पूनम पांडे अंगअंगभर साडीत दिसेल आणि म्हणूनच ती ओळखली जाईल. तिला ‘ओळख’तात म्हणून बड्या बॅनरच्या निर्मात्यांनी तिला करारबद्ध केलं, हा धक्का पचवता न आल्याने तिने यापुढे मी अभिनयअंगाकडे लक्ष देईन अशा मुलाखतींचं वाटप केलं.

(अखेर) चांगली/कसदार पटकथा मिळाली म्हणून माधुरी दीक्षितने मराठी चित्रपटाच्या करारपत्रावर ‘शुद्ध आणि स्वच्छ’ मराठीत स्वाक्षरी केली आणि मग तिच्या मॅनेजरने ‘एक पैशाच्याही मानधना’ची अपेक्षा न ठेवता तिची लहानमोठ्या सर्व मराठी उपग्रह वाहिनीवर मुलाखत आयोजित केली. एखाद्या फिल्मी/गैरफिल्मी/सामाजिक/राजकीय सोहळ्यात ‘उंच’ पाहुणा म्हणून नाही, एखाद्या चित्रपट/जाहिरातपटाचं चित्रीकरण नाही, दिवसभरच्या व्यक्तिगत अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील घटनेवर ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करणं नाही, असा वर्षभरातील ३६५ दिवसांतील अमिताभ बच्चनचा किमान एक दिवस वाया गेला. राखी सावंतच्या ‘पोपटपंची’कडे प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष केलं, तिची काही काळ ‘बोलती बंद’ म्हणून मल्लिका शेरावतच्याही बेधडक बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कतरिना कैफ रणबीर कपूरशी एकनिष्ठ राहिली… कतरिना छान मैत्रीण म्हणून उत्तम आहे, पण तिचा पत्नी म्हणून स्वीकार करणं अवघड आहे असा रणबीरला ‘नात्याचं शेवटचं रिळ’ आहे तरी कल्पनाच आली नाही.

युवराज सिंग, सिद्धार्थ मल्ल्या, रणबीर कपूर, रणवीर सिंग असे ‘बाद केलेले खेळाडू’ विसरून दीपिका पादुकोणने हक्काचा एक ‘नवा सवंगडी’ शोधला. त्याचा आपल्यावरचा ‘फोकस’ वाढवण्यासाठी वापर न करता वो तो उसकी हो गयी.

सेलिब्रेटीच्या खाजगी आयुष्यात प्रसारमाध्यमांनी विशेषतः गॉसिप्स मॅगझिन्सनी ‘जरूरत से जादा’ लक्ष घालू नये आणि ‘इतनी सी बात को’ बढा चढा के रंगवू नये, असं ‘अभिनेत्री खासदार’ रेखा हिने राज्यसभेत विधेयक मांडलं आणि त्याला ‘खासदार अभिनेत्री’ जया बच्चन हिने अनुमोदन दिलं. (रेखा सर्वकालीन सर्व जागी अभिनेत्री असते. म्हणूनच तिचा उल्लेख करताना ‘अभिनेत्री’ असं प्रथम म्हटलं.)

विदेशात ‘नाचा-नाच’ करणार्या मराठीच्या ‘कौतुक सोहळ्या’साठी मराठी चित्रपटापासून खूप दूरवर असणार्यांना दूरच ठेवलं गेलं आणि मराठी चित्रपटांशी बांधिलकी, निष्ठा, प्रेम असणार्यांना आवर्जून नेलं गेलं. सगळं कसं योग्य आणि सुसंगत घडलं.

वाढत्या वयाचा तरी विचार करून सलमान खानने लग्न केलं, त्याने लग्न केलं म्हणून त्याचे चाहते प्रेमाने ‘जय हो’ म्हणाले. त्याचीही ‘तू लग्न कधी करणार’ या प्रश्नातून सुटका झाली. किंचितशाही भांडणाशिवाय ‘बिग बॉस’चं आठवं सत्र पार पडलं. ‘घरात कोंडून घ्यायला तयार असणारे कलाकार निवडताना ‘हुकूमी भांडकुदळपणा’ हा गुण दुर्लक्षित ठेवला.

आपल्या बुद्धिवादी अभिनेता अशा स्वतःच घडवलेल्या प्रतिमेशी प्रामाणिक राहून आमिर खानने त्या ‘क्लास’ला साजेशा चित्रपटातून भूमिका साकारली आणि यापुढे आपण ‘मंगल पांडे’, ‘गजनी’, ‘धूम ३’ अशा सामान्य दर्जाच्या चित्रपटातून भूमिका साकारणार नाही असा निश्चय केला आणि त्या निश्चयाला तो सॉलिड चिकटला.

‘मन्नत’ बंगल्याबाहेर चाहत्यांना ‘साध्या दर्शना’साठी वाट पाहायला लावायची आणि बंगल्याच्या मागच्या बाजूला प्रसारमाध्यमांच्या गर्दीलाही तसाच दोन तासांचा इंतजार घडवायचा आणि मग त्याच त्याच स्वतःभोवती कौतुकाची आरती ओवाळून घ्यायची, गोडधोड मुलाखत द्यायची असा वाढदिवस आपण साजरा करणार नाही असं शाहरुख खानने जाहीर केलं आणि त्याला चक्क स्वस्थ बसणं जमलं. ‘गप्प शाहरुख’ हा खूपच मोठा सांस्कृतिक धक्का ठरला. शिल्पा शेट्टीचं किंचित किंचित वजन वाढलं. म्हणून तिच्या फिटनेसवर त्याचा परिणाम दिसू लागला आणि त्याचा तिच्या हसण्या-खिदळण्यावर परिणाम झाला. महाखर्चिक हिंदी चित्रपटासाठी मल्टीप्लेक्समध्ये जास्तीत जास्त खेळ अडवले म्हणून न घाबरता त्यातूनच मिळालेल्या एखाद्या खेळासाठी मराठी चित्रपटाला दणकून गर्दी झाली आणि ते पाहून मल्टीप्लेक्स चालकाने अगदी ‘मनसे’ हिंदी चित्रपटाचे खेळ कमी केले.

‘पुरानी दुश्मनी’ विसरून पटकथाकार सलीम-जावेद पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी ‘बच्चन कुटुंबा’साठी ‘एक नयी दिवार’ हा चित्रपट लिहिला. अमिताभ, जया, अभिषेक, ऐश्वर्या हे प्रत्यक्ष नात्यातील भूमिकांत या चित्रपटात दिसणार. त्या निमित्ताने एबीसीएलचंही पुनरुज्जीवन करण्यात आलं. चित्रपटाच्या गुणवत्तेचं ‘योग्य’ मूल्यमापन केल्याने ‘प्रेक्षक संस्कृती’मध्ये सिनेमा साक्षरता रुजेल आणि त्याचा चित्रपटाचा दर्जा सुधारण्यास फायदा होईल, असं लक्षात आल्याने, ‘अवघ्या तीन दिवसांत’ शंभर कोटी कमावले अशा ‘चिल्लर’ बातम्यांकडे दुर्लक्ष वाढलं.

कोणीही उठावं आणि कोणालाही पारितोषिक द्यावं ही गोडधोड प्रथा बाजूला ठेवून फक्त मान्यवर आणि परंपरागत पारितोषिकंतेवढी ‘चालू’ ठेवावीत असं ठरलं आणि त्याचं चित्रपटसृष्टीत सर्व घटकांनी स्वागत केलं. अनेकांनी तर गतवर्षात मिळालेली ‘चालू’ पारितोषिकं विनयाने परतदेखील केली.

आपण सेलिब्रेटीज् आहोत म्हणजे आपण टूथपेस्ट कोणाची वापरतो अशा अत्यंत खाजगी गोष्टीची चर्चा होणार नाही असं हिंदी चित्रपटसृष्टीतील काही तारकांनी ठरवलं. तर आपण आपल्या प्रियकराला कसं फुटवलं हे लोकांसमोर आल्याने मी घाबरत नाही, काही झालं तरी मी सेलिब्रेटीच आहे, माझी प्रत्येक ‘इतनी सी बात’ देखील ‘हॉट न्यूज’ व्हायलाच हवी असा काही मराठी तारकांनी चंग बांधला…

२०१४ साली यापैकी काहीही घडण्याची शक्यता ‘शून्य’ आहे. त्यामुळे बाकीचं जे जे काही घडेल/पडेल/बिघडेल/चावेल/ आपटेल यावर आपलं ‘एकच लक्ष्य’ ठेवू यात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *