जादूटोणाविरोधी विधेयकावरून गेली १४ वर्षं राज्यात गदारोळ सुरू आहे. आधी ‘अंधश्रद्धाविरोधी’ या नावाने असणारं हे विधेयक समजून घेण्यापेक्षा त्याला विरोध करण्यातच अनेकांना रस होता. सनातनसारख्या संस्थेने तर याच विरोधाच्या जीवावर आपलं बस्तान बसवलं. या कायद्याची येथेच्छ बदनामी केली. जे कायद्याच्या मसुद्यात नाही ते लोकांना सांगितलं. एरवी धर्म-कर्मकांडात न पडणार्या वारकरी संप्रदायालाही या सनातन्यांनी फशी पाडलं. या संप्रदायात घुसून तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.वारकरी या दुष्टप्रचारात आले, पण राजकारणीही यापासून सजग राहिले नाहीत. भाजप आणि शिवसेनेने या विधेयकाला कडवा विरोध केला. अगदी सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांचा या विधेयकाला विरोध होता. हा विरोध अर्थातच अर्धवट माहितीच्या आधारे होता. त्यांना या कायद्याचा मसुदा समजावून सांगण्यासाठी मग डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी प्रचंड मेहनत घेतली. एकेका आमदाराला ते भेटले. त्यांना समजावून सांगितलं. अगदी वारकर्यांशीही चर्चा करण्यासाठी त्यांनी कधी आनबन केलीनाही. याबाबत दाभोलकरांचा संयम हा वाखाणण्याजोगा होता. अंधश्रद्धेतून घडणार्या घटना इतक्या होत्या की त्या कुणीही मोडीत काढू शकत नव्हतं. या कायद्याबाबत येणार्या सर्व सूचनांचं स्वागत करत, कायद्याचं नाव, त्यातील महत्त्वाची कलमं वगळत केवळ१२ कलमांचा मसुदा डॉ. दाभोलकरांनी मान्य केला. मात्र तरीही सनातन्यांनी आपला हेका काही सोडला नव्हता. त्यांनी विरोध सुरूच ठेवला. मात्र या सगळ्यात युक्तिवाद करताना ही मंडळी तोकडी पडत होती. म्हणूनच दाभोलकरांचा निर्घृण खून करण्यात आला.

खरंतर महाराष्ट्र राज्यातील प्रबोधनाची परंपरा आणि इथल्या समाजसुधारकांमुळे या राज्याची पुरोगामी राज्य अशी प्रतिमा आहे. अन्यायी राजकीय, सामाजिक, धार्मिक व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी आणि समताधिष्ठित व्यवस्था तयार करणारी उत्तुंग व्यक्तिमत्त्व याच महाराष्ट्रात निर्माण झाली आणि त्यांनी या देशाला दिशादर्शन करण्याचं काम केलं. या परंपरेची नाळ असलेल्या डॉ. दाभोलकरांनी हयातभर विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा अंगीकार करत समाजाला अंधभक्तिपासून सजग करण्याचा प्रयत्न केला.या विज्ञानयुगातही समाजाला मागे खेचण्यासाठी हेतुतः प्रयत्न करणार्या शक्ती आहेत. या शक्तिंच्याविरोधात अहिंसकपणे दाभोलकर लढत राहिले. त्यांची सचोटी आणि हेतू यांच्याविरुद्ध बोलण्यास त्यांचे विरोधकही धजावत नाहीत. मात्र विधान परिषदेतील शिवसेनेचे गटनेते असलेल्या दिवाकर रावते यांनी आपल्या वाचाळकीचं प्रदर्शन करत दाभोलकरांच्या सचोटीवरच थुंकण्याचा प्रयत्न केला आहे.

कायदा करणं हे सरकारचं काम आहे. मात्र जादूटोणा कायद्यासाठी दलाल काम करताहेत. यात दलाल नंबर एक म्हणजे दाभोलकर होते. ते आता गेले. त्यांच्या पाठोपाठ श्याम मानव हे दलाली करताहेत, असं हे रावते म्हणाले आहेत. खरंतर महापौर असताना विरोधकांना पायातली चप्पल दाखवणार्या रावते यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार? शिवसेनेत अनेक पदं अनेकांना मिळाली, पण ती पदं भुषवण्यासाठी त्या माणसांची उंची तेवढी होती का हा प्रश्न कायम उभा रहातो. आपण काय बोलतोय याचं भान रावते यांच्यासारख्यांना रहात नाही ही खरी शोकांतिका आहे.

जादूटोणाविरोधी कायद्याच्या विरोधासाठी सनातन्यांनी अनेक ठिकाणी आपली माणसं कामाला लावली. वेगवेगळ्या पक्षातल्या आमदारांना त्यांनी जाऊन संपर्क सुरू केला.भाजप-शिवसेनेत आधी अनेकांचा विरोध होता. मात्र कालांतराने हा विरोध कमी झाला. शिवसेनानेते सुभाष देसाई यांच्यासारख्यांनी त्यातील महत्त्वाच्या सूचना करत या कायद्यामध्ये आपल्याला हव्या त्या सुधारणा करून घेतल्या. भाजपच्या डॉ. अशोक मोडक यांनी तर हा कायदा किती महत्त्वपूर्ण आहे याबाबत लेखही लिहिलेला आहे. त्यामुळे अनेकांनी या सनातन्यांना जुमानलं नव्हतं. रावते यांच्यासारखी मंडळी या सनातन्यांच्या गळाला लागली आणि कोणतीही गोष्ट समजून घेण्याच्या मानसिकतेत ती राहिली नाहीत.

स्वतः दाभोलकरांनी या कायद्याबाबत असलेल्या आक्षेपांबाबत स्पष्टीकरण केलेलं आहे. या मसुद्यात श्रद्धा काय अंधश्रद्धा असाही शब्द नाहीये. जी बारा कलमं आहेत ती बुवाबाजी आणि जादूटोणा याबाबतच्या गंभीर गुन्ह्याबाबतची आहेत. ‘कलमनामा’ने याविषयी सचित्र पुस्तिका प्रसिद्ध केलेलीच आहे. महाराष्ट्रभरातून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, सर्वसामान्य वाचक यांनाही कायदा कळण्यास त्यामुळे मदत झाली. मात्र एवढं सगळं स्पष्ट असताना हा कायदाच नको असं रावते म्हणतात तेव्हा माणसं सत्य नाकारण्यासाठी किती निगरगट्ट असतात हेच दिसतं. याच निगरगट्टपणातून रावतेंनी गरळ ओकली आणि अडचणीत सापडले.

ज्या दाभोलकरांनी समाजातील बुरसटलेपण दूर करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना दलाल म्हणताना रावते हे विसरले की दाभोलकर कुणाचे वारसदार होते. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित दाभोलकरांची सगळी लढाई होती. प्रबोधनकारांनी त्यावेळी देव, धर्म आणि अंधश्रद्धा यावर जी घणाघाती टीका केली ती रावतेंनी वाचलीय का? देवळाचा धर्म, धर्माची देवळं… हे पुस्तक माहिती आहे का? ती भाषा आणि तो विचार पटत असला तरी दाभोलकर एकदम देवळं उद्ध्वस्त करण्याची मांडणी करत नव्हते. मात्र प्रबोधनाचा वारसा तोच होता. दाभोलकरांना दलाल म्हणणारे रावते मग प्रबोधनकार ठाकरे यांना काय म्हणणार? हिंमत असेल तर त्यावर भाष्य करा…

मुळात दाभोलकर हयात असताना ते शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यांच्या मृत्युनंतर या कायद्यासंदर्भात श्याम मानव हेही उद्धव यांना भेटले होते. या भेटीत उद्धव यांनी सकारात्मक भूमिका मांडली होती. जर दाभोलकर, श्याम मानव दलाल असतील तर मग त्यांना आदराने भेटून चर्चा करणार्या उद्धव ठाकरेंना रावते काय म्हणणार आहेत? उद्धव चुकले असं रावते म्हणणार आहेत का?

ज्या माणसाच्या मृत्युने लोक हळहळताहेत त्या माणसाच्या मृत्युनंतर त्याला दलाल म्हणणं हे खुनाइतकंच गंभीर आहे. हा अश्लाघ्यपणा कोणत्या धर्मात बसतो? स्वतः रावते हे अंधश्रद्धेच्या गटारात अडकलेले आहेत. पुण्याच्या एका महाराजाच्या आश्रमात ते कसे जाऊन रहातात याच्या कथा शिवसेनेतील लोकच सांगतात. अशा माणसाकडून अपेक्षा तरी काय करणार? मात्र हे करताना आपण स्वतःच सनातन्यांचे दलाल झालोत हे रावतेंच्या लक्षात येत नाहीये. हीच इथली शोकांतिका आहे. डोकं एकदा सनातनी झालं की कोणती पताका कशासाठी आपण आपल्या खांद्यावर घेतोय हेच बहुजन समाजातील माणसाला कळेनासं होतं. या कळपात अनेक दाखल आहेत, रावते त्यातीलच एक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *