इमानदारीने निवडणूक लढता येते आणि जिंकूनसुद्धा दाखवता येते… हा नवा क्रांतिकारी इतिहास माझ्या पिढीला पहायला मिळाला ही घटना नक्कीच या काळासाठी एक मोठी बाब आहे. अरविंद केजरीवाल या सामान्य माणसाने हे करून दाखवलं. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहचण्यासाठी हजारो कटकारस्थानं करत करत आपली अख्खी हयात घालवणार्या कित्येकांना तर दोन वर्षांच्या मेहनतीवर इतकं मोठं होता येतं, यावर केजरीवालांचा आता शपथविधी झाल्यावरही विश्वास ठेवणं अशक्य झालंय.

सामान्य माणसाला गृहीत धरणं काय असतं हे या विजयामुळे अधिक गडदपणे अधोरेखित झालं आहे. मुळात एकट्यादुकट्या सामान्य माणसाची ताकद अशी ती काय मोठी असणार… मात्र हाच सामान्य जेव्हा गर्दी होऊन रस्त्यावर येतो तेव्हा त्याच्या आवाजाने चांगल्या चांगल्यांना कशा कानठळ्या बसू शकतात याचं उदाहरण जगाला दिल्ली निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आलं… ‘मेरे सिने मे नहीं तो तेरे सिने मे सहीं… हो कही भी आग लेकीन आग लगनी चाहीये…’ या दुष्यंत कुमार यांच्या ओळींमधला बदल निर्माण करण्याचा विचार ज्या वेळी एकामेकांच्या डोक्यात उगवू लागतो अगदी त्याचवेळी केजरीवालसारख्यांची ओळख समाजात अधिक गडदपणे प्रतिबिंबित व्हायला लागते.

मात्र कुठल्याही समाजात नेतृत्वाची निर्मिती त्या समाजातल्या गर्दींमुळे किंवा त्या नेतृत्वाच्यामागे असणार्या कार्यकर्त्यांमुळे होत असते असं म्हणणं तितकंसं न्यायिक ठरणार नाही. त्या त्या समाजात निर्माण होत जाणारी अन्यायी आणि जटिल परिस्थितीच अशा नेतृत्वाला जन्माला घालत असते. परंतु हेही तितकंच खरं आहे की निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीला नेतृत्वासाठी अनुकूल बनवण्याची ताकद ठेवणारा एखाद् दुसराच अशा संधीचं सोनं करू शकत असतो… केजरीवाल यांच्यात ती ताकद होती आणि आहे म्हणूनच एवढ्या मोठमोठ्या ताकदी केजरीवाल यांना चीफ मिनिस्टर ऑफ देल्ही (दिल्ली) होण्यापासून जरासुद्धा रोखू शकल्या नाहीत. सातत्य, साधेपणा, प्रचंड संयम आणि यांच्या जोडीला असलेल्या पराकोटीच्या विनम्र भाषेमुळे अरविंद जनमानसात जलदगतीने प्रवाही झाले… कट्टर विरोधकाचंही नाव घेताना त्या नावपुढे ‘जी’ हा शब्द लावायला ते विसरत नाहीत. दिखाव्याच्या या दुनियेत ‘दिसणं’ यापेक्षा ‘असणं’ किती महत्त्वाचं असतं हे त्यांनी दाखवून दिलं. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे असतो… कोणत्या आणि कशा भूमिका घेऊन आपण जगतो याला केजरीवाल यांनी अधिक झुकतं माप दिलं.

केजरीवाल यांच्याप्रमाणेच भारतात आणखी एक नाव लोकांनी डोक्यावर नाचवलं होतं. ते नाव होतं जॉर्ज फर्नांडिस… एका आवाजात देश बंद करायची ताकद या माणसात होती… झुकणं त्यांना माहीत नसायचं… एखादं काम होत कसं नाही… ही एकच जिद्द त्यांच्यात संचारलेली असायची. केजरीवालांसारखाच साधेपणा त्यांच्याही अंगात होता. दोन जोड कपडे एवढीच काय ती त्यावेळेला त्यांची प्रॉपर्टी होती. एक ड्रेस अंगावर तर मळलेला दुसरा स्वतःच धुऊन वाळायला टाकण्याचा त्यांचा नित्यक्रम असायचा. अरविंद  केजरीवालसारखी माणसं जॉर्ज यांच्याच कबिल्यातली… मागे हटणं यांना समजत नाही… निराशा यांच्या रक्तात नसते… होतंच काय माझ्याकडे म्हणून लढताना गमवण्याची भीती सतावत राहील हा असा विचारच या लढवय्यांमध्ये मोठी आग निर्माण करत जातो. मग या आगीत सारं सारं वाईट आपोआप नष्ट होऊन जातं… वाईटपणा संपवण्यावर या अशा लोकांचा भर असतो. वाईट माणूस नाही… कारण ही लढाईच असते वृत्तीविरुद्धची, व्यक्तिविरुद्ध नाही. जॉर्ज फर्नांडिस याच वृत्तीने काम करायचे. नंतरच्या कालावधित राजकारणाची यथार्थता त्यांना काही भूमिका वठवण्यासाठी कारणीभूत ठरली ही बात अलाहीदा… मात्र सुरुवातीपासून वक्तृत्वाची धार आणि अंतःकरणातली आग जॉर्ज यांनी कधीच संपू दिली नाही. प्रत्येक दिवशी उगवायचंच असतं हे अशा माणसांना माहीत असतं.

एकमात्र खरंय की या देशात कांशिराम असोत, जॉर्ज असोत की केजरीवाल असोत या अशा लोकांना लोकांनी तनमनधनाने पाठिंबा ज्या ज्या वेळी दिला ती ती वेळ प्रस्थापितांना चांगलाच धडा शिकवणारी राहिली… त्याग आणि समर्पण या दोन घटकांना सतत कृतित ठेवल्यावर एक साधी व्यक्तिदेखील इतिहास निर्माण करू शकतो हेच यावेळी पुन्हा एकदा सिद्ध झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *