हां हां म्हणता शेवटी सासवडमध्ये मराठी साहित्य संमेलन धडाक्यात म्हणतात तसं पार पडलं. लोकांना परतीचे वेध लागलेले… आता वेगळे कपडे संपत आलेले… स्वेटर जाम मळलेला… भाषण ऐकून ऐकून एकप्रकारचा बौद्धिक ताण मनावर आलेला… त्यामुळे कधी एकदा घरी जातो, बादलीत साबणाचा फेस करून त्यात रुमालासकट (रुमाल इ- चिकट झालेला असतो) सगळे कपडे बुडवून स्वच्छ डोक्यावरून अंघोळ करून मस्तपैकी भरपूर दुधाचा आलं टाकलेला आपल्या नेहमीच्या कपातून चहा घेतो असं सगळ्यांना झालेलं असावं… बायकांना आपल्याच हातच्या जेवणाची चव आठवली असेल. काहीतरी फोडणीला घातल्याशिवाय आपलं आता काही खरं नाही हे मनोमन पटलं असेल. कोणकोण सतत ‘लाईव्ह’ कार्यक्रम बघून बापडे जेरीला आले असतील. सतत छोट्या पडद्यावर काही ना काही चटक मटक म्हणा, अरबट चरबट म्हणा बघायची सवय झालेली. त्यामुळे कार्यक्रमाचा कंटाळा आल्यावर चॅनेल बदलणारे हात अस्वस्थ झालेले… व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं म्हणतात. त्याप्रमाणे ‘व्यक्ती तितक्या समस्या’ हे पण खरं आहे. कार्यक्रम एकच पण प्रत्येकाची आस्वाद घेण्याची म्हणा किंवा कंटाळण्याची म्हणा पद्धत निराळी. एकंदरीत काय ‘दैनंदिन रूटिनला कंटाळून लोक अशा ठिकाणी येतात आणि मग २/३ दिवसांतच त्या रूटिनची ओढ वाटायला लागते. आपली नेहमीची बसण्याउठण्याची जागा, आपलं घरदार, आपली झाडं, दारासमोरचा रस्ता, मुलांची भांडणं या सगळ्यांचं आपणाला जे व्यसन लागलेलं असतं, त्याविना आपण जास्त काळ कुठे तग धरू शकत नाही. असो.

संमेलानाध्यक्ष फ. मुं. शिंदेंच्या भाषणावर शेवटी टीका झालीच. भाषण खूप कोटीबाज आणि वरवरचं बर्याचजणांना वाटलं. कुणाकुणाला ती सायंकालीन मैफल वाटली. त्याला आता काय विलाज? खरं तर फ.मुं.नी खूप विचारपूर्वक अंतर्मुख होऊन असं भाषण करायचं ठरवलं असणार. कारण सुरुवातीलाच ते मी अत्रेंचा मानसपुत्र आहे, अशा अर्थाचं काही (बाही नव्हे) बोलले होते. मग अत्रेंचा वारस गंभीर का म्हणून बोलेल? (आणि त्याचा उपयोग काय?) म्हणून ते विनोदी लोकप्रिय बोलले आणि त्यांनी सगळ्यांबरोबर स्वतःच्याही मनाचा ताण घालवला. मुख्य म्हणजे त्यांनी जे छापील भाषण वाटलं आणि ‘सवडीने वाचा’ अशी सवलत दिली ते खूप वैचारिक, अंतर्मुख आणि गाभ्याला हात घालणारं आहे. त्याची दखल कोणीच घेतली नाही. पण लोक ते वाचतील हा त्यांचा विश्वास वाखणण्याजोगा आहे. (नाहीतर खूपदा लोक हा वैचारिक खाऊ मंडपातच विसरून जातात. माझा जीव नुस्ता मग वर्षभर हळहळतच राहतो. कागद किती फुकट जातो, त्यासाठी वृक्षतोड किती होते, याचे हिशेब मनात घोंगावत राहतात.)

तर काय सांगत होते… कोट्यांच्या नादात फ.मुं. शिंदे दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करायला विसरले. पण त्या छापील भाषणात तरी हा उल्लेख आहे का याची मला उत्सुकता आहे. कारण त्यांनी ते भाषण मांड ठोकून खूप विचारपूर्वक तासन्तास बसून लिहिलं असणार. त्यातही हा उल्लेख राहिला असेल तर मात्र हा निश्चितच मोठा गुन्हा आहे. कारण या गोष्टीची साधी दखल घेतली गेली नसेल तर मग त्या गोष्टीचे, त्या माणसाचे यांच्या मनात स्थान किती हा प्रश्न उभा राहतो. फ.मुं. शिंदेंच्या निषेधाने फार काही साध्य होणार होतं किंवा होणार आहे असा भाग नाही पण आपल्या माणसाचा असा अकारण घेतलेला बळी यांना अस्वस्थ करत नाही का? एवढंच फक्त…

‘झेंडूची फुले’ हा विडंबनात्मक कवितेचा एक लोकप्रिय कार्यक्रम झाला, असं पेपर वाचून कळलं. कुठेतरी दीपिकाच्या मुलाखतीऐवजी किंवा केतकरांची मुलाखत बर्याचवेळा सगळ्या न्यूज चॅनेलवर दाखवली त्याऐवजी (ती एकदा दाखवून) हा कार्यक्रम दाखवला असता तर फार फार बरं झालं असतं.

संमेलनातल्या राजकीय उपस्थितीबाबत नेहमीप्रमाणे खमंग चर्चा झाली. त्यांना व्यासपीठाखाली पहिल्या रांगेत का बसवलं जात नाही? (बरं भाषणही खूप सुंदर वैचारिक मार्मिक असतं असाही भाग नाही) पुढील संमेलनाध्यक्षांनी याबाबतीत कठोर भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर मी ऐकणार नाही. या संमेलनात खाण्याचा जेवणाचा काय मेन्यू होता हे मात्र प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलं नाही. निदान आम्ही डोळ्यांसमोर कल्पना तरी आणली असती. प्र. के. अत्रे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. सगळ्या कलांमध्ये त्यांची लेखणी खुल्ली. खाण्याच्या बाबतीत ते खवय्ये होते पण खादाड नव्हते. त्यांचं जेवण कमी पण चवीचं होतं. ‘हश्या आणि टाळ्या’ हेच आमचं टॉनिक असं ते म्हणत.

लिहिताना त्यांना काहीतरी खायला लागे. बर्याच वेळा ते तामसी पोहे करून खात. कच्चे पोहे त्यावर मीठ, तेल, तिखट कांदा, लसूण, शेंगदाणे असं घालून ते एकत्र करत आणि मग त्याचा समाचार घेत आणि झकासपैकी लिहित. मी हा प्रयोग बर्याचवेळा केला पण ना तसे पोहे साधले आणि त्यामुळेच ना तसं लिखाणही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *