अनियंत्रित माध्यमं ही नेहमीच असुरक्षित असतात. त्या माध्यमांवर पसरणारे कोणत्याही प्रकारचे मेसेजेस्, माहिती किंवा दृकश्राव्य स्वरूपातील कोणतंही मटेरिअल अतिशय वेगाने प्रत्येक युझर्सच्या इनबॉक्सपर्यंत पोचत असतं. नेमका असाच काहीसा प्रकार व्हॉट्सअपच्याबाबतीतदेखील आहे. देवयानी खोब्रागडे प्रकरणाचा संदर्भ घेऊन व्हॉट्सअपवर वायरल झालेला फेक व्हिडिओ मेसेज व्हॉट्सअप हॉक्सचं आणखी एक ताजं उदाहरण…

भारताच्या अमेरिकेतील काऊन्सिल जनरल देवयानी खोब्रागडे यांच्या अपमानास्पद अटकेच्याप्रकरणात कधी नव्हे ते भारतीय प्रसारमाध्यमं (लोकसत्ता वगळता) आणि भारत सरकारने अमेरिकेची ज्या पद्धतीने हवा टाईट केली ती निश्चितच आश्चर्याचा धक्का देणारी होती. व्हिएन्ना कनव्हेंनशनुसार मिळणार्या इम्युनिटीचा जराही विचार न करता देवयानी यांना केली गेलेली अटक आणि त्यानंतर स्टँडर्ड प्रोसिजर या गोंडस नावाखाली दिली गेलेली बॉडी कॅव्हिटी सर्चची हीन वागणूक निश्चितच तळपायाची आग मस्तकात आणणारी होती.

देवयानी प्रकरणात नेमका मौका साधून सायबर क्रिमिनल्सनी देवयानी खोब्रागडेंवरील बॉडी कॅव्हिटी सर्चचा एक फेक व्हिडिओ शनिवारी युट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर वायरल केला आणि त्यातून उडालेला गोंधळ अनेकांना मानसिक ताप देऊन गेला. या प्रकरणात न्यूज एक्स या न्यूज चॅनेलचे देवयानीवरील एका पॅकेजसोबत अक्षम्य छेडछाड करून तो प्रसारित करण्यात आला होता. हा फेक व्हिडिओ तयार करणार्यांनी न्यूज एक्स, सीएनएनसारख्या वृत्तसंस्थांच्या लोगोचा वापर करत २००९ साली अमेरिकन पोलिसांनी एका महिलेवर ऑन कॅमेरा केलेल्या अत्याचाराच्या फुटेजेसना देवयानी खोब्रागडेंवर झालेले अत्याचार म्हणून प्रसारित केलं. त्या फेक व्हिडिओमध्ये असलेली पीडित महिला ही ब्लर करण्यात आली होती. मात्र युट्यूबवर दोन्ही व्हिडिओ एकमेकांसोबतच्या कनेक्टेड लिंक्ससोबत पहायला मिळत होते. त्या दोन्ही व्हिडिओज्च्या लिंक्स आणि टायटल्स मी इथे आपल्या पडताळणीसाठी देत आहे.

व्हॉट्सअपवर पसरलेल्या व्हिडिओचे मूळ फुटेजेस हे तुम्हाला खालील लिंक वर पहायला मिळतील. हे व्हिडिओ २००९ साली अपलोड झालेले आहेत आणि त्यांचा खोब्रागडे प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही.

Police Rape Woman on Camera – Hope Steffey – !! Beware Graphic Material !! (टायटल)

http://www.youtube.com/watch?v=4xVP8XO1qKE&feature=youtu.be (लिंक)

२००९ साली एज रेस्ट्रिक्टेड कॅटेगरीत अपलोड झालेला हा व्हिडिओ एकदा पहा आणि त्यानंतर खाली दिलेला फेक व्हिडिओ एकदा पहा. आपल्याला दोन्ही व्हिडिओतील बनावटपणा लगेचच लक्षात येईल.

Watch “Devyani khobragade Police Cavity Search Video 18+” on YouTube – (टायटल)

https://www.youtube.com/watch?v=qpsbUzmsQeM&feature=youtube_gdata_player  (लिंक)

खरं पाहता याआधीही रोवन एटकिंसनच्या मृत्युची खोटी अफवा व्हॉट्सअपवर वायरल झाली होती. दर आठवड्याला व्हॉट्सअप हॉक्सचं एखादं प्रकरण तरी समोर येतच असतं. मात्र यावेळेस प्रकरण साधंसुधं नाही. देवयानी खोब्रागडेंना झालेली अटक आता आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि अमेरिका या दोन ताकदवर लोकशाहींमधील मैत्रीपूर्ण संबंधांना बसलेल्या ब्रेकच्या पार्श्वभूमीवर तपासून पाहिली जात आहे. अशाप्रकारच्या अफवा निश्चितच लोकमन उद्रेकी बनवू शकतं. तसंही व्हॉट्सअप हे काही साधंसुधं अॅप नाही. सोशल मीडियाच्या शृंखलेतील व्हॉट्सअप नावाचं मल्टीमीडिया मेसेजिंगचं अॅप्लिकेशन हे आजच्या घडीला मेसेज सर्व्हिसिंगमधल्या संवादाचं सर्वात स्वस्त माध्यम म्हणून फार अल्पावधितच लोकप्रिय बनलं आहे.

याहू.कॉममध्ये इंजिनिअर्स असलेल्या ब्रायन एक्टन आणि जॅन कोऊम या जोडागोळीने एकत्र येत २००९ साली कॅलिफोर्नियात व्हॉट्सअपची स्थापना केली. अनलिमिटेड शब्दांचे मेसेजेस, इमेजेस, फोटोज्, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स शेअर करता येण्याच्या फंक्शन्समुळे व्हॉट्सअप प्रत्येक स्मार्ट युझरच्या पहिल्या पसंतीचं अॅप्लिकेशन बनलं.

१३ जून २०१३ला ट्विटर केलेल्या एका अधिकृत ट्विटनुसार त्यावेळेस व्हॉट्सअपने दर दिवसाला २७ अब्जांहून अधिक मेसेजेस इनकमिंग आणि आऊटगोईंग झाल्याचा नवा रेकॉर्डच केला होता. १० नोव्हेंबर २०१३ रोजी व्हॉट्सअपने १९ कोटींहून अधिक अॅक्टिव्ह नेटीझन्स आणि ४०० मिलियन युझर्सकडून शेअर केल्या गेलेल्या इमेजेसचा डेटा आणि सोबतच दर दिवसाला १० अब्जांहून अधिक केवळ टेक्स्ट मेसेजेस शेअर होऊ शकेल एवढी अवाढव्य प्रणाली आज व्हॉट्सअप सांभाळत आहे. त्यामुळे व्हॉट्सअप आणि त्याच्या समकक्ष असलेल्या युट्यूबसारख्या सोशल मीडियावर वायरल होणार्या कन्टेटबाबत आपण निश्चितच कमालीची सुरक्षा बाळगायला हवी. त्यासोबत सोशल मीडियावर व्यक्त होतानादेखील योग्य पातळीचं भान राखूनच लिहिलं गेलं पाहिजे.

या प्रकरणावर व्यक्त होताना सोशल मीडियामध्ये मात्र दोन टोकाचे विचित्र सूर जाणवले. एक टोक होतं टीकेचं किंवा उगाच केलं जाणार्या चारित्र्यहननाचं आणि दुसरं होतं ते निषेधाचं. या प्रकरणावर ज्याने त्याने आपआपल्या चष्म्याने व्यक्त होण्याऐवजी न्यायाधीशाचीच भूमिका घेतल्याचं दिसत होतं. उत्तम खोब्रागडे आणि देवयानी खोब्रागडे या भारतीय प्रशासन सेवेतील उच्च पदस्थ बाप-लेकींच्या प्रशासकीय सेवेतील करिअरची शहानिशा करण्याचंच काम सुरू केलं होतं. आदर्श प्रकरणाचा देवयानीच्या अटकेशी काहीही संबंध नसताना उगाचच ओढून ताणून त्यावर अग्रलेख, लेख लिहिणार्यांचा भरणा जरा जास्तच आढळला. मुळात आपण कोणत्या विषयावर आणि कोणाबद्दल लिहित आहोत याचा साधासा अंदाजही न बाळगता अनेकजण सोशल मीडियावर बेफाम वक्तव्यं करत सुटली होती.

वास्तविकतेत अमेरिकेसारख्या हुकूमी लोकशाहीत उपायुक्त असणार्या देवयानींना अगदी अट्टल चोर गुन्हेगारांसारखी अगदी बॉडी कॅव्हिटी सर्चसारख्या थर्ड डिग्री ट्रीटमेंटमुळे खवळून उठलेले नेटीझन्स भारत सरकारच्या एकूण एक कृत्याचं समर्थन करत होते. त्यानिमित्ताने अपडेट झालेले स्टेट्स आणि ट्विट्स सलग ४० तास गुगल ट्रेंड्जमध्ये पहिल्या पाचात होते.

देवयानी खोब्रागडे यांचं चारित्र्यहनन करण्याची एकही संधी जात-पितृसत्ताकवादी मनो(नू)वृत्ती सोडत नाहीये. कृपया आपण विवेकाने काम घ्यावं आणि ती लिंक आपल्या इनबॉक्समध्ये येताच क्षणी डिलिट करावी ही नम्र विनंती… सायबर क्राईम सेल लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावेलच. खरे दोषी लवकरच पकडले जातील अशी आशा धरायला हरकत नसावी. मात्र लोकमन फार उद्रेकी असतं आणि हा विषय आता आंतरराष्ट्रीय राजकारणाशी जोडला गेलेला असल्याने यात अधिक खोडसाळपणा होऊ नये हीच माफक अपेक्षा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *