पंढरीच्या वारीवर मी बनवलेला ‘गजर’ हा मराठी चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय सर्व काही प्रेक्षकांना खूप आवडलं होतं आणि त्यामुळे या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं होतं. तसंच या चित्रपटाने ३२ पुरस्कारही जिंकले होते आणि तोच चित्रपट ‘मोक्ष’ या नावाने मी हिंदीमध्ये घेऊन येत आहे. या चित्रपटाची संकल्पना ही ‘गजर’ या मराठी चित्रपटासारखीच आहे. तसंच कलाकार आणि तंत्रज्ञदेखील सारखेच आहेत. पण आम्ही हा हिंदीत डब केलेला चित्रपट नाहीय. यातील अनेक दृश्यांचं चित्रीकरण आम्ही पुन्हा केलं आहे. तसंच या चित्रपटाची गाणीही आम्ही नव्याने बनवली आहेत. शंकर महादेवन यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.

‘मोक्ष’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अजित भाईरावकर हे माझ्याकडे पंढरपुरच्या वारीवर मी एक डॉक्युमेंट्री बनवावी यासाठी आले होते. अजित यांचं म्हणणं होतं की, ही वारी केल्यानंतर शेतकर्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण कमी होतं असं दिसून आलं आहे. कारण या वारीमुळे त्यांना मनःशांती मिळते. तेव्हा त्यांनी सांगितलेला हा विषय मला प्रचंड आवडला आणि त्यामुळे या विषयावर डॉक्युमेंट्री बनवण्याऐवजी चित्रपट बनवावा असं मी सुचवलं. त्यामुळे आम्ही मराठीत ‘गजर’ हा चित्रपट बनवला आणि आता हिंदीत याच विषयावर ‘मोक्ष’ हा चित्रपट बनवत आहोत. ‘मोक्ष’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव हा खूपच चांगला होता. कारण आम्ही पंढरपुरच्या वारीत प्रत्यक्ष चित्रीकरण केलं आहे. या चित्रपटात कोणताही ज्युनिअर आर्टिस्ट नाहीय तर वारीत आलेले २० लाख लोकच या चित्रपटात आहेत. त्यामुळे पंढरपुरच्या यात्रेच्यावेळी भक्तांची उसळणारी गर्दी आम्ही आमच्या कॅमेर्यात बंदिस्त केली आहे. खरं तर इतक्या गर्दीत चित्रीकरण करणं काही सोपं नव्हतं. कारण आमची १०५ जणांची टीम होती. त्यामुळे एकमेकांशी संपर्क साधणंही कठीण जात होतं. म्हणून आम्ही वॉकीटॉकीचा वापर करत होतो. तसंच गर्दीत चित्रीकरण करताना आम्ही छोट्या कॅमेर्याचा वापर केला आहे. आम्हाला इतक्या गर्दीत काम करावं लागेल याची कल्पनादेखील आम्हाला नव्हती. कारण आम्ही पंढरपुरच्या यात्रेत चित्रीकरण करायचं ठरवलं तेव्हा तिथे इतकी गर्दी असेल याची कल्पनाच नव्हती. पण या गर्दीतही चित्रीकरण चांगल्याप्रकारे झालं. फक्त एकदा चित्रीकरणाच्यावेळी आमचा कॅमेरामन चित्रीकरणासाठी एका झाडावर बसला होता आणि तिथून तो पडला. त्यावेळी आम्ही सगळे खूपच घाबरलो होतो. पण ४० फुटावरून पडूनही त्याला जास्त काही दुखापत झाली नसल्याने आमचा जीव भांड्यात पडला. तसंच या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आम्ही पॅराग्लाईडचाही वापर केला आहे. यासाठी एका कॅमेरामनला खास सहा महिन्यांचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं.

चित्रपटाचं चित्रीकरण करताना वारकर्यांनी आम्हाला खूप मदत केली. ते आम्हाला व्यवस्थित माहिती द्यायचे. आमच्याशी चांगलं वागायचे. एवढंच काय तर कधीकधी त्यांच्याकडची भाकरी, चटणीही आम्हाला खायला द्यायचे. चित्रीकरण करताना आमचे खाण्याचे खूप हाल होत होते. आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न येत होता तो म्हणजे जेवणाचा. कारण २० लाखांच्या गर्दीत १०५ लोकांना जेवण पोहचवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे आम्ही २५-२५ जणांची टीम बनवली होती. पण तरीही दुपारचं जेवण टीमपर्यंत पोहोचायला संध्याकाळचे पाच-सहाही वाजायचे. पण तरीही सगळ्यांसाठी हा एक वेगळा आणि चांगला अनुभव होता. ‘मोक्ष’ या चित्रपटाच्यावेळी आलेला एक अनुभव माझ्या कायमच लक्षात राहील. चित्रीकरण करताना आम्हाला एक साधू भेटला होता. तो आमच्यासोबत अस्खलित इंग्रजीत बोलत होता हे पाहून आम्ही सारे चकित झालो. एखादा साधू इतकं चांगलं इंग्रजी बोलू शकतो असं मला कधी वाटलंही नव्हतं आणि त्यामुळे आम्ही त्याला या चित्रपटातही घेतलं.

‘मोक्ष’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, सुहास शिरसाठ, उमेश जगताप, सुखदा यश, एडवर्ड सोनेनब्लिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चिन्मय मांडलेकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक खूप फेमस कलाकार आहे आणि त्यामुळे चित्रीकरणाच्यावेळी पंढरपुरच्या यात्रेतील अनेक लोक त्याला ओळखायचे. त्याच्यासोबत बोलण्यासाठी खूप उत्सुक असायचे. त्यामुळे अनेकवेळा आम्हाला गर्दीला सांभाळणं कठीण जायचं. पण तरीही आम्ही सारं चित्रीकरण वेळेत पूर्ण केलं.

पंढरपुरच्या वारीवर ‘मोक्ष’ हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे आणि तो लोकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.

 सुनिल खोसला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *