२०१३ हे वर्षं बॉलिवूडसाठी खूपच चांगलं गेलं. ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाने आतापर्यंतचं सर्वात जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. बॉलिवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीतही एक विक्रम झाला. आतापर्यंत कोणत्याही मराठी सिनेमाने २५ कोटींचा  गल्ला जमवला नव्हता. पण ‘दुनियादारी’ चित्रपटाने २५ कोटींचा टप्पा पार केला. तसंच ‘बालक पालक’ या चित्रपटानेही चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. तसंच राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही मराठी चित्रपटाने बाजी मारली. ‘धग’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, उषा जाधवला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर विक्रम गोखले यांना ‘अनुमती’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर बॉलिवूडमध्येही ‘क्रिश३’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘धुम३’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘ऌगँ्रड मस्ती’, ‘रेस२’, ‘आशिकी२’, ‘लंच बॉक्स’ यांसारख्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं. तर ‘पानसिंग तोमार’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि याच चित्रपटासाठी इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

२०१३ मध्ये बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट आल्यामुळे आता प्रेक्षकांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. २०१४ मध्ये अनेक मोठ्या बॅनरचे आणि कलाकारांचे चित्रपट येणार आहेत. सलमान खान याचा २०१३मध्ये कोणताही चित्रपट न आल्यामुळे त्याच्या फॅन्सची काहीशी निराशा झाली होती. पण या वर्षात ‘जय हो’ आणि ‘किक’ हे त्याचे दोन चित्रपट येणार आहेत. ‘जय हो’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सोहेल खानने केलं असून या चित्रपटात तब्बूचीही प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट जानेवारीला प्रदर्शित होत आहे तर साजिद नाडियाडवालाचं दिग्दर्शन असलेला ‘किक’ हा चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातील दीपिका आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती आणि यावर्षी प्रदर्शित होणार्या ‘हॅपी न्यू इअर’मध्येही हीच जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन फराह खान करणार आहे.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील कतरिना आणि हृतिकची जोडी खूप गाजली होती आणि आता याच जोडीचा ‘बँग बँग’ हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कतरिना कैफचा ‘फॅन्टम’ हा चित्रपटही यावर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान आहे. आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. सैफ अली खानचे तर या वर्षात तीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘हॅपी एन्डिंग’ या चित्रपटात त्याच्यासोबत गोविंदा, एलियाना डिक्रूझ, रणवीर शौरी, कल्कि कोचलिन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर त्याच्या ‘हमशकल्स’मध्ये रितेश देशमुख, बिपाशा बासू, राम कपूर आहेत. या चित्रपटात सैफ, रितेश आणि राम हे तिघेही तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट संजीव कपूर आणि देवेन वर्मा यांच्या ‘अंगूर’ या चित्रपटावर बेतलेला आहे. तर ‘फाईंडिंग फॅनी फर्नांडिस’ या चित्रपटाचा सैफ निर्माता आहे. हा चित्रपट जुलैत प्रदर्शित होणार असून दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, नसिरूद्दिन शहा यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटांचा सिक्वल येण्याचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. २०१४ मध्येही आपल्याला हा ट्रेंड पहायला मिळणार आहे. ‘प्यार के साईड इफेक्ट्स’ या चित्रपटाचा सिक्वल असलेला ‘शादी के साइड इफेक्ट्स’ हा चित्रपट यावर्षी आपल्याला पहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे विद्या बालन आणि फरहान अख्तरची जोडी पहिल्यांदाच झळकणार आहे. तर अजय देवगणच्या ‘सिंघम’चा सिक्वल असलेला ‘सिंघम२’ ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसंच अजय देवगण प्रभूदेवाच्या ‘अॅक्शन जॅक्सन’ या चित्रपटातही झळकणार आहे. प्रभूदेवाची लाडकी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात अजयसोबत आहे. अॅक्शन हिरो अक्षय कुमार याचेही ‘इटस् एन्टरटेन्मेंट’ आणि ‘हॉलिडे’ हे दोन चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. ‘हॉलिडे’मध्ये सोनाक्षी सिन्हा तर ‘इटस् एन्टरटेन्मेंट’ या चित्रपटात तमन्ना त्याच्यासोबत झळकणार आहे.

चेतन भगतच्या ‘थ्री मिस्टेक्स् ऑफ माय लाईफ’ या पुस्तकावर आधारलेला ‘काय पो छे’ हा चित्रपट २०१३मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता ‘टू स्टेट्स’ या गाजलेल्या पुस्तकावर आधारित ‘टू स्टेट्स’ हा चित्रपट एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि आलिया भट आहेत. तर ‘मुंबई फॅबल्स’ या पुस्तकावर आधारित ‘बॉम्बे व्हेलवेट’ डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘बॉम्बे व्हेलवेट’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात करण जोहर अभिनय करणार आहे. तसंच या चित्रपटात रणबीर कपूर, अुनष्का शर्मा, के के मेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमच्या आयुष्यावर ‘मेरी कोम बायोपिक’ हा चित्रपटही यावर्षी प्रदर्शित होईल. प्रियांका चोप्रा या चित्रपटात मेरी कोमची व्यक्तिरेखा साकारत आहे. तसंच परिणती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा यांचा ‘हसे तो फसे’ हा चित्रपट फेब्रुवारीत तर वरूण धवन, एलियाना डिक्रूझ, नर्गिस फाकरी यांचा ‘मैं तेरा हिरो’ हा चित्रपट एप्रिलला प्रदर्शित होत आहे. ‘थ्री इडियट’ या चित्रपटनंतर राजकुमार हिरानी आणि आमिर खान यांची जोडी ‘पी.के.’ हा चित्रपट घेऊन येत आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून खूपच अपेक्षा आहेत.

मराठीत तर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ‘टाईमपास’ हा रवी जाधवचा चित्रपट येत आहे. यात केतकी माटेगांवकर आणि प्रथमेश परब पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणार आहेत. तर उर्मिला मातोंडकर हिचा ‘आजोबा’ हा चित्रपट याच वर्षात प्रदर्शित होत आहे. उर्मिलाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. रितेश देशमुखही ‘लय भारी’ या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करत आहे. तसंच या चित्रपटात सलमान खानही पाहुणा कलाकार म्हणून आहे. वीणा जामकर, श्रुती मराठे, नीना कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दृष्टीदान’, देवेंद्र चौगुले आणि दिपाली सय्यद यांचा ‘वेलकम टू जंगल’, भरत जाधव आणि विजू खोटे यांचा ‘फेकम फाक’ हा चित्रपटही या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

एकूणच बॉलिवूड आणि मराठी प्रेक्षकांसाठी या वर्षी चांगल्या चित्रपटांची मेजवानी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *