काही काही मोठ्या लोकांना कुठं काय बोलावं तेच मुळी समजत नाही. त्यापेक्षा आम्ही छोटी माणसं बरी- कुणी कितीही आपटाधोपटा, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतो. उगाच आपलं लोकशाही आहे म्हणून वाणी स्वातंत्र्य गाजवायला जायचं अन् आमचाच ‘ब्यांड’ वाजायचा. नरेंद्र दाभोलकरांचं उदाहरण डोळ्यांसमोर आहे. त्यांच्या मारेकर्यांचा अजून पत्ता नाही. आमचं तसं काही झालं तर मारेकर्यांचाच काय पण आमच्या देहाचाही पत्ता लागायचा नाही अन् त्यामुळे आम्ही सदेह वैकुंठाला गेलो अशीही वार्ता पसरायची. तूर्तास तरी आम्हाला स्वर्ग किंवा वैकुंठाला जायची घाई नाही. वाघ होऊन चार दिवस जगण्यापेक्षा मुंगी होऊन रडत कढत अन् कुढत जगणारे आम्ही… आहे ते बरं आहे! तर विषय चालला होता मोठी माणसं आणि त्यांची ‘अपचनी’ पडणारी वाणी! आता नुकतेच ‘भारतरत्न’ म्हणून गौरवले गेलेले रसायन शास्त्रज्ञ डॉ. सी.एन.राव यांचंच बघा ना, भारतरत्न म्हणजे केवढा मानाचा पुरस्कार! एकदा तो मोरारजी देसाईला दिला गेला म्हणून काय त्याचं महत्त्व कमी होत नाही. तेव्हा तो पुरस्कार तडफेने झडप घालून स्वीकारायचा, आधुनिक राजांचा उदो उदो करायचा. पण नाही… रावांनी चक्क सरकारच्याच धोतराला हात घातला. (सद्यस्थितीत दाढीला हात घातला असं म्हणणंच योग्य ठरेल.) खरं म्हणजे असं रोखठोक तोंडावर बोलण्याची प्रथा मराठी माणसाची! मग भले औचित्यभंग होवो नाही तर आणखी काही होवो! यापूर्वी असं भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मुंबईच्या शिवाजी पार्कवर त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते लाखो लोकांच्या उपस्थितीत देण्यात आलं. तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात होती. नेहरू महाराष्ट्राला मुंबई देण्याच्या विरुद्ध होते. हे काय महर्षींना माहीत नसावं? पण नाही. सत्काराला उत्तर देताना त्यांनी काय म्हणावं तर, ‘सगळं काही आयुष्यात मिळालं आहे. मी तृप्त आहे, आता फक्त याची देही याची डोळा संयुक्त महाराष्ट्र झालेला पहायला मिळावा. नेहरूंचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. खरं म्हणजे न पहाण्यासारखा झाला होता. समर्थ रामदास अस्सल मराठी माणूस. (उगाच का मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असं गर्जत फिरत होते.) पण त्यांचाही मराठी बाणा काही औरच! महाराष्ट्रभर झोळी घेऊन फिरायचं आणि वर बाणेदारपणे म्हणायचं, ‘आम्ही काय कुणाचे खातो रे… तो देव आम्हाला देतो.’

ही बाणेदार उदाहरणं इथेच संपत नाहीत. नेहरू मराठी माणसाला मुंबई देण्याच्या विरोधात आहेत हे पाहिल्यावर त्यांच्याच मंत्रिमंडळात असलेले मराठी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख म्हणजेच सी.डी. देशमुख नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकून पुन्हा तोंडावरच म्हणाले होते, ‘महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात आकस आहे.’ काय म्हणावं अर्थमंत्र्याच्या या अव्यवहारीपणाला? अर्थात केंद्रीय मंत्र्याला मिळणारं भरपूर मानधन, भत्ते इ. काही न घेता केवळ एक रुपया मानधन घेणार्या माणसाकडून दुसरी, तिसरी अपेक्षा करण्यात काय ‘अर्थ’ आहे म्हणा! त्यातल्या त्यात एकच समाधानाची गोष्ट म्हणजे असला ‘बेहिशेबीपणा’ पन्नास वर्षांत कोण्या मराठी मंत्र्याने दाखवलेला नाही.

पेशवाईतही रामशास्त्री प्रभुणे नावाचे एक न्यायमूर्ती होऊन गेले. (खरं म्हणजे, खरं बोलल्याबद्दल त्यांना जावं लागलं.) त्यांनी काय बाणेदारपणा दाखवावा? तर ज्या राघोबा दादांनी त्यांची न्यायमूर्ती म्हणून नेमणूक केली त्या राघोबा दादांनाच नारायणरावांच्या खुनाबद्दल शिक्षा सांगताना, ‘या गुन्ह्याबद्दल देहांत प्रायश्चिताशिवाय दुसरी शिक्षा नाही,’ अशी भर दरबारात गर्जना केली. परिणाम काय झाला? न्यायाधीशपदावरून पायउतार व्हावं लागलं! सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे काय आम्ही रामशास्त्रांना सांगावयास हवं? तसं केलं तर तो उलटा न्याय नाही का होणार? रामशास्त्री बुवांचं उदाहरण जुनं झालं पण वर्तमानकाळातही एक पुरुषोत्तम निघालेच. खरं तर ते महाराष्ट्राचं लाडकं दैवत! लडिवाळपणे आपले लाड करून घ्यायचे, तर नाही. वाणी स्वातंत्र्याचं श्राद्ध घालायला टपलेल्या युती सरकारने देशपांडे कुलोत्पन्न पुरुषोत्तमाला ‘महाराष्ट्र भूषण’ हा मानाचा पुरस्कार दिला. आता तो पुरस्कार सस्मित वदनाने घ्यायचा का नाही? तर नाही त्यांच्यातही त्यावेळी, महर्षि कर्वे, सी.डी. देशमुख, रामशास्त्री, समर्थ रामदास सगळे एकवटून अंगात आले.

पुरस्काराच्यावेळी ‘आदेश’ देऊन वाणी स्वातंत्र्याचं श्राद्ध घालणार्या राडा संस्कृतीच्या विरुद्ध बोलायचं काय काम होतं? मग सेनापतींनीही, ‘झक मारली अन् यांना महाराष्ट्र भूषण दिलं,’ असं दूषण दिलं तर त्यात त्याचं काय चुकलं? चिखलात दगड मारला की आपल्या अंगावर घाण उडणारच! असो, रावांच्या औचित्य भंगावर बोलताना बरंच विषयांतर झालं. टीव्हीवरचे परिसंवाद सतत ऐकल्याचा परिणाम दुसरं काय? तर मुद्दा हा होता की कुणी ‘मान’ किंवा ‘धन’ दिलं म्हणून ही मंडळी त्यांच्या ताटाखालचं मांजर होत नाहीत. (आम्हीही होणार नाही पण आमचे प्रकाशक आम्हाला मानधन देतील तेव्हा ना? एकाने तर पुस्तक प्रकाशित करायला आमच्याकडेच धन मागितलं होतं.)

भारतरत्न मिळाल्यावर सी.एन.रावांनी काय म्हणावं? म्हणे सरकार विज्ञानाच्या विकासासाठी पुरेसे पैसे राखून ठेवत नाहीत. अहो पण राव, पैसा आणायचा कोठून? पैशाचं काय ‘झाड’ असतं का? या देशात लोकशाही आहे. तेव्हा निवडणुका लढवाव्या लागतात. त्यासाठी राजकारण्यांना थोडा का पैसा खर्च करावा लागतो? साड्या वाटाव्या लागतात. (काही ठिकाणी धोतरंपण मागतात.) मंदिर, मशिदीच्या पायर्या कराव्या लागतात, समोरच्याने जो रेट लावला असेल त्याच्या दुप्पट रेटने मतं घ्यावी लागतात, शिवाय कार्यकर्त्यांसाठी रोज संध्याकाळी श्रम परिहारासाठी ‘पिंप’ भरून ठेवावी लागतात. प्रयोगशाळेत संशोधन करण्याइतकं सोपं नाही ते! हा, आता पैसा, धन, संपत्ती, सोनं, नाणं आपल्या देशात नाही असं नाही. तेवढा काही आमचा देश दरिद्री नाही पण हा पैसा, हे धन आमच्या देवांना ऐष आरामासाठी आणि सोनंनाणं नटण्यासाठी लागतं त्याचा विचार नको करायला?

साईबाबा आयुष्यभर साधे राहिले, मग त्यांना सोन्याचं सिहांसन अन् रूपेरी मुकुट नको द्यायला? झालंच तर गाव आडगावच्या मरी आई, जोखाई, काळूबाई यांच्यासाठी पैठण्यांची तरतूद नको करायला? त्यांनी काय गावच्या दरिद्री बाईसारखं गाठी मारलेलं लुगडं नेसायचं? आमचा देश भले गरीब असेल पण आमचे देव गरीब नाहीत. ते टाटा, बिर्लासारखे श्रीमंत आहेत असं आपण जगाला ओरडून नुसतं ओरडून नाही तर, गर्वाने ओरडून सांगितलं पाहिजे. त्या युरोप, अमेरिकेला भले त्यांच्या विज्ञानातल्या प्रगतीबद्दल गर्व असेल पण आमच्याकडेही देव, धर्म, अध्यात्मक, मंत्र, नामस्मरण, उपासना, साधना अन् दैवीशक्तिने भरलेले अन् भारलेले बुवा महाराज, स्वामी, गुरू, सद्गुरू, बापू (काही तुरुंगात काही बाहेर) माता इ. खच्चून भरलेले आहेत. जगाच्या पाठीवर कुठेही आमच्या देशाइतके दैवी स्त्री-पुरुष नाहीत हे गर्व करण्यासारखं नाही काय?

आता काही दीडशहाणे हेही म्हणतात की, आपल्या सगळ्या देव स्थानातली, तीर्थक्षेत्रातली गडगंज संपत्ती आपण विज्ञानाच्या विकासासाठी वापरली तर त्याच्या जोरावर आपण प्रगत होऊन युरोप, अमेरिकेच्या तोंडात मारू शकू. एक तर अशी हिंसक भाषा आपल्यासारख्या अध्यात्मिक देशाला शोभत नाही. दुसरं म्हणजे आपल्याला मुळी विज्ञानाच्या विकासासाठी श्रम आणि पैसा नासवायाची गरजच काय? ते चंगळ संस्कृतीतले पाश्चात्य, वैज्ञानिक शोध लावून आमचं मंगल ‘परभारे’ करतातच की! त्यांनी लावलेले शोध आपोआप आमच्याकडे येतातच ना! म्हणजे असं की, त्यांनी विजेचा शोध लावायचा आपण छानपैकी आपल्या घरात दिवा लावून प्रकाश पाडायचा. त्यांनी पंख्याचा शोध लावायचा आणि आपण आरामात पंख्याखाली वारा घ्यायचा. त्यांनी रेडिओचा शोध लावायचा आणि आपण त्यावर, ‘पराधीन आहे जगती, पूत्र मानवाचा,’ असं सुस्कारा टाकणारं गाणं ऐकायचं. त्यांनी कॉम्प्युटरचा शोध लावायचा आणि आपण त्यावर कुंडली पत्रिका काढायची. त्यांनी मोबाईलचा शोध लावायचा आणि आपण तो जिथे जावू तिथे संगती न्यायचा अन् त्याच्यावर आपण कॉलर ट्युन अन रिंगटोन टाकायची, ‘जेथे जातो तेथे ‘देवा’ तू माझा सांगाती.’ तेव्हा सी.एन.रावसाहेब आपल्याला वैज्ञानिक शोध लावण्यासाठी हातपाय हलवायची मुळीच गरज नाही.

आणि विज्ञानाची काय एवढी शेखी मारता? विज्ञान जिथे संपतं त्याच्यापुढे अध्यात्म सुरू होतं, हे तुम्हाला माहीत नाही काय? हवं असल्यास आमच्या ‘निश्चलानंद’ शंकराचार्यांना विचारा, ते त्यावर ‘अचल’ आहेत. शंकराचार्यांचं कशाला, आचार्यापासून ते कुठल्याही कर्मचार्याला विचारा तेही तेच सांगतील, कारण आम्ही सगळ्या भारतीयांनी पाळण्यातच हे ऐकलेलं असतं की भारत अध्यात्मवादी देश आहे अन् सगळं जग अध्यात्मासाठी भारताकडे आशेने पाहत आहे. ‘पाळण्यात’ सांगितलेलं ‘पाळायला’ नको? खरं तर विज्ञान पाश्चात्यांनी जोपासायचं आणि अध्यात्म आम्ही सांभाळायचं अशी मुळी वाटणीच झालेली आहे. म्हणजे तसा अलिखित ‘करार’च झालाय म्हणाना! पण हे पाश्चात्य एक नंबरचे लुच्चे आहेत. विज्ञानाच्या जोरावर दांडगे होतात अन् आमच्यावर राज्य करतात. हे पाप नव्हे काय? हे पाप आमच्या हातून होऊ नये म्हणूनच आम्ही म्हणजे जनता जनार्दन आणि आमचे नेते विज्ञानाच्या नादी लागत नाही. पण काहीतरी ‘नाद’ हवाच म्हणून मग आमचे नेते कुठल्यातरी बापुंच्या नायगावकरी मिशांना पीळ द्यायला जातात. तुरुंगातून सुटून आल्यावर अन् मग साळसूदपणे धर्माचार्य झालेल्या एखाद्या बाबांपुढे दंडवत घालतात, हवेतून अंगठी काढणार्या बाबाला लुंगी नेसवतात. पण त्याचं कौतुक म्हणजे, ते होतं न होतं तोच ते, जोतिबा फुल्यांची पुण्यतिथी साजरी करायला धावतात. (यालाच, पाणी तेरा रंग कैसा जिस मे मिलावे तैसा, असं म्हणत असतील काय?)

तेव्हा ‘राव’साहेबांनी विज्ञानाकडे सरकारचं दुर्लक्ष होतं म्हणून उगाच कावकाव करू नये. विज्ञानाचं श्राद्ध आम्ही कधीच घातलेलं आहे. आता अध्यात्माच्या कावळ्याची वाट फक्त बघतोय, त्यांना जरा उशीर होतोय कारण देशभर विज्ञानाचं श्राद्ध चालू आहे.

– चंद्रसेन टिळेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *