तुमची मुलगी आणि भारताची अमेरिकेतील राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याबाबतीत जे काही घडलंय ते षडयंत्र आहे हे कशावरून म्हणता?

या प्रकरणाचा जर तुम्ही संपूर्ण घटनाक्रम पाहिलात तर कुठल्याही सामान्य माणसाच्या हे लगेचच लक्षात येईल की, हे सगळं एक षडयंत्र आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्र्यांनीसुद्धा हे षडयंत्र असल्याचं विधान केलंय ना. जेव्हा आम्हाला घरकामगाराची आवश्यकता होती. तेव्हा त्यांना माहितीच होतं की, देवयानीची तिकडे पोस्टिंग झालीय. आणि तिला घरकामगार हवीय. देवयानीला दोन मुली असल्याने तिला महिला घरकामगारच लागणार हेही उघड होतं. त्यामुळे आम्ही जेव्हा लोकांना अशी महिला घरकामगार शोधायला सांगितलं. तेव्हा ती आली. तेही स्वतःहून… त्यावेळेस त्या संगीता रिचर्ड नामक महिलेने आम्हाला हे अजिबातच सांगितलं नाही की तिचे सासू सासरे हे अमेरिकन अॅम्बेसिमध्ये काम करतात म्हणून. तिने ही माहिती दडवून ठेवली होती. उलट तिने त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं की, तिचा नवरा दारू पितो, तो नोकरीवर नाही, दोन्ही मुलं शिकताहेत. त्यामुळे मला पैशांची प्रचंड आवश्यकता आहे. म्हणून मी या कामासाठी आलीय. तरी आम्ही तिला विचारलं होतं की तुला याच कामाची एवढी गरज का आहे? त्यावर तिचं उत्तर असं होतं की, माझ्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून मग मी तिला तिकडे घेऊन गेलो. कुणी तरी स्क्रिप्ट लिहिली आणि आम्ही त्यात गोवत गेलो, इतकं हे सगळं भयानक आहे.

संगीता सहा महिने तिकडे राहिली. ती पळून गेली तेव्हा आम्ही तिच्या नवर्याला फोन केला. (त्या नवराबायकोमध्ये रोजचा संपर्क असायचा.) पण तो आम्हाला ‘मेरे को पत्ता नहीं,’ असंच कायम उत्तर द्यायचा… त्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्याची नीट चौकशी केली तेव्हा संगीता आणि तिच्या नवर्याने आम्ही त्यांच्याकडून जास्त तास काम करून घेतो अशीकोर्टात केस दाखल केली. पण त्यांच्या तक्रारीत काहीच तथ्य नाहीये. कारण ती जेव्हा सहा महिने तिथे काम करत होती. तेव्हा जास्त तास काम करावं लागतंय हे कुणालाच नाही दिसलं आणि मला एक कळत नाही काय जास्त काम आहे तिथे? माझी मुलगी, तिचा नवरा आणि दोन मुली, इतकेच लोक त्या घरात राहतात. आणि त्या घरामध्ये सगळीच गॅजिटस् आहेत. म्हणजे व्हॅक्यूम क्लिनर आहे, वॉशिंग मशिन आहे, डिश वॉशर आहे, या साधनांच्या साहाय्याने तिथे काम करायचं असतं. यात कसला आहे कामाचा त्रास? तरीही त्यांनी जास्त तास काम करावं लागतं अशी केस केली आणि मग परत ती केस काढूनही टाकली. खरंतर तिने कधीच आम्हाला सांगितलं नाही की तिला परत जायचं वगैरे. ती जेव्हा पळून गेली तेव्हा आम्हीच तिला संपर्क साधला होता. ती जिथून फोन करायची तोफोन नंबर दिल्ली पोलिसांनी इथून शोधून काढला आणि अमेरिकेतील त्या ठिकाणी आम्ही पोचलो. तेव्हा तिने दहा हजार डॉलर आणि इमिग्रेशन हेल्प मागितली. आम्ही तिला दहा हजार डॉलर द्यायला तयारही होतो. तिला भारतात परत जा असंही सांगितलं. पण तेव्हाही ती गायब व्हायची. तिचा काही पत्ताच लागायचा नाही. यानंतरची घडामोड अधिक महत्त्वाची आहे. ती पळून गेल्यानंतर तिच्या नवर्याला इथून स्पेशल व्हिसा देऊन अमेरिकेत नेण्यात आलं. असा स्पेशल व्हिसा देणं तितकं सोपं काम नाहीये. आणि यानंतर जेव्हा आम्ही इथून तिच्यावर केस केली आणि अटक वॉरंट काढलं. तेव्हा लगेचच तिला अटक न करता देवयानीला अटक केली. इतकंच नाही तर ते देवयानीला बोललेही की, तुम्ही तिच्यावर अटक वॉरंट काढलं म्हणून आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. तिचं लिगल स्टेट्स आहे असंही त्यांचं म्हणणं होतं. पण तिचं लिगल स्टेट्स काय आहे? काहीच नाही… याचाच अर्थ हे कुणी तरी प्लॅन केलेलं आहे. आणि त्या षडयंत्राचे आम्ही आता व्हिक्टिम आहोत…

भारत सरकारने या प्रकरणात जी भूमिका घेतलीय ती तुम्हाला योग्य वाटते का?

भारत सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे. ते करत असलेली कारवाईही योग्य आहे. पण ती पुरेशी नाही. जोपर्यंत या प्रकरणात रिझल्ट येत नाही तोपर्यंत ती कारवाई पुरेशी आहे, असं म्हणता येणार नाही. यापेक्षा अधिक कठोर नि तातडीची कारवाई करण्याची आता गरज आहे. अर्थातच कारवाईची सगळी पावलं एकदमच उचलता येणार नाहीतच. पण भारत सरकारने ती कारवाईची पावलं जलदगतीने उचलावीत असं मला वाटतं. आणि ते अधिक जलदगतीने कारवाई करतील याची खात्रीही मला वाटते. पण सरकारने जी कारवाई केलीय ती योग्य आहे, असं मी नक्कीच म्हणेन.

सरकारने अजून नेमकी कोणती कारवाई करणं गरजेचं आहे, असं तुम्हाला वाटतं?

हे पहा, डिप्लोमॅटिकली सरकारने काय कारवाई करायला हवी, हे आम्ही सरकारला सांगणार नाही. पण जोवर रिझल्ट मिळत नाही तोवर कडक पावलं सरकारने उचलणं आवश्यक आहे आणि सरकार सध्यातरी तशी कडक कारवाई करतंय, असं मला वाटतं.

अमेरिकन सरकारचं कारवाई करताना नेमकं काय चुकलंय?

एकतर ही केस आमच्यावर नव्हतीच. त्यांनी नीट तपासायला हवं होतं. कारण ते म्हणतात ही व्हिसा फ्रॉडची केस आहे. तर मग व्हिसाचा अर्ज कोणी केला? तर संगीता रिचर्डने केला… तिचा दोनदा इंटरव्ह्यू घेतला यूएस कॉन्सिलेटनी… म्हणजेच तिने अर्ज केला, तिचा दोनदा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यानंतर व्हिसा दिला. मग जर यात काही गडबड झाली असेल तर ती कुणी केली? संगीता रिचर्डने केली की त्या यूएस कॉन्सिलेटच्या ऑफिसरने केली ज्याने तिला व्हिसा दिला? आमचा याच्याशी काय संबंध? फक्त आमच्या कॉम्प्युटरवरून ते पाठवलं गेलं म्हणून आम्हीगुन्हेगार का? असं असताना तिला सोडून द्यायचं, तिला प्रोटेक्शन द्यायचं देवयानीला अटक करायची? तिला अमानूष वागणूक द्यायची? तिला क्रिमिनलसारखं ठेवायचं? या अशा सगळ्या घडामोडींमुळे हे स्पष्ट दिसतंय की हे सारं ठरवून केलं गेलंय… ‘हे भारत सरकार आमचं ऐकत नाही ना आता आपण यांना धडा शिकवू…’ असं ठरवूनच अमेरिकन सरकारने हे कृत्य केलंय.

तुम्ही निवृत्त सनदी अधिकारी आहात. परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्र संबंध याबद्दलचा तुमचा अभ्यास आहे. मग या प्रकरणाच्यानिमित्ताने परराष्ट्र संबंधांच्या धोरणांमध्ये आता नेमकेकोणते बदल करणं गरजेचं आहे, असं तुम्हाला वाटतं?

हा दोन देशांमधील संबंधांच्या धोरणाचा प्रश्न नाही. तर तुम्ही भारतीय म्हणून अमेरिकेशी कसं वागायला पाहिजे याचा प्रश्न आहे. भारत सरकारशी आम्ही कधीच काहीही बेकायदेशीर वागू शकत नाही, इतकी वचक त्यांना भारताबद्दल वाटली पाहिजे. त्यामुळे हा धोरणाचा प्रश्न मुळीच नाही तर आपण अमेरिकेशी किती कठोरपणे आणि किती निर्णायक पद्धतीने वागतो याचा प्रश्न आहे. त्यामुळे भारत सरकार आता जितक्या कठोरपणे कारवाई करतंय त्याहून अधिक कठोरपणे त्यांनी कारवाई करायला हवी. तीही भविष्यात नाही तर याच केसमध्ये त्यांनी ती कठोर कारवाई करायला हवी.

हे प्रकरण घडल्यानंतर प्रसारमाध्यमातून खास करून मराठी वृत्तपत्रांमधून देवयानी यांच्याविरोधातच बातम्या प्रसिद्ध होत आहेत, याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय?

हा सरळसरळ जातीयवाद आहे. अख्खा भारत देवयानीच्या बाजूने आहे. संपूर्ण पार्लमेंट तिच्या बाजूने आहे. अशावेळेस महाराष्ट्रातील जे तीन-चार वर्तमानपत्रं तिच्या विरोधात लिहिताहेत तो उघड जातीयवादच आहे. कारण त्यांना सहनच होत नाहीये की, एक मराठी मुलगी, दलित समाजाची मुलगी एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोचते… इतकं चांगलं काम करते… आज ती तिच्या कामामुळे प्रसिद्ध झालीय… हे सगळं त्या जातीयवादी वृत्तपत्रांना पटतच नाही. त्यांना ते सहन होतंच नाही. नाही तरी एका ठरावीक जातीतील लोकांना दलितांची प्रगती कधीच पचलेली नाही. त्यामुळे हा जातीयवादच आहे.

या प्रकरणाच्या निमित्ताने मला अजून एक मुद्दा सांगायचाय तो म्हणजे, आज आपल्या देशाच्या प्रतिष्ठेवर हल्ला झालाय. देवयानी तिथे फिरायला गेली नव्हती किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करण्यासाठी गेली नव्हती. तर भारतानेच तिला तिथे आपल्या देशाची सेवा करण्यासाठी पाठवलं होतं. त्यामुळे एक देशभक्त मुलगी प्राणाची पर्वा न करता तिथे काम करतेय आणि अशा परिस्थितीत तिला त्रास होतोय, याचं जर कुणाला वाईट न वाटता आनंद होत असेल तर खरे देशद्रोही कोण आहेत हे त्यांनीच ठरवावं. त्यामुळे अशा लोकांना मी जातीयवादी म्हणणार नाही तर ते देशद्रोही आहेत, असंच म्हणेन.

अमेरिकी अॅटर्नी प्रीत भरारा यांनी देवयानी यांच्यावर अमेरिकन सरकारने केलेल्या कारवाईचं समर्थन केलंय. याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय?

प्रीत भरारा यांनी चूक केलीय. त्यामुळे आपण चूक केली आहे हे स्वतःहूनकोण कबूल करणार… त्यामुळे ते अशाचप्रकारचं विधान करून स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालणारच… आणि दुसरं म्हणजे भरारा यांच्या विधानावर आपल्या परराष्ट्र खात्यानेच प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे या संदर्भात यापेक्षा अधिककोणतीही प्रतिक्रिया मी देणार नाही. पण तरीही प्रीत भरारा जे बोलला आहे ते तो खोटं बोललाय हे संपूर्ण देशाला माहीत आहे.

तुम्ही या प्रकरणी उपोषणाचा इशारा दिलाय.कोणाविरुद्ध तुम्ही उपोषण करणार आहात भारत की अमेरिका?

मी शेवटचा पर्याय म्हणून उपोषणाचा इशारा दिलाय. माझं उपोषण कोणा एकाच्या विरोधात नाहीये. मी न्यायासाठी उपोषण करणार आहे. कुणाच्याही विरोधात उपोषण करणार नाही. माझी मुलगी तुम्ही पाठवली… त्यामुळे माझी मुलगी निष्कलंक मला परत द्या बस्स…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *