वर्ल्ड सोशल फोरमच्या निमित्ताने ब्राझिलच्या सावपावलो इथे गेलो होतो. तिथल्या एका स्टेडियममध्ये वेनन्झुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचं भाषण आयोजित करण्यात आलं होतं. आम्ही काही सहकार्यांनी तिथे जाण्याचं ठरवलं. जथ्थेच्या जथ्थे… हजोरो लोक स्टेडियमच्या दिशेने जात होते. तरुणांचा तर त्यात प्रचंड भरणा होता. दक्षिण अमेरिकेत चावेझ यांची लोकप्रियता किती हे तिथे दिसत होतं. चावेझ यांनी संवाद सुरू केला. लोक प्रतिसाद देत होते, त्यातच चावेझ यांनी गिटार हातात घेतली. गिटार झंकारत मग सुरू झालं त्यांचं गाणं. खरंतर ती स्पॅनिश भाषा कळत नव्हती. पण स्टेडियममधील प्रत्येकजण त्यांच्यासोबत गातानाचं ते चित्र अद्भुत होतं. दक्षिण अमेरिकेतील गरिबी, भेदाभेद याविरुद्ध लढा यशस्वी करत भ्रष्टाचारमुक्त, घटनात्मक राज्यकारभार, संसदीय लोकशाही याची मुळं चावेझ यांनी रूजवली. त्यामुळेच १९९९ ते आयुष्याच्या शेवटापर्यंत म्हणजे २०१३ पर्यंत वेनेन्झुएलाचे अध्यक्ष राहिले. मात्र संयुक्त राष्ट्रसंघातील भाषण असो, की टीव्हीवरील कार्यक्रम असो, ते बिनदिक्कत गाणी म्हणायचे. त्यांच्या ‘हॅलो प्रेसिडेन्ट’ या टीव्हीवरील कार्यक्रमातही ते गायचे. ही गाणी असायची ती परिवर्तनाची, संघर्षाची, जगण्याच्या नव्या उमेदीची. एक सच्चेपणा होता त्यात. त्यांच्या गाण्याचा अल्बमही घराघरात आहे. याच चावेझ यांच्या त्या सभेची आठवण आली ती गेल्या शनिवारी. रामलीला मैदानावर अरविंद केजरीवाल यांनी शपथ घेतली तेव्हा…

इन्सान को इन्सान से हो भाई चारा,

ये ही है काम हमारा…

मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर अरविंद केजरीवाल यांनी थेट गाणं गात जमलेल्या समर्थकांमध्ये उत्साह भरला. हा सगळा सोहळा देशभरातील लोक लाईव्ह पहात होते. पाहणार्यांना हे चित्र अगदी अनोखं आणि आश्चर्यजनक होतं. मुख्यमंत्री गातो म्हणजे काय? असा सगळ्यांनाच प्रश्न होता. काहींना त्यांचं कौतुक होतं. आपल्याकडे असलेल्या एकूणच राजकीय चौकटीची आपल्यालाही सवय असते. राजकारण्यांचे कायम गंभीर चेहरे आपण पाहात असतो. त्यामुळे पहिल्यांदाच असा अनोखा प्रकार असल्याने अचंबित होणं साहजिकच होतं. पण आता पारंपरिक राजकारण चालणार नाही, त्यात साधेपणा, सच्चेपणा असावा असे काहीसे संकेत यानिमित्ताने अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. आपल्याकडे कलेला दाद देणारे राजकारणी खूप आहेत. विलासराव देशमुख हे दर्दी रसिक होते. सुशिलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील, गोपीनाथ मुंडे, वसंत डावखरे… असे कितीतरी रसिक. प्रत्यक्ष गाणारे राजकारणीही आहेत. मध्य प्रदेशमध्ये लोकप्रिय असलेले मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हेही गायक आहेत. ते अनेक ठिकाणी भजनं गातात.

केजरीवाल यांचं राजकारणातलं पदार्पण, त्यांची राजकीय मांडणी, त्यांचा पक्ष, त्यांची निवडणूक पद्धत आणि त्याचं चिन्हं… या सार्याच गोष्टी त्यांनी ज्या पद्धतीने पुढे आणल्या त्या पारंपरिक चौकटी मोडणार्या होत्या. खरंतर आधी कुणीच गंभीरपणे त्यांना घेतलं नव्हतं. पण दिल्लीत त्यांनी जी धडक मारली त्याने सगळ्यांनाच धडकी भरली. अत्यंत सावध पद्धतीने त्यांनी आपली खेळी चालवली आहे. त्यांच्यासह सात मंत्र्यांचा शपथविधी रामलीला मैदानावर झाला. हेच मैदान अण्णा हजारे आणि केजरीवाल यांनी लोकपाल कायदा आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने गाजवलं होतं. आता त्याच मैदानावर असा शपथविधी पहिल्यांदाच होत होता. शपथ घेतल्यानंतर तिथे असलेल्या माईकचा ताबा घेत केजरीवाल यांनी थेट भाषणच सुरू केलं. त्याही पुढे जात त्यांनी गाणं म्हटलं, त्यांना कोरस द्यायला नवनिर्वाचित मंत्रीही उभे राहिले. मैदानभर झाडू हलत राहिले…

केजरीवाल यांनी मीडियासमोरच खातेवाटप केलं. हे खातेवाटप करताना कुणाला कोणतं खातं हे त्यांनीच जाहीर केलं. हे सगळं पुन्हा आरपार. मग मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. त्यात पहिला निर्णय होता तो मंत्री आणि सनदी अधिकार्यांच्या लाल दिव्यांच्या गाडीवर बंदी घालण्याचा. नऊ अधिकार्यांच्या तडकाफडकी बदल्या. शिक्षण संस्थांतील मॅनेजमेंट कोटा रद्द केला… पहिल्याच दिवशी दे धमाल. अधिकार्यांना चरफडण्याशिवाय काही करता येत नव्हतं. आपल्याला कोणत्या लोकांबरोबर काम करायचं आहे याचा त्यांना अंदाज आला असेलच. जे आपण सिनेमात पाहतो तसं प्रत्यक्ष होताना दिसणं जरा विलक्षणच वाटत होतं. सरकारी बंगला, बडेजाव याला तर फाटाच. त्यामुळे कुणी काही म्हणो देशातील तरुण या सगळ्याने प्रभावित झाला आहे. मात्र असा वेगळा प्रयोग होत असताना त्याचे फायदे आणि तोटे सोबतच असतात.

‘आप’मध्ये जे लोक आलेत ते अनेक प्रवाहातून आलेत. फेसबुकवर एक कॉमेंट बोलकी होती. कुणी गांधीवादी तर कुणी संघाचे कार्यकर्ते होते, तर कुणी समाजवादी चळवळीत. हे सगळे आता ‘आप’मध्ये आहेत. याची प्रचार यंत्रणा मात्र इझम नसलेल्या तरुणांच्या हातात. ‘आप’ला तशी एक तात्त्विक बैठक नाही. अशावेळी गोंधळ उडण्याची शक्यता अधिक. म्हणूनच या सगळ्यांना किमान भारतीय राज्य घटना आणि तिचे विचार याची तात्त्विक बैठक हळूहळू का होईना दिली गेली तरच पुढची दिशा स्पष्ट होऊ शकते. अर्थात हे दीर्घ प्रक्रियेतूनच होणार आहे. आता सत्तेची जबाबदारी पेलणं, ती समजून घेणं यातच वेळ जाणार आहे.

केजरीवाल यांचं सरकार किती दिवस टिकणार? अशा पद्धतीने कारभार कधी चालतो का? भाजप,  काँग्रेससमोर राजकारणात हे लोक टिकतील का? हे प्रश्न सर्वांना पडले आहेत. आता कुठे सरकार स्थापन झालेलं नाही तर ते किती दिवस टिकणार याचीच चिंता व्यक्त होतेय. पण, काही दिवस तरी या मंडळींना द्यायला नकोत का? केजरीवाल आणि त्यांच्या ‘आप’मध्ये कुणीही प्रस्थापित राजकारणी नाही. त्यांना सत्ताच काय पक्ष चालवण्याचाही अनुभव नाही. त्यामुळे पडत-उठत असाच हा कारभार ही मंडळी करणार आहेत. मात्र यातून एक गोष्ट झालीय. राजकारण ही वाईट गोष्ट आहे हा जो काही लोकांचा समज होता तो बदलण्यास मदत होतेय. तरुण यातून प्रभावित झालेत. दुसरं असं की सत्ता ही सरळसाधेपणे वापरता येते. बदलासाठी सत्ता असते हेही यायोगे ठसवता येऊ शकतं. केजरीवाल यांनी जर संयतपणे याबाबत मोहीम केली तर नक्कीच आशेचं चित्र उभं राहू शकेल. आज तरी किमान प्रस्थापित चौकटीला धक्का दिलाय.

आता लगेच भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था किती होईल, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. समजा ही मंडळी फार राज्य करू शकली नाहीत, हा खेळ काही महिन्यांनी संपला तर आनंद कशाचा करायचा? भ्रष्टाचारमुक्ती वा स्वच्छ राजकारण ही एकट्या ‘आप’ची मक्तेदारी आहे का? ‘आप’चं सरकार आलं म्हणून परिस्थिती आता बदलणार असं नाही. सगळी व्यवस्था बदलणं ही दीर्घ चालणारी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेचे आपणही भाग आहोत. यानिमित्ताने ही सुरुवात झालीय एवढंच म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *