बाबरी पाडली, अरे फटाके फोडा…., माझ्या आजोळी मामाच्या घरी त्या संध्याकाळी उशिरा कुणी धावत आला होता. मला उगाच चेव. मी फटाके फोडले. मामा घरी नव्हता. कारण, कारसेवेसाठी तो अयोध्येत होता. शेवटची बातमी मिळाली तेव्हा त्याला अटक झाली होती. काही तरी सॉलिड घडत होतं. ते चांगलं की वाईट हे कळायची अक्कल नव्हती. पण, देशभर तयार झालेल्या भावनिक लाटेवर मीही हिंदोळे खात होतो. मुंबईच्या वातावरणात वाढलेल्या मला जातीची ओळख नव्हती. मात्र, तेव्हाच्या हिंदुत्वाच्या कल्लोळात माझ्या कुमारवयाला ‘गर्वसे कहो हम हिंदू है’ची ओळख भावली होती. घरात तसं काही कडवं धार्मिक वातावरण नव्हतं. बहुधा मामानेच दिलेला रामाचा फोटो मात्र आवडीने कपाटाला लावला होता. सिक्स पॅक अॅब्ज, नील वर्णी, जटाधारी, धनुष्याची प्रत्यंचा ताणून समुद्रात आक्रमणासाठी सिद्ध रामाचं ते पोस्टर होतं. मला ते पोस्टर एक चित्र म्हणून आजही आवडतं. या काळात भाजपवाल्यांच्या घोषणा ऐकायला, वाचायला मिळत होत्या. सौगंध राम की खातें है, मंदिर वही बनाएंगे, मंदिर निर्माण से शुरू होगा राष्ट्र निर्माण, अयोध्येत राम, हाताला काम, शेतकर्याला दाम, साध्वी ऋतंभरा, प्रवीण तोगडिया, अशोक सिंघल, आचार्य धर्मेंद्र म्हणत होते ‘जो न हमारे राम का, वह न हमारे काम का, हिंदू हित की बात करेगा वही देशपर राज करेगा!…’ अर्थ स्पष्ट होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि त्यांच्या अखत्यारित येणार्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल वगैरेंच्यासमोर आणि या सर्वांचे धुरीण म्हणून अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी असं मानत होते की, देशासमोर सर्वात कळीचा मुद्दा आहे राम मंदिराची निर्मिती. ८०च्या दशकाचा अस्त आणि ९०च्या दशकाच्या सुरुवातीची ही वर्षं. त्या काळात देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती कशी होती हे जाणून घेण्यासाठी कोणतेही जुने अहवाल वाचण्याची गरज नाही. आज २१व्या शतकाच्या दुसर्या दशकात आपल्या समस्या काही प्रमाणात फक्त सैल झाल्या आहेत. अन्न, निवारा, शिक्षण, रोजगार, शेती, आरोग्य या समस्यांची तीव्रता आजही जर पूर्णतः सुटलेली नाही तर ९०च्या दशकात सारं काही आलबेल कसं असू शकणार? पण तरीही तेव्हा देशासमोर एकच प्राधान्यक्रम ठेवण्यात आला होता- देवालय.

सार्वजनिक शौचालयांची अवस्था आजही अगदी प्रमुख शहरातही चीड आणणारी आहे. राममंदिर आंदोलनाच्या दशकात तर गावोगावी हागणदारी कशी होती हे मी पाहिलंय. पण तेव्हाही अजेंडा ठेवण्यात आला होता… राममंदिराचा. बरं ९० वगैरेचं दशकच का घ्या? स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरही या देशात सगळं ठीकठाक असं कधीच काहीच झालेलं नव्हतं. नाही. असं असताना संघाने आणि भाजपने मात्र अजेंडा ठरवला होता राममंदिराचा! अर्थात हे वातावरण बनायला जसं काँग्रेस-राजीव गांधीकृत शाहबानो प्रकरण महत्त्वाचं ठरलं तसंच मंडल आयोगाद्वारे येऊ घातलेलं मागास जातींच्या आयडेंटिटीचं वादळही. म्हणजेच, राममंदिर हा प्रतिहल्ला होता. तो खुद्द संघ किंवा भाजपसाठीही प्राधान्याचा विषय नव्हताच!!!

…. आणि तरीही हजारो कारसेवकांनी या आंदोलनात भाग घेतला. बाबरी पाडली. आजही तेव्हाचे व्हिडिओ पाहताना त्या कारसेवकांचे चेहरे दिसतात. उच्चवर्णीय जातीतली मुलं यात असणं तसं कमीच. काही नोकरदार, थोडंफार बरं चालणार्या लोकांचे ग्रूप्सही तिथे गेले होते (माझा मामा अशाच ग्रूपसोबत गेलेला). पण, आधीच अटक झाल्याने असे लोक तसे सेफच राहिले. बाबरीच्या परिसरातले, बाबरी पाडणारे, पोलिसांच्या लाठ्या झेलणारे, गंभीर गुन्ह्यांच्या केसेस लागलेले कारसेवक वेगळेच. मग ते सारे कारसेवक कोण होते? महाराष्ट्र आणि काही प्रमाणात कर्नाटक, आंध्र आणि मुख्यतः उर्वरित उत्तर भारतातील ही तरुणाई सामान्य बहुजन वर्गातली होती. काय गंमत आहे, सर्वच पक्ष संघटनांचा कणा हाच वर्ग असतो. मग भले त्यांच्या जाती कोणत्याही असोत. आज या कारसेवकांना सरसकट हिंदुत्ववादी गुंड, दंगलखोर आणि नेहमीप्रमाणे प्रतिगामी वगैरे ठरवणं सोपं आहे. पण, एवढ्या संख्येने एकवटलेल्या या शक्तिचं नेतृत्व हुकलेलं होतं त्याचं खापर सरसकट या लोकांवर फोडणं अन्यायाचं ठरेल. डोक्याला आणि हाताला काम मिळण्याऐवजी त्यांच्या डोक्यात राम आणि हातात त्रिशूळ देण्यात आला होता. थोडाफार फायदा, पैसा वगैरे, मॉब मेंटॅलिटीद्वारे गुर्मी आणि मस्ती, संघटनेचं कवच आणि नेत्याचा आशीर्वाद याच्या जोडीला काहीतरी डॅशिंग आयडेंटिटी मग ती बजरंगी असो की पँथरी (ढसाळ-ढालेंच्या नंतरच्या उगवलेल्या अनेक पँथर संघटना- शेवटी डोकं ना माकडाला असतं ना चित्त्याला ना वाघ-सिंहाला!) एकदा का या गोष्टी मिळाल्या की नेता बोले, अनुयायी हाले अशीच स्थिती. हिंदू संघटनांच्याबाबतीत सांगायचं म्हणजे त्यांना आपल्या अनुयायांसमोर मुसलमान हा हिंसेची खुमखुमी पैदा करण्यासाठी शत्रू म्हणून सहज उभा करता येतो. बोलभांड नेत्यांची आक्रस्ताळी आणि उचकवणारी भाषणं अशा तडतडणार्या स्फोटक मिश्रणाला खदखदत ठेवतात. अशा अनुयायांच्याबाबतीत एक वेळ अशी येते की, भावनिक, आक्रमक उपद्व्याप एवढंच करणं त्यांना जमतं. या स्टेजमध्ये नेत्यांनाही अनुयायांच्या मताप्रमाणेच वागावं लागतं. (आपल्या प्रतिमेचा कैदी म्हणून मला तोगडिया खास करून दिसतात) अशा अपरिहार्यतेतून बाबरी विध्वंस किंवा गुजरात दंगल घडते.

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी मात्र आता शौचालय के बाद देवालय अशी भूमिका मांडतायत. चांगलं आहे. मेख इथे आहे की आता मोदी आणि त्यांचे समर्थक म्हणताहेत की आजच्या परिस्थितीत देवालयापेक्षा शौचालय महत्त्वाचं आहे. शौचालय हे प्रतीक आहे जनतेच्या साधारण, सामाईक आणि आवश्यक भौतिक गरजांचं. पण, ही परिस्थिती नेहमीच होती हेच तर आपण पाहिलं. याचा अर्थ उलट संघाला, भाजपला आणि पर्यायाने मोदींना आता याचं भान किंवा हिशेबी समज आली की, ९०-९२च्या काळात तरुणाई बहकवली जाऊ शकली. तशी आता बहकणार नाही. यातूनच देवालय मागे पडलं आणि शौचालय पुढे आलं. मग मुद्दा हा आहे की, ज्या असंख्य ज्ञात-अज्ञात कारसेवकांनी डोकी फोडली-फोडून घेतली, केसेस लावून घेतल्या ते मूर्ख ठरले का? बरं एवढं करूनही भव्य राम मंदिर बनलं नाही ते नाहीच शिवाय कारसेवक मात्र ठरले फक्त खलनायक. त्यांचे नेते मात्र सुमडीत भूमिका चेंज करत अडवाणी, मोदींसारखे मध्यममार्गी बनले. कारसेवकांना या सार्या प्रकरणात तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. जिथे मोदीच आता शौचालयाचा जयजयकार करत असतील, तर राम मंदिराचा मुद्दा गुंडाळून ठेवल्यातच जमा आहे. बरं, विकास केल्यावर देवालय बनणार असेल तर किती विकास हे काही भाजपने स्पष्ट केलेलं नाही. उदाहरणार्थ, विकास दर ९-१० टक्के वगैरे. तेव्हा सत्ता आली तर विकासाच्या मुद्यावर आणि सत्ता नसली तर हतबल म्हणून राममंदिराच्या जबाबदारीतून हात वर करायला मोदी, राजनाथ सिंह मोकळे! नरेंद्र मोदींनी गेल्या दोन-तीन वर्षांत राम मंदिराबद्दल काही एक स्पष्ट भूमिका घेतली आहे असं त्यांचं विधान दाखवा आणि बक्षीस जिंका अशी स्पर्धा घेण्याची वेळ आलीये. परवा आमच्या ‘माझा विशेष’च्या चर्चेत मोदी राम मंदिराबद्दल चकार शब्द का काढत नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना, बजरंग दलाचे नेते बोलून गेले की, मोदींना रामाचं नाव घ्यायची गरजच नाही! मस्त रे! चला या निमित्ताने मुसलमानी टोपी न घालणारे मोदी रामाचं नाव घ्यायलाही कचरतात हे पाहून त्यांना भंपक सेक्युलरपणाचं लर्निंग लायसन्स द्यायला हरकत नसावी. पण, यात ज्या कारसेवकांची डोकी फुटली ते तर येडे ठरले ना? गेला बाजार जसं व्हॅटिकनवाले पोप वगैरे ठरावीक काळाने चर्चकडून झालेल्या अत्याचाराबाबत माफी मागतात तशी माफी तरी संघ-भाजप मागेल का? देशाची नका मागू हवं तर किमान… तुमच्या कारसेवकांची तरी?

जाता-जाता : चर्चेदरम्यान भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी किस्सा सांगितला की, अयोध्येतील कारसेवेच्यावेळी त्यांच्यासह हजार-बाराशे लोकांना जवळच्या एका गावात पोलिसांनी ठेवलं. ते गाव स्वतःच हजारभर वस्तीचं. या हजार कारसेवकांमुळे गावाच्या सोयींवर ताण आला. सकाळी बसायची पंचाईत या कारसेवकांची झाली. अखेर कारसेवकच म्हणू लागले….च्यायला आधी इथे संडास बांधा!

 

आधी शौचालय बांधा, अशी सूचना काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली तेव्हा परिवारातील कार्यकर्ते संतापून उठले. त्यांच्या निवासस्थानाला सुलभ शौचालय असं संबोधून तिथे निर्लज्जपणे सामूहिक लघवी करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. आता या कार्यकर्त्यांची गोची झाली असेल.

(लेखक ‘एबीपी माझा’चे असो. सिनिअर प्रोड्युसर-अँकर आहेत.)

1 Comment

  1. सर्व उच्चशिक्षित, स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या विचारवंत/पत्रकारांना माझा प्रश्न आहे की सध्याच्या राजकारणातील काँग्रेस वाईट आहे, मोदी वाईट आहेत, बीजेपी नतद्रष्ट आहे, कम्युनिस्ट पचण्यास जड आहेत, सपा,बसपा, जद हे अवसरवादी आहेत. तर आम्ही सामान्य माणसांनी निवडणुकीत मत कोणाला द्यायचं? सर्वांवर टीका करता तर समाजाला दिशा दाखवण्याचं कामही तुमचंच आहे. आहे याला काही उत्तर ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *