अवघ्या एक वर्षात आम आदमी पक्षाने दिल्लीत आपलं अस्तित्व स्थापित केलंय. आम आदमीच्या यशाने सारेच स्तंभित झालेत. काँग्रेस आणि भाजप यांच्यापुढे या नव्या दमाच्या पक्षाने आव्हान उभं केलंय. याच आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आयबीएन-७ चे व्यवस्थापकीय संपादक आशुतोष यांच्याशी केलेली ही बातचीत…

निवडणुकीच्या या निकालावर तुम्ही खूश आहात का?

– मी खूश होणं किंवा आनंदी होणं ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटत नाही. कारण मला वाटतं आज या देशात खूप मोठी घटना घडलीय. ती म्हणजे, आज या देशात एका नव्या पद्धतीच्या राजकारणाचा जन्म झालाय. या देशातला सामान्य माणूस महागाई, भ्रष्टाचार यांमुळे खूप जास्त त्रस्त झाला होता. आणि आमच्या पक्षाचे कोणते उमेदवार जिंकलेत, हे पहाणंही गरजेचं आहे. आमच्या पक्षाची उमेदवार राखी बिर्ला जिंकली आहे. कोण आहे ही राखी बिर्ला? कोण ओळखतं या मुलीला? ती एक सामान्य मुलगी आहे, एक छोटी पत्रकार… पण तिने राजकुमार चौहानसारख्या बड्या मंत्र्याला हरवलंय. अशोक चौहान जिंकलेत. आंबेडकरनगर मधून… कोण आहेत हे अशोक चौहान? पण त्यांनी सलग चाळीस वर्षं जिंकून येणार्या चौधरी प्रेमसिंग यांना हरवलंय. अखिलेश त्रिपाठी जिंकलेत… कोण आहेत अखिलेश त्रिपाठी? हे सगळे लोक सामान्य लोक होते. यांच्यासंदर्भात मीडियावाले म्हणत होते की, या लोकांकडे कसलाच अनुभव नाहीये. पण आता मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, जेव्हा या देशातला आम आदमी उभा राहतोना तेव्हा मोठमोठाले तख्तही डगमगायला लागतात. या निवडणुकांच्या निकालांनंतर ती मोठी सिंहासनं डगमगू लागलीत. माझ्याबाबतीत म्हटलं जातंय की, मी २६ हजार मतांनी जिंकलोय. पण हा माझा थोडीच विजय आहे. ही जी विजयी मतांमधील तफावत आहे ना ती तफावतच हे दर्शवतेय की, या देशातला सामान्य माणूस किती संतापला होता… किती दुःखी झाला होता ते… आजवर लोकांकडे भाजप, काँग्रेसशिवाय पर्यायच नव्हता… मात्र आता लोकांना पहिल्यांदा एक प्रामाणिक पर्याय मिळालाय. एका बाजूला संताप आणि दुसर्या बाजूला सक्षम पर्याय हेच या निकालांमधून समोर आलेलं चित्र आहे, असं मला वाटतं.

म्हणजे तुम्ही आम आदमीला ‘खास’ आदमी बनवलंत?

– होय, या देशातल्या आम आदमीला आम्ही खास आदमी बनवलं आणि या देशातले जे कुणी सो कॉल्ड व्हीआयपी लोक होते ना त्या सर्वांची खुर्ची या सामान्य लोकांनी काढून घेतली.

तुम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तुमचं स्थान कायम केलंय. पण जर सरकार बनवता नाही आलं तर…? निराशा वाटेल?

– हो थोडी निराशा जरूर वाटेल आम्हाला… पण माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की, या निवडणुकांच्या निमित्ताने एक नव्या पद्धतीच्या राजकारणाने या देशात जन्म घेतलाय. एक मोठी घटना या देशात घडलीय… सगळ्याच गोष्टी काही एका दिवसात घडणार नाहीत पण आतापासून या मोहिमेला इथून पुढे नेलं जाईल. आज दिल्लीच्या जनतेने या देशाला एक मोठा आशेचा किरण दिलाय. त्यांनी एक रोप लावलंय. आता या रोपाचं वृक्षात रूपांतर करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून आता या देशातील लोकांना सोबत यावं लागेल. जे जे लोक भ्रष्टाचारमुक्त भारताची इच्छा बाळगून आहेत, ज्यांना एक स्वच्छ भारत हवाय, त्या सर्वांनी आता एकत्रित येणं आवश्यक आहे.

पण आज दिल्लीत जी परिस्थिती निर्माण झालीय. त्यावरून तुम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून निश्चित झाला आहात. त्यामुळे आता सरकार स्थापन करण्यासाठी तुम्ही कुणाला समर्थन देणार? यातही जर भाजपने तुमच्याकडे पाठिंब्याची मागणी केली तर…

– कुणाला समर्थन देणार आम्ही…. तुम्हीच सांगा… भारतीय जनता पक्षाला कसं समर्थन देणार? काँग्रेसला कसा पाठिंबा देणार? हे दोन्ही पक्ष जर काही काम करणारे पक्ष असते तर आम्हाला आम आदमी पक्ष स्थापन करण्याची आवश्यकताच काय होती? या दोन्ही पक्षांनी लोकपाल बिल पास केलं असतं,  स्वराज्य कायदा पास केला असता, राईट टू रिकॉल, राईट टू रिजेक्ट ही बिलं पास केली असती, इथली व्यवस्था सुधारू शकले असते, सामान्य माणसाचं जगणं सुकर करू शकले असते तर आम्हाला आम आदमी पक्ष स्थापनच का करावा लागला असता?

म्हणजेच तुही सरकार बनवण्यासाठी कुणालाच पाठिंबा देणार नाही?

– नाही.

भाजपला बहुमत मिळवता आलं नाही तर नियमाप्रमाणे दुसर्या क्रमांकाच्या पक्षाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रित केलं जातं. यानुसार, जर राज्यपालांनी तुम्हाला सरकार बनवण्यासाठी बोलावलं तर तुम्ही सरकार स्थापन कराल?

आम्ही सरकार कसं स्थापन करू शकतो. ज्याला बहुमत असतं तोच सरकार स्थापन करू शकतो ना… आणि आम्हाला तर बहुमत नाहीये. जेव्हा आम्हाला बहुमत मिळेल तेव्हाच आम्ही सरकार स्थापन करू. एक गोष्ट मी इथे प्रामुख्याने नमूद करू इच्छितो की, आम्ही इथे जोडण्या- तोडण्याचं राजकारण करायला आलेलो नाही. आम्हाला सत्तेचं राजकारण करायचं नाही. सत्ता काबीज करण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही. तर या देशाचं राजकारण बदलवण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही सगळे जण आपापलं करिअर सोडून इथे आलेलो आहोत, आपलं करिअर बनवायला आम्ही राजकारणात आलो नाही. त्यामुळे कुणाशी युती करायची? कुणाशी आघाडी करायची? आम्ही हेयुतीचं आणि आघाडीचं राजकारण करायला इथे आलेलो नाही.

मग जर काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला तर…

ते भाजपला पाठिंबा देऊ शकतात. याचं कारण असं की, या दोन्ही पक्षांची विचारसरणी एकच आहे. हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचार करतात, दोघंही जातीयतेचं, धार्मिकतेचं राजकारण करतात, दोन्ही पक्ष गुन्हे करतात… यामुळे या दोन्ही पक्षांच्या अनेक गोष्टी एकमेकांसारख्याच आहेत. लोकांच्या पाठीमागे यांची हातमिळवणी आहेच. यांच्या गुप्त बैठकाही होतातच. मग आता जाहीरपणे सर्वांसमोर येऊन हातमिळवणी होऊ द्याना…

अशा परिस्थितीत कुणीच सरकार बनवू शकलं नाही तर मग दिल्लीत पुन्हा निवडणुका होतील का? तुम्हाला काय वाटतं दिल्लीत पुन्हा निवडणुका व्हाव्यात?

जर पुन्हा निवडणुका होणार असतील तर ती काही मोठी गोष्ट नाही. होऊ शकतात पुन्हा निवडणुका… देशाला बदलवण्यासाठी पुन्हा एकदा निवडणुका होणार असतील, प्रामाणिक राजकारण स्थापन करण्यासाठी जर पुन्हा एकदा निवडणुका होणार असतील तर हरकत नाही. काही लोक मला म्हणताहेत की, जर पुन्हा निवडणुका झाल्या तर खर्चही पुन्हा करावा लागणार… यावर मी निवडणुकीसाठी येणार्या खर्चाचा हिशेब काढला तर एका राज्यात निवडणुकीसाठी ५० ते १०० करोड इतका खर्च येतो. मग हे लोक तर एका कंत्राटातच ५००/५०० करोड रुपये खातात… मग निवडणुकीसाठी ५०/१०० करोड रुपये खर्च झाले तर काय फरक पडतो… पण मला वाटतं भाजप काँग्रेसने मिळवून सरकार बनवावं… त्यांनी आता पुन्हा एकदा लोकांवर निवडणुका लादू नयेत…

तुम्ही आता त्याच लोकशाहीतील राजकीय व्यवस्थेचा भाग बनला आहात जी व्यवस्था भल्याभल्यांना भ्रष्ट बनवते… आणि या राजकीय व्यवस्थेवर तुम्ही रामलीला मैदान आणि जंतरमंतरवरून प्रचंड टीकाही केली होती… अशाच व्यवस्थेचा आता तुम्हीही एक भाग बनला आहात…

– लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांनीही राजकारण केलंय. पण ते कधीच भ्रष्ट झाले नाहीत.

सरकार बनवण्यासाठी आता तोडफोडीचं राजकारण सुरू होईल. तुमच्या विजयी उमेदवारांना मोठमोठी आमिषं दाखवली जातील. तुम्हाला विश्वास वाटतो का की तुमचे आमदार फुटणार नाहीत?

– शंभर टक्के मला विश्वास वाटतो… एकही आमदार फुटणार नाही. अजूनपर्यंत एकही उमेदवार फुटलेला नाही. ज्यांना ज्यांना फोडण्याचे प्रयत्न झाले त्या सर्वांनी आम्हाला लगेचच यासंदर्भातील माहिती दिलीय. आमच्या काही उमेदवारांनी मला सांगितलंदेखील की, भाजपवाले हमे तोडने के लिये आये थे, लेकिन हमने उन्हे बताया के हम यहाँ देश के लिये आये है, सर कटा लेंगे लेकिन पैसा नहीं लेंगे…

तुमच्या पक्षावर असाही आक्षेप घेतला जातो की, हा पक्ष एकाच मुद्याचा पक्ष आहे. केवळ भ्रष्टाचार या एकाच मुद्यावर हा पक्ष काम करतो. पण आता जेव्हा तु?ही सत्तेत याल, प्रमुख विरोधी पक्ष ?हणून लोकांसमोर याल तेव्हा तुमच्या पक्षाची एक विचारसरणी असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे एक ठोस धोरण असणं गरजेचं आहे, असं तुम्हाला वाटत नाही?

– कोण म्हणतं आम आदमी पक्ष हा एकाच मुद्याचा पक्ष आहे? तुम्ही आमचा जाहीरनामा वाचालात तरी तुमच्या लक्षात येईल. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही सार्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे… हा झाला पहिला मुद्दा… आता माझा दुसरा मुद्दा असा आहे की, कोण लोक आहेत जे असं म्हणताहेत की, हा पक्ष एकाच मुद्याचा पक्ष आहे? आम्ही म्हणतो की, भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवा. तेव्हा हे राजकारणी म्हणतात की, अरे, या पक्षाची विचारसरणीच कळत नाही. या लोकांना कशी कळणार आमची विचारसरणी? पण त्याचवेळेस सामान्य जनतेला मात्र आमची विचारसरणी कळतेय… इतकंच नाही तर जनतेला आमची विचारसरणी मान्यही होते. भ्रष्टाचार थांबला तर सर्वांना शिक्षण मिळेल, भ्रष्टाचार थांबला तर सर्वांना चांगलं आरोग्य लाभेल, त्यांना रुग्णालयात औषधं मिळतील, चांगले रस्ते तयार होतील, विजेचे दर कमी होतील या आमच्या सर्व गोष्टी जनतेला समजल्या पण नेत्यांना नाही समजल्या… कारण ते समजूनच घेऊ इच्छित नाहीत…

म्हणजेच तुमचा पक्ष एकाच मुद्याचा पक्ष नाही आणि लोकपाल विधेयक मंजूर झालं तर तुम्ही पक्ष बरखास्त कराल असंही काही लोक म्हणत होते. तेही आता शक्य नाही?

– नाही… आता हा पक्ष बरखास्त होण्याची कोणतीच शक्यता उरलेली नाही. आता खूप उशीर झालाय. आता या देशात केवळ संपूर्ण व्यवस्था परिवर्तन होईल… ६५ वर्षांपूर्वी काही तरी चांगलं काम करतील या विश्वासाने जनतेने या सर्व पक्षांना सत्ता दिली होती. पण त्यांनी काहीच केलं नाही. म्हणून आता पुन्हा एकदा ती सत्ता या देशातील सामान्य जनतेच्या हाती परत द्यायचीय… या देशात पुन्हा एकदा स्वराज्य आणायचंय.

आता तुम्ही प्रमुख विरोधी पक्षाचे नेते म्हणून तुम्हाला कॅबिनेट पद मिळू शकतं. यानुसार तुम्हाला लाल दिव्याची गाडी, बंगला या सर्व सुविधा मिळतील. तुम्ही या सुविधा घेणार का?

– नाही. मी कोणत्याही सुविधा घेणार नाही. मी लाल दिव्याची गाडी घेणार नाही, मोठा बंगला घेणार नाही, इतकंच नाही तर मी सुरक्षाही घेणार नाही. याचं कारण असं की, या सर्व सुविधा मी घेणार नाही, असं एक कबुलीपत्र मी माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांच्या घराघरात पोचवलंय आणि हे केवळ मी माझ्यापुरतंच नाही बोलत तर माझ्या पक्षातील प्रत्येक आमदाराच्यासंदर्भात बोलतोय. आमच्यापैकी कुणीही या सोयीसुविधा घेणार नाही.

लोकप्रतिनिधींना मिळणारं वेतनही तुम्ही घेणार नाही?

– किती वेतन मिळतं लोकप्रतिनिधींना… पण आम्ही अजून याविषयाबाबत काहीही ठरवलेलं नाही. या विषयासाठी आम्ही सर्व मिळून एक निर्णय नक्कीच घेऊ. जर अधिक वेतन मिळत असेल तर त्यातील काही भाग आम्ही दान करू किंवा कमी वेतन घेऊ. पण यासंदर्भात लवकरच आम्ही एक निर्णय निश्चित घेऊ…

तुम्ही अण्णांच्या आंदोलनातले प्रमुख नेते होता. मग अशावेळी तो नेमका क्षणकोणता होता ज्या क्षणाला तुम्ही राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतलात? कारण अण्णा तुमच्या या निर्णयात तुमच्यासोबत नाहीत…

– आम्ही त्या दोन वर्षांत सर्व प्रयत्न करू पाहिले. या राजकारण्यांसमोर आम्ही रडलो, गुडघे टेकले… अण्णांनी तर तीन वेळा उपोषणही केलं. आठवा ते अण्णांचं तेरा दिवसांचं उपोषण… त्या उपोषणाच्यावेळेस सर्व पक्षांनी मिळून संसदेत असं वचन दिलं होतं की, अण्णा तुम्ही उपोषण मागे घ्या. आम्हाला तुमच्या तिन्ही अटी मंजूर आहेत आणि आम्ही लोकपाल विधेयक मंजूर करायला तयार आहोत. याच वेळेस पंतप्रधानांनीही एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र घेऊन विलासराव देशमुख स्वतः आले होते. या पत्रलेखनालाही दोन वर्षं उलटली. पण काय झालं या सगळ्याचं…? सर्व राजकीय पक्षांनी मिळून धोका दिला. मी दोनदा उपोषण केलं. तरीही या लोकांनी काहीच केलं नाही. आम्ही जंतरमंतरवर उपोषण करून मेलो तरी यांना त्याचं काही वाटणार नाही. अशी सगळी परिस्थिती असताना आम्ही आणखी काय करायला हवं होतं? त्यामुळे आमच्याकडे याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता. अण्णाही म्हणतात की, राजकारण चिखल आहे. पण आम्ही त्यांनाही सांगितलं की आता परिवर्तन हवं असेल तर झाडू घेऊन या चिखलात उतरावंच लागेल. त्याशिवाय ही घाण साफ होणार नाही.

अण्णा तुमचे नैतिक आणि राजकीय गुरू आहेत. पण ते तुमच्यासोबत नाहीत. ते नाराज आहेत तुमच्यावर… ते जर तुमच्यासोबत असते तर आजचा तुमचा विजय अजून मोठा असता? या विजयानंतर तरी अण्णांशी तुमचं काही बोलणं झालंय?

– हो निश्चितच… अण्णा जर आज आमच्यासोबत असते तर हा विजय नक्कीच आणखी मोठा असता. दुसरं म्हणजे अजून तरी माझं अण्णांशी या विजयासंदर्भात काहीच बोलणं झालेलं नाही. त्यांचे पीए माझं अण्णांशी बोलणं करून देत नाहीत. आणि पुन्हा एकदा सांगतोय की, हा माझा किंवा आमचा विजय नाही. तर हा दिल्लीच्या जनतेचा विजय आहे. दिल्लीच्या जनतेने या निमित्ताने संपूर्ण देशाला एक दिशा दाखवलीय. स्वच्छ आणि प्रामाणिक राजकारणाचं एक उदाहरण त्यांनी घालून दिलंय. आजवर कुणी असा विचार तरी केला होता का, एक नंबरच्या पैशांनीही निवडणुका जिंकता येऊ शकतात?

ऐन मतदानाच्या तोंडावर तुमच्या काही लोकांचं स्टिंग ऑपरेशन केलं गेलं. याचा विपरीत परिणाम तुमच्या मतदानावर झाला?

निश्चितच झाला. त्या स्टिंग ऑपरेशनचा विपरीत परिणाम झाला याबद्दल माझं अजिबातच दुमत नाही. पण ते स्टिंग ऑपरेशन बनावट होतं हेही तितकंच खरंय. तसं सिद्धही झालं. काही चॅनेल आणि अनुरंजन झा यांनी मिळून ते कारस्थान रचलं होतं. पण अखेरीस सत्य बाहेर आलं. ते स्टिंग ऑपरेशन बनावट असल्याचं सिद्ध झालं. पण त्यामुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल यात शंका नाही. असा संभ्रम निर्माण करण्याचा यांचा जुनाच उद्योग आहे. नाही तर आमची शाजिया इल्मी फक्त ३२६ मतांनी हरली नसती…

तुम्ही ज्या प्रकारचे प्रस्ताव लोकांना देताय, जे मॉडेल लोकांसमोर मांडताय ते इथे खरंच लागू पडेल असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही लोकांना विचारून निर्णय घेण्याची बात करताय. यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होणार नाही का?

– का नाही लागू होणार…? बाहेरच्या अनेक देशांमध्ये अशाचप्रकारे कारभार चालतो. अमेरिकेसारख्या देशातही अशाचप्रकारे लोकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जातं. तिथे ठरावीक दिवशी, ठरावीक वेळेला लोक एकत्र जमतात आणि ते त्यांच्या विभागाचा पैसा प्रथम कशावर खर्च होणार याचा निर्णय घेतात आणि तो निर्णय तिथल्या महापौरांना, अधिकार्यांना मान्य करावाच लागतो. मग आपल्या देशात असं का घडू शकत नाही? का घडू नये? आम्ही दिल्लीतही हा प्रयोग करून पाहिलाय. विनोदकुमार बिन्नी यांच्या वॉर्डमध्ये… तिथे लोकांनीच निर्णय घेऊन आपल्या वॉर्डाची विकासकामं करून घेतली आहेत. या पद्धतीमुळे उलट विकासकामांचा वेग वाढतो. अन्यथा जोपर्यंत कंत्राटदार पैसे घेऊन येत नाही तोवर आपले अधिकारी, मंत्री विकासकामांचे प्रस्ताव बासनातच बांधून ठेवतात. त्यामुळेच या देशातील विकासकामं आजवर रखडली आहेत…

तुम्ही विधानसभेची निवडणूक तर लढवलीत पण आता काय तुम्ही लोकसभेचीही निवडणूक लढवणार?

– भ्रष्टाचार फक्त दिल्लीतच नाही. तो देशभर आहे. त्यामुळे देशातून भ्रष्टाचार नष्ट करायचाय. पण लोकसभेची निवडणूक लढवायची की नाही हे पक्ष ठरवेल. मी एकटा यासंदर्भात निर्णय घेऊ शकत नाही. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, कुमार विश्वास असे मोठे मोठे लोक आमच्या पक्षात आहेत. त्यांच्यासोबत सल्लामसलत करूनच हा निर्णय घेतला जाईल.

पण तुमचं वैयक्तिक मत काय आहे, तुमच्या पक्षाने लोकसभेची निवडणूक लढवायला हवी?

– मीही तेच सांगतोय, भ्रष्टाचार संपूर्ण देशातून नष्ट करायचाय. पण लोकसभेसाठी पक्षाची किती तयारी आहे, किती जागांवर लढायचंय, ही निवडणूक लढवायचीय की नाही, आगामी निवडणूक लढवायची की पुढची लढवायची अशा सगळ्या मुद्यांवर आम्हाला एकत्रित बसून चर्चा करायचीय… त्या चर्चेनंतरच यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल. पण लोकसभेची निवडणूक कधी ना कधी लढवायचीय हे मात्र निश्चित आहे. पण ही निवडणूक दिल्लीची जनता लढली हे मात्र नक्की… अशीच आता देशाची जनताच निवडणूक लढवेल, अशी आम्हाला खात्री आहे. कारण आता या देशाला एक व्यक्ती वाचवू शकते आणि ती व्यक्ती आहे आम आदमी…

पण, तुमचे समर्थक, मतदार यांच्यापैकी एक वर्ग असा आहे जे नरेंद्र मोदींना देशाच्या पंतप्रधानपदी पाहू इच्छितात… तुमच्यावर तसा आरोपही लावला जातोय…

– ज्यांना असं वाटतंय त्यांना असं वाटू द्या… पुढे काय घडेल ते येणारा काळ ठरवेलच. पण यानिमित्ताने मी इतकंच सांगेन की, या देशात आता एक महत्त्वपूर्ण घटना घडलीय. येणार्या काळात या देशात पर्यायाचं राजकारण केलं जाईल. त्यामुळे आता आपणही या सगळ्या गोष्टीला थोडा वेळ द्यायला हवा.

अनेक मोदी समर्थक तुमचेही समर्थक आहेत. त्यामुळे तुमच्या पक्षावर सतत मोदींच्याअनुषंगाने आरोप केले जातात. तुमचं मोदींविषयीचं वैयक्तिक मत काय आहे?

– मी त्यांच्याबाबत का विचार करू? मला त्यांच्या विचारधारेशी काहीही घेणंदेणं नाही. तुम्ही जे म्हणता की, ते तोडण्याचं राजकारण करतात, धार्मिक तेढ निर्माण करतात… तुमच्या या मताशी मी संपूर्णतः सहमत आहे. त्यामुळे मला मोदींविषयी विचार करण्याची आवश्यकता वाटत नाही. मला या देशातील जनतेविषयी विचार करायचाय. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा विचार करायचाय.

निवडणुकांच्या प्रचारादरम्यान तुमचा पक्ष आरएसएसशी संबंधित आहे, असा सतत आरोप केला गेला आणि म्हणूनच मुस्लीम समाजाचे लोक तुमच्यासोबत जोडले जात नाहीत, असंही म्हटलं गेलं. यात कितपत तथ्य आहे?

– भाजपवाले म्हणतात आम्ही काँग्रेसचे एजंट आहोत आणि काँग्रेसवाले म्हणतात आम्ही भाजपचे एजंट आहोत… तर काही जण म्हणाले आम्ही कॉर्पोरेट्सवाल्यांचे एजंट आहोत. पण असे आरोप करणार्या त्या सर्वांना सांगू इच्छितो की, आम्ही आम आदमीचे एजंट आहोत.

या निवडणुकांचे निकाल तुम्ही नीट पहा… जागेच्या संख्यांवर जाऊ नका. पण आजचं जे जनमत आहे ते या दोन्ही प्रमुख पक्षांच्याविरोधात आहे. त्यामुळे या निवडणुकीत लोकांनी यांच्याविरोधातच मतदान केलंय. मुसलमानांना काँग्रेसचं व्होटबँक मानलं जातं तर वाल्मिकी समाजाला भाजपचं. पण या दोन्ही समाजातील मतदारांनी आम आदमी पक्षाला मतदान केलंय. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या पारंपरिक व्होटबँकही या निवडणुकीत उद्ध्वस्त झाल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *