आय.एम.ए. इंडियन मेडिकल असोसिएशन ही भारतातील डॉक्टरांची संघटना आहे. मुख्यतः खाजगी व्यवसाय करणार्या अॅलोपॅथी डॉक्टरांचं या संघटनेत वर्चस्व आहे. मध्यंतरी आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात भारतातील वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्ती आणि गल्लाभरू प्रथांविषयी अनेक प्रकरणं मांडली गेली. त्यामुळे देशातील डॉक्टरांच्या नीतिमत्तेविषयी अनेक प्रश्न पुढे आले. या एकाच एपिसोडमुळे डॉक्टर फार खवळले. आय.एम.एच्या सचिवांनी आमिर खानविरोधी पत्रकार परिषद घेतली होती. आमिर खानचा निषेध केला. आमिर खान याने देशातील डॉक्टरांची माफी मागावी, अन्यथा त्याच्या चित्रपटांवर आम्ही बहिष्कार टाकू अशी विनोदी वल्गनाही करण्यात आली.

या पत्रकार परिषदेत आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मुलाखतीत आय.एम.एच्या सचिव महाशयांनी आमची संघटना कशी जनतेच्या हितासाठी काम करते, वैद्यकीय व्यावसायिक कसे नीतिमान आहेत याविषयी जोरदार भाषण ठोकलं होतं.

आय.एम.ए. खरोखरच सामान्य नागरिक आणि रुग्णांच्या हितासाठी कार्यरत असेल तर त्यांच्यासमोर असं एक आव्हान सर्व नागरिकांच्या वतीने देता येईल. हे आव्हान या डॉक्टरांच्या संघटनेने स्वीकारलं तर, आय.एम.ए. आणि भारतातील सर्व डॉक्टरांची जनमानसातील प्रतिमा निश्चितच उंचावेल.

विषय असा आहे – जगभरातील डॉक्टर्स सदी, ताप, खोकला आणि फ्ल्यू या सर्वसाधारण नेहमी आढळणार्या आजारांवर औषधोपचार करत असतात. या आजारांवर असलेली औषधंही तुमच्या आमच्या माहितीची झालेली असतात. किंबहुना भारतासारख्या देशात ‘जी.पी.’ या नावाने ओळखले जाणारे जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टरांकडे येणारा रुग्णांचा मुख्य ओघ या आजारांनी त्रस्त रुग्णांचाच असतो.

सर्दी, खोकला, घसादुखी हे आजार वैद्यकीय परिभाषेत अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स म्हणून ओळखले जातात. (श्वसन संस्थेच्या वरच्या मार्गातील संसर्गाचे आजार) हे आजार विविध प्रकारच्या संसर्गामुळे होऊ शकतात. अशा संसर्गासाठी जीवाणू किंवा विषाणू कारणीभूत ठरतात. जीवाणू किंवा बॅक्टेरियांमुळे होणार्या संसर्ग झालेल्या आजारावर औषधयोजना करण्यासाठी अॅण्टिबायोटिक किंवा प्रतिजैविकांचा वापर केला जातो. तर विषाणू वर्गातील संसर्गावर परिणाम करू शकणारी औषधं उपलब्ध नाहीत. विषाणू हे अतिसूक्ष्म असतात आणि कोणत्याही मायक्रोस्कोपखाली दिसत नाहीत. सर्दी, खोकला किंवा घसादुखी यामधील सर्व प्रकारांच्या संसर्गापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त संसर्ग हे या विषाणुंमुळे-व्हायरसमुळे होतात. बर्याच विषाणुंचे संसर्ग आपोआप बरे होतात. विषाणुंचा जीवनचक्र पाच ते सहा दिवसांचा असतो. त्यामुळे असा संसर्ग आपोआप नाहीसा होतो. त्यासाठी औषधाची गरज नसते. डॉक्टरांमध्ये असं विनोदाने म्हटलं जातं की, ‘बहुतेक सर्दी-पडसं सहा-सात दिवसांत बरं होतं कधीकधी एक आठवडा लागतो इतकंच!’ तर या विषाणुंमुळे झालेल्या संसर्गांवर प्रतिजैविकं किंवा अॅण्टिबायोटिक्सचा काहीही परिणाम होत नाही. मात्र जी.पी. किंवा जनरल प्रॅक्टिशनर्स एखाद्या रुग्णाचा संसर्ग बॅक्टोरियल इन्फेक्शन आहे का, व्हायरल इन्फेक्शन आहे, याचा पुरेसा तपास न करता रुग्णाला अॅण्टिबायोटिक्स वर्गातील औषधं देऊन टाकतात. यामागे अनेक कारणं आहेत. पण विषाणू किंवा व्हायरस संसर्गावर अॅण्टिबायोटिक्स देणं ही धादांत चुकीची औषधयोजना आहे. रुग्णाला गरज नसताना अॅण्टिबायोटिक्स देणं रुग्णाला घातक ठरू शकतं. त्यामुळेच ही डॉक्टरांची जबाबदारी असते की आवश्यकता असेल तेव्हाच अॅण्टिबायोटिक्सचा वापर केला पाहिजे. गरज नसताना अॅण्टिबायोटिक्सचा मारा रुग्णावर केला गेल्यास शरीरात त्या औषधाची परिणामकारकता नंतर आवश्यकता असेल तेव्हा कमी होते. म्हणजेच नंतर भविष्यात ते औषध अधिक मात्रेत (हायर डोस) द्यावं लागतं किंवा देताच येत नाही. हा रुग्णासाठी गंभीर धोका ठरू शकतो.

