१९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्य लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ही आधुनिक भारतातील सर्वात मोठी सांस्कृतिक घटना होती. त्यानंतरच्या पन्नास वर्षांच्या काळात व्यक्तिगत पातळीवरची काही उदाहरणं सोडता मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झालं नाही. २००६ साली बाबासाहेबांच्या धर्मांतराचा सुवर्णमहोत्सव साजरा होऊ लागल्यापासून सामुदायिकरित्या बौद्ध धम्मात प्रवेश करण्यासाठी अनेक समाजघटक पुढे येत आहेत आणि लाखोंच्या संख्येने धर्मांतर करत आहेत. गेल्या दोनतीन वर्षांपासून देशाच्या विविध भागातील ओबीसी समाजात बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यासंबंधी गंभीरपणे विचारमंथन सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातही अनेक ठिकाणी धर्मांतराची चळवळ चांगलीच मूळ धरू लागली आहे. ओबीसी समाजातले असंख्य नवजागृत लोक आणि अनेक संस्था-संघटना या चळवळीत हिरिरीने सहभागी होत आहेत. या चळवळीने सुरू केलेल्या ओबीसी बांधव बौद्ध धम्माऌच्या वाटेवर या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

असं असलं तरी या चळवळीत जे प्रत्यक्षरित्या सामील झालेले नाहीत त्यांच्या मनात धर्मांतराबद्दल बर्याच शंका आहेत. काही प्रश्नही आहेत. या शंका आणि प्रश्नांवर सर्वांगीण चर्चा होणं आवश्यक आहे. कारण त्यामुळे धर्मांतराची कारणमीमांसा तावून-सुलाखून निघेल आणि प्रश्नांचं/शंकांचं समाधानकारक निरसन झाल्यामुळे धर्मांतराचा रस्ता मोकळा होऊन पुढचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागेल. तो अधिक सुकर होईल.

या विषयाची मुद्देसूद चर्चा करण्याची गरज लक्षात आल्याने पुरोगामी चळवळीतील लेखक संदीप जावळे यांनी ‘ओबीसी धर्मांतर ः शंका… निरसन… निर्धार’ असं पुस्तक लिहिलं असून ते नुकतंच नवता प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झालंय. या पुस्तकात सुमारे तीस प्रातिनिधिक शंकांची चर्चा करण्यात आली आहे. या शंकांचं निरसन करताना कुणीही दूरान्वयानेही दुखावणार नाही याची काळजी लेखकाने घेतली आहे. ‘आपल्याला विचारांती जो मार्ग पटला त्या मार्गाने जाणं आणि

ज्याला हा मार्ग पटेल त्याला त्या मार्गाने जाण्यास सहकार्य करणं’ हे या ठिकाणी प्राधान्याचं मानलं आहे. धर्मांतराची भूमिका घेतल्यानंतर तशी भूमिका घेणार्या नेत्यांवर ‘आलिया भोगासी असावे सादर’ अशी मानसिकता असलेल्या समाजातून टीकाटिपण्णी होणार हे साहजिकच आहे आणि ते इथे गृहीत धरलं आहे. या टीका आणि शंकांचा प्रतिवाद न करता त्या बेदखल करून तशाच वार्यावर सोडून देणं शक्य आहे. मात्र तसं केलं तर त्या शंकांचं (आणि शंकेखोरांचंही) विनाकारण फावू शकतं. धर्मांतराच्या पुरस्कर्त्यांजवळ आमच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत असा अपप्रचार ते करू शकतात. त्याचा विपरीत परिणाम धर्मांतराच्या चळवळीवर होऊ शकतो. म्हणून त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरं दिली गेली पाहिजेत ही लेखकाची भूमिका आहे.

या देशातील सांस्कृतिक जीवनाची खरी मेन स्ट्रीम कोणती, ओबीसींचे मुलभूत प्रश्न काय आहेत, ओबीसींचा धर्म कोणता, जो धर्म स्वतःला सहिष्णू आणि सर्वसमावेशक म्हणवतो, तो खरोखरच तसा आहे काय, दारिद्र्यनिर्मूलन, जातिअंत, शिक्षण इत्यादी प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धर्मांतर कशासाठी, धर्मांतर हा पळपुटेपणा नाही काय, बौद्ध धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे, असं समजणं योग्य की अयोग्य, आता धर्म महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा मानला पाहिजे, असं असताना धर्माला अतिमहत्त्व देण्याची गरजच काय, ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला ते कुठे सुधारले आहेत, तेव्हा आम्ही हा धर्म स्वीकारावा, अशा अनेक शंकांची/प्रश्नांची या पुस्तकात अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने उत्तरं देण्यात आली आहेत.

प्रस्तुत पुस्तकाचा फायदा धर्मांतराच्या अभियानातील ओबीसी कार्यकर्त्यांनाही होईल हे उघड आहे. कार्यकर्त्यांना मुद्दामहून चित्रविचित्र प्रश्न आणि शंका विचारून भंडावून सोडणारे, नाउमेद करणारे, स्वीकृत मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारे बरेचजण आजूबाजूला आढळतात. ते स्वतः समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने भरीव असं काही करत नाहीत. प्रबोधनाच्या प्रक्रियेला नेमकं टोक येईल असंही काही बोलत नाहीत. ‘काय नाकारायचं’ याचीच चर्चा वर्षानुवर्षं चालली आहे, मात्र ‘काय स्वीकारायचं’ याचा विचार करताना कुणी आढळत नाही. बौद्धधम्म स्वीकाराची भूमिका घेऊन ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करणार्यांची आत्मीयतेने दखल घेण्याऐवजी त्यांच्यावरच टीका केली जाते. या ना त्या कारणाने ज्यांची स्वतःची कोंडी झालेली आहे ते यात आघाडीवर असतात. अशा लोकांशी वेळप्रसंगी चर्चेची तयारी ठेवावी लागते. त्यासाठी मुळात कार्यकर्त्यांची स्वतःची चांगली वैचारिक तयारी असणं आवश्यक ठरतं. प्रत्येकच कार्यकर्त्याचं वाचन चांगलं असेल असं नाही. प्रत्येकाला मुद्देसूद उत्तरं देता येतील असंही नाही. काही प्रश्न असे असतात,

ज्यांची उत्तरं ताबडतोब सांगता येत नाहीत वा सुचत नाहीत आणि त्यामुळे आपण निरुत्तर झालो आहोत की काय अशी शंका येते. तर काही प्रश्न असे असतात,

ज्यांची उत्तरं लगेच हाताशी नसतात किंवा ती कुठे मिळतील हे ठाऊक नसतं आणि म्हणूनच सामान्य कार्यकर्तासुद्धा सक्षमपणे त्याची धर्मांतराची भूमिका लोकांसमोर मांडू शकेल, या गरजेतून हे पुस्तक साकारलंय.

ज्यांच्या मनात धर्मांतराबद्दल शंका आहेत, त्यांच्या शंका या पुस्तकाच्या वाचनाने दूर होतील. धर्मांतराच्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनाही या पुस्तकातील चर्चा मार्गदर्शक ठरेल. एवढंच नव्हे तर, धर्मांतराच्या अभियानाविषयी कुतूहल असणार्या मंडळींना आणि सजग वाचकांनाही हा विषय सहजपणे समजेल, असा विश्वास वाटतो. धर्मांतराच्या अभियानाला सर्वार्थाने मार्गदर्शक ठरेल असं सुंदर पुस्तक लिहिल्याबद्दल संदीप जावळे यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच!

 रघुनाथ महाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *