राज्यव्यवस्था, शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था ही सगळी समाज व्यवस्थेचीच अंगं असतात, पण त्या पलीकडेही समाजाची म्हणून उपस्थिती असते, भूमिका असते. युद्धकाळात, नैसर्गिक संकटाच्या काळात, देशांतर्गत यादवीच्या काळात, एखाद्या प्रश्नावरील देशव्यापी उठावाच्या काळात किंवा अनेकदा निवडणुकांच्या काळात, राष्ट्रीय आंदोलनात समाजाची उपस्थिती जाणवते.

प्रत्येक देशातील समाजाची परिपक्वता वेगवेगळ्या पातळीवर असते. त्या त्या समाजाचा जीवनविषयक दृष्टिकोन, सांस्कृतिक प्रगल्भता, कार्यसंस्कृती, नीतिमत्ता इत्यादींचा त्या समाजातील शासनव्यवस्थेच्या जडणघडणीवर, कार्यशैलीवर परिणाम होत असतो. अमेरिकन समाजाचंच उदाहरण घेतलं तर वॉटर गेटसारख्या प्रकरणावरून राष्ट्राध्यक्षाला पायउतार व्हावं लागल्याचं दिसतं. आणि व्हिएतनाम युद्धाबाबत अमेरिकन नागरिकांच्या नापसंतीमुळे आपलं परराष्ट्रीय धोरण बदलावं लागलं. गेली काही वर्षं अमेरिकेतील बेकारीच्या प्रश्नाला प्रत्येक राष्ट्राध्यक्षाला अग्रक्रम देऊन आर्थिक धोरणं, व्हिसाविषयी धोरणं आखावी लागत आहेत. वास्तविक २०१० साली अमेरिकेची लोकसंख्या ३१ कोटी होती. पैकी १० कोटी मुख्यतः काम करणारे आणि त्याच्या पाच-सहा टक्के म्हणजे पन्नास-साठ लाख एवढे बेकार. पण तो प्रश्न तिथे राष्ट्रीय महत्त्वाचा बनतो. कारण त्यामागे अमेरिकन समाजाचा दबाव आहे. एवढा अमेरिकन समाज जागृत आहे. उलट २००१ साली भारतातील काम करणार्यांचीच संख्या चाळीस कोटींवर होती. आणि त्यातील ३१ कोटी मुख्यतः काम करणारे आणि ९ कोटी सीमान्त श्रमिक होते, म्हणजे बेकारच होते. शेतीतील अर्धबेरोजगारी सोडूनही जवळपास २० टक्के बेरोजगारी होती. आजही तीच स्थिती आहे. पण त्याची चर्चाही होत नाही. कारण भारतीय समाजात असा काही प्रश्न आहे याचं भान दिसत नाही. मग शासनावर त्याचा दबाव येण्याचा प्रश्नच नाही.

महाभारतात यादव कुळाच्या अंतिम काळाचं वर्णन आहे. ज्यामध्ये सगळा समाज सुखासीन झाला होता आणि आपसातच संघर्ष करत होता. त्यातूनच त्याचा नाश झाला आणि त्यामुळे यादवी हा शब्द शब्दकोशात आला.

लिओ टॉलस्टॉयच्या ‘वॉर अॅण्ड पीस’ या कादंबरीत झारकालीन रशियन समाजाचं चित्र उभं केलं आहे. पोशाखी उमरावांचा तो काळ होता. समाजातील दैन्यदारिद्र्याशी त्यांचा संबंध नव्हता, कर्तृत्वहीन, बढाईखोर महाजन म्हणून ते रशियन समाजात वावरत होते आणि त्यातूनच कम्युनिस्ट क्रांतिची बीजं रोवली गेली. संतांच्या उदयापूर्वी महाराष्ट्रात अलक निरंजन पंथ जोरात होता. मठांची स्थापना होत होती. तरुण स्त्री-पुरुष घरदार सोडून मठात जात होते. तिथे योनी पुजेसारखे अभद्र प्रकार सुरू होते. नीतिमत्ता रसातळाला गेली होती. या पार्श्वभूमीवर भागवत धर्माचा उदय झाला. संतांनी संसार करून परमेश्वराची उपासना येते हे दाखवून दिलं आणि एक परिवर्तन घडवलं.

आजचा भारतीय समाज संवेदनाहीन झाल्याची स्थिती आहे. देशात अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण झाला आहे पण त्याच्याशी समाजाचं काही देणंघेणं आहे असं दिसत नाही. प्रत्येकजण स्वतःपुरतं जगतो आहे. स्वतःपुरतं पहातो आहे. प्रत्येकजण पुढे घुसण्याच्या नादात समाजव्यवस्थेत ट्रॅफिक जॅम होतो आहे आणि अनेक प्रश्न तसेच लोंबकळत पडले आहेत. पण तक्रार आहे ती स्वतःला पुढे जाता येत नाही याची… म्हणूनच एखाद्या दिल्ली बलात्कारासारख्या घटनेवर अनेकजण रस्त्यावर आलेले दिसतात. समाज जागा झाल्यासारखा वाटतो. पण तो आभासच असतो. पाण्यावर लक्षावधी बुडबुडे यावेत आणि विरून जावेत असं घडतं आहे. कारण रस्त्यावर येतो तो समाज नसतो ती अनेकदा गर्दी असते, परस्परांशी संबंध नसलेल्यांची. लोकलमधूनच हजारो माणसं एकाच दिशेने प्रवास करतात पण उतरल्यावर प्रत्येकाची दिशा वेगळी असते. तसंच भारतीय समाजाचं घडतं आहे का?

तुम्ही आम्ही मिळूनच जर भारतीय समाज बनला आहे तर आपण कसे वागतो आहोत याचा विचार करायचा की नाही? राज्यकर्ते, शासनकर्ते, अनीतिमान झालेत अशी आपली तक्रार आहे. पण समाजातीलकोणता घटक नीतिमान आहे, कर्तव्यदक्ष आहे? राजेशाहीत ‘यथा राजा तथा प्रजा’ असं म्हटलं जाई, आता लोकशाहीत ‘यथा प्रजा तथा राजा’ असं म्हणावं लागेल. म्हणजे या देशातील बिघडलेपणाला आपणही, तुम्ही आम्हीही जबाबदार आहोत हे मान्य करावं लागतं.

आजचा भारतीय समाज पोशाखी बनला आहे. टिव्ही सिरियलमधील माणसं २४ तास सूट घालून आणि भरजरी साड्या नेसून मेकअप करून घरात वावरतात तसंच आपलं जीवन दिखाऊ आणि टाकाऊ तर झालं नाही? आपण

ज्यांना सेलिबे्रटी मानतो ते किती उथळ असतात हे आपल्याला माहीत नाही? पुरस्कारांचा तर पाऊस पडतो आहे. एवढी कर्तृत्ववान माणसं आहेत तर देशाची दुर्दशा का असा प्रश्न पडत नाही? आपणही एका मागोमाग एका उत्सवात गुंगून गेलो आहोत आणि काहीतरी महत्त्वाचं राष्ट्रकार्य करत आहोत असा आव आणत आहोत.

जागतिक मंदी, देशांतर्गत वाढते प्रश्न, राज्यकर्त्यांची कर्तृत्वहीनता या सगळ्या गोष्टी आहेतच पण शासनव्यवस्थेच्या सर्व घटकांवर दबाव ठेवणारा समाजही नाही हे सत्य आहे. आपणच झोपून राहिलो तर ‘वार्ता विघ्नाची’च असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *