मुंबई हरली. महाराष्ट्राविरुद्ध हरली. रणजीच्या इतिहासात आजवर दोन्ही टीम एकूण ६२ वेळा एकत्र आल्या आणि त्यापैकी महाराष्ट्राचा हा केवळ तिसरा विजय ठरलाय. इतकंच काय बाद फेरीत महाराष्ट्राने पहिल्यांदाच मुंबईला लोळवलंय आणि हे सगळं घडलं ते मुंबईत. मुंबईला मुंबईच्या मैदानावर लोळवण्याची मर्दुमकी महाराष्ट्राने दाखवलीय. गेल्या १७ वर्षांत पहिल्यांदाच महाराष्ट्राचा रणजी संघ सेमी फायनलमध्ये धडकलाय. यावरून महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक विजयाचं महत्त्व कळू शकतं.

खेळात हारजीत ही होत असतेच पण महत्त्व असतं ते तुम्ही कशी लढत दिली याला. मुंबईची टीम महाराष्ट्रविरुद्धच्या या क्वॉर्टर फायनल मॅचमध्ये पूर्ण हतबल दिसली. विशेष म्हणजे यजमान मुंबईच्या टीमने पहिल्या डावात आघाडी घेऊनही हा सामना गमावला. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबईच्या टीमने आत्मघात केला.

महाराष्ट्राच्या टीमचे हिरो होते ते केदार जाधव आणि विजय झोल. केदारने दुसर्या डावात नाबाद १२० रन्स केल्याच. पण विजय झोलसोबत २१५ रन्सची भागीदारीही केली. महाराष्ट्रासाठी रणजी इतिहासातील ही आजवरची कोणत्याही विकेटसाठीची विक्रमी भागीदारी ठरली. यापूर्वी १९४०-४१ म्हणजे ६३ वर्षांपूर्वी कमल भांडारकर आणि रंगा सोहोनी यांनी २०४ रन्सची सलामी दिली होती. त्याचवर्षी महाराष्ट्राने शेवटची रणजी ट्रॉफी जिंकली होती. केदारचं यंदाच्या मोसमातील हे पाचवं रणजी शतक आहे. तर ९१ रन्सवर नाबाद राहणार्या विजय झोलने यंदाच्या आशियाई चषक विजेत्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. केदार जाधवने मुंबईच्या शार्दुलला स्क्वेअर लेगला खणखणीत चौकार पेश करत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पण त्याची संपूर्ण इनिंग लाजवाब अशीच होती. विशेषतः मुंबईचा लेफ्ट आर्म स्पिनर विशाल दाभोळकरला केदारने खेचलेल्या तीन सिक्सेस अफलातून अशाच होत्या.

मुंबईच्या पहिल्या डावातील ४०२ रन्सच्या प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्राची टीम पहिल्या डावात २८० रन्सच करू शकली होती. मुंबईच्या सूर्यकुमार यादवच्या १२० रन्सच्या शतकी खेळीमुळे मुंबईला ही मजल मारता आली होती. पण १२२ रन्सची ही आघाडी मुंबई टिकवू शकली नाही. मुंबईचा दुसरा डाव अवघ्या १२९ धावांत पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. विजयासाठी २५२ रन्सचं टार्गेट तसं अवाक्यात होतं. केदार जाधव सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने अगदी अलवार हे आव्हान पेललं. ४० वेळा रणजी स्पर्धा जिंकणारी हीच का ती मुंबईची टीम असा प्रश्न पडावा इतपत मुंबईचा खेळ वाईट होता.

आता या पराभवाचा बाप शोधण्याचा प्रयत्न सुरू होईल. पराभवाचं खापर फोडण्यासाठी एक बकरा लागतोच. येणार्या आठवड्याभरात हा बकराही आपल्याला कळेलच. पण त्यातून मुंबई क्रिकेटचं काही भलं होणार आहे का? गंमत बघा, मुंबईच्या टीमने क्रिकेटच्या मैदानावर महाराष्ट्राविरुद्ध नांगी टाकलेली असतानाच तिकडे मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे देण्यात येणारा बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स अॅवॉर्डचा किताब स्वीकारत होते. मैदानावर या टीमची दाणादाण का उडाली यावर विचार करायला कुणालाच फुरसत नाहीय.

यंदाच्या हंगामात मुंबईच्या टीमची कामगिरी ही मृत्युशय्येवर आचके देणार्या रुग्णासारखी होती. त्या रुग्णाचा कार्डिओग्राम जसा झपाट्याने वर-खाली होत असतो तशी मुंबईची कामगिरी होती. यंदाच्या हंगामात अभिषेक नायरच्या नेतृत्वाखालील मुंबई टीमने अगदी झारखंडसारख्या दुबळ्या टीमकडूनही पहिल्या डावात आघाडी गमावली होती. त्यानंतर नायर जखमी आहे असं सांगून त्याला कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. मग सुरू झाले ते कॅप्टन्सीचे प्रयोग. झहीर खानने मुंबईचं नेतृत्व केलं आणि व्हाईस कॅप्टन होता तो आदित्य तरे.

ज्याला याआधी कॅप्टन्सीचा कोणताही अनुभव नव्हता आणि ते सुद्धा संघात न्यूझीलंडविरुद्ध भारतीय अ संघाचं नेतृत्व ज्याच्याकडे सोपवण्यात आलं होतं त्या अभिषेक नायर अथवा भारताच्या अंडर २३ टीमचं नेतृत्व केलेला सूर्यकांत संघात असताना. कॅप्टन्सीचे निर्णयही मुंबईला मारक ठरले. गुजरातविरुद्धच्या मॅचमध्ये मॅच विनर असणार्या इक्बाल अब्दुल्लाच्या वाट्याला महाराष्ट्रविरुद्धच्या मॅचमध्ये वाट्याला आल्या फक्त १० ओव्हर्स. पहिल्या इनिंगमध्ये आठ तर दुसर्या इनिंगमध्ये दोन ओव्हर्स. सगळंच अनाकलनीय.

संघातील सीनिअर खेळाडू आणि कोच सुलक्षण कुलकर्णीतील विसंवाद जगजाहीर… अशावेळी टीम म्हणून मुंबईची टीम मैदानात दिसलीच नाही.

मुंबईच्या क्रिकेटमध्ये वाढत असलेल्या बाह्य दबावाचा फटका टीमला बसलाय असं हलक्या आवाजात म्हटलं जातंय. हा आवाज खूप क्षीण आहे. पुराव्यानिशी बोला असं म्हणणारी माणसं राज्य करतायत. अशा कारभारात पुरावा मागे न सोडण्याची हातोटी एव्हाना सार्यांनाच आलेली असते. पण हा आता क्षीण वाटणारा आवाज वादळासारखा घुमू लागण्याच्याआधी कठोर निर्णय घेतले गेले पाहिजेत. मुंबईच्या क्रिकेटपुढे कुणीच मोठं नाही… खेळाडूही नाहीत आणि क्रिकेट प्रशासक तर नाहीच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *