४.

पंचमहाभूतांच्या निसर्गाच्या पोटातून जन्माला आलेली जी सजीवसृष्टी आहे, तिच्यात पुन्हा अनेक घटक आहेत. त्यात जलचर आणि भूचर असे मुख्य दोन घटक. या दोन्ही घटकांत मिळून मग असंख्य जातींच्या वनस्पती, अनेक जातींचे प्राणी असे अनेक उपघटक आहेत. त्या उपघटकांमध्ये आपापल्या अस्तित्वांचं, किंवा अस्तित्वांसाठीचं समन्वयाचं एक चक्र आहे. त्या चक्रात पुन्हा प्रत्येक सजिवाची उपयोगिता-निरुपयोगिता ठरलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे यातल्या प्रत्येक उपघटकाला पुन्हा स्वतःचं अस्तित्व आणि स्वतंत्र जीवनचक्रसुद्धा आहे. यातला प्रत्येक उपघटक स्वतःपुरता एक स्वतंत्रच घटक आहे आणि त्याचं स्वतःच्या जन्म, वाढ, मृत्यूचंही एक स्वतंत्र चक्र आहे. या सगळ्यांचा मिळून एक विस्तारित पसारा आहे आणि माणूस हा त्या पसार्यातला एक छोटासा भाग आहे. त्या छोट्याशा भागाचा पुन्हा स्वतंत्र, दीर्घ इतिहास आहे आणि त्या इतिहासाला अनेकानेक कंगोरे आहेत. त्या प्रत्येक कंगोर्यांचाही पुन्हा स्वतःचा इतिहास आहेच.

ही अशी मांडणी इथे अशासाठी केली की, एकाच्या पोटात दुसरं, दुसर्याच्या पोटात तिसरं, तिसर्याच्या पोटात चौथं अशी एकूणच निसर्गाच्या निरनिराळ्या अस्तित्वांची साखळी आहे आणि त्या साखळीचा माणूस हा अगदी गणंग, नगण्य, अगदी लहान हिस्सा आहे. मानवी संस्कृती असा वाक्प्रचार आपण वापरतो तेव्हा वैश्विक पसार्यात त्याची जागा किती लहान आहे, हे इथे दाखवून द्यायचं आहे. (आणि तरीही मानवी संस्कृतीचा स्वतःचा पसाराही विशालच आहे. अशा अनेकानेक विशालतांचा मिळून निसर्गाचा किंवा विश्वाचा महाविशाल पसारा मांडला गेला आहे. एका मानवी संस्कृतीच्या सर्व कंगोर्यांचा उलगडा करत बसणं हे जर अवघड असेल, तर संपूर्ण वैश्विक संस्कृतीचा पसारा उलगडत बसणं किती अवघड ठरेल, हे इथे सांगायचं आहे.)

मानवी आयुष्याला कोट्यवधी वर्षांचा काळ झाला म्हणतात! म्हणजे प्रचंड मोठा काळ. पण हाच प्रचंड मोठा काळ एकूण वैश्विक पसार्यात अगदीच क्षुद्र आणि अगदीच कणभर आहे, असंच लक्षात येईल. आणि मानवी संस्कृती म्हणून आपण जे म्हणू पाहतो, ते प्रकरण अगदीच कणभर आहे, म्हणजे एका कणाची संस्कृती सांगावी लागेल, असं म्हणता येईल. (आणि प्रत्यक्षात तेही काम भव्य आहे. कुणाच्याही आवाक्याबाहेरचं आहे.)

सजिवांचं जे एकमेकांना जगवणारं चक्र आहे, त्यातला एखादा घटक टिकला काय न् नष्ट झाला काय, याचं निसर्गाला काही घेणंदेणं नसतं. परिणाम झाला तर तो सजिवांवर होतो, निसर्गावर नाही. सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. एकमेकांच्या जिवावर जगतात. त्या जगण्याचं एक चक्र तयार होतं. त्या चक्रातले काही सजीव काळाच्या ओघात नष्ट होतात, काही नव्या सजिवांची त्यात भर पडते. काही सजीव ते चक्र चालू ठेवायला अतिशय उपयोगी पडतात. ते समजा नष्ट झालं तर चक्रही खंडित किंवा नष्ट होऊ शकतं. जीवनाच्या या चक्रमालिकेत माणूस हा नेमका कुठे बसतो न् त्याचा त्या चक्राला काही उपयोग होतो का न् समजा माणूस हा प्राणी या चक्रातून नष्ट झाला तर त्या चक्रावर काही परिणाम होतील का, असा नीट विचार केला तर, असं लक्षात येतं की, सजिवांच्या जीवनचक्रात माणसाचा प्रत्यक्ष असा काहीही उपयोग नाही. अगदी एखाद्या क्षुद्र कीटकाइतकाही नाही. सजिवांचं जीवनचक्र चालू राहणं किंवा थांबणं हे माणूस या प्राण्यावर अजिबातच अवलंबून नाही. उदाहरणार्थ, जगातले सगळे वाघ संपले किंवा सगळी फुलपाखरं संपली किंवा मुंग्या संपल्या तर सजीव निसर्गचक्राचं अतोनात नुकसान होऊ शकतं. तसं माणूसजात संपूर्ण संपली तर निसर्गाचं अजिबातच नुकसान होणार नाही. सृष्टीत अनेक सजीव नुसतंच, असायचं म्हणून असतात. त्यातलाच माणूसही आहे. पंचमहाभूतांच्या थोर निसर्गचक्रात किंवा सजिवांच्या स्वतःच्या निसर्गचक्रात माणूस या जातीचं काहीही प्रयोजन नाही. आणि तरीही तो या निसर्गात आहे आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे निसर्गाशी वेगवेगळ्या पातळ्यांचा झगडा मांडलेला तो एकमेव सजीव आहे. आजवरची एकूणच मानवी संस्कृती म्हणजे काय, याचं एक सोपं उत्तर द्यायचं असेल तर, ते असं देता येईल की, माणसाने निसर्गाला स्वतःसमोर वाकवायचा केलेला प्रयत्न म्हणजे मानवी संस्कृती. ज्या निसर्गाने माणसाला जन्मवलं, घडवलं, त्याच निसर्गाला माणसाने वापरायची जास्तीत जास्त संधी घेणं हा मानवी जीवनाचा अगदी सुरुवातीपासून आजपर्यंतचा इतिहास आहे आणि तो इतिहास म्हणजेच एकूण मानवी संस्कृती.

माणूस निसर्गाच्या बरोबरीला उभं राहण्याचा किंवा त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणारा एकमेव सजीव आहे, पण अर्थात त्यात तो अंतिमतः, कधीही यशस्वी होणं शक्य नाही, हेही सत्य आहे. निसर्गचक्रात बेहद्द परका, उपरा घटक असूनही इतर कुठल्याही सजिवापेक्षा निसर्गाला सर्वात नुकसानदायी वागणारा माणूसच आहे. एवढंच नाही तर पंचमहाभूतांवरही स्वतःचा कबजा मिळवण्याचा त्याचा प्रयास आहे. यात तो पूर्ण यशस्वी कधीच होणार नसला तरी, त्याची ही प्रवृत्ती समजा अवाढव्य झाली तर तो निसर्गचक्राचं अपरिमित नुकसान मात्र करू शकतो. त्या प्रयत्नाचा शेवट म्हणून माणूसजातीचाच निःपात होऊ शकतो. निसर्गाच्या नुकसानीची हद्द ओलांडली गेली तर निसर्ग माणसाचाच नायनाट करू शकतो. या प्रक्रियेत आजच्या निसर्गाचं रूप थोडं पालटू शकतं, एवढंच, पण निसर्गाचा स्वतःचा खातमा होईल हे कधीही शक्य नाही. एवढंच नाही तर माणूस संपूर्ण सजीवसृष्टीही स्वतःच्या मरणाबरोबर नेस्तनाबूत करू शकतो, मात्र पंचमहाभूतांच्या निसर्गाला तो कधीही संपवू शकत नाही. सगळे सजीव संपले तरी वेगळ्या स्वरूपात निसर्ग का होईना, हयात राहणारच. (हे थोडंसं, मुद्दामच विषयांतर.)

५.

माणसाच्या उत्पत्तीच्या शास्त्रीय, अशास्त्रीय अशा अनेक कथा आहेत. त्या काहीही असल्या तरी, मानवी संस्कृती म्हणून जो विशेष उल्लेख आपण करायला पाहतो, तो त्याच्या उत्पत्तीपासूनच गृहीत धरला पाहिजे. तिथूनच माणसाची स्वतःची संस्कृती सुरू झाली. काळाच्या प्रवाहात माणसाची अनेक रूपांतरं, विकसनं झाली, हासुद्धा त्याच्या संस्कृतीचाच भाग आहे, हेही गृहीत आहे. आणि त्याचा तिसरा टप्पा, आजच आपण या विषयाची मांडणी करतो आहोत म्हणून ‘आजचा माणूस’ असा अभिप्रेत आहे. माणसाची उत्पत्ती, वाढ आणि त्याचा आजचा काळ या संदर्भात लिहायचं ठरलं तर मग या सगळ्या प्रवासातलं त्याचं चांगलंपण-वाईटपण, त्याच्या प्रवासाचे सगळे रंग आणि त्यावरून तो कसा असायला हवा होता, कसा नको होता आणि त्यातून साहजिकच भविष्यात तो कसा असायला हवा-कसा नको, याचीही मांडणी करता येईल. आजवरच्या माणूसजातीवरून भविष्यातल्या माणसाचंही संकल्पचित्र रचता येईल.

माणूस हा एक प्राणी आहे, असं नेहमी बोललं गेलं. ते खरं आहे. तो इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळा प्राणी आहे असंही बोललं गेलं, तर तेही खरं आहे. आज आपल्याभोवतीची जेवढी सृष्टी आपल्याला दिसते, कळते, तिच्यात तरी माणूस हा इतर कुठल्याही चल आणि अचल सजिवापेक्षा अचाट, आगळा सजीव आहे, असंच त्याचं दर्शन आहे. सृष्टीने प्रत्येक सजिवाला उत्पत्तीनंतर स्वतःत हवे ते बदल करण्याची, कोणत्याही प्रकारे स्वतःचं विकसन करण्याची सोय दिलेली असते. त्या सोयीचा अतिशय आणि अधिकाधिक फायदा माणूस या सजिवाने उचलल्याचं अगदीच स्पष्ट दिसतं. त्यातही इतर सजिवांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्यातले बदल बरेचसे निसर्गाच्या इच्छेने किंवा निसर्गात झालेल्या बदलांमुळे झालेले असतात. त्यांच्या जगण्याच्या गरजेतून ते बदल घडतात. माणसाचं – किमान आताच्या माणसाचं – तसं नाही. नैसर्गिक गरजेने त्यांच्यात बदल होत गेले हे खरंच आहे, पण बर्याचदा माणूसही स्वतःत काही बदल करत गेला स्वतःच्या इच्छेखातर, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याही पुढची गोष्ट अशी की, त्या बदलांखातर तो सृष्टीतही अनेकानेक बदल करण्यासाठी धडपडत राहिला. त्यामुळे इतर कुठल्याही सजिवापेक्षा माणसाचा इतिहास अतिशय वेगळा घडत गेला. इतर कोणत्याही सजिवापेक्षा निसर्गाने माणसाला अनेक नवनव्या गोष्टी बहाल केल्या. काही गोष्टी माणसाने स्वतः आत्मसात केल्या, स्वतःत विकसित केल्या. उदाहरणार्थ, जगातल्या अनेक सजिवांना स्वरयंत्र असतं, निरनिराळे ध्वनीही काढता येतात. माणसाचंही तेच आहे. पण माणसाने ध्वनींची भाषा तयार केली. त्या भाषेत तो एकमेकांशी बोलू लागला. भाषेतून त्याने ‘ज्ञान’ नावाचा प्रकार शोधून काढला. त्या ज्ञानाच्या जोरावर तो जगावर राज्य करायला निघाला. आज अवस्था अशी आहे की, माणूस ठरवलं तर जगातला कुठलाही सजीव जिवंत ठेवू शकतो किंवा मारून नष्ट करू शकतो. जगातल्या कुठल्याही सजिवाचा माणूस अभ्यास करू शकतो. इतर कुठलेही सजीव (अजून तरी) एकमेकांचा किंवा माणसाचा अभ्यास करू शकत नाहीत. (काही पाळीव प्राणी माणसाचा किंवा एकमेकांच्या आधारावर जगणारे प्राणी एकमेकांचा थोडासा अभ्यास करतात असं वाटतं. उदाहरणार्थ, कुत्री-मांजरं, गाई-गुरं माणसाला जाणतात.) भाषेतने माणसाने एकमेकांशी संपर्कासाठी अनेक माध्यमं निर्माण केली, अनेक ज्ञानशाखा निर्माण केल्या आणि त्याला हव्या त्या प्रगतीच्या अवाढव्य झेपा त्याने घेतल्या. स्वतःसाठी त्याने संपूर्ण सृष्टी वापरायला काढली. माणूस हा प्राणी आज जगण्याची जी शक्ती आणि युक्ती दाखवतो, तशी किंवा तेवढ्या प्रमाणातली, तेवढ्या विविधतेची शक्ती आणि युक्ती इतर कुठल्याही सजिवाला दाखवता येत नाही, हे माणसाचं मोठं वेगळेपण. ती त्याची सृष्टीच्या तुलनेतली संस्कृती.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *