भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमा गेली जवळपास ७० वर्षं होरपळत आहे. या वादावर कधी आणि कसा तोडगा निघणार हे कुणीच सांगू शकणार नाही, मात्र या वादातून ज्या विध्वंसक गोष्टी घडतायत त्या भयानकतेची परिसीमा गाठणार्या आहेत. या विध्वंसाच्या परिणामांना सामान्य लोकांना सामोरं जावं लागतंय. एकतर भारतात मुस्लीम द्वेषाच्या भांडवलावर राजकारण होतंय, त्यातून दोन्ही देशांतील संबंध गुंतागुंतीचे होतायत. भारत द्वेषावरच तिथलं सगळं राजकारण बेतलेलं आहे. भारतात कोणताही भाग सुरक्षित राहू नये याची खबरदारी पाकिस्तानातील अतिरेकी संघटना लष्कराच्या सहाय्याने घेत आहेत. जिहादच्या नावाने सगळा खूनखराबा करतच तालिबानी संघटना पाकिस्तानी लोकांचाही जीव घेत आहेत. पाकिस्तानात सतत बॉम्बस्फोट होत आहेत. या सर्वच विध्वंसाला थांबवण्यासाठी सर्व सामान्य माणसांनीच आता बोलायला हवं. दबाव गट निर्माण करायला हवेत. दोन्ही देशांत शांततापूर्ण वातावरण तयार व्हायला हवंय. त्यातूनच विकास साधणं शक्य आहे. या सगळ्याला एकच उत्तर, ते म्हणजे मैत्रीपूर्णसंवादाचं… हा विचार मानणार्यांत या दोन्ही देशांतील जे लोक अग्रेसर होते त्यातीलच एक होत्या रेश्मा…

रेश्मा यांचं नुकतंच निधन झालं. आपल्या गायकीने रसिकांना मुग्ध करणार्या या पाकिस्तानी गायिकेसाठी जगभरातील लोकांनी हळहळ व्यक्त केलीय. रेश्मासारखी माणसं केवळ कलावंत नसतात. बंदिस्त सीमा उखडून टाकणारी ती वादळं असतात. आपल्या कलेलाच आपल्या विचारांचं शस्त्र करणार्या आसामी असतात. जात, धर्म, पंथ, देश, प्रदेश यांना न जुमानणारा हा विचार असतो. रेश्मा या मुळच्या राजस्थानमधल्या. बंजारा या भटक्या समाजात त्यांचा जन्म झाला. जत्रेत, मेळ्यात आपली कला सादर करत फिरणं हे या समाजाचं काम. जन्मजातच ही कला रेश्मा यांना मिळालेली. शरीर, हाताच्या वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा करत आपल्या पहाडी आवाजात ही मंडळी लोकसंगीत सादर करतात. रेश्मा यांचा आवाज अत्यंत वेगळ्या धाटणीचा. फाळणी झाली आणि रेश्माचं कुटुंब पाकिस्तानच्या सीमेकडे रवाना झालं. खरंतर राजस्थान हे सीमेवरचं राज्य. त्यामुळे सीमा पार करणं तसं खडतर नव्हतं. पण का आणि कोणत्या परिस्थितीत या कुटुंबाला सीमा पार करावी लागली याचे काहीच दाखले कुठे नाहीत. बंजारा ही काही मुळची पाकिस्तानी जमात नाही. त्यामुळे रेश्माचं कुटुंब सीमेपलीकडे गेलं खरं पण वाताहत अधिक भयानक झाली. तिथेही भटकंती सुरूच होती. आपली आधीची भूमी सोडून आपण इथे का आलो, हे न कळण्याच्या वयात तो सगळा त्रास रेश्माने अनुभवला.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात शाहबाज कलंदर या सुफी संताची समाधी आहे. मात्र ही कबर म्हणजे धार्मिक स्थान नाहीये, तर लोककलाकारांची तिथे मांदियाळी भरत असते. आपल्या कवनातून, गायनातून कलंदर बाबाची भक्ती गाणार्या कव्वालांची इथे रीघ असते. मातीतील ते सुफी संगीत ऐकायला मोठ्या संख्येने पर्यटक तिथे जात असतात. सुफी संप्रदाय हा व्यापकतेच्या विचाराची मांडणी करणारा आहे. ही व्यापकता जग कल्याणाची आहे. ज्ञानेश्वरांनी पसायदान मागताना विश्वात्मके देवाकडे जे दान मागितलं होतं त्याच्याशी या सुफी विचारांशी नाळ जुळते. पाच वेळा नमाज, रोजा या सगळ्या पलीकडे ही सुफी संतांची संगीतमय आराधना असते. याच कलंदर बाबाच्या दर्ग्याजवळ रेश्मा आणि त्यांचं कुटुंबीय विसावलं. लहानग्या रेश्माची इथेच कलंदर मौलाच्या विचारांशी गाठ पडली आणि ती गाऊ लागली… दमादम मस्त कलंदर… ओ लाल मेरी… त्यावेळी रेश्मा होती अवघ्या १२ वर्षांची. या मुलीच्या पहाडी आवाजातील ते गाणं कुणाचं लक्ष न वेधतं तरच नवल. पाकिस्तानी टीव्ही, रेडिओने तिला जगापुढे आणलं. उन्हातान्हात कला सादर करणारी रेश्मा पाकिस्तानात लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली. तिथल्या गायक-संगीतकारांनी, बॅन्डनी तिला आपल्यासोबत घेतलं. पाकिस्तानी गायिका म्हणून तिचा लौकिक झाला. तिथल्या नव्या पिढीची ती आवडती गायिका झाली. तिला जे फॅन फॉलोविंग होतं तेवढं कुणाला मिळालं नाही. अतिरेकी कारवायांनी, अस्थिर राजकारणांनी बरबटलेल्या पाकिस्तानात रेश्माचं गाणं हाच काहीसा दिलासा होता. या सगळ्यामुळेच पाकिस्तानचे सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार तिने मिळवले. बायकांनी कसं रहावं, काय करावं याचे फतवे काढणार्या धर्मांधांचा आदेश रेश्माला लागू होत नव्हता. आपली कलंदरी तिने सोडली नाही…

भटकंती थांबली यश मिळालं, मात्र फाळणी, स्थलांतर, त्यानंतरची दुःखं याचा विसर तिला कधीच पडला नाही. त्यात सुफी विचारांची कासही तिने कधी सोडली नाही. भारत-पाकिस्तान दरम्यान जेव्हा संवाद सुरू झाला आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा माहौल सुरू झाला, तेव्हा आसुसलेल्या अवस्थेत रेश्मा भारतात आली आणि कलंदर विचारच तिने पुन्हा एकदा रुजू केले. शबे शाहबाज कलंदर… म्हणत भारतीय रसिकसुद्धा मग या कलंदरात सामावून गेले. अर्थ माहीत असो नसो, आज कोणत्याही कार्यक्रमात हे गाणं तन्मयतेने गायलं जातं. सुफी संगीताची नजाकत भारतीयांना अनुभवायला मिळते. आता ते आम झालं आहे. खरंतर भारत-पाकिस्तान यांच्यात संवाद करण्याचा मुद्दा येतो तेव्हा हे कलाकारच त्यासाठी आग्रही असतात. मात्र आपल्याकडे या कलावंतावर राग काढण्याची मर्दुमकी दाखवणारे काही कमी नाहीत. तरीही कोणताही कलावंत उमेद हरत नाही.

कलावंत म्हणून भारतात येताना रेश्मा दोन्ही देशातील सीमावाद कसा निरर्थक आहे यावरच भर देत होत्या. संगीत, संस्कृतीला कोणत्याही सीमा बंदिस्त करत नाही हे या अनपढ गायिकेने वारंवार ठासून मांडलं. भारतीयांनी दिलेल्या प्रेमाची जाणीव रेश्माला कायम होती. भारताबद्दलची ओढ मनात घट्ट होती. यासाठीच भारतात येऊन गायची रेश्माची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण केली ती सुभाष घईंनी १९८३ साली. ‘हिरो’ या चित्रपटात रेश्माने पहिलं गीत गायलं… ‘लंबी जुदाई…’ रेश्माच्या जादुई आवाजाने या गाण्याला जी लोकप्रियता मिळाली ती आजही कायम आहे. हे गाणं म्हणजे देशभरातील प्रेमवीरांचं भावगाणं होऊन गेलं. आजही रेडिओ, टीव्हीवर हे गाणं लागल्यानंतर चॅनेल कुणी बदलत नाही. कुठल्याही वयोगटातील स्त्री-पुरुषांना हे गाणं म्हणजे आपल्या भावभावना वाटतात. पण रेश्मासाठी हे गाणं तशाच भावनेचं होतं काय?

रेश्मासाठी लंबी जुदाईचा भावच वेगळा होता. इथल्या मातीशी, माणसांशी, वाळवंटात गात फिरताना दाद देणार्या समाजाशी जी जुदाई झाली त्याचं दुःख त्या गाण्याच्या स्वरातून उमटत होतं. ती आर्तता, ते दुःख, तो सल तिने गाण्यात मांडलेला जाणवत नाही? रेश्माच्या मृत्युनंतर हे गाणं पुन्हा ऐकूया…

बिछडे अभी तो हम बस कल परसो

जिऊंगी मैं कैसे इस हाल में बरसो

मौत ना आयी तेरी याद क्यों आयी

लंबी जुदाई…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *