‘तो तिथला माणूस म्हणतो की, बायका नाजूक, कमजोर असतात. त्यांना बग्गीत चढायला, उतरायला पण मदत लागते. मग मी काय बाई नाही? पण मी हाताला घट्टे पडेपर्यंत खड्डे खणलेत, कंबरतोड मेहनत करून ऊस उगवलाय, चामडी लोळेपर्यंत चाबकाचे फटकारे खाल्लेत. आणि मी काय बाई नाही? तेरा मुलांना जन्म दिला आणि निम्मी अधिक गुलामीत विकलेली पाहिली. तेव्हा परमेश्वर फक्त माझा वाली होता आणि मी काय बाई नाही?’ हे भाषण आहे सोर्जनर ट्रूथ या निग्रो गुलाम बाईचं. १८५१ मधलं. काळ होता – स्त्रियांनी मतदानाचा हक्क मिळावा यासाठी चळवळ उभारली, सभा-संमेलनं घेतली आणि स्त्रिया मतदान करण्यासाठी अर्थात राजकीय लायक नाहीत या प्रचाराला उत्तरं दिली तेव्हाचा. या काळातलं एका काळ्या बाईचं हे भाषण ‘ब्लॅक फेमिनिझम’चं आद्य स्त्रोत मानलं जातं. तिचा सवाल Ain’t I a woman?? आजपर्यंत अनेकदा परत परत विचारला गेलाय. गेल्या दिडशे वर्षांत काळ्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी, लेखकांनी आणि विचारवंतांनी प्रचंड प्रगती केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांकाच्या निमित्ताने हा त्याचा ऊहापोह…

वर्ण आणि जात संघर्षात बर्यापैकी साम्य असल्याने दलित स्त्रीवादी विचार हा ब्लॅक फेमिनिझमशी नातं जोडू शकतो आणि आपली ताकद वाढवू शकतो. दलित स्त्रियांनी आपली आत्मचरित्रं लिहून स्त्री जीवनाचा अलग अनुभव मध्यमवर्गीयांच्या चूल आणि मूलच्या पलीकडचा मेनस्ट्रीम समाजापुढे मांडला आहेच. ‘रेशमाच्या साड्या नेसून तुम्हाला दुःख कसं कळणार?’ असा सवालही विचारलाय उच्चभ्रू स्त्रियांना. (स्त्री प्रश्न हा एकाच उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय चौकटीत अडकलेला नाही, त्याची अनेक रूपं आहेत हे दाखवलंय.) यामध्ये स्त्री प्रश्नाचे अनेकविध आणि विरोधी आकार उकार दिसतात. उदा. चूल आणि मूल यातील अस्तित्व हा दलित स्त्रीचा प्रश्न नाही, उलट स्वप्न असू शकतं. पण तिला त्या चुलीत भरायला लाकडं, गोवर्या नाहीत, शिजवायला धान्य नाही, मुलाला दूध नाही म्हणून घराबाहेर पडावंच लागतं आणि मग जात आणि लिंगभेदाने घेरलेल्या समाजव्यवस्थेत दलित स्त्री म्हणून शोषण सहावं लागतं. पण स्त्रीवादी विचारात फार प्रगल्भतेने याकडे पाहिलं जात नाही.

Sisterhood is global? असा नारा दिलेल्या आपल्या ‘गोर्या बहिणींना’ काळ्या बायका म्हणतात, ‘तुम्हाला चिंता आहे की तुमचे मुलगे मोठे होतील आणि पुरुषप्रधानतेचे पाईक बनतील. तुमच्याशी दगा करतील. आम्हाला चिंता आहे की आमचे मुलगे पोलिसांच्या गोळ्यांचे शिकार होतील आणि भीती ही पण आहे की तेव्हा तुम्ही ते बघून न बघितल्यासारखं कराल.’

ब्लॅक फेमिनिस्ट म्हणतात, भांडवलदारी कल्पनांना बळी पडून, त्या सौंदर्याच्या शर्यतीत पडून स्वतःवर शस्त्रक्रिया करून घेणं यात आणि आपण काळ्या जन्माला आल्यामुळे कधीही सुंदर होऊच शकत नाही असं मानण्यात जमीन-आस्मानचा फरक आहे. अनेक छोट्या मुली अशा स्वतःचा तिरस्कार करत मोठ्या होतात. टोनी मॉरीसनच्या कथेत नाही का ती चिमुरडी रोज झोपताना देवाकडे प्रार्थना करते की, उठेल तेव्हा ती गोरी, सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची होऊ दे? तिला वाटतं घरातल्या जाचापासून, सावत्र बापाच्या लैंगिक शोषणापासून तिची मग आपोआप सुटका होईल कारण गोर्या मुलींशी लोक छान वागतात. गुलामगिरीमध्ये काळ्या बाईवरचा बलात्कार हा गुन्हाच नव्हता. मग तो गोर्या किंवा काळ्या पुरुषाने केलेला असो. बलात्कारातूनच गुलामांची पुढची पिढी तयार होणार ना. ही मानसिकता अजूनही कायम आहे. त्यामुळे काळ्या बायकांना ‘लूस’ ठरवून त्यांच्यावर अविश्वास ठेवण्यात येतो. आपल्याकडे नाही का न्यायालयाने भंवरीदेवीच्या बलात्कार्यांना सोडून दिलं? का तरकोर्टाच्या भाषेत ‘चार उच्चवर्णीय प्रतिष्ठित पुरुष मिळून एका अछूत बाईवर बलात्कार करतील ही विश्वासपात्र कथा नाही!’

ब्लॅक फेमिनिस्ट पुढे म्हणतात, रेप कायद्याचा उपयोग मग काळ्या पुरुषांना ताब्यात ठेवण्यासाठी होत असे. गोर्या बायका आकर्षित तर होत काळ्या पुरुषांकडे, शारीरिक संबंधही ठेवत पण सापडला की नामानिराळ्या होत. काळे पुरुष जमावांकडून ठार मारले जात किंवा गोर्या बाईच्या बलात्कारासाठी तुरुंगात पोचत. To kill a mockingbird मध्ये असाच एक कष्टाळू, प्रेमळ काळा तरुण एका दुर्लक्षित गोर्या मुलीला मदत करायला जातो, ती त्याच्यावर लुब्ध होऊन बिलगते. तिचा बाप आणि समाज रितसर कोर्ट केस चालवून त्याला दोषी ठरवतात. या सर्वांचे भयानक परिणाम मग काळ्या बायका आणि मुलं भोगतात.

कायदा आणि राज्यव्यवस्था खूप वेगळी नसते समाजापेक्षा. काळ्या कायदेतज्ज्ञांनी याचा पुरेपूर ऊहापोह केला आहे. Anti discrimination कायद्याअंतर्गत एक सामाजिक गट एकत्र येऊन ‘क्लास अॅक्टन’साठी कोर्टात जाऊ शकतो. पण काळ्या बायका यात अपयशी ठरतात. त्यांना सांगण्यात येतं, discrimination एकतर सर्व काळ्यांचं असावं नाहीतर सर्व बायकांचं. कुठल्यातरी एका गटात तरी बसवावं लागेल आणि काळ्या बायका हा वेगळा गट कायदा जाणत नाही. उदा. काळ्या बायका त्यांचे केस अफ्रिकन पद्धतीने छोट्या छोट्या वेण्यात बांधतात. केस असे निरोगी राहतात. पण बरेच employers अशा ‘विचित्र’ हेअरस्टाईलवर बंदी आणतात, कारण त्यांना कर्मचार्यांनी ‘नॉर्मल’ दिसायला हवं असतं आणि नॉर्मल म्हणजे गोरे माणूस किंवा जास्तीत जास्त गोरे सदृश्य काळे माणूस! काळ्या बायकांना सरळ केसांसाठी मग रसायनं, हेअर आयर्न वापरावे लागतात. रोजचे कष्ट, खर्च वाढतात. तब्येतीवर, केसांवर वाईट परिणाम होऊ शकतात. पण चार काळ्या बायका एकत्र येऊन कोर्टात गेल्या की कंपनी आम्हाला discriminate करते आहे. तर कोर्ट म्हणतं, कंपनीच्या या पॉलिसीने वर्णभेद किंवा लिंगभेद वाढतोय का? इतर काळ्यांना किंवा इतर बायकांना याचा त्रास होतोय का? आपली कोर्ट नाही का खैरलांजी हा जातीय गुन्हा नाही असा अहवाल देऊन मोकळी होतात?

याने वैतागलेल्या ब्लॅक फेमिनिस्ट विचारतात, ‘काळे लोक म्हणजे पुरुष आणि बायका म्हणाल्या की, गोर्या. मग यात काळ्या बायका आहेत कुठे?’

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *