एखादी व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला अचानक आवडत नसते त्यावेळी तिच्यात नेमकं काय आवडत नाही याचा आपण व्यवस्थित शोध घेत असतो का? सर्वसाधरणतः कालपर्यंत आवडणारी जी व्यक्ती अचानक आवडत नाही म्हटल्यावर नेमका दोष आपला असतो की समोरच्या व्यक्तिचा? मुळात व्यक्तिला स्वीकारताना आपण नेमकं काय म्हणून स्वीकारत असतो हा फार महत्त्वाचा सवाल आहे किंवा याच उलट, ज्यावेळी आपण कुठल्याशा व्यक्तिला नाकारतो तर अशाही वेळी नेमकं आपण काय नाकारत असतो. हेही स्पष्ट होणं गरजेचं नाहीये का? व्यक्ती म्हणजे केवळ एक शरीर असतं का? तर हे असं निश्चितच नसावं, व्यक्तिच्या बाहेरील आकर्षणापेक्षा आपलं लक्ष त्याच्या आंतरिक जडणघडणीच्या बाबतीत अधिकचं असावं. शारीरिक आकर्षणामुळे कदाचित एकामेकांच्या सहवासात येणं सहज शक्य असू शकतं. मात्र कुठलंही नातं मजबुतीने टिकणं किंवा टिकवणं हे संपूर्णतः एकमेकांच्या गुणदोषांवरच निर्धारित होत असतं.

आजूबाजूला एक नजर मारली की सहजतेने काही बाबी दिसू लागतात, लग्न करताना किंवा प्रेमात पडतानाही अनेकदा आपला होऊ घातलेला जोडीदार गोर्या रंगाचा, दिसायला सुंदर आहे का ही व्याख्या प्रथम समोर उभी केली जाते. व्यक्तिला स्वीकारताना ज्यावेळेस शरीराचा रंग बघून स्वीकारलं जातं त्यावेळी हे निश्चित होऊन जातं की खरोखरच व्यक्तिचं लग्न ही एक सामाजिकच घटना असते. कारण अनेकदा याला त्याला दाखवण्यासाठीच ज्यांचा त्यांचा हा रंगाचा खटाटोप सुरू असतो. कित्येक घरांमध्ये एखाद्या मुलीला पाहण्यासाठी एक नाही दोन नाही पन्नास पन्नास मुलं येऊन जातात, मग पन्नास वेळेला चहा बनतो, पन्नास वेळेला पोहे तयार केले जातात. पन्नास वेळेला त्या मुलीला तिच्या परिने चेहर्यावर स्मित हास्य ठेवत सजावं लागतं. कधी त्यांच्या समोर चालून दाखवावं लागतं तर कधी इंग्रजीमध्ये बोलून दाखवावं लागतं एक ना अनेक बाबी तिला कराव्या लागतात. या सगळ्यांमधून ती बिचारी तरली की मग एकतर देण्या-घेण्यावरून मुद्दा फिस्कटतो किंवा कुठले तरी गुणच जुळून येत नाहीत तर कधी नाडी परीक्षेमध्येच गडबड होऊन जाते. जर वागणुकीच्या बाबतीत काही चुकीचं जाणवलं असेल तर ही बाब लक्षात घेता येते मात्र दिसण्यावरून किंवा रंगावरून जेव्हा नाकारण्यात येतं तेव्हा अशावेळी कुणी परक्याने आपल्याला नाकारलं याचं दुःख निश्चितच होत असतं. मात्र त्याहीपेक्षा अधिक वेदना तेव्हा होत असते ज्यावेळेस जन्मदाते मायबापच पोरीला तू बुटकी आहेस, तू काळी आहेस म्हणून तुझं लग्न होत नाहीये, अशा शब्दांत हिणवत असतात. हे असं ऐकलं की कसंसंच होतं.

व्यक्तिचं व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ त्याचं दिसणं नसून त्याचं असणं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. व्यक्ती कशी दिसते यापेक्षा ती कशी असते हे अधिक महत्त्वाचं नसतं का? आणि मुळात आपल्याला मिळालेल्या संस्कारांपासून आपल्याला मिळालेल्या जातीपर्यंत सारीच तर देण आपल्या मायबापांची असते आणि यासकट आपल्याला मिळालेलं शरीरसुद्धा त्यांच्यातूनच तर निर्माण झालंय. जर काळा रंग पाल्याला लाभला असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्या मायबापाचीच ना? मात्र नेमकं लग्नाच्या वेळेला हे सारं विसरून केवळ लग्न जुळत नाही म्हटल्यावर तिला विविध अत्यंत वाईट आणि वेदनादायी अशा वाक्यांचा सामना करावा लागत असतो.

प्रतिभावान नाटककार शेक्सपिअर नेहमी म्हणायचे, ‘निग्रो स्त्री ही मला जगातली सर्वात सुंदर स्त्री वाटते. तिच्या गडद काळ्या रंगामुळे तिच्या रंगात इतर कुठलीही मिलावट करणं अशक्य आहे. कुठलाही मेकअप तिला, तिच्या अस्सलतेला बदलवू शकत नाही.’ जगण्यातली आणि दिसण्यातली अस्सलताच तर अधिक महत्त्वाची असते. चेहरा गोरा आहे यापेक्षा मन स्वच्छ असणं कधीही श्रेयस्कर नसतं का? मातीत राबराब राबणारे काळे कुळकुळीत झालेले मजूर प्रेमळ नसतात का? विकलांगता शरीराला असेल तर हरकत नाही मात्र मनाने आणि वृत्तीने विकलांग असणं हे सगळ्यात घातक असतं. नऊ दिवस पायात चप्पल न घालता चालण्याने नेमकं आपण काय सिद्ध करत असतो. त्याग, परंपरा की दिखावा… पायातून चप्पल त्यागण्यापेक्षा मनातले वाईट विचार त्यागल्याने इशप्राप्ती होण्याची अधिक शक्यता असते. मॉलमध्ये इस्केलेटरवर उभं राहता आलं किंवा चार इंग्रजीचे शब्द बोलता आल्याने आधुनिक होता येत नसतं. आधुनिकतेचा संबंध योग्यतेशी असतो. न्यायाशी असतो. नुसतं स्पर्धा परीक्षेसाठी समाजसुधारक पाठ करायचे आणि पोस्ट हातात मिळताना हुंडा मागून स्वतःचा भाव ठरवायचा असा करंटेपणा करणार्यांना बहिष्कृत करण्याची मोहिमच हाती घेतली पाहिजे. देशाला अमेरिका बनवू पाहणार्यांनी प्रथम गावागावात पहिले संडास बांधून दाखवले पाहिजेत मग हाणल्या पाहिजेत गप्पा एकविसाव्या शतकाच्या… काळा देव चालतो पण काळी पोटची लेक चालत नाही हा दुटप्पेपणा हाणून पाडला पाहिजे. जातीसाठी माती खाऊन पोटच्या पोरीला जिवंत मारणार्यांना चौकात घेऊन चोप दिला पाहिजे. कदाचित हा शेवटचा पर्याय नाही. पण हा पर्याय आहे. हा असा पर्याय, जे कोणी असं करण्याचा मनसुबा ठेवतील त्यांच्यासाठी सरळ आणि कडक संदेश ठरू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *