मराठी चित्रपटात एक गाणं पडछाया का पाठलाग किंवा दुसर्या कुठल्यातरी सिनेमातलं ते गाणं, अगदी आजही प्रसिद्ध आहे.

त्याच्या ओळी अशा आहेत. ‘ऐन दुपारी, यमुना तिरी, खोडी उगी काढली आणि बाई माझी करंगळी मोडली…

भगवान श्रीकृष्णाने काढलेल्या खोडीबद्दल एका गवळणीची ही लाडिक सांगीतिक तक्रार आशा भोसलेंच्या आवाजाने अधिक अर्थपूर्ण केलीय…

प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या हिंदू संस्कृतितील दोन आदर्श पुरुष देव! हरे राम, हरे कृष्ण असं त्यांचं एकत्रित नामस्मरण केलं जातं. पण या दोन्ही पुरुषोत्तमात एक मूलभूत फरक आहे. प्रभू रामचंद्र हे एक पत्नीवृत्ती मर्यादा पुरुषोत्तम तर कृष्ण सोळा सहस्र गवळणींचा नाथ! तरीही हिंदू समाजमनाने, धार्मिक संस्काराने त्यांना एकत्रच पूजलं. आजच्या काळातल्या परस्परविरोधी पक्षांनी सत्तेसाठी एकत्र यावं आणि सहमतीने सरकार चालवावं, याची ती आध्यात्मिक सुरुवात असावी!

तर प्रभू रामचंद्र हे चारित्र्यावर डाग चालवून घेणारे नसल्याने, एका धोब्याच्या संशयावरून/शंकेवरून त्यांनी पत्नी सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली. रामायणातला हा धोबी आजच्या माहितीच्या अधिकाराचा वापर करणार्या कार्यकर्त्याचा पूर्वज असावा.

भगवान श्रीकृष्ण यांचं आत्मचरित्र हे त्यांच्या जन्मापासूनच अनेक घटनांनी उत्कंठावर्धक आहे. जे भगवद्गीतेची निर्मिती करून एका उंचीवर जातं आणि द्वारका बुडाली या शोकात्म शेवटावर संपतं. भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील सर्वांचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होते. प्रत्यक्ष युद्धात त्यांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं! असा उज्ज्वल धर्मइतिहास असणार्या आपल्या देशात आजचं नेतृत्व सैनिकांना मैदानात पाठवतं आणि स्वतः उडनखटोल्यातून मार्गदर्शन करतात!

पण या सगळ्या बाकीच्या फाफट पसार्यात न जाता आपण भगवान श्रीकृष्णाच्या बालक्रीडा आणि रासलीला एवढ्यापुरतं सीमित ठेवू. भगवान लहान असल्यापासूनच त्यांना समवयीन मुलींऐवजी वयात आलेल्या तरुण मुलींची खोडी काढायची खोडी होती!

गोकुळातल्या त्या गवळणी छोट्या श्रीकृष्णाच्या सर्व खोड्या गोड मानून घेत. तो दगडाने त्यांचे दही, दुधाचे मडके फोड, अंघोळीला नदीत शिरल्या असताना त्यांची वस्त्रं पळव अशा सर्वसाधारण खोड्या असतं. त्या यशोदेकडे तक्रार करत पण लाडिक! आजच्या पालकांप्रमाणे तुमच्या पोर्याला आवरा वगैरे आवाज चढवून अथवा प्रसंगी कानफटवून तक्रार करत नसत. कारण त्यात ‘भगवान’ आहेत याची त्यांना जाणीव होती. वयात आल्यावर राधा, मीरा, सुभद्रा अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये बसतील अशा ‘सख्या’ केल्या. एकाच वेळी पत्नी, मैत्रीण आणि भक्तिभाव यांचा त्रिवेणी संगम केला. त्यामुळे भारतीय पुरुषांनी घरी श्रीराम आणि बाहेर श्रीकृष्ण अशी सोयीची विभागणी स्वतःच करून घेतली!

त्यामुळे काय झालं आजही अगदी तरुण तेजपालपर्यंतच्या पुरुषांनी आपली कृष्ण प्रतिमा आत कुठेतरी जपून ठेवलीय! एकदा का माणूस म्हणजे पुरुष, आपल्या क्षेत्रात एका उंचीवर गेला की, त्याला आपण ‘भगवान’ झाल्याचा साक्षात्कार होतो. आणि मग आता आपण रासलीला खेळण्यास एलिजेबल झालो असं तो स्वतःच ठरवतो. सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती, भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय पत्रकारितेतील स्टिंग प्रणेते तरुण तेजपाल या तिघांवर लैंगिक शोषणाचे आरोप होताहेत. यात नरेंद्र मोदी यांच्यावर तसा थेट आरोप नाही पण आपलं जिथे ‘लक्ष’ आहे तिथे आणि कुणाकुणाचं ‘लक्ष’ आहे, त्यावर लक्ष ठेवून असणं अशी साधारण तारुण्यसुलभ युवक युवतींची ‘पझेसिव्हनेस’ची पातळी मोदी आणि त्यांच्या सहकार्यांनी गाठली असा आरोप होतोय.

मोदी हे अविवाहित आहेत असा सर्वसाधारण समज आहे. परंतु त्यांचं लग्न झालेलं असून, तो विवाह असफल झाला. वेगळी झालेली त्यांची पत्नी गुजरातमध्येच शिक्षिका आहे. याआधी अटलबिहारी वाजपेयी हे ब्रह्मचारी गृहस्थ राजकारणात शीर्षस्थानी होते पण त्यांनी स्वतःच मी ब्रह्मचारी नाही तर अविवाहित आहे असं मोकळेपणी सांगून टाकलं.

तर पदाचा गैरवापर करून, सोबत काम करणार्या अथवा ओळखीच्या स्त्रिशी असभ्य वर्तनाचा ठपका (मोदी वगळता) इतर दोघांवर आहे. यातला गमतीचा भाग असा न्यायमूर्ती आणि पत्रकार या दोघांबद्दलची तक्रार आल्यानंतरही त्यांच्या आस्थापनांनी गोकुळच्या गवळणींसारखी प्रगल्भ भूमिका घेत या ‘खोडी’बद्दल गवगवा करण्यासारखं काही नसून, चौकशी करून या आधुनिक छोट्या बालकृष्णांना ऊखळीला बांधून ठेवण्यासारखी शिक्षा करू असं खूप शांतपणे समजावणीच्या सुरात सार्या जगाला सांगितलं!

आपला समाज अधिक उत्क्रांत, प्रगल्भ आणि सिव्हिलाईज्ड होत गेला तसा तो विनाकारण नैतिक/अनैतिक फंदात पडत गेला! आता फॉर एक्झाम्पल गोकुळातल्या गवळणी रोज मथुरेच्या बाजाराला जात. म्हणजे, त्या वर्किंग वुमनच झाल्या. अशा या गवळणींना भर बाजारात कृष्ण अडवी, छेड काढी, नाचायला लावी पण याला कोणी तेव्हा ‘हॅरेसमेंट अॅट वर्किंग प्लेस’ म्हणत नसत. किंवा हात धरून जवळ खेचली तर ‘अटेम्प्ट टू रेप’ असं कलम लागत नसे! आता वर्किंग वुमन दह्यादुधाच्या होलसेल विक्रीपासून हर प्रकारच्या कामात आहेत. त्यामुळे सख्या हरि साहेबांना या भरल्या गोकुळात गवळणींची छेड काढाविशी वाटली तर आपण त्याकडे रिलिजियस मेल डीएनए म्हणून पाहिलं पाहिजे! भारतीय पुरुष हा ‘राम’ असू शकतो अथवा ‘कृष्ण’. मग रामप्रवृत्तीचं आपण जसं स्वागत आणि कौतुक करतो तद्वतच ‘कृष्ण’ प्रवृत्तीही समजून घेतली पाहिजे. हे जेनेटिक ‘तहलका’च्या संपादक शोमा यांनी समजून घेतलं. तरुण तेजपाल यांचा लौकिक बघता, त्यांच्यातला कृष्ण जागा झाला तर आपण समजून घेतलं पाहिजे! कदाचित असं झालं असेल आधी दिवसभर ‘गीता’ सांगून झाल्यावर त्यांना रात्री थोडी रासलीला कराविशी वाटली असेल तर त्याकडे आजच्या भाषेतल्या ‘आय नीड अ बे्रक’ इतक्या साधेपणाने पाहिलं पाहिजे.

पण हल्ली काय झालंय, जरा पुरुष जवळ आला की मार बोंब नी कर त्याला बंद असं या वर्किंग/नॉनवर्किंग बायकांनी ठरवूनच टाकलंय. गोकुळातल्या अशिक्षित गवळणींची लैंगिक समज या हायली

एज्युकेटेड, इंडिपेंडंट स्त्रियांत नाही! बरं त्या याही विसरतात की विश्वामित्रासारख्या हायली इंटेलेक्च्युअल विद्वानाची तपश्चर्या निव्वळ देह हेच भांडवल असणार्या मेनकेने तोडली तेव्हा विश्वामित्रांनी काय केलं? करणार काय बिचारे? मोहाला बळी पडले! साक्षात व्हिक्टीम झाले! आता यात दिवस मेनकेला गेले ही बायोलॉजिकल अडचण होती! त्यामुळे मोहाला बळी पडलो तसं पितृत्वाला बळी कशाला पडा? असा विचार करून ते गेले निघून तपश्चर्येला! त्यांच्या तपश्चर्येत बाधा आणल्याबद्दल त्यांनी मेनकेला दोषी न धरता ‘मोहाला’ दोषी धरलं! हे विश्वामित्री धोरण आज ते न्यायमूर्ती आणि तरुण तेजपाल पुढे नेताहेत!

विश्वामित्रांना मोहात पाडून मेनकेला, स्वर्गात ‘महाअप्सरा’ बनायचं असेल! आणि असं काहीतरी मिळवण्यासाठी मेनकेच्या आजच्या वंशज ‘मोहाचं जाळं’ फेकतात आणि कार्यभाग साधून घेतात. त्यातून कार्य होऊन पुढचा भाग मिळाला नाही की त्या आरडाओरड करतात असं मधुर भांडारकर, शायनी आहुजा ते तरुण तेजपाल यांचा प्रामाणिक दावा आहे!

आता तर सर्व पुरुषांचं (ते ‘मावा’ वगैरे संस्था चालवणारे आणि काही स्त्रीमुक्तीवादी नरपुंगव सोडले तर) म्हणणं आहे, स्वसंरक्षणार्थ मिळालेल्या कायद्याचा आता बायका दुरुपयोग करताहेत!

म्हणजे पूर्वी पुरुष बलात्कार करून बाईला आयुष्यातून उठवत असे. आता बाई बलात्काराची तक्रार करून पुरुषाला आयुष्यातून उठवते. उत्क्रांत आणि विकसित, शिक्षित समाजात बाई ‘शरीर’ हे माध्यम वापरते असा आरोप आता उच्चरवात होऊ लागलाय!

दलित अत्याचार विरोधी अॅट्रोसिटी अॅक्टचा दुरुपयोग केला जातो, माहिती अधिकाराचा दुरुपयोग केला जातो तसाच दुरुपयोग स्त्रियांसंबंधी नव्याने बनवलेल्या कायद्यांचा होतो आहे अशा तक्रारी वाढताहेत!

आता हे सगळं बोलत असताना आपल्या समाजाचं आजही सर्वसाधारण वर्तन जातीय, धर्मांध आणि स्त्रिला भोगवस्तू मानणारं असतं.

कार्यालयातल्या पुरुष सहकार्याला घरची भाजी आणायला सांगण्यापासून मुलींना शाळेत सोड अशी कामं सांगणारे अधिकारी, हाताखालच्या स्त्रिला जेवण बनवून आणा, दळण आणा असं सांगण्यापेक्षा बहुतांश वेळा शरीरसुखाची मागणी करतात. ती पूर्ण झाली नाही की आधी छोटे-मोठे स्पर्श, मग अश्लील बोलणं, मोबाईलवर क्लिप पाठवणं असे प्रकार सुरू होतात.

नियमाला अपवाद असतात पण अपवादालाच नियम करून आपली पुरुषप्रधान संस्कृती टिकवण्याचा बेशरम आटापिटा आजचा पुरुष करतो तेव्हा त्याला आजही स्त्री कळलेली नाही असंच म्हणावं लागेल.

आजही तो स्त्रिकडे ‘शरीर’ म्हणूनच बघत असेल तर हा त्याच्या मेंदूतला मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे असं म्हणावं लागेल. स्त्री शरीराकडे येनकेनप्रकारे झेपावणार्या पुरुषाला करंगळी मोडली या गाण्यात मध्येच थांबून एक गद्य वाक्य येतं, तेच वाक्य जरा वेगळ्या सुरात सांगायची गरज आहे.

(ते वाक्य आहे – अंगाला हात लावायचं कारण (च) काय?!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *