प्रत्येक महामानवाला दोन शत्रू असतात, एक समोरासमोर असतो अन् दुसरा पायाजवळ बसलेला असतो. समोरासमोर असलेला शत्रू स्पष्ट असतो अन् त्याचा धोका दिसतही असतो पण हा पायाजवळ बसलेला शत्रू फार खतरनाक असतो. तो अनुयायाचे कपडे घालून भक्त झालेला असतो. तो महामानवाला पायाकडून पोखरतो. तो शिष्य नसल्याने त्याचे त्या महामानवाच्या विचारांशी देणंघेणं नसतं. त्याला रस असतो भक्तित, नामस्मरणात आणि भजनात. तो भक्तिच्या कोलाहालात महामानवाचे विचार धूसर करतो. तो त्या महामानवाला देव बनवतो. मंदिरं उभारतो. त्याच्या विचारांसंबंधी त्याला काही विचारलं तर तो भक्तिरसातच रंगतो. ‘अहो, ते देवच होते. त्यांचे विचार फक्त तेच प्रत्यक्षात आणू शकतात. आपण पामर आपली लायकीच काय? आपण त्यांच्या विचारांचा विचार करण्याच्यासुद्धा लायकीचे नाही!’ हे ऐकताना या माणसातील विनम्रपणा जाणवण्याऐवजी त्याच्यातील मानसिक गुलामगिरीच अधिक जाणवते.

एखाद्या महामानवाबद्दल सद्भावना असणं चांगलंच असतं. पण सद्भावनेची जागा जेव्हा भक्ती आणि अंधश्रद्धा घेते तेव्हा खरा धोका सुरू होतो. जगभरात अनेक महामानवांच्या बाबतीत हे घडत आलं आहे. मनुष्यप्राणी हा भावनाशील आणि विचारशील प्राणी आहे. त्याला प्रतीकांची गरज नेहमीच भासली आहे. अज्ञानाच्या गर्तेमध्ये असताना अंधाराचा अर्थ शोधता शोधता त्याने सूर्याला देव केलं तर अन्नाच्या भटकंतीत अहोरात्र फिरणार्या आदिम मानवाने पृथ्वीच्या पोटातून अन्न उगवतं म्हणून पृथ्वीला देव केलं. पंचमहाभूतांच्या दैवतीकरणाच्या इतिहासापासून हा सिलसिला सुरू आहे. माणसाला जगताना आधार लागतो. कधी माणसांचा तर कधी देवांचा. माणसाने माणसाच्या खांद्यावर मान टाकली आणि माणसानेच त्याचा गळा कापला तर अशा अविश्वासाच्या क्षणी माणसाला डोकं टेकवण्यासाठी देवाचा खांदा लागतो. म्हणूनच तर मंदिरासमोरच्या रांगा हटता हटत नाहीत. माणसानेच माणसाविरुद्ध युद्ध पुकारल्यावर सामान्य माणसाने जावं तरी कुठे? अगतिकतेमुळे माणसं देवांचे उंबरठे झिजवतात अन् त्याच मार्गात कुणी थोडासा विश्वास ठेवण्यापुरता ‘बाबा’, ‘बापू’ भेटला तर त्याच्या पायाजवळ आपलं सर्वस्व अर्पण करतात. पाश्चिमात्य समाजात विज्ञानाची चळवळ झाली म्हणून तिथला माणूस

निदान दुःखाच्या प्रसंगी थोडा तरी विज्ञाननिष्ठ विचार करू शकतो. पण भारतासारख्या देशात दुःखाच्या काळात फक्त देवाचाच पर्याय शिल्लक असतो. त्यामुळे भारतीय समाज हा त्यांच्या प्रतीकांच्या बाबतीत अतिसंवेदनशील आहे. तुम्ही त्याला काही म्हणालात, चार शिव्या दिल्या तर तो ऐकून घेईल पण तुम्ही त्याच्या प्रतीकांच्याबद्दल ‘ब्र’ काढलात तर परिणाम अत्यंत घातक होऊ शकतात.

भारतीय सत्ताधारी वर्गाला या परिस्थितीची पक्की जाणीव आहे. म्हणून या देशात सत्ता बदलल्या, सत्ताधारी बदलले पण त्यांनी कधीच भारतीय समाजाच्या श्रद्धांच्या क्षेत्रात कसलीच लुडबूड केली नाही. ज्या ज्या वेळी असं काही करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी ताबडतोब प्रतिक्रिया उमटल्याचं इतिहासात दिसून येतं. म्हणून देशी विदेशी सत्ताधारी कधीच श्रद्धा-अंधश्रद्धांच्या क्षेत्रात हस्तक्षेप करताना दिसत नाहीत. उलट हे सत्ताधारी शोषितांवर आपला अंकुश ठेवण्यासाठी प्रतीकांचा अत्यंत खुबीने वापर करतात अन् आपली सत्ता कायम करतात.

प्रतीकांची निर्मिती कशी होते? हे समजून घेतलं तर त्या प्रतीकांचा वापर कसा केला जातो हे आपणास सहज समजेल. मानव समाज आदिम अवस्थेत असताना खाजगी मालमत्ता नावाची गोष्ट नव्हती. त्यामुळे अंतर्गत हेव्यादाव्यावरून मारामार्या होण्याच्या भानगडी नव्हत्या. पण खाजगी मालमत्तेच्या संकल्पनेचा जन्म झाल्यानंतर मात्र ही युद्ध वाढली, असुरक्षितता वाढली, दुःख वाढलं आणि या दुःखाला वाचाफोडणारे मानवसुद्धा निर्माण होऊ लागले. दुःखाची निर्मिती करणार्या सत्ताधारी वर्गाची अशा मानवांची विल्हेवाट लावण्याची एक अत्यंत कुटिल पद्धत आहे. ते सुरुवातीला तर या मानवांकडे दुर्लक्ष करतात. तो किंवा ती काय बोलतेय हे सत्य आहे हे समजूनसुद्धा अशा व्यक्तिंकडे मुद्दाम कानाडोळा केला जातो. त्यांना माध्यमांतून वजा केलं जातं. त्यांना मानसन्मान मिळू नयेत अशी अलिखित व्यवस्था केली जाते. अशा कटकारस्थानांमुळे दुःखाविरुद्ध लढणारे काही महामानव हे गर्भातच मरतात. पण काही प्रखर स्वभावाचे मानव मात्र सत्ताधारी वर्गाने काहीही केलं तरी गप्प राहत नाहीत ते सत्याच्या मार्गाने निर्भयपणे चालत राहतात अन् त्यांच्या अशा बांधिलकीमुळे समाजातला दुःखाने गांजलेला समाज त्यांच्यामागे उभा राहतो अन् मग मात्र सत्ताधार्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मग ते अशा मानवांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करतात. ज्या व्यवस्थेच्या विरोधात ते संघर्ष करत असतात त्या व्यवस्थेत तुमच्यासारख्या सत्यवादी लोकांनाही एक अवकाश आहे अशी ग्वाही देतात. व्यवस्थेच्या एखाद्या लहानशा सत्तेचा तुकडा त्यांच्या पुढे टाकून बघतात पण त्यानेही हा मानव बधला नाही तर मात्र त्याच्या बदनामीचे मार्ग शोधले जातात पण बदनामीनेही हा माणूस मरत नसेल तर कायदेकानून वगैरेची दहशत दाखवतात अन् एखाद्यावेळी तुरुंगातही पाठवून बघतात. पण त्यानेही हा मानव मेला नाही तर मात्र अशा मानवांच्या हत्येचा कट रचतात. हत्या घडवून आणतात. पण हत्याही करता आली नाही तर हा मानव सन्मानाने सत्याच्या लढाईत लढता लढता नैसर्गिकरित्या जग सोडून जातो. अशी माणसं युगायुगातून एकदाच जन्माला येतात. त्यामुळे सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर असतोच. पण मृत्युनंतर हे महामानव अधिक मोठे होतात अन् मग सुरू होते मृत्युनंतरच्या खुनाची तयारी. हा खून अत्यंत वाईट पद्धतीने केला जातो. मृत्युनंतर महामानव कुणा एका समाजाचे राहत नाहीत. ते वैश्विक होतात. मग सत्ताधारी त्यांना स्वीकारतात. ते म्हणतात, ‘ते तर महामानव. ते आमचेही आहेत!’ पण मृत्युनंतर जेव्हा या महामानवांना स्वीकारलं जातं तेव्हा एक मोठी हेराफेरी केली जाते. असल्या हेराफेरी करण्यात सत्ताधारी वर्ग मोठा वाकबगार असतो. सत्ताधारी महामानवाला स्वीकारताना ते त्या महामानवाला आपल्या मूल्यव्यवस्थेचं इंजेक्शन देतात आणि तो महामानव जणू सत्ताधारी वर्गाच्या मूल्यांसाठीच जगला आणि गेला असं भासवतात. प्रथम सत्ताधारी वर्गच अशा महामानवांचा देव बनवतो अन् त्याच्या लढ्याला आणि तत्त्वांना पातळ करून कधी कधी तर चक्क विपर्यास करतात आणि सरळ सरळ खोटी प्रतिमा उभी करतात.

ही प्रक्रिया एका पिढीत होत नाही. ही सांस्कृतिक गुन्हेगारी पिढ्या न् पिढ्या अविरत चालू असते. त्यामुळे इतकं उलटल्यावर तर हा महामानव नेमका कसा होता हेच कळत नाही. पण तोपर्यंत त्याचा देव मात्र झालेला असतो.

प्रतीकांच्या दैवतीकरणाच्या या प्रक्रियेकडे डोळसपणे बघण्याची किंवा समजून घेण्याची सवड सामान्य माणसांना नसते. म्हणून ते आपल्या सोयीचं असणारं प्रतीक स्वीकारतात आणि त्याच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक ओळख करून देतात. फार खोलात जायला सामान्य माणसांना वेळ नसतो. त्यांना रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणारी ओळख हवी असते. त्या ओळखीतून प्रतीत होणारी अस्मिता हवी असते. त्या अस्मितेमुळे त्याला सुरक्षितता मिळते. मान मिळतो. त्यामुळे त्या महामानवाच्या वैचारिकतेचा आणि त्याच्या कार्याचा सखोल अभ्यास करून त्याच्या विचारांचा विकास करण्याची जबाबदारी तो झटकून टाकतो.

जे इतर महामानवांच्या बाबतीत झालं तेच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत चालू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वैचारिक भूमिकेसाठी जन्मभर लढा दिला त्या वैचारिक भूमिकेची दुहेरी कोंडी आज चालू आहे. देशातल्या सत्ताधार्यांना हे माहीत होतं की, जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर अत्यंत धोकादायक आहेत. म्हणून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं सत्ताधार्यांना अभिप्रेत असलेलं प्रतीक गेल्या ५० वर्षांत घडवलं आहे. सरकारी बाबू आणि सरकारी बुद्धिजीवी यांना जन्माला घालणारं हे प्रतीक प्रत्येक लढ्याकडे नकारात्मक पद्धतीने पाहतं.कोणत्याही त्यागाची प्रेरणा त्या प्रतीकातून मिळत नाही. उलट कसंही करून कुणाच्याही नरडीवर पाय देऊन तुम्ही वरच्या जागा पटकावा. म्हणजेच त्यागी आंबेडकरांचं भोगी प्रतीक त्यांनी आपल्या माथी मारलं आहे. एकदा वरच्या जागांवर गेलात की मागे वळून पाहू नका, तुमच्या पायाखाली खितपत पडलेला समाज बघू नका, असं बाबासाहेबांच्या खर्या रूपाला विसरायला लावणारं प्रतीक सत्ताधारी वर्गाने आपल्या माथी मारलं आहे.

ज्या बाबासाहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत जातिअंताचा लढा दिला त्या बाबासाहेबांना एका जातिच्या कुंपणात बंदिस्त करण्याचं कारस्थान करण्यात आलं. प्रथम व्होट बँक म्हणून आणि नंतर फक्त दलितांचे कैवारी म्हणून. सत्ताधार्यांनी बाबासाहेबांना कधीच स्वीकारलं नव्हतं. म्हणून त्यांना भीती होती की, मृत्युनंतर हा महामानव राष्ट्रपुरुष होईल. म्हणून त्यांची उंची कापून त्यांना जातिपुरता लहान करण्यात आलं. बाबासाहेबांच्या विचारांची झेप पाहता ते कधीच एका जातीच्या कोंडाळ्यात रमले असतील असं वाटत नाही. उलट जातिव्यवस्था तोडून सारे भेद मिटवून आपण माणूस म्हणून जगावं म्हणून त्यांनी संघर्ष केला. आज एका जातिचा नेता अशी बाबासाहेबांची ओळख तयार झाली आहे.

ज्या बाबासाहेबांनी कधी व्यक्तिपूजा केली नाही त्यांनाच व्यक्तिपूजेच्या मखरात बसवण्यात आलं आहे. एकाबाजूने सत्ताधारी तर या कामात आघाडीवर आहेतच पण सामान्य माणसंही त्याच पद्धतीने व्यक्तिपूजेत बुडालेली आहेत. जसं बुद्धाने मूर्तिपूजेला विरोध केलापण त्याच बुद्धाच्या जगात सर्वात जास्त मुर्त्या आहेत. महामानवांना मारतात ते असं! आज बाबासाहेबांच्या पुतळ्यांची गणती करता येत नाही एवढे पुतळे आहेत अन् हे पुतळे जसे सत्ताधारी बनवत आहेत त्याच वेगाने सामान्य माणसंही बांधत आहेत. विचार वजा करून एक निर्जीव आंबेडकर आपल्या माथी मारला जात आहे.

आज या स्थितीचा विचार करणारे बुद्धिजीवी संपले आहेत. काही दरबारी हुजरे म्हणून सत्ताधार्यांच्या पायाजवळ बसून आहेत तर काहींना जातिच्या सापाने विळखा घातला आहे. त्यांना आपल्या पल्याडचं जग दिसत नाहीत. सत्ताधार्यांनी टाकलेल्या जातिच्या सापळ्यात ते एकदम फिट्ट बसले आहेत. काहींना एवढा गर्व झाला आहे की जणू ते स्वतःच बाबासाहेब आहेत असं समजून वागत आहेत. काहींना ब्राह्मण्याने ग्रासलं आहे ते ब्राह्मणांच्यावर जातीय अहंगडाने बेजार आहेत. काहींना भांडवलशाहीने विळखा घातला आहे. त्यांना वाटतंय आपण भांडवलदार होणार आहोत. नाना तर्हेचे आंबेडकरवादी दिसू लागले आहेत. काहींनी तर सरळ सरळ ब्राह्मण्यवादी आणि फॅसिस्ट लोकांच्या गळ्यात गळा घातला आहे.

अशा विचित्र स्थितीत खरं बाबासाहेब हरवून गेले आहेत. काही कट्टरपंथी, पोथीवादी लोक बाबासाहेबांच्या विचारांना वेद आणि कुराण बायबलसारखं समजून त्या विचारांच्या विकासाचा मुद्दा निघाला की धर्मांध लोकांसारखे चवताळतात. सत्ताधारी वर्गात बाबासाहेब निस्तेज केला तरी त्याबाबत काही न बोलणारे हे वीर बाबासाहेब आज असते तर खैरलांजीच्या हत्याकांडाचा न्याय त्यांनी कसा मागितला असता किंवा जागतिकीकरणाच्या लाटेत आलेल्या खाजगीकरणावर बाबासाहेब काय म्हणाले असते? असं विचारलं की मूग गिळून गप्प बसतात.

मुद्दा आहे खरे बाबासाहेब शोधण्याचा! त्यासाठी जमिनिशी नातं असणार्या बुद्धिजीवींना नव्याने विचार करावा लागणार आहे आणि बुद्धिजीवींची पुढारपणाची आणि नेतृत्वाची झूल चढवलेल्या या दरबारी बैलांना त्यांची जागा दाखवली पाहिजे.

– संभाजी भगत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *