महापरिनिर्वाणदिनी पुन्हा सारे चैत्यभूमीवर एकत्र येतील. सारे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था पुन्हा ऐक्याच्या आणाभाका खातील. एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हातांनी व्ही दाखवत विजयाची आशा पुन्हा निर्माण करतील. तिथे जमलेले लोक कदाचित परत भाबड्या आशेने विश्वास ठेवतीलदेखील. नेमकं या दिनाचं औचित्य साधून आंबेडकरी चळवळीत परत एकदा ढवळाढवळ सुरू झालेली आहे. पण आंबेडकरी तरुणाईच्या मनात चाललेलं वादळ मात्र अनेकविध मार्गांनी सोशल मीडियावर आधीच व्यक्त व्हायला लागलंय, त्यानिमित्ताने…

६ डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं तो दिन. यादिवशी देशाच्या कानाकोपर्यातून आंबेडकरी अनुयायांचा जनसागर चैत्यभूमीवर ओसंडून वाहत असतो. इथे येणारा प्रत्येक अनुयायी आपआपल्यापरिने आपल्या मनातील भावना बाबासाहेबांना आदरांजलीच्या रूपाने व्यक्त करत असतो. जोडीला असलेला भाकर-तुकडा उपरण्यात बांधून, पिशवीत मळणार नाहीत या हिशोबाने बांधून ठेवलेले पांढरे कपडे जपत प्रत्येकजण चैत्यभूमीची वाट चालत असतो ती फक्त बाबासाहेबांप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच. असा हा कृतज्ञतेचा भावनिक सोहळा विविधतेने, ज्ञानार्जनाच्या अंगानी रंगलेला असतो. दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये लागणार्या पुस्तकांच्या स्टॉल्सवर होणारी पुस्तकांची विक्रमी खरेदी-विक्री क्वचितच अन्य सोहळ्यांत होत असेल. एका अर्थाने बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या संदेशाला पूर्णत्वाकडे नेणारी ही वृत्ती या सोहळ्याची शानच वाढवत असते.

सोशल मीडियाच्या युगात महापरिनिर्वाण दिन आता फक्त चैत्यभूमी किंवा आपआपल्या परिसरातील विहारांपुरता मर्यादित राहिलेला नसून आता तो ऑनलाईनसुद्धा साजरा होताना दिसत आहे. गेल्या महिन्याभरापासूनच महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने फेसबुक, ट्विटर, ब्लॉगस्पॉट, वेबसाईट्स, पोर्ट्ल्सवर महापरिनिर्वाणदिनाच्या पोस्ट्स झळकू लागल्या आहेत. बाबासाहेबांना आदरांजली वाहणारे बॅनर्स पोस्ट होण्याचं प्रमाण वाढीस लागलं आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या कानाकोपर्यातून येणार्या सार्या अनुयायांसाठी मार्गदर्शन करणार्या मदतकेंद्रांची माहिती, त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा कुठे आणि कशा मिळतील यासंदर्भात माहिती देणार्या अनेक पोस्ट टाकण्यात फेसबुक युझर्सनी कमालीचा वेग दाखवला आहे.

शिवाजी पार्कवरील सार्या सोयी-सुविधांचं नियोजन मुंबई महापालिकेकडून करण्यात येतं. महापालिकेकडून छापण्यात येणारे पोस्टर्स, भित्तीपत्रकं आधीच सर्वांपर्यंत पोचवण्याचं काम सोशल मीडियाच्या युझर्सकडून होत आहे. मुंबईत आल्यानंतर कुठे जावं, कोणत्या रस्त्यावरून गेल्यावर सोईस्कर पडेल, कोणते मार्ग कसे ओळखावेत यासंदर्भातील नकाशे आणि त्यांच्या इमेजेससुद्धा आपल्याला फेसबुकच्या अनेक ग्रुप्सवर पहायला मिळतील. फेसबुकवर कार्यरत असलेल्या अनेक ग्रुप्सनी मेसेज सर्व्हिसद्वारे प्रथमच चैत्यभूमीला येणार्या व्यक्तिला वैयक्तिक पातळीवर मदत पोचवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे. कारण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून फेसबुक, गुगल प्लससारख्या वेब प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी व्हर्चुअल ओळखी जपणार्या अनेक सहकार्यांची प्रत्यक्ष भेट ही चैत्यभूमीवरच होत आहे.

येत्या महापरिनिर्वाणदिनी कोणकोणते प्रकाशक शिवाजी पार्कवर स्टॉल्स लावणार आहेत, त्यांची व्यवस्था आणि स्टॉल लावण्याचं ठिकाण, प्रत्येक प्रकाशकाकडे नव्याने प्रकाशित झालेली पुस्तकं, जुन्या पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या, आंबेडकरी चळवळीतील लेखक, कवी, कलावंत आपल्याला कुठे आणि कोणत्या स्टॉलवर भेटू शकतील, गर्व्हमेंट प्रेसकडून प्रकाशित होणारं साहित्य, खंड कुठे, कधी, किती वाजता आणि किती किमतीत मिळतील याची सारी माहिती देणार्या पोस्ट्स, त्यासंदर्भात विचारले गेलेले प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून वाचनात येत आहेत. सोशल मीडियावर अशा प्रकारचा ट्रेंड पहिल्यांदा एखाद्या सामाजिक घटनेसंदर्भात रुजताना दिसून येत आहे. ही निश्चितच कौतुकास पात्र ठरणारी गोष्ट म्हणावी लागेल.

एका ठिकाणी ६ डिसेंबरच्या निमित्ताने अनेक सकारात्मक कामं होताना आपण पाहत असलो तरी या प्रकरणाला नकारात्मकतेची झालर असलेली दुसरी बाजूदेखील तितकीच चिंताग्रस्त करणारी आहे. दादर शिवाजी पार्क परिसरात राहणार्या आणि त्या परिसरात नेहमीचा राबता असणार्या अनेक फेसबुक युझर्सकडून मात्र फारच विरोधी प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत. याआधीही त्या मिळत होत्याच. फरक इतकाच की आधी त्या छापील माध्यमांत व्यक्त होत असल्याने भाषेचा बाज जरा मवाळ असायचा परंतु आता सेन्सॉरलेस माध्यमांत मात्र त्या अतिशय अश्लाघ्य स्वरूपात व्यक्त होत आहेत. ६ डिसेंबरचा दिवस म्हणजे ४ डिसेंबर ते ७ डिसेंबर अशी लादली गेलेली सुट्टी, भयानक ट्रॅफिक डिजास्टर, शिवाजी पार्क घाण करण्याचा हक्काचा दिवस, सरकारने दलितांना दिलेली शक्तिप्रदर्शनाची फुकट संधी वगैरे वगैरेसारख्या मथळ्यांच्या अनेक पोस्ट्स दरवर्षी वाचायला मिळत असतातच.

सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा त्यांचा अधिकार आपण कधीही नाकारू शकत नाही. पण त्यांच्या व्यक्त होण्याच्या प्रकाराला आणि त्यातील जातीय विद्वेषाचा निषेध मात्र जरूर व्हायलाच हवा. ६ डिसेंबरला जमणारी गर्दी कोणत्याही प्रकारचं शक्तिप्रदर्शन करायला जमलेली गर्दी नसते. गेल्या ५७ वर्षांपासून अथकपणे आपल्या उद्धारकर्त्याला आदरांजली वाहायला येणारा लीडरलेस मॉब हा कोणतं शक्तिप्रदर्शन करण्यास तिथे येत असेल या प्रश्नाचं उत्तर ज्याने त्याने आपापल्या बौद्धिक कुवतीनुसारच शोधलेलं बरं.

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळीच्या राजकीय नेतृत्वावर नव्याने चर्चा घडत आहे. नेमीची येतो पावसाळा या उक्तिप्रमाणे घडणार्या या चर्चांमध्ये नवं असं काहीच नाही. रिपाई म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बाबासाहेबांच्या संकल्पनेतील असून बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपाईची स्थापना करण्यात आली होती. कालपरत्वे दलित ही स्थितीवाचक संकल्पना जातिदर्शक होऊन बसली आणि दलित म्हणजे केवळ नवबौद्ध इतका संकुचित अर्थबोध त्या शब्दाला जोडला गेला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा फक्त दलितांचा पक्ष म्हणून ब्रँडिग करण्यात विरोधकांनी आणि तत्कालीन स्वार्थी नेतृत्वाने कोणतीच कसूर सोडली नाही. सोशल मीडियावर जेव्हा प्रश्न आंबेडकरी राजकीय चळवळीचा येतो तेव्हा सारेच जण टीकाकाराच्या भूमिकेत शिरतात. नेमकी अशी ठाम भूमिका घेणं कोणालाही जमत नाही. शिव्यांची लाखोली वाहणं आणि बोटं मोडणं, नेत्यांवर टीका करणं आणि आपल्याला आवडणार्या एका ठरावीक गटाच्या नेत्याची बाजू अलगदपणे लावून धरणं म्हणजेच दलित चळवळीच्या राजकीय अंगाची समीक्षा करणं असा काहीसा गोड गैरसमज सध्याच्या नेटीझन्समध्ये आपल्याला सर्रास आढळून येताना दिसत आहे.

६ डिसेंबर तशी कॅलेंडरमधील एक साधीशी तारीख. दिवसामागून येणारा एक साधासा दिवसच. पण इतिहासात या दिवसाने अनेक खूणगाठी आपल्या उदरात बांधून ठेवल्या आहेत. अशा घटनांच्या खूणगाठी ज्या २१ व्या शतकातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समीकरणांना पूर्णपणे बदलणार्या ठरल्या आहेत. ६ डिसेंबर १९९२ रोजी घडलेल्या बाबरी विध्वंसानंतर उसळलेल्या दंगलींनी देशभरात रक्ताचे पाट वाहताना पाहिलेत. त्याच्या जखमा आजही अधूनमधून त्रास देताना आपण पाहतच असतो. ६ डिसेंबर १९५६ साली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर पोरका झालेला भारतातील सारा शोषित वर्ग आजही पोरकाच राहिलेला आहे. दोन्ही घटनांमध्ये जवळपास ३६ वर्षांचं अंतर परंतु या दोन्ही घटनांचा सर्वात जास्त फटका सोसलेले या देशातील तमाम मागासवर्ग आणि अल्पसंख्याक आजही त्यांचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष एन. शिवराज यांनी एक वाक्य म्हटलं होतं, Dead Ambedkar is more dangerous than Alive… डॉ. बाबासाहेबांचे विचार आज बाबासाहेबांच्या हयातीनंतरही फार प्रखरतेने पसरताना आपण अनुभवत आहोत. स्वातंत्र्यापेक्षा काहीच उच्च नाही, गुलामीपेक्षा काही नीचतम नाही. स्वातंत्र्याचा आस्वाद घेणं ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. बाबासाहेबांच्या चळवळीने बहुजन समाजाला विचारस्वातंत्र्य दिलं. सोशल मीडियासारख्या सेन्सॉरलेस माध्यमाची जोड मिळाल्यामुळे हे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आवश्यक असलेली माध्यमसुलभतादेखील मिळाली. विचारशक्तिच्या जोरावर सुशिक्षित तरुणाने स्वतःची ओळख ‘आंबेडकरी तरुण’ म्हणून प्रस्थापित करण्याचा जो चंग बांधला आहे तीच बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *