सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवाच्या हाती माहितीचा मोठा खजिना आला आहे. परंतु अजूनही लैंगिक संबंधांबाबतची योग्य माहिती मिळवण्याबाबत आणि ती देण्याबाबत समाधानकारक चित्र दिसत नाही. त्यामुळे अपुर्या, अर्धवट आणि गैरसमजावर आधारित माहितीवर विश्वास ठेवला जातो. अशा वेळी लैंगिक संबंधांबाबतच्या समस्या मोकळेपणाने मांडणं आणि त्याला योग्य उत्तरं मिळणं गरजेचं ठरतं.
गुदभ्रंश ?म्हणजे काय? कोणत्या उपचाराने तो बरा होतो?
आयुर्वेदानुसार, रुक्ष आणि दुर्बल शरीर असलेल्या व्यक्तिची गुदा जोर लावल्याने किंवा वारंवार शौचास झाल्याने बाहेर येते. लहान मुलं आणि युवकांमध्ये गुदभ्रंश होण्याचं मुख्य कारण आहे मलावरोध. तांदूळ, मैदा, पचण्यास जड भोजन, तळलेले पदार्थ, मिठाई यांच्या अतिसेवनामुळे मलावरोधाची समस्या वाढते. अन्नाचं पचन नीट होत नाही आणि पोटात गॅस तयार होतो. त्यामुळे शौचाच्यावेळी खूप जोर लावावा लागतो. असं वारंवार घडल्याने गुदा बाहेर येते. काही वेळा गुदद्वाराला काही कारणास्तव इजा झाल्याने तेथील मांसपेशी दुर्बल होतात आणि गुदभ्रंश होतो. लहान मुलांमध्ये दुर्बलता, कृमिरोग, गुदमार्गातील मांसपेशी दुर्बल झाल्याने किंवा लघवीच्यावेळी जोर लावल्यानेही, गुदा बाहेर येऊ शकते. कृश मुलांना खोकला, अतिसार, पौरुषग्रंथी वृद्धी, मूत्रमार्गाचा संकोच इत्यादीमुळेही गुदभ्रंश होतो. गुदमार्गाला सूज येणं, मूत्राशयात अश्मरी होणं ही अन्य काही कारणं आहेत. स्त्रियांमध्ये मूलाधार फाटल्याने हा रोग होतो. वृद्ध व्यक्तिंमध्ये वयानुसार गुद भागाच्या मांसपेशी ढिल्या झालेल्या असतात. त्यामुळे हा रोग होऊ शकतो.
शौचाच्यावेळी रुग्णाने जोर लावल्यावर गुदाची श्लेष्मल कला बाहेर येते. या रोगाने पीडित रुग्णाला भयंकर वेदना होतात. काही वेळा गुदाचा बाहेर आलेला भाग हाताने आत ढकलता येतो. परंतु तसं झालं नाही तर त्याला सूज येते. अशा अवस्थेत ऑपरेशनच्या मदतीनेच बाहेर आलेला भाग आत जाऊ शकतो. रुग्णाच्या गुदामध्ये असह्य वेदना होतात आणि बेचैनी वाढते. अपूर्ण गुदभ्रंशात केवळ गुदाची श्लेष्मल कला बाहेर येते. ती गुलाबी रंगाची असते. परंतु अर्श रोगामध्ये गुदभ्रंश झाल्यास श्लेष्मल कला, कृष्णाभरक्त वर्णाची दिसते. प्रौढांमध्ये अपूर्ण गुदभ्रंश आढळतो. अपूर्ण गुदभ्रंश शौचानंतर स्वतःहून आत जातो. परंतु वेळीच उपचार न झाल्यास त्याला स्थायी रूप प्राप्त होतं. पूर्ण गुदभ्रंशात संपूर्ण गुदा गुदद्वाराच्या बाहेर येते. हा प्रकार लहान मुलांमध्ये जास्त आढळतो. यामध्ये गुदाबरोबरच आंत्राचा काही भागही बाहेर येतो. घर्षणामुळे आंत्राचा भाग सुजतो आणि कधी कधी जखमही होते. भयानक अवस्थेत त्यामध्ये सडण्याची प्रक्रिया होऊन आंत्राला छिद्र पडतं. गुदाचा भाग बाहेर आल्यावर त्याला थंड पाण्याने नीट धुवून आत ढकलावा आणि गुदद्वारावर कापडाचा जाड तुकडा ठेवून दुसर्या कपड्याने घट्ट बांधावं. तसंच वाटलेला माजू, पाण्यात विरघळवून त्या पाण्याने तो भाग धुवावा. नंतर तो आत ढकलून लंगोट बांधावा. हीरा कासीस थंड पाण्यात विरघळवून त्या पाण्याचा एनिमा देण्यानेही लाभ होतो. लहान मूल खूप दुर्बल असल्यास त्याला शार्क लिव्हर तेल अर्धा ते एक चमचा दिवसातून दोन वेळा पाजावं. लहान मुलांना अमलतासाची मज्जा दुधात मिसळून द्यावी. त्यामुळे मलावरोध दूर होऊन गुदभ्रंशात लाभ होतो. तसंच बाभळी, नागवेल आणि धातकीच्या फुलांचा काढा बनवून गुदा धुवावी किंवा त्या काढ्यात रुग्णाला बसवावं. त्यामुळे दोन-तीन आठवड्यात रुग्णाला बराच आराम मिळतो.
नियमित लैंगिक संबंध आवश्यक आहेत का? त्याचे फायदे काय?
हवामानात वारंवार बदल झाला की, डोकेदुखी, सर्दी अशा व्याधी निर्माण होतात. जीवनात घडणार्या बर्या-वाईट घटनांमुळे ताण-तणाव, नैराश्य, चिंता अशा मानसिक समस्या निर्माण होऊन त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे काही व्यक्तिंमध्ये स्थूलपणा, चेहरा निस्तेज होणं अशा समस्या निर्माण होतात. मात्र या समस्यांवर नियमित लैंगिक संबंध हा खात्रीशीर उपाय आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवाल? पण ही वस्तुस्थिती आहे. मुलांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी रोज एक सफरचंद खाण्याचा उपाय सांगितला जातो. तीच गोष्ट दाम्पत्य जीवनात लैंगिक संबंधांबाबत सांगता येईल. दाम्पत्य जीवनात लैंगिक संबंधांबाबत नियमितता असणं आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये लैंगिक संबंधांचं महत्त्व संशोधकांनी वर्णन केलं आहे. ठरावीक वयात स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन शरीरसंबंध निर्माण करून प्रजोत्पादन करावं यासाठी विवाह बंधनाचा समाजसंमत पर्याय मांडण्यात आला. ठरावीकवयानंतरच्या शरीरसंबंधांची अनिवार्यता वैज्ञानिकांना हजारो वर्षांपूर्वी पटली होती. प्राचीन वैज्ञानिकांना लैंगिक संबंधांचं महत्त्व इतकं पटलं होतं की त्यांनी चिकित्सा विज्ञानात वाजीकरण नामक एक स्वतंत्र शाखाच निर्माण केली. यामध्ये योग्य लैंगिक संबंध कसे असावेत, त्याचे फायदे-तोटे, परिणाम याबाबत ऊहापोह करण्यात आला. या शास्त्रातील माहिती महत्त्वपूर्ण असून कोणत्याही स्त्री-पुरुषांना त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. वाजीकरण शास्त्रानुसार लैंगिक संबंधांत नियमितता असणार्या व्यक्ती वास्तविक वयापेक्षा किमान सात वर्षं लहान दिसतात. याचाच अर्थ लैंगिक संबंधांत सातत्य ठेवणार्या व्यक्ती युवावस्था आणि तारुण्य अधिक काळ टिकवून ठेवू शकतात. थोडक्यात वाजीकरण शास्त्रानुसार नियमित लैंगिक संबंध हे एक प्रकारचं ‘सेक्स टॉनिक’च आहे.
वंध्यत्वाची कारणं आणि त्यावरील उपचाराविषयी सांगाल?
जननेंद्रियांभोवती अधिक तापमान निर्माण झाल्याने वंध्यत्वाची समस्या उद्भवते. त्यामुळे गार पाण्याने आंघोळ करणं, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं यासारखे उपाय अवलंबायला हवेत. पौष्टिक आहारासोबत चहाऐवजी कॉफीचं सेवन अधिक फलदायी ठरू शकतं. अर्थात स्त्रियांनी अतिरिक्त कॉफीपान केलं तर त्यांच्याबाबतही समस्या उद्भवू शकते. वंध्यत्व टाळायचं तर व्यसनांपासून कटाक्षाने दूर रहायला हवं. आपला व्यवसाय वंध्यत्वाला कारणीभूत ठरणार नाही याची जाण ठेवावी. औषधोपचार करताना डॉक्टरांशी सल्लामसलत करायला हवी. अगदी पित्तविकार नाहीसा करणारी औषधंसुद्धा वंध्यत्वाला निमंत्रक ठरतात. रोज कमीतकमी तीन लिटर पाणी प्यावे. आहारामध्ये व्हिटॅमिन सीचा वापर वाढवावा. फॉलिक अॅसिड, झिंक आदी रसायनांचा वापर हितकारक ठरू शकतो. मूसली, शतावरी, मखान्न, तालमखाना, तालमुली आदी या औषधी वनस्पती मदतकारक ठरू शकतात. वंध्यत्वावर उपचार करताना दोन लैंगिक संबंधांत पुरेसा कालावधी असणंही गरजेचं आहे. एवढी काळजी घेतली तर निकोप वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगणं शक्य आहे. केवळ दुर्लक्षामुळे अथवा भीतीमुळे या समस्येकडे दुर्लक्ष होऊ नये. तसंच वैद्यकीय सल्ल्याशिवाय काही औषधं घेतली तर ही समस्या अधिक बिकट बनेल.
– डॉ. अरुण कुमार
(अशा स्वरूपाच्या प्रश्नांवर योग्य मार्गदर्शनासाठी तसंच अधिक माहितीसाठी (०२२) २८०५३४३४, २४३३३४३४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)