मग असं असूनही डॉक्टर्स सर्दी, पडसं, खोकला, घसादुखी यासारख्या संसर्गात अॅण्टिबायोटिक्सचा सरसकट वापर का करतात? याची दोन-तीन कारणं संभवतात.

एक म्हणजे ‘रुग्णाला’ आपण लवकर बरं व्हावं असंच वाटत असतं. त्याचा दबाव डॉक्टरांवर असतो. ‘हा डॉक्टर फटाफट आजार घालवतो,’ असं रुग्ण बोलतात. त्यामुळे नवे रुग्ण येण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे अशा रुग्णांना सरसकट अॅण्टिबायोटिक्स देऊन बरं करण्याचा ‘मोह’ डॉक्टरांना होत असतो.

दुसरं कारण म्हणजे, महागडी अॅण्टिबायोटिक्स जितक्या प्रमाणात एखादा डॉक्टर देतो तेवढ्या प्रमाणात असा डॉक्टर औषध कंपन्यांचा ‘लाडका’ ठरतो. अशा डॉक्टरला औषध कंपन्या ‘विशेष प्रोत्साहन’ देतात. कधी परदेशी कॉन्फरन्सला पाठवलं जातं, कधी टीव्ही, फ्रिज, कारसारख्या भेटी मिळतात. त्यामुळे गरज नसतानाही अॅण्टिबायोटिक्स लिहून देण्याकडे डॉक्टरांचा कल असतो.

तिसरं कारण म्हणजे डॉक्टरांचं अज्ञान. म्हणजे असं की, एकदा कॉलेज शिक्षण संपवून बाहेर पडल्यावर डॉक्टर मंडळींना क्वचितच त्यांच्या क्षेत्रातील नव्या ज्ञानप्राप्तीसाठी अभ्यास करण्याची वेळ येते. बहुदा औषध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि औषध कंपन्यांनी प्रायोजित केलेल्या कॉन्फरन्सेस हाच या डॉक्टर्ससाठी ज्ञानाचा स्रोत असतो. त्यामुळे अनेक डॉक्टर्सना नव्याने येणार्या औषधांचे योग्य डोस, साइड इफेक्टस् यांची नेमकी माहितीही नसते. परिणामी रुग्णांना त्याची किंमत मोजावी लागते. खरं तर सर्व डॉक्टर्सच्या नियमित वैद्यकीय ज्ञानाचं अद्ययावतीकरण करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर जगभरात अॅण्टिबायोटिक्सचा अतिरिक्त वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा सगळ्यात मोठा धोका लहान मुलांना आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन या सरकारी संस्थेने अलीकडेच अॅण्टिबायोटिक्स औषधांचा वापर लहान मुलांसाठी कसा करावा याबाबत मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध केली आहेत. लहान मुलांना सर्दी, खोकला, घसादुखी, पोटदुखी, फ्ल्यू, ताप, कानदुखी या कॉमन आजारांमध्ये आवश्यकता असल्याशिवाय अॅण्टिबायोटिक्स देऊ नयेत असं या मार्गदर्शक तत्त्वात सांगण्यात आलं आहे आणि अॅण्टिबायोटिक्स औषधांचे साइड इफेक्टस मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात. तसंच लहान वयात अॅण्टिबायोटिक्सचं अतिरिक्त सेवन करणार्या मुलांसाठी त्यांच्या पुढील आयुष्यात त्या औषधांचा परिणामकारक वापर करता येत नाही. तेव्हा वरील कॉमन आजारांत रुग्णाला झालेला आजार बॅक्टेरियांमुळेच झाला आहे असं सिद्ध झालं तरच अॅण्टिबायोटिक्स द्यावीत, अन्यथा देऊ नयेत. सामान्यतः एक आठवड्यापर्यंत ताप असेल, सर्दी-खोकला असेल कानदुखी, घसादुखी असेल आणि तो संसर्ग बॅक्टेरियांचा असेल तरच अॅण्टिबायोटिक्स द्यावीत असं ही मार्गदर्शक तत्त्वं सांगतात.

सध्या अमेरिकेत सुमारे एक कोटी लहान मुलं (० ते १२ वयोगटातील) अतिरिक्त अॅण्टिबायोटिक्सच्या मार्याच्या धोक्यात आहेत. या मुलांना पुढील आयुष्यात अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्ससाठी ही अॅण्टिबायोटिक्स निरुपयोगी ठरणार आहेत असा इशारा सेंटर फॉर डिसीज कंट्रोलतर्फे देण्यात आला आहे. २०१० पासून सुरू असलेल्या एका अभ्यासात असंही पुढे आलं आहे की, अतिरिक्त अॅण्टिबायोटिक्सचं सेवन केलेल्या मुलांमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गाचं प्रमाणही वाढलं आहे. अश संसर्गांमध्ये अॅण्टिबायोटिक्स निरुपयोगी ठरत आहेत. कारण या जंतू संसर्गांनी ‘ड्रग रेझिस्टन्ट’ औषधांना दाद न देण्याची क्षमता प्राप्त केली आहे. सीडीसी आणि अमेरिकन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिशन्स (बालरोग तज्ज्ञांची संघटना) या दोन्ही संस्थांनी एकत्रितपणे हा अहवाल तयार केला आला आहे.

याच संदर्भात लॅन्सेट मेडिकल जर्नलने प्रसिद्ध केलेल्या लेखात असा इशारा देण्यात आला आहे की, आपण आत अॅण्टिबायोटिक्सनंतरचं युग आता सुरू झालं आहे. अतिरिक्त वापरामुळे ही अॅण्टिबायोटिक्स निष्प्रभ ठरत आहेत. डॉक्टर्स या औषधांचा अतिरिक्त वापर करत आहेत तर रुग्ण परस्पर या औषधांचा वापर करतात. त्यामुळे अनेक रोगजंतू अधिक प्रभावी झाले आहेत. त्यामुळे पूर्वी अॅण्टिबायोटिक्स नसल्यामुळे मोठे साथीचे रोग पसरत आणि लोक पटापटा मृत्यू पावत, तसं परत सुरू होण्याचा धोका मोठा आहे.

या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेणं आवश्यक आहे की, क्षयरोगाच्या ड्रग रेझिस्टन्स संसर्गाच्या जगातील सर्वाधिक केसेस भारतात आहेत. भारतात अॅण्टिबायोटिक्सच्या वापराचा नियमित अभ्यास करण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. किंबहुना सरकारने औषधोपचाराच्या शास्त्रीय, योग्य वापरासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वं निर्धारित केलेली नाहीत. डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या ज्ञानावर आणि सदसद्विवेकबुद्धीवर आपण अवलंबून आहोत. अशा परिस्थितीत आय.एम.ए.सारख्या डॉक्टरांच्या अखिल भारतीय संघटनेने पुढाकार घेणं आवश्यक आहे.

आय.एम.ए. आर्थिकदृष्ट्या तगडी संघटना आहे. त्यांच्याकडे या विषयातील तज्ज्ञ उपलब्ध आहेत. तेव्हा या संघटनेला व्यापक समाजहित आणि जगभरातील रुग्णहिताचा विचार करून पुढाकार घ्यायला काहीच हरकत नाही. किमान लहान मुलांना होणार्या कॉमन संसर्गामध्ये अॅण्टिबायोटिक्सचा वापर केव्हा आणि कसा करावा याविषयी मार्गदर्शक तत्त्वं आय.एम.एने प्रसिद्ध करावीत. डॉक्टरांना जागृत करावं. आय.एम.ए. दरवर्षी लहान मुलांना दिल्या जाणार्या अॅण्टिबायोटिक्सचा सर्व्हे करू शकते. भारतातील सर्वच रुग्णांसाठी असा सर्व्हे आय.एम.एने केल्यास उत्तमच!

पण किमान लहान मुलांच्या औषधोपचारांमध्ये अॅण्टिबायोटिक्सचा वापर कमी करण्यासाठी आय.एम.एने पुढाकार घेण्याची अपेक्षा करावी का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *