आता आठ दिवस मी एकदम आराम करणारय. लागोपाठ दोन विधेयकं पास करून घेतल्यामुळे एकदम थकवा आल्यासारखा झालाय. त्यातलं एक परत दिल्लीत एवढ्या लांब आणि दुसरं नागपुरला कडाक्याच्या थंडीत! कडाक्याच्या थंडीत पास करून घेतलेल्या या कायद्यांमुळे सामाजिक जीवनात मात्र उब निर्माण झालीय.

अण्णांबरोबर मी पण आठ दिवस उपास केला. तेवढंच आपलं आत्मिक बळ त्यांच्या चळवळीत मी ओतलं. मी जो उपास केला त्या प्रकाराला ‘जेवून खावून उपास’ म्हणतात. म्हणजे फक्त दोन वेळा चहा घ्यायचा आणि दोन वेळा जेवायचं! (म्हणजे सकाळचा नाश्ता राखून ठेवून दुपारच्या जेवणात घ्यायचा नाही. मनावर संयम ठेवायचा) पहिलं वाढलेलं संपवायचं. चांगला पदार्थ घाईघाईने संपवून परत वाढून घ्यायचा नाही. थोडक्यात हावरेपणा करायचा नाही पण शरीरावर अन्यायही करायचा नाही. हे वागणं सोपं नाही. मला वाटतं आपला नियमित पगार होत असताना हे मध्ये मध्ये सतत तोंडात टाकणं, त्याला चटावणं म्हणजेच भ्रष्टाचार! सगळ्या पचन यंत्रणेत त्यामुळे बिघाड होतो.

अगदी आता खरं सांगायचं तर कधीकाळी हे लोकपाल बिल पास होईल असं मला मनातून एक टक्काही वाटलं नव्हतं. अण्णा आपले दरवर्षी अधून मधून उपोषण करत राहणार. कधी कधी जागा बदलणार. सहकारी बदलणार (बदलणार म्हणजे ते आपोआप बदलतात.) दरवेळी काहीतरी अडचणी दुरुस्त्या होणार. अण्णा ते नाकारणार आणि पुन्हा नव्या जोमाने उपोषण करणार. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ याप्रमाणे ‘नेमेचि येती मग उपोषण’ अशी परंपरा सुरूच राहणार असं वाटलं होतं. त्या निमित्ताने समाज ढवळला तर जातोय या विचाराने मी समाधानी होते.

आता हे बिल पास होण्याचं श्रेय अण्णांच्या शुद्ध हेतूला आहेच आणि त्याचबरोबर अरविंद केजरीवालांनाही आहे. त्यांच्या ‘आप’ पक्षाला घवघवीत यश मिळाल्याने राहुल गांधींनी पटकन बिल पास करून घेतलं आणि ‘आप’ची बोलती बंद केली.

अण्णांनी पण आवडता खाऊ संपवायचा ठरवला हा चांगला निर्णय घेतला. मला वाटतं अंनिसवाल्यांनी विधेयक पास हातोना जी लवचिकता दाखवली त्याचा खोल परिणाम अण्णांवर नक्की झाला असणार. शिवाय केजरीवालांनाही धडा शिकवता आला. एकंदरीत आनंदी आनंद झाला. (अण्णांना खायला काय आवडतं हा महत्त्वाचा प्रश्न कोणीच विचारला नाही. निदान उपोषण सोडल्यावर तरी विचारायचा.)

आता मला घरी टीव्हीसमोर बसल्या बसल्या एक प्रश्न पडलाय. तो म्हणजे अण्णा म्हणतायत की या बिलमुळे पन्नास टक्के भ्रष्टाचाराला आळा बसेल! पण हे ठरवणार कसं? चुकून ५२ किंवा ४९ टक्के भ्रष्टाचाराला आळा बसला तर? मग काय करणार? अण्णांनी आपली ही सेफ बाजू आधीच घेऊन ठेवलीय. म्हणजे भ्रष्टाचार झाला तर लगेच कोणी बिलावर बोट ठेवायला नको.

म्हणून मला आपलं वाटतं की केवळ या बिलामुळे कचाट्यात मिळाले त्यांची संख्या बिलाच्या वर्धापनदिनी दरवर्षी जाहीर करण्यात यावी. जमल्यास तेवढे केक किंवा संख्या वाढल्यास कपकेक कापण्यात यावेत.

आजकाल चोरट्याला पकडणार्या शूरवीरांना लगेच इनाम दिलं जातं. सत्कार समारंभ होतात. पण भ्रष्टाचार्याला पकडणार्या शूराचं फारसं कौतुक होत नाही. जर त्याचा मोठा सत्कार, मुलाखत, मिरवणूक, शासकीय नोकरी, नोकरीत असल्यास बढती इत्यादी कौतुक झालं तर लोक भ्रष्टाचार्याला पकडायला आनंदाने पुढे येतील. शेवटी कौतुक महत्त्वाचं! कौतुकाच्या दोन शब्दांनी, एका नजरेने, चार फुलांनी, एका नारळाने (वाजणार्या) एक शालीने एखाद्याच्या आयुष्याला मोठी उमेद मिळते. (हे वाक्य मी यांना बर्याचवेळा म्हणून बघितलंय. फक्त शाल या शब्दाऐवजी साडी असा एक साधा आणि शुल्लक बदल मी करते! प्रयत्न सोडायचे नाहीत असं मी ठरवलंय.)

बाकी सर्व ठीक. थंडीचा कडाका बर्यापैकी सुरू झालाय. मुंबईत पण बर्यापैकी फेंट गुलाबी थंडी पडलीय. मुंबईकरांना स्टायलिश स्वेटर घालून मिरवायला एक यंदा छान कारण मिळालंय.

खेड्यापाड्यातून नाशिक, नागपूर, पुणे, कोकणात डार्क गुलाबी हाडं गोठवणारी थंडी पडायला सुरुवात झालीय. थंडीचं कवच फोडण्यासाठी शेकोट्या पेटायला लागल्यात. गावोगावच्या जत्रा सुरू झाल्यात. चहाचे ग्लास रिकामे होताहेत. तीन दगडांच्या चुलीवरच्या कढ्यातून गरमा गरम कांदाभजीचे, बटाटा भजीचे, बटाटेवड्याचे घाणे उतरवले जाताहेत. कोकणात दशावतारी नाटकं, जत्रा दणाणून सोडताहेत. रात्री बारा वाजून गेले की दशावतारी नाटक देवळात उभं रहातं. दशावतारी राजा आला की त्याच्या पायाखाली फुगे सोडून त्याचं स्वागत केलं जातं. मग राजा हमखास एक वाक्य म्हणतो, ‘मी अवंतीनगरीचा सम्राट चंद्रसेन असून माझ्या नगरीत सर्वत्र शुभ आणि मंगल असं वातावरण बघून माझ्या मनाला अत्यंत आनंद होत आहे.’

वाढत चाललेला भ्रष्टाचार आणि स्त्री पोटात असल्यापासून तिच्यावर होणारे अत्याचार रोखले गेले तर महाराष्ट्रात शुभ आणि मंगल असं वातावरण निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *