भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकन प्रशासनाने दिलेल्या सामान्य गुन्हेगारासारखी वागणूक वादग्रस्त ठरली. कधी नव्हे ते भारत सरकार, परराष्ट्र मंत्रालय, मंत्री यांच्या जोडीने विरोधी पक्ष आणि माध्यमं (इलेक्ट्रॉनिक जास्त) यांनी आक्रमक पवित्रा घेत अमेरिकेला ‘गुडघे’ टेकायला लावण्याची भाषा करत, त्यादृष्टीने काही पावलंही उचलली गेली.

एखाद्या सिंगल फसली पंटरने, भाईलाच कानाखाली पेटवेन असा दम देत त्याचे एक दोन अड्डेही उद्ध्वस्त करावे आणि काही क्षण त्या भाईलाही सुधरेनासं व्हावं तसं भारताच्या या आवेशाने अमेरिकेचं झालं!

अमेरिकेला वाटलं आता गयावया, अर्ज, विनंत्या, उच्चस्तरीय बैठका, आरोपीच्या नातेवाईकांना भेट देण्याची मुभा वगैरे काही जमतंय का? असा मांडवलीवजा प्रयत्न भारताकडून होईल. पण झालं भलतंच! देवयानी खोब्रागडे ही संपूर्ण भारताचीच ‘अस्मिता’ असल्यासारखं चहूबाजूंनी मोहोळ उठलं! त्यात कारवाई करणारा अधिकारी प्रीत भरारा हा देखील मूळ भारतीय आणि ज्या मोलकरणीवरून हे प्रकरण घडलं ती संगीताही भारतीयच! मूळ तक्रारही तिचीच!

आता ही भारतीय संगीता पगार वाढवत नाय तर इथल्या कामवाल्या बायांसारखं ‘येवढ्या पैशात जमत नाय, तुमी दुसरी बाय बगा’ असं सांगून राह्यलेली बाकी कदी देता? असं म्हणून थांबली नाही. तिने सरळ कायदेशीर तक्रारच केली. अमेरिकेसारखी प्रेसिडेन्शिअल व्यवस्था इथे पाहिजे म्हणून इंग्रजीत टीवटीव करणारे, त्यासाठी अनुनासिक स्वरात देव पाण्यात बुडवून ठेवणारे नवश्रीमंत यांना इथल्या ‘कामवाल्या बायांनी’ अशा तक्रारी करून ‘भारतीय’ पोलीस कस्टडीची हवा खायला लावली तर?

ते होणार नाही. कारण अशावेळी ‘पोलीस लायनीत’ राहणारा पोलीस पण कामगारवर्गाच्या नाही तर अभिजनांच्या पैशांचा मिंधा होतो. देवयानीच्या निमित्ताने ही प्रस्तावना पुरेशी झाली. दिल्लीत ‘आप’ने सरकार बनवायचा घेतलेला निर्णय आणि राज-अमिताभ दिलजमाईने देवयानीची बातमी पहिल्या पानावरून आतल्या पानावर गेलीय!

मात्र यानिमित्ताने काही गोष्टींची चर्चा होणं आवश्यक आहे. देशात सध्या असलेलं निवडणुकीचं वातावरण, काँग्रेसने खाल्लेला मार आणि भाजपला मिळालेलं यश यामुळे दोन्ही पक्षांना देवयानीचा असलेला ‘मागासवर्गीय प्रवर्ग’ नक्कीच आकर्षित करून गेला असणार. त्यात देवयानीचं ‘स्त्री’ असणं हे ‘निर्भया’ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अधिकच अधोरेखित करण्यात आलं. त्याला पुढे मुलीला शाळेत सोडायला चाललेली असताना, वेश्या, सामान्य गुन्हेगारांच्या सोबत ठेवलं अशा फोडण्याही देण्यात आल्या. त्यामुळे वातावरण अलका कुबल अभिनीत मराठी सिनेमासारखं झालं!

या लढाईत देवयानीचे वडील, ज्येष्ठ सनदी अधिकारी उत्तमराव खोब्रागडे हिरिरीने उतरले नसते तरच नवल! अण्णा हजारे, गो. रा. खैरनार यांच्यासारखी बातम्यात राहण्याची कला उत्तमरावांनीही थोडी फार अवगत केलीय. त्यासाठी आपला ‘मागासवर्गीय प्रवर्ग’ कधी वापरायचा आणि ‘कर्तव्य कठोर सनदी अधिकारी प्रवर्ग’ कधी वापरायचा याचा एक वेगळाच ‘वडाळा पॅटर्न’ त्यांनी या सरकारी सेवा ‘संसारी’ राबवत आणलाय! बाबासाहेबांनी सांगितलं होतं, ‘राज्यकर्ती’ जमात व्हा, त्यानुसार प्रत्यक्ष राजकारणात नसली तरी ‘प्रशासनात’ मात्र फार मोठ्या प्रमाणात ‘भीमाची लेकरं’ कार्यरत आहेत! आता त्याचा फायदा गावखेड्यात ते अगदी शहरात रोजगार विन्मुख असणार्या गरीब, शिक्षित, अर्धशिक्षित, कुशल, अ-कुशल भीमलेकरांना किती झाला हे कळण्यासाठी याच प्रवर्गातून निवृत्त झालेल्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एखादा आयोग नेमता येईल. तेवढीच त्यांनाही निवृत्तीपश्चात मानधन आणि सरकारी सेवा काही वर्षं उपभोगता येईल!

तर उत्तमराव खोब्रागडे यांची कन्या देवयानी आयएएस होऊन ‘भाप्रसे’मध्ये आलीय ही ‘बातमी’ही माध्यमांपर्यंत व्यवस्थित पोहचली!

आंबेडकरी समाजाला ‘आपली’ मुलगी एवढ्या पुढे गेली या बातमीने लगेच ‘उर’ भरून येतो. नरेंद्र जाधव, भालचंद्र मुणगेकर या ‘आपल्यांना’ सत्तास्थानाच्या जवळ पाहून आंबेडकरी समाजाचा ‘उर’ भरून आलाच होता. पण दुर्दैवाने आंबेडकरी समाजाच्या बाबतीत ‘उर भरून येणं’ आणि नंतर ‘उर बडवून घेणं’ या दोनच स्थिती कायम राहतात! डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नाव आजही ‘उर भरून आणणारं’ आहे बाकी सर्वांनी ‘उर बडवायलाच’ लावलाय!

खोब्रागडे पिता-पुत्रीने तेच केलं! प्रशासकीय सेवेत राहून निव्वळ आपली ‘घरं’ भरली! ही ‘घर’भरणी कमी पडली की काय म्हणून त्यांनी आणखी ‘घरं’ घेतली. तीही शासकीय कोट्यातून! उत्तमरावांनी मध्यंतरी ‘बेस्ट’मध्ये दलित तरुणांची बेधडक भरती केली होती. त्यावर उलटसुलट चर्चा झाली. त्यातले आज किती तिथे नियमित झाले कुणास ठाऊक. हा असा एका ‘गटाला’ हाताशी धरून घेतलेला ‘धडक’ कार्यक्रम सोडला तर सातत्याने, सनदशीर मार्गाने, व्यवस्थित प्रशिक्षण, मार्गदर्शन करून त्यांनी काही केलंय असं काही कुठे ऐकण्या/पाहण्यात नाही.

सर्वसाधारण समाजात एखादी दलित व्यक्ती वागण्या/बोलण्या/दिसण्यात दलितत्वाच्या पारंपरिक (गैरसमजी) लक्षणात दिसली नाही की लगेच ‘‘हो! पण वाटत नाही!’’ अशी प्रतिक्रिया येते. देवयानीच्या माध्यमात झळकलेल्या छब्या पाहताच, आडनावाने जात न ओळखणार्या आणि सोशल मीडियाला चिकटून असणार्या पिढीला वाटलं असणार की ‘हाऊ क्यूट शी इज अॅण्ड हाऊ क्रूएल अमेरिका, इव्हन ‘अवर’ प्रीत भरारा!’

निर्भयानंतर ग्लॅमर प्राप्त झालेल्या एलिट वर्गातही फोटो पाहून आणि ‘लेडी’ म्हणून लगेच काही उसासे निघालेच! नंतर कदाचित ‘ओह शी इज फ्रॉम दॅट क्लास’ असं आश्चर्याने विचारून त्यांनी विषय बदललाही असेल.

पण लेकीचा झालेला अपमान, हा देशाचा अपमान असं उच्चरवात बोलत न्यायाची भाषा करत उत्तमराव थेट दिल्लीत धडकले. आमरण उपोषणाची धमकी देताच आम्हाला वाटलं आता उत्तमराव जंतर मंतर गाठतील आणि दिल्लीतले मेणबत्त्यांचे व्यापारी खूश होतील! पण ‘उत्तमरावांना’ अपेक्षित ‘प्रवर्गाचं’ हत्यार कामी आलं ना, देवयानीचं ‘स्त्री’ असणं. त्यात मुळात सरकारनेच एवढा वरचा स्वर लावला होता की त्याच्या वरचा स्वर लावायचा तर त्यांना ‘जयंती’ला येणार्या एखाद्या ‘कव्वालालाच’ गाठावं लागलं असतं.

भारताच्या पवित्र्याने अमेरिकाही थोडी नरमली. दरम्यान तिच्या मागे तिथले आणि इथलेही भारतीय अल्पसे का होईना उभे राहिल्याने अमेरिकेच्याही जीवात जीव आला!

दरम्यान या आधीच ‘आदर्श’ प्रकरणात देवयानीचं नाव प्रसिद्ध झालेलं असल्याने, त्या प्रकरणावरचा अहवाल याच दरम्यान सभागृहात मांडून फेटाळला गेला! अहवाल फेटाळला गेला तरी त्यातल्या पानात देवयानी खोब्रागडेंची ‘घर’ लाटण्याची कारकिर्दच नोंदवली गेलीय. ती पाहता बाबासाहेबांनी राज्यकर्ती जमात व्हा असा जो प्रोत्साहनवजा आदेश दिला होता तो याचसाठी का? असा प्रश्न पडतो. अर्थात ‘नैतिकतेची’ अपेक्षा आंबेडकरी समाजाकडूनच व्हावी असंही नाही.

आंबेडकरी समाज या समाजाचाच भाग आहे. या समाजातल्या सगळ्या चांगल्या/वाईट सवयी/प्रवृत्ती या समाजातही असणार पण त्यांच्यावर एक विशेष जबाबदारी येऊन पडते!

ही विशेष जबाबदारी म्हणजे, जातिव्यवस्थेतून नाकारलेला शिक्षण, रोजगाराचा हक्क भारतीय संविधानाने या समाजाला नुस्ता दिलाच नाही तर ‘आरक्षित’ही केला. स्वातंत्र्याने पहिली दहा वर्षं ठेवण्यात आलेली ही व्यवस्था आज ६० वर्षांनंतरही चालू आहे. कारण समाज वास्तव आणि समाजमन अजूनही पूर्णपणे बदललेलं नाही.

अशावेळी या ‘आरक्षणाचा’ लाभ घेऊन जे सुस्थितीत गेले त्यांचं वर्तन असं हवं की, बघा समान अधिकार मिळाला की काय होऊ शकतं? पण हीच सुस्थितीतील माणसं जेव्हा ‘भ्रष्टाचारी व्यवस्थेचा’ भाग होतात, तेव्हा असं वाटतं यांची ‘उपासमार’ आजही चालू आहे! ही अशी उपासमार आणि त्यामुळे लागलेला भस्म्या रोग तुमची बौद्धिक, आर्थिक, सांस्कृतिक, दिवाळखोरीच दाखवून देतो. शोषणातून मुक्त होऊन वर गेलेल्याने आपला हात खालच्याला वर खेचण्यासाठी खाली न्यावा की ‘हात’ झटकून शोषणकर्त्यांच्या गँगमध्ये सामील व्हावं हा प्रश्न आहे आणि हीच विशेष जबाबदारी आहे!

खोब्रागडे दलित ऐक्यासाठी, खैरलांजीसाठी प्राण पणाला लावू म्हणाले नाहीत. मुलीसाठी चार जागा घेताना, शहरात झोपडपट्टीत सडणार्या ‘आपल्या’ माणसासाठी एखादी ‘आदर्श’ योजना मांडू शकले नाहीत. अशा या ‘उत्तम’ पित्याला आणि त्यांच्या ‘आदर्श’ मुलीला ‘आपलं’ म्हणून त्यांच्या पाठीशी उभं रहावं असं काही आहे?

‘आपलं’ सोडा ‘भारतीय’ म्हणूनही सगळं लज्जास्पद आहे!

1 Comment

  1. लेख आवडला. मते अत्यंत सडेतोड व सुस्पष्ट मांडली आहेत. एक भारतीय म्हणून आम्हालाही तसेच वाटते. पण तसे उघड बोलण्याची आम्हा ‘सानुनासिकांना’ मुभा नाही. कारण एखाद्या विधानाची दाहकता, ही त्या विधानाच्या अर्थापेक्षा , ती कुणाकडून आली आहे, यावर ठरते.

    अवांतर तरीही महत्त्वाचे:-हल्ली हे, सिनेमात आणि सिरियलमधे सानुनासिक बोलण्याचे प्रस्थ फारच वाढले आहे. प्रत्यक्षांत, आमच्या पिढीतच काय, तर आमच्या मागच्या तीन पिढ्यात असे कोणी नाकांत बोलत नव्हते. पण, त्यानिमित्ताने, सानुनासिक जमातीविरुद्ध एक घाऊक तिरस्कार वाढीस लागला आहे हे मात्र जाणवू लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *