बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त तुरुंगात असूनही चर्चेत आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यात संजय दत्तला याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. सध्या तो जेलमध्ये असला तरी आतापर्यंत दोन वेळा तुरुंगातून सुट्टी घेऊन घरी आलाय. पण हा न्याय सामान्य कैद्यांना का नाही, असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय. संजय दत्त अभिनेता आहे म्हणून त्याला शिक्षेत खास सवलत मिळतेय का यावर आता कट्ट्यावरही चर्चा सुरू झालीय…
सेलिब्रेटी म्हणून सवलत देणं चूकच
तो एक सेलिबे्रटी आहे म्हणून त्याला त्याच्या गुन्ह्याच्या शिक्षेत नेहमीच सवलत मिळत आली आहे. त्याला ज्या गुन्ह्यासाठी शिक्षा झालीय तो गंभीर गुन्हा आहे. त्याच गुन्ह्याच्या इतर कैद्यांना अतिशय कडक शिक्षा दिली जाते. पण संजय दत्तला मात्र हवं तेव्हा घरी पाठवलं जातंय, हे चूकच आहे.
– सायली शिर्के, विद्यार्थिनी
त्याचा गुन्हा दहशतवादी कारवायांमध्येच मोडणारा आहे. त्यामुळे त्याला अशा सवलती देणं कितपत योग्य आहे? किंबहुना त्याला त्या सवलती न देता एका दहशतवाद्याप्रमाणेच जेलमध्ये ठेवावं. खास कैदी म्हणून संजय दत्तला वागणूक देऊ नये.
– दिपाली ठाकूरदेसाई, विद्यार्थिनी
भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये जर आपण गुन्हा केलाय तर त्याची साधारण शिक्षा आपल्याला भोगावी लागतेच. मग संजय दत्तने जर गुन्हा केलाय तर त्याने त्याची शिक्षा भोगणं अनिवार्य आहे. मात्र ती शिक्षा तो भोगत नाहीये. हा खरं तर आपल्या न्यायव्यवस्थेचाच अपमान आहे आणि पर्यायाने लोकशाहीचाही अपमान आहे.
– कौतुकी आंबोले, विद्यार्थिनी
एखाद्या कैद्याला सवलत मिळणं नि तीच सवलत मिळवून दिली जाणं यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्याला कायद्यामधून जी सवलत मिळतेय त्याला कुणीही विरोध करण्याचं कारण नाही. मात्र तो एक सेलिबे्रटी आहे म्हणून त्याला जास्तीची सवलत मिळवून दिली जाऊ नये.
– जयदीप पवार, विद्यार्थी
संजय दत्तला नियमाप्रमाणे सुट्टीची सवलत देणं हे मान्य आहे. मात्र इतर कैद्यांचे नातेवाईक वारले तरी त्यांना बेड्या घालूनच त्यांच्या अंत्यसंस्काराला नेलं जातं. इथे तर त्याची बायको केवळ आजारी आहे. तरीही त्याला सहज सुट्टीवर सोडलं जातंय.
– ओमकार गायकवाड, विद्यार्थी
त्याला जी सवलत दिली जातेय ती नियमात बसणारीच आहे. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणेच त्यालाही त्या सवलती मिळत आहेत. मात्र त्या सवलती मिळताना त्याला जी खास वागणूक दिली जातेय ते चूक आहे. भारतीय कायद्याप्रमाणे साधा कैदी आणि व्हीआयपी कैदी अशी विभागणीच होऊ शकत नाही.
– गणेश जाधव, विद्यार्थी
संकलन – शामली देवरे