याने पदार्थांचे लाखो प्रकार बनवले. त्यांची शास्त्रं रचली. माणसाने वस्त्रांचे निरनिराळे प्रकार बनवले. माणसाने कोणताही सजीव स्वतःच्या अंकित करण्याची, त्याला सहज मारण्याची, अगदी पाळीव करण्याचीही कला शोधली. माणूस समुद्राच्या तळाशी आणि अंतराळाच्या पोकळीत पोचला. माणसाने रसायनं शोधली. माणसाने पर्वत आडवे केले. पूर थोपवले. माणूस निसर्गातल्या प्रत्येक साधनसंपत्तीचा वापर करू लागला, नायनाट करू लागला न् ती नव्याने तयारही करू लागला. माणूस प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करू लागला न् त्यांची शास्त्रंही रचू लागला. माणसाने एकमेकांशी संवादासाठी अनेक माध्यमं शोधली, अनेक कला शोधल्या. अशा करोडो गोष्टी माणसाने तयार केल्या. प्रचंड भौतिक विकास करून घेतला. हे सगळं त्याने स्वतःला सुरक्षित करण्यासाठी, म्हणजेच भयापासून मुक्त होण्यासाठी न् स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलं. या सर्वच्या सर्व बाबतीत तो इतर कोणत्याही सजिवापेक्षा वेगळाच ठरला. (एवढंच नाही तर आज जगात कोणता सजीव टिकावा न् कोणता नष्ट व्हावा हे ठरवण्याइतपत तो मोठा झाला.)

पण मला या सर्वात जास्त वैशिष्ट्यपूर्ण वाटतं ते माणसामाणसांनी एकत्र येणं. एक होणं. समूह तयार करणं. शास्त्रीय मांडणी करून पाहिलं तर माणूस हा स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व चल सजिवांमधला सर्वांत कमकुवत प्राणी आहे. जगातल्या प्रत्येक सजिवाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी निसर्गानं काही ना काही सुविधा दिली. काही ना काही हत्यारं दिली. काही ना काही शक्ती दिली. अगदी डास, ढेकूण, पिसवा, कोळी असे कीटक घेतले तरी ते माणसाला भारी ठरतात. ते माणसाला चावू शकतात. त्याच्यात रोग फैलावून त्याला मारू शकतात. माणूस त्यांना चावू शकत नाही. साध्या उंदराकडे जमिनीत बिळं करण्याची न् काहीही करण्याची शक्ती असते. तेवढीही माणसाकडे नसते. पाली, साप, विंचू यांच्याकडे संरक्षणासाठी विषं असतात. माणसाकडे ती नसतात. मांजर, कुत्री, वाघ, सिंह, चित्ते यांच्याकडे नख्या, सुळे आणि शारीरिक ताकद असते. त्यावर ते टिकू-जगू शकतात. ससे, हरणं असे गरीब म्हटले जाणारे प्राणी संरक्षणासाठी पळू शकतात. घोडे, झेब्रा, गाढव असे प्राणी पळूही शकतात आणि दुगाण्याही झाडू शकतात. माणूस त्यांच्याएवढं पळू शकत नाही न् दुगाण्याही झाडू शकत नाही. माश्या अंगावर रोगजंतू घेऊन आणि भिणभिण करत कुठेही अंगावर बसून इतर प्राण्यांना हैराण करू शकतात. माणूस ते करू शकत नाही. जिराफ, हत्ती, उंट हे प्राणी अट ताकदीवर आणि मोठ्या धडावर जगू शकतात. माणसाकडे तसं काही नसतं. मासे, कासवं कितीही लांब पोहून स्वतःला वाचवू शकतात. माणसाला ते शक्य नसतं. गाई, म्हशी यांच्याकडे सुरक्षेसाठी शिंगं असतात. माणसाकडं ती नसतात. पक्षी हवेत उडून स्वतःला वाचवू शकतात. कितीही लांबचा प्रवास करून अन्न शोधू शकतात. माणूस ते करू शकत नाही. माकडं झाडावर चढून अन्न मिळवू शकतात न् स्वतःला संकटापासून वाचवू शकतात. माणसाला त्यांच्यासारख्या टणाटणा झेपा घेणं जमत नाही. अस्वलं, कोल्ही, लांडगी यांनाही शिकार करण्याची कला असते. केसाळ कातडी असते. ते प्राणी बर्फातही राहू शकतात. उंट पोटात पाणी साठवून वाळवंटात राहू शकतात. गेंड्यांकडे, डुकरांकडे जाड कातडी आणि सुळे असतात. असं प्रत्येक प्राण्याला निसर्गाने स्वतःच्या संरक्षणासाठी आणि जगण्यासाठी काही ना काही बहाल केलेलं असतं. केस, सुळे, नख्या, कातडी, धावण्याची किंवा उड्या मारण्याची शक्ती, पोहण्याची किंवा उडण्याची शक्ती, शेपट्या, विषं, अंधारातसुद्धा पाहण्याची शक्ती, रवंथ करण्याची कला, पोटात अन्नपाण्याचा साठा करून ठेवण्याची कला, अतिशय दूरवरचं पाहण्याची दृष्टी, तीव्र घ्राणेंद्रियं, असं काही ना काही स्वतःला वाचवण्याचं न् जगवण्याचं प्रत्येक प्राण्याला मिळालेलं असतं. तसं माणसाकडं काय असतं? काहीच नाही. अगदी काहीच नाही. निसर्गातल्या कोणत्याही संकटापासून वाचण्यासाठी माणसाकडे शारीरिक असं एकही साधन नाही. स्वतःला जगवण्यासाठीही त्याच्याकडे शारीरिक असं एकही साधन नाही. तो सर्वच बाबतीत जगातल्या कोणत्याही सजिवापेक्षा नाजूक आणि बलहीनच आहे. पूर्ण रिकामा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *