भारतात आजवर सर्वात जास्त रकमेची (वैद्यकीय सेवेतील हलगर्जीपणासाठी) नुकसानभरपाई सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. कोलकात्याच्या एएमआरआय या पंचतारांकित सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि त्यातील तिघा डॉक्टरांनी डॉ. अनुराधा सहा या रुग्णावरील उपचारांत वैद्यकीय हलगर्जीपणा केला आणि त्यामुळे त्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरले म्हणून एकूण तब्बल ११.५५ कोटी रुपये नुकसानभरपाई सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. डॉ. अनुराधा यांचे पती डॉ. कुणाल सहा यांनी हा खटला १९९८ साली दाखल केला होता. म्हणजे तब्बल १५ वर्षांनी हा खटला निकालात निघाला. इतक्या प्रचंड नुकसानभरपाई रकमेमुळे या प्रकरणाची देशातील प्रसारमाध्यमांत चर्चा सुरू झाली आहे.

भारतातही आता वैद्यकीय हलगर्जीपणाची प्रकरणं मोठ्या प्रमाणात सुरू होणार, रुग्णांना कायद्याचं संरक्षण मिळणार, रुग्णांच्या हक्कांची चळवळ जोर धरणार, डॉक्टर आणि वैद्यकीय व्यवस्थेवर मोठा दबाव येणार असे मुद्दे चर्चेत येऊ लागले आहेत. म्हणूनच या प्रचंड रकमेच्या नुकसानभरपाई आणि अनुराधा सहा प्रकरणाचा जरा खोलात जाऊन विचार करायला हवा.

प्रथम या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहू. डॉ. अनुराधा सहा या स्वतः डॉक्टर होत्या. त्यांचे पती डॉ. कुणाल सहा हेसुद्धा डॉक्टर आहेत. दोघेही अमेरिकेत रहात होते. आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी तेकोलकात्याला आले होते. डॉ. अनुराधा यांना ताप आला आणि त्वचेवर पुरळ (रॅश) आले म्हणून उपचारासाठी त्यांना एएमआरआय या पंचतारांकित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापूर्वी कोलकात्यातील नामांकित जनरल फिजिशियन डॉ. सुकुमार मुखर्जी हे त्यांच्यावर उपचार करत होते. त्यांनी डॉ. अनुराधा यांना डेपोमेडरॉल हे स्टिरॉइड वर्गातील औषध दिलं. डॉ. मुखर्जी हे त्यांच्या पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार अमेरिकेला निघून गेले. त्यांनी डॉ. अनुराधा यांना डॉ. बलराम प्रसाद यांच्या देखरेखीखाली एएमआरआयमध्ये दाखल केलं. ‘डेपोमेडरॉल’ स्टिरॉइड औषधाचा डोस रुग्णावर दीर्घकाळ कार्यरत (लाँग अॅक्टिंग ड्रग) असतो. त्यामुळे या औषधाचा वापर काळजीपूर्वक करायचा असतो. परंतु डॉ. मुखर्जी यांनी अनुराधा यांना ८० मिलीचं इंजेक्शन दरदिवशी दोनवेळा देण्यात यावं असं आपल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहून दिलं होतं. एएमआरआयमध्ये डॉ. बलराम प्रसाद यांच्याबरोबर डॉ. अवनी रॉय चौधरी, डॉ. बैद्यनाथ हलधर हेही उपचार करत होते. डेपोमेडरॉल स्टिरॉइड औषधाचा डोस दीर्घकाळ आणि अतिरिक्त प्रमाणात देण्यामुळे डॉ. अनुराधा यांची प्रकृती वेगाने ढासळली आणि गंभीर होत गेली. चार दिवसांत डॉ. अनुराधा यांची प्रकृती इतकी ढासळली की, डॉ. कुणाल सहा यांनी हेलिकॉप्टरने त्यांना मुंबईच्या ब्रिच कॅण्डी रुग्णालयात नेलं. प्रयत्नांची शर्थ करूनही डॉ. अनुराधा वाचू शकल्या नाहीत.

डॉ. कुणाल सहा यांनी एएमआरआयसारख्या पंचतारांकित रुग्णालयातील अनागोंदी कारभार, डॉक्टरांचा रुग्णांकडे पहाण्याचा बेपर्वा दृष्टिकोन याविरुद्ध आवाज उठवला. डॉ. मुखर्जी, डॉ. बलराम प्रसाद, डॉ. अवनी रॉयचौधरी, डॉ. हलधर यांच्याविरुद्ध बंगाल मेडिकल काऊन्सिलकडे तक्रार केली. तेव्हा बंगाल मेडिकल काऊन्सिलने डॉ. सहा यांच्याविरुद्धच ताशेरे झोडले. डॉ. मुखर्जी, डॉ. रॉयचौधरी, डॉ. हलधर,

डॉ. प्रसाद यांना निर्दोष सोडलं. त्यानंतरच डॉ. कुणाल सहा यांनी वैद्यकीय व्यवस्थेतील या संघटित झोटिंगशाहीविरुद्ध फौजदारी, दिवाणी आणि ग्राहक संरक्षण न्यायालयात खटले दाखल केले.

सर्वोच्च न्यायालयाने आता (तब्बल १५ वर्षांनी) या प्रकरणात निकाल दिला आहे. यापूर्वी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाने (२०१२) संबंधित डॉक्टर्स आणि एएमआरआय रुग्णालयाने ७५ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी असा निकाल दिला होता. त्या निर्णयात डॉ. मुखर्जी यांनी ३० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तर डॉ. प्रसाद, डॉ. हलधर, डॉ. रॉयचौधरी यांनी पाच लाख रुपये द्यावेत आणि रुग्णालयाने उर्वरित नुकसानभरपाई द्यावी असे आदेश दिले. ७५ लाख रुपये नुकसानभरपाई आणि त्यावरील व्याज असे मिळून एकूण एक कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानभरपाई राष्ट्रीय ग्राहक मंचाने मंजूर केली होती. ही रक्कम खूपच कमी असल्याचं डॉ. कुणाल सहा यांचं म्हणणं होतं. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं म्हणणं मान्य करत नुकसानभरपाईची रक्कम पाच कोटी ९६ लाख रुपयांपर्यंत वाढवली. या रकमेवर सहा टक्के व्याज (१९९८ पासून) लावलं आहे. म्हणून ही रक्कम ११.५५ कोटी इतकी वाढली आहे. भारतात वैद्यकीय हलगर्जीपणासाठी ठोठवलेली ही आजवरची सर्वात मोठी आर्थिक नुकसानभरपाई ठरली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने इतका मोठा दंड का ठोठावला? तर त्यामागचा महत्त्वाचा घटक म्हणजे डॉ. कुणाल सहा आणि डॉ. अनुराधा सहा हे दोघे अमेरिकास्थित व्यावसायिक डॉक्टर होते. त्यामुळे त्यांचं उत्पन्न डॉलरमध्ये मोजलं गेलं. प्रती डॉलर ५५ रुपये हा विनियम दर धरून एकूण नुकसानभरपाई मोजली गेली. म्हणूनच नुकसानभरपाईचा आकडा खूप मोठा दिसतो. समजा, अनुराधा सहा या भारतात रहाणार्या सामान्य गृहिणी असत्या तर ही नुकसानभरपाई खूपच कमी झाली असती. म्हणजेच, अशाचप्रकारच्या एखाद्या अन्य प्रकरणात रुग्णांना इतकी मोठी नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता नाही.

तिसरा लक्षात घेण्याचा मुद्दा हा की, या प्रकरणात सर्वाधिक दोषी ठरलेल्या डॉ. सुकुमार मुखर्जी यांनी तर या निकालावर आनंदच व्यक्त केला. कारण राष्ट्रीय ग्राहक मंचाने डॉ. मुखर्जींना तीस लाख रुपये दंड आणि व्याज अशी एकूण ४० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता. तर सर्वोच्च न्यायालयाने ही रक्कम दहा लाख रुपये इतकी कमी केली. त्यामुळे प्रत्यक्षात डॉ. मुखर्जी यांना तीस लाख रुपये परत मिळणार आहेत. ‘द टेलिग्राफ’ या कोलकात्याच्या वर्तमानपत्राशी बोलताना डॉ. मुखर्जी म्हणाले की, ‘मला तर सुटकाच झाल्यासारखं वाटतंय!’

आणखी एक मुद्दा म्हणजे गेल्या १५ वर्षांत या प्रकरणातील आणखी एक आरोपी डॉ. अवनी रॉयचौधरी २०११ मध्ये निधन पावले. त्यामुळे त्यांच्यावरील ४० लाख रुपयांचा दंड रद्दबातल ठरला. याच प्रकरणातील आणखी एक डॉक्टर बैद्यनाथ हलधर हे आज ८२ वर्षांचे असून ते गंभीर आजारी आहेत. डॉ. बलराम प्रसाद हे आज पंचावन्न वर्षांचे असून एएमआरआयमध्येच कार्यरत आहेत. सदर रुग्णालय आजही दणदणीत व्यवसाय करत आहे.

तर या निकालाने आनंदित झालेले डॉ. मुखर्जी तर आजही प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून सन्मानाने व्यवसाय करत आहेत. आता तर ते ममता बॅनर्जींच्या सरकारच्या आरोग्य खात्याचे ‘सल्लागार’ म्हणून काम करत आहेत. अनेक मोठ्या रुग्णालयांचे सन्मानीय डॉक्टर आहेत.

तर नोंद घेण्याची बाब म्हणजे १९९८ पासून वैद्यकीय हलगर्जीपणासाठी वादग्रस्त ठरलेल्या एएमआरआय या पंचतारांकित रुग्णालयाचा व्यवसाय वाढतच गेला असून २०११ मध्ये याच रुग्णालयाला आग लागून ९२ रुग्ण होरपळून गेले होते. त्या प्रकरणातील आरोपी संचालक आजही मोकळे (जामिनावर) असून, मृत रुग्णांचे नातेवाईक नुकसानभरपाईसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. केसच सुरू होत नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *