सीन एक

‘पिढ्या न् पिढ्या जे उन्हातच होते त्यांना सावलीत आणणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मी मला मिळालेला हा संमेलनाध्यक्ष पदाचा बहुमान अर्पण करतो’ अशी जागरूक भावना मराठा समाजात जन्मलेले ख्यातनाम कवी आणि ८७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ४६० मतं घेऊन निवडून आलेले अध्यक्ष फ.मुं. शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी परत एकदा एका कार्यक्रमात जाहीर व्यक्त केली. १८६५ च्या आसपास पुण्यातल्या रानडेंनी काही ग्रंथ निर्मिती करणार्यांना हाताशी धरून पुढे १८७८ मध्ये पुण्यातल्याच हिराबागेत ११ मे ला साहित्य संमेलनाचा पहिला घाट घातला होता. या संमेलनाच्या अध्यक्षपदी अर्थातच रानडे स्वतःच होते. दुसरं साहित्य संमेलन १८८५ च्या दरम्यान पुण्याच्याच बुधवार पेठेतल्या दाणे आळीत पार पाडण्यात आलं. शंकरराव खरात, केशव मेश्राम, उत्तम कांबळे आणि यु.म. पठाण या अशांना सोडलं तर आतापर्यंत या संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कुणा कुणाला प्राप्त झाली हे सांगणे न लागे.

सीन दोन

एव्हाना देवयानी खोब्रागडे प्रकरण कदाचित बर्यापैकी थंड झालेलं असेलही पण या प्रकरणातून मी मी म्हणणार्या चार दोन टाळक्यांची ज्यांनी लोकमान्य लोकशक्तिला व्यक्त करायचा सो कॉल्ड ध्यास घेतलाय, अशा शब्दकुबेरांची खरी काया दिसून आली. देवयानी प्रकरणाच्या बाबतीत एक बाब फारच निर्लज्ज पद्धतीने पुन्हा एकदा सिद्ध झाली की कदाचित आता तोंडात जात उरली नाही मात्र डोक्यात अजूनही शिल्लक आहे. मेलियेच्या रांडा इच्छिते लेकरू या तुकोबांच्या ओळी झटाझट कानावर आदळवल्या पाहिजे या सार्याच खुज्या लोकांच्या. शेजारच्या जिल्ह्यात काय शिजतंय आणि याहीपेक्षा आपल्या बुडाखाली काय जळतंय याची बित्तंबातमी नसणार्यांनी आखातातल्या तेलावर किंवा तिथल्या भयंकर अशा रासायनिक अण्वस्त्रांवर किंवा लॅटिन अमेरिकेत झालेल्या बदलावर आपली लेखणी पाजळताना, आपल्या गावातल्या सगळ्या नगरसेवकांची नाहीतर किमान राज्यातल्या सगळ्याच आमदारांची नावं सांगून दाखवावी. उंटाचा मुका घ्यायच्या स्पर्धेत उतरू पाहणार्यांना देशाच्या विकासासाठी किंवा इथल्या एकूण प्रगतीसाठी सातत्याने युरोपियन देश किंवा अमेरिकेच्या पाच पन्नास राज्यांची तुलनाच लिटमस टेस्ट म्हणून सातत्याने गरजेची पडत असते. सध्या आपली स्थिती कबीर म्हणतात त्याप्रमाणे, जानिता बुझा नहीं, बुझी किया नहीं गौन. अंधे को अंधा मिला राह बतावे कौन… अशी झालीय.

सीन तीन

जागतिक कीर्तिचे अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, ‘आय एम फर्स्ट अँड लास्ट इंडियन…’ देशावर अपार प्रेम असणार्या व्यक्तिच्याच तोंडातून असं विधान उमटू शकतं. म्हणूनच तर ही सामाजिक आणि देशभक्तिची नाळ अमर्त्य सेनसारख्या नोबेल पारितोषिकापर्यंत मजल मारणार्या अर्थतज्ज्ञाला ‘आंबेडकर इज माय फादर इन इकॉनॉमिक्स,’ असं छातीठोकपणे घोषित करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळवून देते आणि म्हणूनच सेन यांच्यामते देशाची प्रगती जीडीपीच्या आकड्यातून नाही तर देशातल्या शेवटच्या माणसाला अन्न, वस्त्र आणि निवारासारख्या अत्यंत प्राथमिक बाबी मिळाल्या का या प्रश्नात आहे.

सीन चार

मात्र हे सारं काही तिकडे लॅटिन अमेरिकेत काय चाललंय किंवा चीन च्या शुआंग प्रांतात काय घडतंय याचीच खाज असणार्यांना यातलं काही कळू शकणार नाही. तिकडे पलीकडे मशिद बंदरच्या किंवा माटुंगा लेबर कॅम्पच्या गल्लीत कोणती पाण्याची पाइपलाइन कुठे लिक झालीय याची माहिती ठेवायला शब्दकुबेरांनी आधी शिकलं पाहिजे. मग आखातातल्या रासायनिक गळतीचं किंवा तेलियाचं पुन्हा पाहता येईल. मध्यंतरी हॉलिवूडच्या जवळपास सार्याच चित्रपटांमध्ये एफबीआय ही अमेरिकेची गुप्तचर संघटना सातत्याने काहीतरी अगम्य, अनाकलनीय अद्भुत हालचाली करताना दाखवली जायची. त्यातले ते एफबीआयचे एजंट कधी अमेरिकेत तर लगेच दोन दिवसांत अफगाणिस्तानात तर अचानक रशियाच्या बारक्याशा गल्लीत तर कधी चीनमधल्या एखाद्या रेस्टॉरण्टमध्ये अत्यंत शिताफीने आपापल्या जबाबदार्या पार पाडताना दिसायचे. एकूणच चित्रपट पाहताना असं वाटायचं की हे अख्खं जग एफबीआय आणि अमेरिकाच चालवते की काय? आपल्याकडच्या या वैचारिक किड्यांना कुलाबा पोलीस स्टेशनमधील दहा पोलिसांची नावं नीटशी माहीत नसतील मात्र त्या एफबीआयमधले मागचे दहा मुख्य अधिकारी पुन्हा तोंडपाठ असतात. गंमत काय आहे की, ज्या क्षेत्रातलं जनसामान्यांना फारसं कळत नसतं त्याच क्षेत्रावर अधिकार वाणीने बोललं की मग आपण आपोआप मोठे होऊन जातो असा एक नासमज या टोळ्यांमध्ये वाढायला लागलाय. मग ही माणसं बलशाली भारत किंवा सुपर पॉवर वगैरे अशी दुधखुळी स्वप्न पाहतात. ही अशी स्वप्नं पाहणं वाईट नाही. अगदी रात्रीच्यावेळी मस्तपैकी स्वतःच्या पैशाची दारू पीत पीत पाहावीत अशी स्वप्नं बिनधास्त पाहावीत, मात्र त्या आधी गावागावात जाऊन आपण लोकांना संडास बांधण्यासाठी तयार केलं पाहिजे. जर आपल्या बिझी शेड्युलमुळे स्वतःला हे शक्य नसेल तर तुमच्या ओळखीने एखाद्या अमेरिकेतल्या एन्जसीला हे काम सोपवलं पाहिजे.

सीन पाच

देवयानी खोब्रागडे या जन्माने दलित असल्या तरी स्वकर्तृत्वाची भरारी त्यांना त्यांच्या हक्कांपर्यंत घेऊनच गेली. निसर्गाची प्रचंड हानी, अफगाणिस्तानात मेलेला प्रत्येकजण किंवा पूर्वी व्हिएतनाममध्ये मेलेली हजारो माणसं हे सारं कोणत्या न्यायाच्या वा कोणत्या मानवी मूल्यांमध्ये बसतं याचाही शोध शब्दकुबेरांनी घ्यावा. पंजाबच्या फिरोजपुरमध्ये निव्वळ जन्मलेल्या मात्र न्यू जर्सीमधला भाकर तुकडा खाऊन पोसलेला प्रीत भरारा खाल्लेल्या मिठाला जागला. पण खंत आहे ती सो कॉल्ड आंतरराष्ट्रीय कुटनीतिची जाण असणार्यांनी इथल्या मिठाशी केलेल्या गद्दारीची. आदर्शचं जे व्हायला हवं ते व्हावंच. मात्र याप्रसंगी हे असं भारतातल्या काही जनांचं उफाळून आलेलं अमेरिकी (अतिरेकी) प्रेम… सारंच काही एफबीआयसारखं अगम्य, अद्भुत असं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *