वैवाहिक जीवनात कामक्रियेचं महत्त्व वाढण्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब करायला हवा?

स्त्री-पुरुषाचं लैंगिक क्रियेच्या निमित्ताने मिलन होतं तेव्हा त्यांना या क्रियेतून अलौकिक असं शारीरिक, मानसिक आणि आत्मिक समाधान मिळतं, यालाच यशस्वी ‘कामजीवन’ म्हणतात. यशस्वी, वैवाहिक जीवनाचं गमक कामक्रियेतच आहे. नवविवाहित जोडप्यांचा कामक्रियेतील उत्साह, सहभाग मोठा असला तरी यात अतिउत्साहामुळे नुकसान होण्याचा संभव असतो. त्यामुळे कामक्रियेतून पती-पत्नी दोघांनाही समाधान मिळणं महत्त्वाचं ठरतं. परस्परांकडून शरीरसुख मिळणं ही वैवाहिक जीवनातील महत्त्वाची गरज आहे. पती-पत्नीने एकमेकांचा आदर ठेवून, समजूतदारपणा दाखवून, इच्छेचा विचार करून कामक्रियेत सहभाग घ्यावा. पूर्वीच्या काळात स्त्रिने शरीरसंबंधांची इच्छा प्रकट करणं म्हणजे गुन्हाच समजला जात असे. शरीरसुखाची इच्छा फक्त पुरुषानेच व्यक्त करायची असा संकेत असे. कामक्रियेत पुरुषाचीच मक्तेदारी दिसून यायची. खरं पाहता या क्रियेत स्त्रिने पुढाकार घेतला तर काहीच गैर नाही. शारीरिक सुखाची भूक स्त्री-पुरुष दोघांनाही सारखीच असते. वैवाहिक जीवनात स्त्रिला शरीरसुख मिळालं नाही तर त्याचा वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम होतो. घरात सतत चिडचिडेपणा, पती-पत्नीत भांडणं होणं अशा प्रकारात वाढ होते. पती, पत्नीला शरीरसंबंधांत समाधान देऊ शकत नसेल तर त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. तो आपल्यातील कमतरता लपवण्याचा प्रयत्न करतो. जुन्या विचारांचा मनावर पगडा असल्यामुळे या समस्येविषयी वाच्यता करत नाही किंवा डॉक्टरांकडे जाण्याचंही टाळतो. या विषयाच्या माहितीअभावी छोट्या दोषाचं रूपांतर गंभीर समस्येत होतं. अशावेळी कामक्रियेतील अपयशामुळे निर्माण झालेल्या समस्या लैंगिक तज्ज्ञांच्या समुपदेशनाने आणि योग्य उपचाराने दूर होऊ शकतात.

विवाहाला पाच वर्षं झाली असून आता मूल हवं आहे. त्यादृष्टीने संबंधांचा सुरक्षित काळ कोणता?

स्त्रियांच्या शरीरात घडून येणार्या जीवशास्त्रीय चक्रामध्ये काही दिवस गर्भधारणेला अनुकूल असतात याची अनेक जोडप्यांना माहिती नसते. तसंच लैंगिक जवळीक घडूनही गर्भधारणा होत नसलेल्या (सेफ पिरिअड) कालखंडाचीही त्यांना जाणीव नसते. एका जोडप्यातील पुरुषाने तर दर महिन्यातील दोन-तीन दिवस वगळता दररोज, एवढंच नव्हे तर पत्नीच्या मासिक पाळीदरम्यानही लैंगिकक्रीडेत सहभागी होत असल्याची माहिती दिली. एवढे प्रयत्न करूनही अपत्यप्राप्ती होत नसल्याबाबत या जोडप्याने खंत व्यक्त केली. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याकडील कामजीवनासंबंधी माहितीचा अभाव. अपत्यप्राप्तीसाठी उत्सुक जोडप्याने मासिक चक्राच्या दहा ते वीस दिवसात लैंगिकक्रीडेत सहभागी होणं आवश्यक आहे. या संबंधांतही पुरेशी उत्स्फूर्तता तसंच उत्साह आवश्यक आहे. कारण याच दिवसांत गर्भधारणा होण्याची जास्त शक्यता असते. मासिक चक्रातील बारा ते सोळा हे दिवस स्त्री-पुरुषांच्या बीजाचं मिलन होण्याच्या दृष्टीने अनुकूल असतात. इतर दिवसांमध्ये या जोडप्यांनी लैंगिकक्रीडेत सहभागी झालं नाही तरी चालतं. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री-पुरुषांमधील जवळीक कमी होऊ लागली आहे. आजकाल धावपळीच्या आयुष्यामुळे लैंगिकक्रीडेत सहभागी होण्यासाठी शरीरात विशेष त्राण उरलेला नसतो. कधी लैंगिक संबंध घडून आला तरी त्यात उत्स्फूर्ततेचा अभाव असतो. यातच गर्भधारणेसाठी अनुकूल काळही जोडप्याच्या हातून निसटतो. सकस, चौरस आहाराचा अभाव, धकाधकीची आधुनिक जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अनियंत्रित ताणतणाव या कारणांमुळे लैंगिकक्रीडेवर परिणाम होतो. अनेक जोडपी या मूलभूत कारणांचा विचार करण्याऐवजी ‘ओव्ह्युलेशन पिरिअड’, ‘फॅलोपिन ट्यूब ब्लॉकेज’ अथवा ‘स्पर्म काऊंट’ अशा तांत्रिक बाबींमध्ये विनाकारण गुंतून पडतात. त्याऐवजी लैंगिक संबंधांविषयी नेमकी माहिती घेणं आणि त्यानुरूप शारीरिक सुखाचा आनंद घेणं केव्हाही हिताचं ठरतं.

प्रजननक्षमता वाढवण्यासाठी काय करावं?

अतिरिक्त मानसिक तणावामुळे शरीरात कोर्टीसोल नामक हार्मोन निर्माण होतात. या हार्मोन्सचा परिणाम शुक्राणुंची संख्या कमी होण्यावर होतो. यासाठी कायम तणावमुक्त राहणं आवश्यक असतं. अनेकांना गरम पाण्याच्या टबमध्ये बसून स्नान करण्याची सवय असते. यामुळे शुक्राणुंची संख्या वेगाने कमी होते. शरीराचं तापमान सामान्यापासून एक अंश सेल्सिअस इतकं जादा झालं तरी शुक्रजनन क्रियेमध्ये गडबड होते. यासाठी नेहमी थंड पाण्याने स्नान करावं. शरीराचं तापमान कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. कॉफीसेवनामुळे प्रजननक्षमतेवर वाईट परिणाम होतो, असा गैरसमज आहे. स्त्रियांबाबत ही गोष्ट खरी असली तरी पुरुषांबाबत कॉफी लाभदायक ठरते. कॉफी पिणार्या पुरुषांमध्ये शुक्राणुंची संख्या अधिक गतिशील असते, असा निष्कर्ष आहे. उत्तेजकता वाढण्यासाठीही कॉफीचा चांगला उपयोग होतो, असं लक्षात आलं आहे. गर्भवती महिलांनी धुम्रपान केल्यास त्याचा परिणाम गर्भातील शुक्राणुवाढीवर होतो. या सवयीमुळे शुक्रजनन वाढण्यासाठी आवश्यक असणार्या डी.एन.ए. नष्ट होतात. शुक्राणुंच्या नियमित वाढीसाठी व्हिटॅमीन ‘सी’चा वापर उपयुक्त ठरतो. फळं, ताज्या भाज्या, संत्र्याचा रस याद्वारे व्हिटॅमीन ‘सी’ मिळतं. अतिरिक्त मद्यपानामुळे टेस्टोस्टीरोन नामक हार्मोन्सची पातळी कमी होते आणि त्यामुळे शुक्राणुंची संख्याही कमी होते. रोज किमान तीन लिटर पाणी पिण्यामुळे प्रजननक्षमता वाढते. पौष्टिक आहार प्रजननक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. आहारात फळं, पालेभाज्या, दूध, डाळी, लोणी तसंच चणा, मूग, मटार यासारख्या कडधान्यांचा वापर करावा. शतावरी, तालमखाना, तालमुळी यासारख्या आयुर्वेदिक वनस्पती शुक्राणुंच्या वाढीला प्रोत्साहन देतात. यामुळे केवळ नव्या शुक्राणुंची निर्मिती होते असं नाही तर कमजोर शुक्राणुंच्या वाढीलाही चालना मिळते. कूठ आणि कायफळ यासारख्या वनस्पतींचाही चांगला उपयोग होतो. याशिवाय पुत्रजीवक, कमल, कुमुद यासारख्या औषधांचा उपयोग होतो. मात्र या सार्या औषधांचा उपयोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

अशा स्वरूपाच्या अनेकविध प्रश्नांवर योग्य मार्गदर्शनासाठी तसंच या संदर्भातील अधिक माहितीसाठी (०२२) २८०५३४३४, २४३३३४३४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *