प्रसिद्ध वात्रटिकाकार आणि चित्रपट निर्माते माजी आमदार रामदास फुटाणे गेल्या २५ वर्षांपासून स्वातंत्र्यसैनिक भाई फुटाणे यांच्या स्मृतिचा जागर म्हणून राज्यस्तरीय संत नामदेव पुरस्कार आणि कवी संमेलनाचं आयोजन करतात. राज्यातील प्रतिभावंत कवींचा सन्मान करण्याबरोबर नामवंत कवींसह नवोदित कवींच्या सहभागाने या कवी संमेलनाचं आयोजन केलं जातं. जामखेडसारख्या दुष्काळी ग्रामीण भागात दरवर्षी होणार्या या कवी संमेलनाची सारेच जण आतुरतेने वाट पाहत असतात.

यंदाच्या राज्यस्तरीय संत नामदेव पुरस्काराचं आणि कवी संमेलनाचं हे पंचविसावं वर्षं होतं. सन २०१२ आणि २०१३ चा राज्यस्तरीय संत नामदेव पुरस्कार कवी अरुण म्हात्रे आणि शाहीर संभाजी भगत यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे, ‘सरहद’चे संजय नहार तसंच म्हाडाचे अध्यक्ष अंकुशराव काकडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

गुलाबी थंडीच्या वातावरणात पार पडलेल्या जामखेड कवी संमेलनात सादर करण्यात आलेल्या पहिल्याच गजलेने वातावरणात धीर गंभीरता निर्माण केली…

पालखी आणू नका दारात माझ्या

संत सारे नांदती देहात माझ्या

नामदेवाने पुन्हा शतकोटी घ्यावी

प्राण आता ओतला शब्दात माझ्या…

प्रदीप निफाडकर यांच्या या भावस्पर्शी गजलेने कवी संमेलनास प्रारंभ झाला. सध्या समाजात बांधावरून, पैशांवरून अशा अगदी शुल्लक कारणांवरून मालमत्तेची वाटणी केली जाते. या वाटणीमुळे घरसंसाराची कशी राखरांगोळी होते यावर भाष्य करताना विशाखा पुरस्कारविजेते कवी लक्ष्मण बाळहाते म्हणतात,

छपराची माडी केली

असा कोणी आव आणू नये

भरलेल्या ताटामध्ये

माती कोणी कालवू नये

आभाळाविना तंबूचा खांब उभा राहत नाही

नुसतं आपलं घोड दामटून

शर्यत कोणी जिंकत नाही

जनात न्यारं मनात न्यारं

असं वागणं बरं नव्हं…

ग्रामीण भागातील शेतकर्याच्या जगण्यातील तक्रारीरी बाळहाते यांनी त्यांच्या ‘वाटणी’ या कवितेतून व्यक्त केल्या. पुण्याच्या प्रतिभावंत कवयित्री लता एवळे-कदम यांनी ‘बाप’ ही कविता सादर करत बापाचं आणि मुलीचं भावविश्व उलगडून दाखवलं. यावेळी कवयित्री म्हणते,

माझ्या डोळ्यांतली आसवं

कुणी मायेनं पुसताना

ऊरी हुंदका दाटतोय

गोष्ट बापाची सांगताना…

तर दुसरीकडे आधुनिक समाजात वावरताना तरुणाई मुलींच्या मागे कशी धावतेय हे सांगत तरुणाईला प्रेमात आलेल्या अपयशाचं वर्णन करताना कवी इंद्रजीत भालेराव आपल्या ‘लग्नातील जेवण’ या कवितेत म्हणतात की,

प्रेमात फार वेळा काय होतं

प्रेम तिच्यावर करायचं

घराभोवती फिरायचं

एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं

अशी लग्न खूप जेवलो…

याशिवाय सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी सुरू असलेल्या लोकशाही बाधक राजकारणाचं विडंबन कवी जाधव यांनी आपल्या ‘नटरंगी नार’ या लावणीद्वारे परखडपणे केलं. ते म्हणतात,

हि नटरंगी नार

मारी काळजात वार…

लागलं पाळायला

हातवालं, कमळवालं, घड्याळवालं,

बाणवालं, इंजिनवालं, हत्तीवालं,

बैचन झालं हिच्या पायी

कोणी हिच्या पायी नांदती

कोणी हिच्या पायी भांडती…

ही कविता या संमेलनात श्रोत्यांच्या विशेष पसंतीसही पडली.

तसंच या कवी संमेलनाचे आयोजक रामदास फुटाणे यांनी आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणावर प्रहार करताना म्हटलं की,

गजर मंदमंद होताच

घड्याळाचा काटा कुरकुरतो

डावा मेंदू दिल्लीत राहिल्यास

उजवा हाथ थरथरतो…

तर आपल्या आणखी एका वात्रटिकेत फुटाणे म्हणतात,

हा हाताचा लकवा की

घड्याळाचा थकवा आहे

आतून दोघं एकच

मतदारांसाठी मात्र चकवा आहे…

दरम्यान या कवी संमेलनाचे सूत्रसंचालक कवी अरुण म्हात्रे यांनी सादर केलेली, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे… ही रचना लक्षवेधी ठरली. यावेळी कवी संमेलनात शाहीर संभाजी भगत, आदिवासी कवी तुकाराम दांडे, प्रा. अल्लाउद्दिन सय्यद, शाहीर जयंत जाधव, शिवाजी सातपुते, जयराम खेडेकर, संदीप काळे आदी कवींनी आपल्या रचना सादर केल्या.

 सत्तार शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *