आम आदमी पक्ष अर्थात आप याच्या दिल्लीतील यशाची चर्चा संपता संपत नाहीये. टीव्ही, वर्तमानपत्र, सोशल मीडिया यावर हा विषय भरून राहिलाय. काँगे्रस, भाजप आणि इतर प्रस्थापित पक्षही ‘आप’ने दिलेल्या धक्क्यातून अद्यापि सावरलेले नाहीयेत. थोड्यावेळात मोठा पल्ला पार करणार्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा गवगवा होणं साहजिकच आहे. सगळ्यांनीच या पक्षाची तशी दखल घेतली नव्हती. आपली किती मोठी चूक झालीय हे आता या पक्षांच्या लक्षात आलंय. केजरीवाल यांच्या या यशाने एकाचवेळी अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. यामुळेच सगळे पक्ष सावध न झाले तर नवल. आगामी २०१४ च्या निवडणुकांना सामोरं जाताना या देशातील मतदार काय विचार करतोय याचा विचार या पक्षांना करावा लागणार आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. तीन राज्यांत भाजपला निर्विवाद बहुमत मिळालंय. पण तरीही दिल्लीतील वातावरणाने पक्षनेते चिंतित दिसत आहेत. तर काँगे्रसची अवस्था बिकटच झाली आहे. दारुण पराभव झाला आणि काय झालं ते कळलंदेखील नाही. म्हणूनच या पक्षाची दयनीय अशी परिस्थिती झालेली आहे.

केजरीवाल यांच्या यशाने सगळ्यांनाच झाडूचा फटकारा बसला आहे. खरंतर ‘आप’च्या या यशाने भारतीय राजकारणाला वेगळी कलाटणी मिळेल का? आता जी बजबजपुरी आहे ती बदलेल का अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्ष नवा आहे आणि त्याची पद्धतही नवी आहे. त्यामुळे ही नवलाई किती टिकणार याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणुकीला सामोरं जाताना पैसा हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो. ‘आप’ने या निवडणुकीसाठी जो निधी उभा केला तेही वैशिष्ट्यपूर्ण होतं. साधारण ७० उमेदवारांसाठी २० कोटी रुपये या पक्षाने निधीद्वारे जमवले. ‘आप’च्या वेबसाईटवरून तरी असं दिसतंय की या पक्षाला २१०१० एवढ्या लोकांनी निधी दिला आहे. यातील १४ कोटी रुपये हे देशातील लोकांनी दिले, तर अमेरिकेतून २ कोटी १७ लाख, दीड कोटी हाँगकाँगमधून, ६२ लाख हे आखाती देशातून, ५८ लाख सिंगापूरमधून, तर ३८ लाख युरोपातून जमा झाले आहेत. याचा अर्थ देशविदेशातील लोक ‘आप’च्या मदतीला धावून आले. एका नव्या पक्षासाठी एवढी मदत येणं ही विशेष बाब आहे. त्याचबरोबर या लोकांनी ‘आप’वर विश्वास दाखवला हेही महत्त्वाचं आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर ‘आप’ या पक्षाने सर्वांपुढे एक आव्हान उभं केलं आहे. खरंतर भाजप हा पक्ष केंद्रात सत्ता काबीज करण्यासाठी निघाला आहे. अगतिकता इतकी आहे की मोदींनी पंतप्रधानपदाची केवळ शपथ घेण्याची औपचारिकताच तेवढी बाकी राहिलीय असा अविर्भाव या पक्षाच्या पदाधिकार्यांच्या चेहर्यावर आहे. मधल्या काळात मोदी यांच्या धडाक्याने सभा सुरू झाल्या. सभेसाठी प्रवेश फी आकारली जाऊ लागली एवढी मोदीलाट सुरू झाली. सभेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकांमधील चर्चा यामुळे मोदींनी सगळ्यांना आपल्या प्रभावाखाली आणलं. पण या तीन राज्यांच्या निकालाने मोदींना त्याचं श्रेय देणं हे भाजपच्या स्थानिक नेत्यांवर अन्यायकारक होईल यात शंका नाही. दिल्लीत तर मोदी अजिबात चालले नाहीत हे उघडच आहे. जिथे जिथे मोदींनी सभा घेतल्या तिथे तिथे भाजपचे उमेदवार पडले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या निकालानंतर मोदीज्वर काहीसा कमी झाल्याचंही दिसतंय.

काँगे्रसच्या दैन्यावस्थेला हाच पक्ष कारणीभूत ठरला आहे. मात्र ‘आप’पक्षामुळे मायावतींचा बहुजन समाज पक्ष हलून गेला आहे. दिल्लीतील सगळा मेहतर, मागास समाज हा ‘आप’च्या मागे उभा राहिला हे निकालावरून दिसतंय. ‘आप’ने निवडलेलं झाडू हे चिन्ह याबाबत कामी आलं. केजरीवाल यांनी जातीय समीकरण बरोबर लक्षात घेऊन १४ टक्के लोकसंख्या असलेल्या मेहतर समाजाला विश्वास दिला. पहिली सभा या समाजाचं प्राबल्य असलेल्या भागात त्यांनी घेतली. सर्व जाती-धर्माचे, शिकलेसवरलेले लोक हातात झाडू घेऊन नाचतायत हे चित्र या समाजाला चकित करणार नाही तरच नवल. झाडूला आजवर एवढी प्रतिष्ठा कधीच मिळाली नव्हती. यामुळेच ‘आप’चं आव्हान कसं आहे हे बसपने ओळखलंय. ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ‘आप’ची मंडळी आली होती, त्यांनी स्टॉलही लावला होता. मात्र या स्टॉलला आक्षेप घेत होते ते बसपचे कार्यकर्ते.

काही असो, दिल्लीतील सत्ता मिळाली नसली तरी ‘आप’ने अपेक्षा वाढवल्या आहेत. खरंतर अरविंद केजरीवाल यांच्याबाबत खूप लोकांचे आक्षेप आहेत. भ्रष्टाचार हा मुख्य मुद्दा त्यांनी केलेला असला तरी इतर कोणते विषय त्यांच्या अजेंड्यावर आहेत तेही स्पष्ट होईलच. भारतीय घटना, सामाजिक न्याय याविषयीची त्यांची काय मतं आहेत याबाबतचीही उत्सुकता व्यक्तहोतेय. विजयासोबतच आलेल्या जबाबदारीचं भान ठेवून ‘आप’ला आपण कसे खास आहोत हे दाखवून द्यावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *