काही दिवसांपूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रौढांमधील परस्परसंमतीने असलेल्या समलिंगी संबंधांना अवैध ठरवताना सर्वांनाच आश्चर्याचा भयंकर झटका दिला. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर म्हणजेच एलजीबीटी या लिंगभावाने अल्पसंख्याक समुदायाला अक्षरशः त्यांच्या मानवी हक्कांपासून वंचित ठेवल्याची भावना प्रत्येकाच्या मनात उमटली. भारतात लिंगभावाच्या दृष्टिकोनातून का होईना अजून रेनिसान्सचा काळ यायचा आहे, असं खेदाने म्हणावं लागत आहे.

भारताच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तार्किक पातळीवर जोखून एवढ्या प्रचंड विरोध आणि टीकेला सामोरं जावं लागत असावं. सर्वच वृत्तपत्रं, अग्रलेख (अपवाद फॅसिस्ट वृत्तीची पत्रं), वृत्तवाहिन्या, कार्यक्रम, सोशल मीडियातील ब्लॉग्ज्, फेसबुक स्टेटस, नोट्स, अपडेट्स, फोटो फिचर्स, ऑनलाईन फोरम्स्, ऑनलाईन पिटिशन्स, डिस्कशन्स फोरम्स्, ट्विटरवरील सेलिब्रेटीज्नी केलेले ट्विट्स या सर्वांचं सोशल मीडियावरील वार्तांकनांचं एकूण चित्र निकालाच्या विरोधात असल्याचं दिसत होतं. तसंच सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करणार्या धर्ममार्तंड आणि विशेषतः संघीय-मार्तंडांच्या वाचाळकथा आणि त्या वाचाळवीरांचा येथेच्छ समाचार घेणारे नेटीझन्स आणि याचा जाहीर निषेध करणारे पुणे, मुंबईसारख्या मेट्रो सिटीज्मधून निघालेले मोर्चे, निदर्शनं, धरणं आंदोलनांचं चित्र निश्चितच काही अंशी आशादायक होतं.

॒एकविसाव्या शतकातलं पहिलं दशक भारतीय समाजरचनेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं दशक होतं. विसाव्या शतकाच्या सरत्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेत दाखल झालेल्या उदारीकरणाने अख्खी बाजारपेठ काबीज केली. जगभरात घडवली गेलेली युद्धं आणि त्याचा थेट परिणाम, भारताचे शेजारी राष्ट्रांसोबत कायम बदलत राहणारे तिखट-गोड संबंध आपण या ना त्या कारणाने आजही अनुभवतच असतो. गेल्या दशकात देशांतर्गत सशस्त्र उठाव ज्या वेगाने होऊ लागला तो याआधी कधीही झालेला नव्हता. नक्षलवादाची पाळंमुळं फार वेगाने खेडोपाड्यात पोहोचली. दहशतवादाला धार्मिक अंगाने पाहण्याची वृत्ती आणखीनच दाट झाली. जातीयतेच्या अत्याचारात स्त्रियांचा लैंगिक छळ अधिकच ठळकपणे होऊ लागला आहे. नेमक्या याच कालखंडात हरेक प्रकारची माध्यमं अवाढव्य ताकदीनीशी मोठी झाली. माध्यमहीन समाजाचं अस्तित्वच पुसलं जाईल इतकी माध्यमंच मोठी झाली. जो समाजसमूह, घटक माध्यमांत आपलं प्रतिनिधित्व निर्माण करणार नाही त्याच्या अस्तित्वालाच स्पर्धा निर्माण करणारे प्रतिस्पर्धी या व्यवस्थेने जन्माला घातले.

समाजातील तृतीयपंथीयांची अवस्था माध्यमांतदेखील तशीच आहे जशी सामान्य जनमानसात आहे. पुरुष आणि स्त्री या दोहोंच्याही पलीकडे वेगळे लिंगभाव जोपासणार्या व्यक्तिला आपल्या समाजात जगण्याचं साधं स्वातंत्र्यसुद्धा आपण बहाल केलेलं नाही. जातपितृसत्तेच्या रहाट्यात आपलं विश्व जोपासणार्या या व्यवस्थेने स्त्रियांच्या प्रश्नांना कधीच अग्रक्रम दिलेला नव्हता किंवा आताही देण्याच्या मनःस्थितीतदेखील नाही. आणि याच व्यवस्थेने एलजीबीटी समूहाच्या प्रश्नांना कधी साधे प्रश्न म्हणून देखील मान्यता दिली नाही. व्यवस्थेकडून दुर्लक्षित, निसर्गाकडून उपेक्षित आणि समाजाकडून सतावले गेलेले हे नवअस्पृश्य कधी कोणाच्या सहानुभूतीचे विषयदेखील बनत नव्हते. परंतु माध्यमांच्या जगतात नवमाध्यमांनी घडवून आणलेल्या क्रांतिने नवअस्पृश्यांना स्वतः वापरता येईल असं सोशल मीडियाचं माध्यम उपलब्ध करून दिलं.

भारतासारख्या लैंगिक जाणिवांबाबत काहीसा मागास आणि अत्यंत कर्मठ अशा देशात समलिंगी संबंध हेदेखील नैसर्गिक असून ते जीवसृष्टीच्या हरेक प्रकारच्या प्रजातीत कमी-अधिक प्रमाणात आढळून येत असतात. विज्ञानाने हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलं आहे हे समजण्यासाठी भारतात इंटरनेटचा उदय व्हावा लागला. इंटरनेटवरून जगभरातील लेखकांनी केलेलं लेखन, यूट्यूबवरून शेअर केलेले व्हिडीओज् पाहून समलिंगींच्या अस्पृश्य जगाचं अंतरंग आपण समजू शकलो.

फेसबुकवर स्माईल विद्याचं पेज इतर कोणत्याही सेलिब्रिटी एवढंच लोकप्रिय आहे. या पेजवर अपलोड होणारे विषय हे कायम जात-वर्ग-धर्म- लिंग या चौकोनी विषवल्लीच्या सूत्राला झोडून काढत वेगळा विचार मांडणारे असतात. स्माईल विद्यासारखी शेकडो पेजेस आणि प्रोफाईल्स आपल्याला लिंक्डइन, फेसबुक आणि ट्विटरवर सहजपणे पहायला आणि वाचायला मिळतील.

सोशल मीडियाच्या उदयाआधी भारतातील विशेषतः शहरी भागातील युवावर्ग हा समलिंगी संबंधांबाबत आजच्याइतका दिलखुलास, जागरूक आणि उदार निश्चितच नव्हता. २०१० सालापर्यंत किंवा त्याच्या पुढेमागे आलेल्या जवळपास सर्वच सिनेमांत आणि बिग बजेट सिरिअल्समध्ये फॅशन डिझायनर हे कायम गे दाखवण्याचे प्रताप अनेक दिग्दर्शकांनी केलेत. चित्रपटांतील एखाद्या दृश्यात दाखवलं जाणारं गे कॅरेक्टर कायम लोकांच्या मस्करीचं, चेष्टेचं पात्र म्हणून दाखवलं जायचं. अनेक मोठ्या कलाकारांना स्वतःच्या सेक्शुअल इंटरेस्टबद्दल बोलताना फार भीती वाटायची. पण ट्विटरच्या जमान्यात या गोष्टी थोड्याशा मागे पडल्या. जागतिक कीर्तिचा सिंगिंग स्टार असलेल्या रिकी मार्टिनने सोशल मीडियावर आपण गे असल्याचं जाहीर करताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचं प्रचंड वजन राखून असलेला, ‘कॉफी विथ करण’मध्ये भल्याभल्यांना बोलतं करणारा करण जोहरदेखील इथल्या सनातनी प्रतिगामी मनोवृत्तीचं भय बाळगून कधीच मनमोकळेपणाने बोलू शकला नव्हता. परंतु गेल्यावर्षीच त्यानेही एका सोशल नेटवर्किंग साईटवर, ‘मला नैसर्गिकरित्या पिता बनण्यात कसलाही रस नसल्याने मी लवकरच एक मूल दत्तक घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.’

या दोन्ही प्रातिनिधिक स्वरूपातील घटनांकडे पाहिलं तर फार वरवरच्या वाटू शकतील. परंतु व्यक्ती कितीही मोठी असो, त्याचं पद, प्रतिष्ठा कितीही मोठी असली तरी पारंपरिक माध्यमांत आपल्या लैंगिकतेविषयी बोलण्याचं स्वातंत्र्य मात्र व्यवस्थेकडे अबाधित होतं. सोशल मीडियात हे स्वातंत्र्य मात्र स्वतःकडे शाबूत राहत होतं. म्हणून बदलत्या काळात कायमच दबलेले नवअस्पृश्य आपल्या लैंगिककतेविषयी खुलून लिहू लागले, बोलू लागले. जाहीर चर्चा घडवून आणण्यात वाटा उचलू लागले. माध्यमांची त्यांच्या व्यक्तित्वावर आणि मानवी

हक्कांचा आनंद घेता येऊ नये म्हणून बाधित केलेल्या लैंगिकतेवर असलेली सेन्सॉरशिप नवमाध्यमांनी खोडून काढली. आता ऑनलाईन मीडियात कायम अॅक्टिव्ह असणार्या नेटिझन्सनी एलजीबीटीच्या प्रश्नांना धोरणात्मक आंदोलनाचं स्वरूप प्रदान करून त्या प्रश्नांची व्याप्ती अधिकाधिक कशी वाढवता येईल आणि जास्तीत जास्त लोकांचं प्रबोधन कसं करता येईल याचा निश्चित कृती कार्यक्रम आखायला हवा, तरच आपण व्यक्त केलेल्या रागाला परिणामकता लाभेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *