गेल्या दोन वर्षांत चर्चा, आश्वासानं फार झाली असं सांगत आता ‘करेंगे या मरेंगे’ची लढाईचा नारा देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी गावात पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय. चार राज्यातील निवडणुकीत भाजपाला मोदींच्या प्रभावामुळे यश मिळालं नाही तर सरकारने जनलोकपालसंदर्भात धोका दिल्याने जनतेने काँग्रेसला झाडूने भुईसपाट केलं आहे. काँग्रेसच्या पराभवाची अनेक कारणं असतील पण सरकारने जनलोकपाल संमत करण्याचं आश्वासन पाळलं नाही, हेदेखील त्यांच्या पराभवाचं एक महत्त्वाचं कारण आहे. जनतेचा विश्वासघात केल्याने मतदारांनी आपला राग मतपेटीतून व्यक्त केला आहे. अजूनही सरकारने जागं व्हावं आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक मंजूर करावं. ते मंजूर झालं नाही तर लोकसभा निवडणुकीतही जनता पुन्हा काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत…

जनलोकपाल मंजूर केलं तर काँॅग्रेस केंद्रातील आपली सत्ता राखू शकेल काय?

– जनलोकपाल विधेयक संमत झालं तर लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. विधेयक संमत न करता सरकाने धोका दिल्यानेच जनतेने त्यांना विधानसभा निवडणुकीत धडा शिकवला आहे. भूमी अधिग्रहण, पेन्शन, तुरुंगात असताना निवडणूक लढवण्याचा अधिकार आदी विधेयकं सरकारने मंजूर करून घेतली. जनलोकपाल जनतेच्या हिताचं नव्हतं का? दोन वर्षं राज्यसभेत ते विधेयक का रोखून ठेवलं? काँग्रेस सरकारने याचंही उत्तर द्यायला हवं, असं मला वाटतं.

जनलोकपाल मंजूर झालं नाही तर काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार का?

– आम्ही निवडणूक मैदानात उतरणार नाही. मात्र जनतेमध्ये यासंदर्भात जागृती निर्माण करण्याचं काम निश्चित करू. हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल मंजूर झालं नाही तर पुढे काय करायचं यावर चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी आहे. अधिवेशनात हे विधेयक मंजूर झालंच पाहिजे.

जनलोकपालच्या आंदोलनासाठी केजरीवाल यांचा पाठिंबा घेणार का?

– केजरीवाल पार्टीवाले आहेत. त्यांचा पाठिंबा आम्ही घेणार नाही. केजरीवालच काय पण कोणत्याही पक्ष अथवा पार्टीचा पाठिंबा आम्ही घेणार नाही. या लोकांना व्यासपीठावर आम्ही येऊ देणार नाही.

दिल्ली विधानसभेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. पण केजरीवाल यांना काँग्रेस पाठिंबा देण्यास तयार आहे. तो त्यांनी घ्यावा का?

– पाठिंब्यामुळे सरकार पंगू होतं. असं सरकार तंदुरुस्त नसतं. काँग्रेसचा  काय कोणचाही पाठिंबा घेऊन तयार होणारं खिचडी सरकार काय कामाचं?  पाठिंबा देणार्यांना सांभाळण्यात वेळ वाया जातो. अरविंदला देशात लोकतंत्र आणायाचं आहे. भ्रष्टाचारमुक्त भारताची निर्मिती करायची असेल तर खिचडी सरकारमुळे ती निर्मिती होणार नाही.

मागील आंदोलनावेळी तुमच्या प्रकृतीत बिघाड झाला होेता. वयोमानानुसार अशी आंदोलनं प्रकृतीला झेपत नसतानाही पुन्हा उपोषण, आंदोलन का करता आहात?

– ज्या डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले आहेत. त्यांच्याशी माझा संपर्क सुरू असून आंदोलनादरम्यान माझ्याजवळ सतत एक डॉक्टर थांबणार आहे. त्यामुळे तब्बेतीची फार काही अडचण येणार नाही. प्रकृतीचा फायदा आणि नुकसान याचा विचार जर मी करत बसलो तर देशातल्या जनतेचं भलं कसं होणार? देशाच्या भल्यासाठी काहीतरी सहन करावंच लागेल. देशासाठी अनेक शूरवीरांनी हसत हसत फासावर जाऊन बलिदान दिलं आहे. तिथे माझ्यासारख्यानेही बलिदान दिलं तर त्यात बिघडलं कुठे?

गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येताहेत, हे खरंय का? तुमच्या जीवाला धोका आहे का?

– हे चुकीचं आहे. माझ्या जीवाला धोका आहे की नाही हा मुद्दाच नाही. लोकसेवा करत असताना जीवाची पर्वा करायची नसते.

विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं?

– मतदार अजून हवा तेवढा जागरूक नाहीय. याचा फायदा भाजपला झाला आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही मोठे पक्ष आहेत. त्यामुळे हेच दोन पक्ष सत्तेत बसू शकतात किंवा विरोधात बसू शकतात असा विचार अजूनही मतदार करतात. एका अर्थाने या दोन्ही सत्ताच आहेत, एक पूर्ण तर दुसरी अर्धी सत्ता आहे, एवढाच काय तो फरक या दोघांमध्ये आहे. त्यामुळे यांना  धडा शिकवणारी तिसरी शक्ती देशात उदयास येईल याचा शेध आम्ही घेत आहोत.

मग आम आदमी पार्टी तिसरा पर्याय ठरू शकते का?

– तिसरा पर्याय ठरण्यासाठी आम आदमी पार्टीने प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही त्यांना जरूर लाखमोलाचे आशीर्वाद देऊ.

नरेंद्र मोदींना भाजपाने पंतप्रधानपदाचं उमेदवार जाहीर केल्यामुळे परिस्थिती बदलली का?

– नरेंद्र मोदी हे काही नवे नाही ते जुनेच आहेत. ही परिस्थिती बदलण्याचं कारण वेगळं आहेत. प्रचंड वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, घोटाळे, अत्याचार या त्रासाला कंटाळून जनतेचा उद्रेक बाहेर आला आहे.

– अविशांत कुमकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *