बॉलिवूडचे अनेक चित्रपट आता १०० कोटींच्यावर गल्ला जमवत आहेत. त्यामुळे बॉलिवूडला खूप चांगले दिवस आले आहेत असं आपण म्हणू शकतो. काही चित्रपट तर २०० कोटींच्याही वर कमाई करत आहेत. बॉक्स ऑफिसवर हिट होणार्या चित्रपटांचा आपण विचार केला तर आज गाजत असलेल्या चित्रपटांमध्ये रिमेक चित्रपटांचाच भरणा अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं. आजही बॉलिवूडमध्ये खूप चांगले कथाकार-पटकथाकार आहेत. म्हणूनच आजही अनेक चांगल्या कथा, पटकथा बॉलिवूडच्या चित्रपटांतून येत आहेत. पण याचं प्रमाण हवं तितकं नाहीये. ते प्रमाण फारच कमी आहे. खरं तर पूर्वीपासूनच आपल्याकडे चित्रपटांचा रिमेक बनवला जातोय. पण त्यावेळेस आपल्याकडे हॉलिवूडच्या चित्रपटांचा रिमेक बनवण्याचं प्रमाण अधिक होतं. हॉलिवूडमधील इंग्रजी किंवा अन्य विदेशी भाषांमधील चित्रपट हिंदीत बनवण्याचा प्रयत्न होत असे. मात्र आता या प्रयत्नांनी प्रादेशिक रूप धारण केलंय. याचा परिणाम म्हणून सध्या बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड जोशात आहे.

सध्याचा काळ हा बॉलिवूडचा सुवर्णकाळ आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणारं नाही. कारण आज साधारणपणे एका वर्षात ४-५ चित्रपट तरी १०० कोटींच्यावर व्यवसाय करत आहेत. आजचे निर्माते पटकथा शोधण्यात किंवा अनेक पटकथा वाचण्यात वेळ न घालवता दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक करणं सर्वात सोप्पं आहे असं मानतात. एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाचे हक्क मिळवायचे आणि त्यावरच हिंदीत चित्रपट बनवायचा असाच प्रकार आताचे निर्माते करत आहेत. चित्रपटांचे हक्क मिळवण्यासाठी कित्येक कोटी मोजायलाही ही मंडळी तयार असतात. एखादा दाक्षिणात्य चित्रपट गाजला की त्या चित्रपटाचे हक्क मिळवण्यासाठी बॉलिवूडमधील निर्मात्यांचे प्रयत्न सुरू होतात. कारण या चित्रपटांमध्ये एक चांगली कथा, प्रेमप्रकरण, मारामारी असा सगळाच चित्रपटाचा मसाला असतो. त्यामुळे एखादा चांगला अभिनेता घेऊन त्या चित्रपटाचा रिमेक केला की तो चित्रपट गाजणारच याची पूर्ण खात्रीच इकडच्या निर्मात्यांना आता झालेली आहे.

टॉलिवूड आणि बॉलिवूड या दोन्हीही आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील मोठ्या सिनेइंडस्ट्रीज् आहेत. पण या दोन इंडस्ट्रीज्मधली मोठी इंडस्ट्री कोणती  असा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये एका वर्षात जितके चित्रपट बनवले जातात त्याच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये फारच कमी चित्रपट बनवले जातात. चित्रपट हिट होण्याच्या प्रमाणातही टॉलिवूड आघाडीवर आहे. म्हणूनच दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री बॉलिवूडपेक्षा अधिक श्रीमंत आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेदेखील टॉलिवूड अधिक पुढारलेलं आहे. छायांकनातीलकोणताही तांत्रिक बदल अथवा इफेक्ट हा प्रथम टॉलिवूडच्या चित्रपटांमध्येच पहायला मिळतो. ७० एमएमचा पडदा असो किंवा रंगीत चित्रपटांत झालेले बदल असोत हे सगळं सर्वप्रथम तिकडच्याच चित्रपटांमध्ये घडलं. यामुळेही टॉलिवूड पैशांच्याबाबतीत अधिक सधन आहे. त्यातच आता बॉलिवूडकरांनी टॉलिवूडच्या चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा धडाका लावल्यामुळे त्यातूनही टॉलिवूडला चांगली मिळकत होतेय.

दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकचा ट्रेंड जरी बॉलिवूडमध्ये आता आला असला तरी बॉलिवूडमध्ये सुरुवातीपासूनच दाक्षिणात्य चित्रपटांचा रिमेक केला जात होता. पण तेव्हा याचं प्रमाण अगदीच कमी होतं. दिलीप कुमार यांचा गाजलेला ‘राम और श्याम’ हा चित्रपट एन.टी.रामाराव यांच्या गाजलेल्या ‘रामूदू भिमूदू’ या चित्रपटाचा रिमेक आहे. तर राज कपूरचा ‘नजराना’ ‘कल्याणा परीसू’ या चित्रपटाचा रिमेक आहे. मीना कुमारी आणि राजेंद्र कुमार यांचा ‘दिल एक मंदिर’ हा चित्रपट ‘नेनजिल ओरे अलायम’ या चित्रपटाचा रिमेक आहे. ‘वो सात दिन’ हा ‘अंथा इझू नाटकाल’ या चित्रपटाचा रिमेक आहे. तेव्हा मात्र काही मोजक्याच दक्षिणेकडच्या चित्रपटांचा रिमेक होत होता.

नव्वदीनंतरच्या चित्रपटांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकचं प्रमाण हळूहळू वाढू लागलं. त्यामुळे याच दशकानंतर आपल्याला अनेक रिमेक चित्रपट पहायला मिळाले. ‘विरासत’ हा चित्रपट सिवाजी गणेशन आणि कमल हासनच्या गाजलेल्या ‘थेवर मगन’ या चित्रपटाचा तर ‘बिवी नं. वन’ हा चित्रपटकमल हासनच्याच ‘साथी लीलीवथी’ या चित्रपटाचा रिमेक आहे. तसंच सलमान खानचा ‘तेरे नाम’ हा चित्रपट ‘सेथू’ या चित्रपटाचा तर ‘जुडवा’ हा ‘हॅलो ब्रदर’ या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे. ‘साथिया’, ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’, ‘संडे’, ‘फोर्स’, ‘खुशी’, ‘शक्ती’, ‘युवा’, ‘खट्टा मिठा’ हेदेखील दाक्षिणात्य चित्रपटांचेच रिमेक आहेत. यातील काही चित्रपटांचा त्याच दाक्षिणात्य निर्मात्यांनी बॉलिवूडमध्ये येऊन रिमेक बनवला आहे. या सगळ्या चित्रपटांचा विचार केला तर हे रिमेक चित्रपट प्रेमकथेवर आधारित आणि कौटुंबिक चित्रपट होते असं आपल्याला दिसून येतं.

पण आता निर्माते कौटुंबिक किंवा प्रेमकथेवर आधारित चित्रपटांना अधिक पसंती देत नाहीयेत. तर त्यांची पहिली पसंती ही अॅक्शन चित्रपटांना मिळते आहे. गेल्या ४-५ वर्षांत आलेल्या चित्रपटांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सध्या बॉलिवूडमध्ये टॉलिवूडमध्ये गाजलेल्या अॅक्शन चित्रपटांचे रिमेक अधिक केले जात आहेत आणि याच चित्रपटांना प्रेक्षक अधिक पसंती दर्शवत आहेत. अॅक्शन चित्रपटांचा रिमेक होण्याचं प्रमाण ‘वाँटेड’ या चित्रपटाच्या यशानंतर अधिक वाढलं. ‘पोकरी’ या चित्रपटाचा रिमेक असलेल्या सलमान खानच्या ‘वाँटेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला जमवला. या चित्रपटातील अॅक्शन सिन आणि संवाद प्रचंड गाजले होते. आणि त्यामुळेच या चित्रपटानंतर बॉलिवूडच्या निर्मात्यांचं दक्षिणेतील अॅक्शन फिल्म्सकडे लक्ष वेधलं गेलं. त्यामुळे त्याच धर्तीचे ‘सिंघम’, ‘रावडी राठोड’, ‘बॉडीगार्ड’, ‘रेडी’, ‘गजनी’ यांसारखे चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळाले. या सगळ्या चित्रपटांमधील साम्य म्हणजे या सगळ्याच चित्रपटांत आपल्याला खूप सारी हाणामारी, तडाखेबाज संवाद पहायला, ऐकायला मिळाले.

 

दाक्षिणात्य सिनेमात सुपरस्टार्सचं जितकं स्टारडम आहे तितकं स्टारडम बॉलिवूडमध्ये नव्हतं. रजनीकांत, कमल हासन, नागार्जुन, महेश बाबू, सूर्या या नटांच्या केवळ नावावरच त्यांच्या चित्रपटांना गर्दी जमते. चित्रपटाची कथा काहीही असो, त्या चित्रपटात त्यांनी हाणामारी केली, चांगले संवाद म्हटले की चित्रपट गाजणारच असं तिकडच्या चित्रपटांचं गणित आहे आणि हेच गणित सध्या बॉलिवूडच्या कलाकारांनी सोडवायला घेतलंय. त्यामुळे सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासारखे बडे कलाकारही रिमेक चित्रपटांमध्ये काम करण्यास प्राधान्य देत आहेत. २०१४ मध्ये सलमानचा येणारा ‘जय हो’ हा चित्रपट चिरंजीवीच्या ‘स्टॅलिन’ या चित्रपटाचा रिमेक आहे. तर ‘थुपक्की’ या दाक्षिणात्य रिमेक चित्रपटात गोविंदा काम करणार आहे. त्यामुळे या पुढेही आपल्याला अनेक रिमेक चित्रपट पहायला मिळणार आहेत.

दाक्षिणात्य रिमेक करण्यासाठी चित्रपटाचे हक्क घेतले की पटकथेचा मोठा प्रश्न सुटतो. आणि त्यासोबतच दिग्दर्शकाचंही काम सोपं होतं. रिमेक केलेले चित्रपट जरा आठवून पहा. अनेक चित्रपटांमध्ये तिकडच्या चित्रपटातील दृश्य नि दृश्य एक सारखीच असल्याची आपल्याला पहायला मिळतात. बॉलिवूडच्या प्रेक्षकांना मूळ चित्रपट माहीत नसतो. त्यामुळे ते चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं कौतुक करत असतात. पण चित्रपटांचा रिमेक करण्यापेक्षा बॉलिवूडच्या फिल्ममेकर्सनी चांगले पटकथाकार प्रेक्षकांसाठी आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. तरच बॉलिवूडचं वेगळेपण टिकून राहील. अन्यथा टॉलिवूडच्या जिवावर बॉलिवूड, अशी एक अनोखीच म्हणच तयार होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *