‘आम्ही माडिया’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती हातोहात खपली होती. सध्याचा नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली, तालुका भामरागड गाव कुडकेल्ली येथील कथा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. या भागातील डुकराच्या आणि रानटी अस्वलांच्या शिकारी करत, मोहाची दारू गाळत आणि आदिवासी नाच करत एक मुलगा शिकत जातो. पुढे पदवीधर होऊन पुण्याच्या र्कोपोरेट जगतात नोकरीला लागतो. तो मधुकर रामटेके हा या पुस्तकाचा लेखक आहे. लेखकाच्या मिस्कील, वर्णनात्मक, खुसखुशीत तरी संवेदनशील अशा शैलीने ‘आम्ही माडिया’ हे पुस्तक वाचनीय बनलं आहे.

पुस्तकाची सुरुवातच शिकारीच्या प्रसंगाने होते. दुष्काळ पडला आहे. पोटासाठी हाल सुरू आहेत. आदिवासींच्या देवीने पाऊस पाडावा म्हणून तिला शिकारीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तिला एकट्या दुकट्याने केलेली शिकार चालत नाही. अख्खा गाव जमतो. तीर, कामठे, भाले, कुर्हाडी, दोर्या, जाळी- बायकापोरं, अबालवृद्ध सारे सज्ज होतात. शिकारीचा प्लान बनतोय. जाळी कुठं लावायची? हाकारे देत प्राणी हाकलत आवाज करत गर्दी पुढे सरकतीय. भाल्याच्या टप्प्यात सावज घ्यायला जाळीजवळ दबा धरला गेला आहे. देवीला नैवेद्य मिळणार का? की बिनधार्मिक उपासाचा भोग तसाच चालू रहाणार?

पुस्तकात अशाप्रकारच्या अनेक शिकारीच्या प्रसंगांची रेलचेल आहे. अस्वल हा प्राणी चक्रम असतो. केवळ मजेखातर तो माणसाला हालहाल करून मारू शकतो. एका मुक्या नावाड्याला रानटी अस्वल भिडतं. त्याला पळून जाता येत नाही, लपण्यासाठी झाडावर चढायला वेळ नाही. मुका नावाडी ओरडून हाळी देऊन कोणाला मदतीलाही बोलावू शकत नाही. मुका पटकन एका झाडामागे लपतो. अस्वल दुसर्या बाजूने झाडाला मिठी मारतो. मुका नावाडी झटकन रानटी अस्वलाची दोन्ही मनगटं पकडतो आणि विरुद्ध बाजूने दणक्यात जोर लावून अस्वलाचं थोबाड झाडाच्या बुंध्यावर आदळतो. अनेकदा असंच करतो. अस्वलाच्या शिकारीची ही अतिशय सुंदर कथा या पुस्तकात आहे. अशा अनेक शिकारकथा या पुस्तकात आहेत. स्वतः लेखकाच्या जीवावर बेतलेल्याही अनेक शिकारी आहेत.

केवळ चक्रमपणा म्हणून हत्या करणारं अस्वल आणि पोटासाठी शिकार करणारे आदिवासी यात फरक आहे. पोटासाठी वणवण अशा नावाचं दुसरं प्रकरण या पुस्तकात आहे. भात, कोवळा बांबू, लाल मुंग्याची चटणी आणि मिळाले तर मासे हा त्यांचा रोजचा आहार. पावसाळ्यात पूर आणि दर दोन वर्षाआड कोरडा दुष्काळ त्यांच्या नशिबी येतो. या सगळ्या परिस्थितीमुळे अस्वलाचं थोबाड फोडण्याची ताकद त्यांच्यात आपोआप येते. अन्नासाठीचे कष्ट हातभार लावतातच पण दुबळ्यांना निसर्ग लहानपणीच मारून टाकतो. उरतात ती चिवट माणसं, बालमृत्यू. लेखकाच्या आप्तजनांचे मृत्यू घडतात त्याचंही वर्णन या पुस्तकात तटस्थपणे येतं.

पण लेखकाची माणुसकी आणि संवेदनशीलता पुनःपुन्हा प्रत्ययाला येत राहते. आदिवासी कुटुंबांच्या चालीरितींचं ओघवतं वर्णन पुस्तकात येत राहतं. तिथे लग्नाआधी शरीर संबंध ठेवणं शिष्टसंमत आहे. तरुण मुलामुलींना समूहनृत्याची जरा मोकळीक मिळावी आणि नंतर ‘रानात’ जाता यावं. म्हणून लवकर निघून जाणारे (अमेरिकन प्रागतिक!) आई बाप आहेत. घरी आलेल्या पाहुण्याला आदराने मोहाची दारू ऑफर करणारे यजमान आहेत. तशा आदिवासींच्या श्रद्धाअंधश्रद्धादेखील आहेत. हे पुस्तक वाचकाला आदिवासी सणवार, उत्सव, त्यांच्या दंतकथा, जलपर्या, मत्स्यकन्या, सर्पकन्या, ड्रेकुला – व्हेम्पायरप्रमाणे वाघाची मुंडकी (मधून – मधून) धारण करणारे रक्तपिपासू मानव वगैरेच्या जादुई हरी पाटील दुनियेत घेऊन जातं. पण वास्तवात कोणालातरी असा ड्रेक्युला ठरवून गावाकडून त्याची होणारी हत्याही या पुस्तकात येते.

पुस्तकात मामाच्या घरी केलेली लग्नाची जबरदस्ती आहे. ती सामाजिक प्रथा म्हणून आदिवासींनी स्वीकारली आहे. लग्न झालेल्या स्त्रिने पोलका घालायचा नाही. उघडंच फिरायचं आणि त्यासाठीचा पोलका उतरवणं- हा आदिवासी धार्मिक विधीही आहे. पण त्याविरुद्ध आवाज उठवून लग्नानंतर पोलकं घालणारी लेखकाची बालमैत्रिणही आहे आणि तिच्या फॉलोवर बनणार्या समस्त गावकरी स्त्रियाही आहेत. १९८०च्या दशकापासून त्या आदिवासी जगतात झालेले बदल लेखकाने टिपले आहेत.

सगळ्या पुस्तकात कुठेही अतिरंजित शैली नाही. शहरी वाचकाला अद्भुत वाटणार्या गोष्टी वास्तवातच घडत आहेत. शिकारीचा थरार तुम्हाआम्हाला तर… कोणासाठी… ते अन्नार्जन आहे. दिखाऊ योनिशुचिता आणि व्यसनमुक्तिच्या शहरी नैतिकतेपेक्षा वेगळी संस्कृती पहायची असेल तर पुस्तक वाचायला हवं. सुसंस्कृतपणाचं मापदंड ढवळून टाकणं वगैरे राणा भीमदेवी भाषा पुस्तकात नाही पुस्तकात फक्त वर्णन आहे नक्षलवाद्यांचं, पोलिसांचं, माणसाला ओढून नेणार्या सर्पकन्यांचं, लाल मुंगीच्या चटकदार चटणीचं, रानात रस्ता चुकून चकवा लावणार्या विशिष्ट वनस्पतींचं, तेंदुच्या पानांचं आणि व्यावसायिक कंत्राटदारांचं फक्त वर्णन… रसरशीत वर्णन… पुस्तकात धडपडून आणि दारू विकून शिक्षणासाठी पैसे जोडणारी तरुण आदिवासी मुलं-मुली दिसतात आणि शहरातला पैसा सोडून आदिवासींसाठी दवाखाना चालवणार्या प्रकाश आमटे या डागदारीचेही उल्लेख येतात.

डागदारी म्हणजे आदिवासी भाषेत डॉक्टर. कुणी दारू पिऊन मस्त गाणी गातो म्हणून त्याचं नाव रेडिओ-हा रेडिओ वस्तीचा मुखिया आहे आणि रेडिओ याच नावाने ओळखला जातो. कुणी लहानपणी हरवलेला माणूस आदिवासी भाषेत ‘बेपत्ता’ म्हणून ओळखला जातो आणि थापाड्या आणि भुयारासारख्या पोकळ बाता मारणार्याचं नाव ‘भूयाराम’ म्हणून रूढ होतं. तिथे सणाला पुजारी बैल कापायला सांगतो आणि देवीला दारूही लागतेच.

अशी मस्त दुनिया लेखक मिस्कील भाषेत वर्णन करत राहतो. त्यावर फारशी मतं मांडत नाही. पण गाणार्याला रेडिओ नाव पडलं होतं तसं लेखकाच्या डेंबिस आणि बदमाश (पान क्र. ११ ) मिस्कीलीवर त्याला लहानपणी कोणतं नाव पडलं होतं ते मात्र शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहतं.

 डॉ. अभिराम दीक्षित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *