भारतीय समाजामध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक, आर्थिक, राजकीय बदल घडवणारी क्रांतिकारक गोष्ट म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या करून या देशाला महान घटना लिहून देणार्या जगविख्यात घटनातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनप्रवास आणि आंबेडकरी चळवळ आपल्या ‘क्रांतिचा साक्षीदार’ या एकपात्री प्रयोगातून रुपेशकुमार निकाळजे सादर करत आहेत. ‘क्रांतिचा साक्षीदार’ या एकपात्री नाट्य प्रयोगाद्वारे दलित रंगभूमी आणि रंगकर्मींना एक नवी झेप घेण्यास रुपेशकुमार यांनी प्रेरित केलं आहे. आंबेडकरी चळवळ आणि सद्यःस्थितीच्या वाताहतीवर प्रकाशझोत टाकत आंबेडकरी चळवळ उभी करण्याचा आणि प्रेक्षकांना तीन तास खिळवून ठेवून चळवळीविषयी आत्मभान देऊन विचार करायला लावण्याचा हा यशस्वी एकपात्री नाट्यप्रयोग आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भीमनगरमधून रुपेशकुमार यांचा नाट्यप्रवास सुरू झाला. या मागास भागात राहूनही नाट्यकलेचं देणं लाभलेल्या आणि फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचं आत्मभान लाभलेला कार्यकर्ता अशीच त्यांची जडणघडण आहे. त्यांनी थांबा रामराज्य येतंय, औधां लगीन करायचंय, काळोख देत हुंकार, स्मारक, तनमाजोरी, वाटा पळवाटा, महानिर्वाण, एक गाव एक पाणवठा, कॉल मी कॅप्टन रॉबर्ट अशा नाटकात आणि काळ्या मातीत मातीत या माहितीपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत.

माणसाला माणूस म्हणून जगू देण्यासाठी आपल्या आयुष्याला खडतर वळण देत आंबेडकरांनी अनेक क्रांतिकारक पावलं उचलली आहेत. दलित समाजाचं अमानुष जगणं आणि या जगण्यात माणूसपण मानण्यासाठी केलेली क्रांती, त्यानंतर दलित चळवळीची झालेली वाताहत, राजकीय चळवळीतील गटबाजीवर भाष्य करणारा एकपात्री प्रयोग म्हणजे ‘क्रांतिचा साक्षीदार’. रुपेशकुमार यांनी या प्रयोगाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती केलीय. या नाट्यप्रयोगात तब्बल ३२ पात्रांचा आवाज काढून एक जिवंत चळवळच सादर करण्यात निकाळजे यांना यश आलंय. हा प्रयोग पाहताना प्रेक्षक भावूक होऊन जातो. तो इतिहासात गुंतून जातो. या प्रयोगाच्या माध्यामातून रुपेशकुमार निकाळजे आंबेडकरांच्या अनुयायांना एकजुटीचं बाळकडूही पाजत असतात.

शिवनाक काका हा खेड्यातील दलित बांधव आपल्याला लाभलेलं जनावराचं जीणं कंठत असतो. त्या काळात जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत होतं पण दलितांना पाण्यावाचून कासावीस व्हावं लागत होतं. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यावर पाण्यासाठी संगर करून अस्पृश्यांना चवदार तळं डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकरांनी खुलं केलं. या चळवळीचा साक्षीदार होता शिवनाक काका. चवदार तळ्याचा संग्राम, काळाराम मंदिर प्रवेश, मनुस्मृतिचं दहन, पुणे करार, धर्मांतर, नामांतराचा लढा, दलितऐक्य या सार्या चळवळींचा साक्षीदार असलेला शिवनाक, चळवळीसाठी त्याच्या मदतीला आलेला त्याचा मुलगा, अन्य दलित तरुण, ठकाई सारगी महिला ही सारी ऐतिहासिक पात्रं या एकपात्री प्रयोगात आपल्याला भेटून जातात. दलित वस्तीतील दामू तात्याचं जगणं आपल्यासमोर मांडून दलित वस्तीतील समाजवास्तवाची सांगड घालण्याचा प्रयत्नही या प्रयोगात करण्यात आलाय. जातवार समाजरचनेचे दुष्परिणाम आणि लोकशाहीवादी आंबेडकरी चळवळीचं समग्र दर्शन घडवण्याचा प्रयत्न निकाळजे यांनी यशस्वीरित्या साधला आहे.

जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे उपविभागात कार्यरत असलेल्या रुपेशकुमार यांनी १९८३पासून नाट्यक्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत त्यांना उत्कृष्ट अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं होतं. १९९२-९३मध्ये नाशिक इथे भरलेल्या दलित नाट्य परिषदेने मराठवाडा विभागीय सचिव म्हणून त्यांची निवड करून त्यांच्या नाट्यकलेची नोंद घेतली. स्वतःच निर्मिती, लेखन, दिग्दर्शक आणि अभिनय करत नाट्यकलेच्या माध्यमातून दलित चळवळीला हातभार लावण्याचं कार्य रुपेशकुमार

करत आहेत. शासनाच्या सांस्कृतिक विभागानेही त्यांची अद्याप दखल घेतलेली नसली तरी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना महात्मा फुले फेलोशिपने दिल्लीमध्ये गौरवण्यात आलंय.

 अविशांत कुमकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *