मराठी मालिकांना सध्या बरे दिवस आले आहेत, असं म्हटलं जातं. कारण मराठी मालिकांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. हिंदी मालिकांमध्ये रमणारा प्रेक्षक आजकाल मराठी मालिकांमध्ये अधिक रमू लागलाय. पूर्वी तुलसी, पार्वती, प्रेरणा यांच्या चिंतेत असलेला प्रेक्षक आज जान्हवी, राधा, देवयानी, दुर्वा यांचं काय होणार असा विचार करू लागलाय आणि त्यामुळे हिंदी मालिकांच्या प्राईम टाईमच्या वेळांतही मराठी मालिकांना चांगला टीआरपी मिळत आहे. मराठी मालिकांसाठी ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण प्रेक्षकांच्या या आवडत्या अनेक मराठी मालिका या हिंदी मालिकांच्याच धर्तीवर आहेत हे वास्तव खूपच कमी प्रेक्षकांना माहीत आहे. आजच्या अनेक मालिकांची कथा ही पूर्णपणे हिंदी मालिकांसारखी नसली तरी मालिकेची संकल्पना मात्र ही हिंदी मालिकांशी मिळतीजुळती असते.

‘मन की आवाज प्रतिज्ञा’ ही मालिका काही काळ स्टार प्लस या चॅनेलवरची नंबर एकची मालिका होती. मवाली क्रिश्ना प्रतिज्ञासोबत बळजबरीने लग्न करतो आणि पुढे त्यांच्यात प्रेम फुलत जातं. हेच सारं प्रेक्षकांना स्टार प्रवाहच्या ‘देवयानी’ या मालिकेत पहायला मिळातंय. तर सध्या स्टार प्लसवर सर्वाधिक टीआरपी मिळवत असलेल्या ‘दिया और बाती हम’ या मालिकेवर आधारित स्टार प्रवाहवरील ‘मानसीचा चित्रकार तो’ ही मालिका बनवण्यात आलीय. आपल्या बायकोला आयपीएस बनवण्यासाठी तिला सर्वतोपरी साथ देणार्या नवर्याची कथा या दोन्ही मालिकांत आपल्याला पहायला मिळते. तर ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ ही ‘उतरन’ या हिंदी मालिकेवर तर ‘सावर रे’ ही मालिका ‘ना बोले मैंने कुछ कहाँ’ या मालिकेवर आधारलेली आहे. हॅटस ऑफ प्रॉडक्शनच्या ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेतील सार्याच व्यक्तिरेखा खूप गाजल्या होत्या. याच मालिकेवर आधारित ‘माधुरी मिडल क्लास’ ही मालिका त्याच प्रॉडक्शन हाऊसने मराठीत आणली आहे. पण या मालिकेतील संवाद मराठमोळे वाटत नाहीत. हिंदीचा बाज हा खूप वेगळा असतो याचा विसर हॅडस ऑफ प्रॉडक्शनला बहुधा पडला आहे असं ही मालिका पाहिल्यानंतर वाटतं. या सार्या मालिकांच्या संकल्पना तंतोतंत हिंदी मालिकांसारख्या आहेत. पण त्याचसोबत काही मराठी मालिका आहेत ज्यांची संकल्पना पूर्णपणे हिंदी मालिकांसारखी नसली तरी मालिकेच्या संकल्पनेचा काही भाग हा हिंदी मालिकेतून घेण्यात आला आहे.

‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्याच्या कुटुंबातील सगळीच नाती ही बनावटी आहेत. आपल्या प्रेयसीला कुटुंबाची ओळख करून देताना आपल्या घरात राहणारी काही मंडळी ही आपले सख्खे नातलग आणि कुटुंबीय आहेत, अशी ओळख करून दिली जाते. सब वाहिनीवरील ‘सजन रे झूठ मत बोलो’ या मालिकेतील सुमित राघवनच्या कुटुंबातदेखील अशीच नात्यांची बनवाबनवी दाखवण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही मालिकांच्या संकल्पनेत काहीच नातं नसलं तरी नात्यांपुरतं का होईना त्यांच्यात नातं जरूर आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तसंच सध्या गाजत असलेल्या ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत सहा सासवांच्या सहवासात असलेली सून आपल्याला पहायला मिळतेय. ही सून आपल्या सगळ्या सासवांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतेय. ‘सास बिना ससुराल’ या मालिकेतसुद्धा अशीच सासर्यांच्या सहवासात असलेली सून प्रेक्षकांनी पाहिली होती. आपल्या सर्व सासर्यांचं मन जिंकण्याचा ती नेहमी प्रयत्न करत होती. तर ‘राधा ही बावरी’ या मालिकेत एक तरुण आपल्यापेक्षा काही वर्षांनी मोठ्या असलेल्या एका डॉक्टर मुलीच्या प्रेमात पडतो आणि ते दोघं लग्न करतात. पण अशीच काहीशी कथा काही वर्षांपूर्वी खूप प्रसिद्ध झालेल्या ‘अस्तित्व- एक प्रेम कहानी’ या मालिकेची होती. या हिंदी मालिकेत वरुण बडोला हा युवक आपल्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या निकी अनेजाच्या प्रेमात पडतो आणि ते दोघं लग्न करतात. पण लग्नानंतर त्यांच्यात होत असलेल्या सततच्या भांडणांमुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो, अशा कथानकाची ती मालिका होती…

मराठी मालिकांच्या या कथा पाहिल्या तर काही मालिकांच्या कथेत अधिक तर काही मालिकांच्या कथेत काही अंशी हिंदी मालिकांशी साम्य आहे. आज मराठी चित्रपट राष्ट्रीय पातळीवरचे सर्वोच्च पुरस्कार मिळवत आहेत. मराठी चित्रपटांच्या कथा या अतिशय सशक्त असतात, त्यात नावीन्य असतं असं चित्रपट जाणकारांचं म्हणणं आहे. मराठी नाटकांमध्येदेखील वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. पण यामध्ये मराठी मालिका का कमी पडत आहेत ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मराठीत खूप चांगले लेखक आहेत आणि ते आपापल्यापरिने चांगलं आणि काहीतरी नवीन देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. पण हे नावीन्य मराठी मालिकांमध्ये खूपच कमी दिसतंय. मराठीच्या सगळ्याच महत्त्वाच्या वाहिन्यांवर अशाच प्रकारच्या मालिकांची आज चलती आहे. त्यामुळे मराठी मालिकांच्या निर्मात्यांकडे नवीन विषय येत नाहीत का की ते नवीन विषय स्वीकारत नाहीत हा खरा प्रश्न आहे.

मराठी मालिकांचा आघाडीचा अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर याच्यामते, हा मराठीत आलेला एक ट्रेंड आहे. दरम्यानच्या काळात हिंदी चित्रपटांचा रिमेक होण्याचा ट्रेंड मराठी चित्रपटसृष्टीत आला होता. सध्या तोच ट्रेंड मराठी मालिकेत आलेला आहे. हिंदीतच नव्हे तर इतर भाषेतदेखील एखादी चांगली संकल्पना असेल तर त्याचा रिमेक करण्यात काही गैर आहे असं त्याला वाटत नाही. कारण केवळ मराठीतच इतर भाषांच्या मालिकांचा रिमेक होतोय असं नाहीय तर मराठीतील अनेक मालिकांचादेखील इतर भाषांमध्ये रिमेक झाला आहे. केवळ रिमेक करताना त्या कथेचं मराठीकरण चांगलं झालं पाहिजे. म्हणजे रंगभूषेपासून प्रत्येक गोष्टीत मराठी वातावरण अनुभवायला मिळालं पाहिजे. चिन्मय पुढे असंही म्हणाला की, ‘मी आतायर्पंत कधीही कोणत्याही रिमेक असलेल्या मालिकेची कथा अथवा संवाद लिहिलेले नाहीत. पण भविष्यात ऑफर आल्यास मी त्यासाठी कम्फर्टेबल असेन अथवा नसेन हे सांगणं कठीण आहे. मात्र कोणतीही मालिका रिमेक करायला मला ती तितकीच आवडलीदेखील पाहिजे आणि त्याचा खरंच रिमेक व्हावा असं मला वाटलं पाहिजे. तरच मी ते काम करीन…’

तर या सार्याकडे दिग्दर्शक सतिश राजवाडे सकारात्मक दृष्टीने पाहतात. त्यांना हा मराठीत आलेला ट्रेंड काहीही चुकीचा वाटत नाहीये. त्यांच्यामते, ही वाहिन्यांची पॉलिसी आहे. अनेक हिंदी वाहिन्यांनी मराठी वाहिन्यांचे हक्क घेतले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या हिंदी वाहिन्यांवरील प्रसिद्ध झालेल्या कार्यक्रमांच्या धर्तीवरचे कार्यक्रम ते मराठीत आणत आहेत. हा सगळ्या वाहिन्यांचा स्वतःचा निर्णय आहे. ते बहुधा एकप्रकारचा प्रयोगच करत आहेत आणि त्यातील अनेक प्रयोग यशस्वीही होत आहेत. पण यात नवीन लेखकांचं नुकसान होत आहे का असं त्यांना विचारल्यावर होतकरू लेखकांचं नुकसान होत आहे असं त्यांना वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं. कारण अनेक लेखकांसोबत वाहिन्यांच्या नेहमी चर्चा या होत असतात आणि त्यामधील खरंच एखादी पटकथा त्यांना आवडली तर त्यांचा ते लगेचच स्वीकार करतात.

मालिकांची ही सुरू असलेली ढापाढापी नववर्षात तरी संपू देत आणि आपल्याला नवीन विषय मालिकांत पहायला मिळू देत इतकीच आपण अपेक्षा करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *