५.

मला इथे बाई आणि पुरुषामधल्या भेदासारखं काहीही उपस्थित करायचं नाही. तो माझा मुद्दाच नाही. पण बाई ही बाईच असते आणि पुरुष हा पुरुषच असतो, हे नैसर्गिक विधान मात्र इथे घट्ट आहे. ते सत्य आहे आणि मला स्वतःला त्यात खालीवर काही आहे, कमीजास्त काही आहे, उच्चनीच काही आहे, या अंगाने जायचंच नाही आहे.

काही बायका माझ्या प्रेमात पडल्या असं मला वाटलं. काही बायकांनी माझा द्वेष केला असं मला वाटलं. आज मला वाटतं, बाई आणि पुरुषातल्या नात्याला नाव काहीही असो, पण ते नातं खरं प्रेम आणि द्वेषाचंच असतं. बाई आणि बाबा एकमेकांवर प्रेम तरी करतात किंवा एकमेकांचा द्वेष तरी करतात, असंच दिसतं. आणि तेच बाई-बाबा नातं असतं. तर मला तेवढ्या व्यापकपणे बोलायचं आहे. त्यातलं एकच एक कुठलं नातं धरून मला इथे मुद्याचा संकोच करायचा नाही. म्हणजे असं की, मी पुरुष आहे आणि माझ्या आयुष्यात अनेक बाया आहेत, त्या माझ्याशी वेगवेगळी नाती सांगतायेत, तर मला ती नाती फार महत्त्वाची करायची नाहीत, तर त्या सर्व जणी बायका आहेत, ही गोष्ट गृहीत धरून माझी गोष्ट सांगायची आहे. तर त्या अनुषंगाने या माझ्या आयुष्यातल्या तमाम बायकांना माझ्यात काय सापडलं आणि काय सापडलं नाही, त्यांनी माझ्याकडून काय काय अपेक्षा केल्या आणि मी त्या त्या अपेक्षांना पुरा पडलो का, असा मला पडलेला साधा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचा हा साधा शोध आहे. त्यातून बापपणाचा हा मुद्दा मला सापडला. पण त्या बाईला बाप हवा असतो म्हणजे ती कमकुवत असते, ती बाई असते म्हणून दुर्बल असते, बाप पुरुष असतो म्हणून ताकदवान असतो, असलं काहीही निरर्थक इथे कटाक्षानेही म्हणायचं नाही आणि तसं घाणेरडं काही म्हणूही नये.

माझ्या लक्षात आलंय की, ठरवलं तर बाई पुरुषाशिवाय जगू शकते आणि पुरुष बाईशिवाय जगू शकतो. तशा जगण्याच्या बाबतीत दोघं समानच ताकदवान असले तरी, तसलं जगणं हे जगण्याच्या नैसर्गिक आणि मूळ उद्देशांपासून दूर भटकणारं आणि जगण्याचं इंगित घालवून बसणारं असतं. तर बाई आणि बाबामध्ये नाती काहीही असोत-नसोत, त्यांच्यातलं साहचर्य हे अंतिम सत्य आहे आणि तेच त्यांच्यातलं खरं नातं आहे. तर माझ्या आयुष्यात आलेल्या बायकांच्या रूपाने, आजवरच्या जगण्याच्या अनुभवावरून, मी पडताळायचा प्रयत्न केला की, त्या सर्व बायकांना मी काय म्हणून हवा होतो आणि काय म्हणून नको होतो? मला त्या बायका काय म्हणून हव्या होत्या आणि काय म्हणून नको होत्या? त्या माझ्याकडे कुठल्या नजरेने पाहत होत्या आणि मी त्यांच्याकडे कुठल्या नजरेने पाहत होतो? त्यानुसारच मला हा मुद्दा गवसत गेला की, त्या सर्व बायका माझ्यातून एका बापाची अपेक्षा करत होत्या. वरवर त्यांची-माझी नाती आणि त्या नात्यांची नावं काहीही असतील, पण त्या सर्व जणींना माझ्यातला बाप हवा होता. मी त्यांना त्यांचा बाप व्हायला हवा होतो.

तर त्यातून प्रश्न पडण्याच्या नेहमीच्या सवयीने पुन्हा प्रश्न पडला की, होऊ शकलो का मी त्यांचा बाप? त्यातल्या एका तरी बाईची मी तिचा बाप होण्याची अपेक्षा पूर्ण झाली का?

तर याही प्रश्नाचं उत्तर जरा गूढ, गहनच आहे, असं माझ्या लक्षात आलं.

६.

पण त्याच प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता, बाप म्हणजे काय ते सापडलं. बाप म्हणजे पुरुष. म्हणजे लैंगिक अर्थाने पुरुष नाही, तर जगात दोन जीव जगत असतात, बाई आणि बाबा या नावाने, त्यातला पुरुष. त्यातलं नुसतं लिंगाचं नातं त्याचं तिच्याशी महत्त्वाचं नाही, तर त्याचा मेंदू, मन, शरीर आणि त्याचं एकूणच अस्तित्व यांचं तिचा मेंदू, मन, शरीर आणि तिचं एकूणच अस्तित्व यांच्यात असलेलं नातं. त्याला बाई आणि बाबा या नात्याशिवाय दुसरं नाव नाही.

हे खरंच की, दोघं माणूसच असतात. शास्त्रीयदृष्ट्या तर म्हणे दोघांच्या शरीररचनेत फारसा फरक नसतोच. फक्त निसर्गचक्र किंवा जन्मउत्पत्तीचं चक्र चालू ठेवण्यासाठी दोघांच्या शरीरातल्या काही अवयवांचे उभार कमीजास्त होतात आणि बाईला फक्त शरीर घडता घडता एक गर्भाची पिशवी आणि जननाचं एक सूक्ष्म बिजांड आणि पुरुषाला एक सूक्ष्म शुक्रजंतू मिळालेला असतो, एवढा एक अल्प फरक सोडला, तर दोघांची शरीरं, शरीराच्या संवेदना, चेतना असं सर्व सर्व अगदी अगदी एकसमान असतं. नसा, रक्त, स्नायू, मेंदू, मन असं सगळंच एकसारखं.

तर जगणं जगण्याच्या दृष्टीने दोघंही समतल, समप्रमाणच असतात. दोघांचीही जगायची ताकद एकसमानच असते. जगण्याला स्त्री-पुरुष असा भेद नसतो. किंचितही फरक नसतो.

तरीही मग प्रश्न निर्माण झाला की, त्या दोघांतल्या बाई म्हणवणार्या मानवी देहाला, त्यातल्या पुरुष म्हणवणार्या मानवी देहातून बाप का हवा असतो? बाप हवा असतो म्हणजे नेमकं काय हवं असतं? आणि तिला तो मिळतो का? निरनिराळ्या नावांनी तिच्या भोवती वावरणारी जी पुरुषनाती असतात, त्यातलं एक तरी नातं तिच्या बापपणाच्या अपेक्षेत पूर्णपणे उतरतं का? आणि मुळात बाईला जन्म देणारा, सख्खा असा एक बाप असतोच, तर तो सोडून ती इतरही पुरुषांमध्ये बाप का शोधायला निघते? काय हवं असतं तिला बाप हवा असतो म्हणजे? आणि तिचा सख्खा, जन्मदाता बाप तिला ते हवं असतं ते देऊ शकत नाही का?

आणि या प्रश्नाचं एक साधं सरळ उत्तर तात्त्विकपणे मला असं सापडलं की, तसंच असणार. तिचा सख्खा, जन्मदाता बाप तिला जे काही हवं, ते देऊ शकत नसणार. म्हणूनच तर ती दुसर्याही पुरुषांमध्ये बाप शोधायला निघते ना! आपल्या बापातून आपल्याला हवा तसा बाप मिळत नाही म्हटल्यावरच बाई आपल्यासाठी दुसरा बाप शोधायला निघत असणार ना!

म्हणजे, हे काही तिच्या भुकेसारखं आहे का? बाईला बापाची भूक असते असं म्हणायचं का? आणि ती भूक तिचा सख्खा, जन्मदाता बाप भागवू शकत नाही का? यावर, हो असंच म्हणायचं?

पण पुन्हा प्रश्न – म्हणजे काय?

७.

मग मी विचार करायला लागलो माझ्या आयुष्यात आलेल्या बायकांचा. त्या आपल्या सख्ख्या, जन्मदात्या बापांबद्दल माझ्याशी काय काय बोलल्या ते मी आठवायला लागलो आणि लक्षात आलं की, त्या सगळ्याच्या सगळ्या बायका आपल्या सख्ख्या, जन्मदात्या बापावर नाराजच होत्या. त्यांना हवा तसा बाप मिळालेला नाही, अशीच त्यांची भावना होती. आपल्या बापामुळे त्या दुखावलेल्याच होत्या.

का बरं असं?

एवढा त्यांचा बाप त्या बायकांच्या जन्मासाठी आपल्या पत्नीशी मेहनतीने समागमरत झालेला असतो, मोठ्या कष्टाने त्याने त्यांना जन्म दिलेला असतो, मोठ्या कष्टाने त्यांना वाढवलेलं असतं, बाप राब राब राबलेला असतो त्या बायकांच्या पालनपोषणासाठी आणि तरीही त्या बायका बापावर नाराज? तरीही त्या बायकांना आपला बाप पुरेसा वाटत नाही? तरीही त्या एक बाप असताना दुसर्या पुरुषांमध्ये दुसरा बाप शोधायला निघतात? ही काय गडबड आहे? ही काय भानगड आहे? असं कसं होतं? आणि का होतं?

८.

तर जगात मुख्य नाती दोन. एक आई, दुसरं बाप. सगळ्याच माणसांना ही दोन्ही नाती हवीशी वाटतात. इतर नात्यांबद्दल वाटत नाही, इतकी या नात्यांबद्दल ओढ वाटते आणि इतर कोणत्याही नात्यांपेक्षा ही दोन नाती जास्त खरी असतात. आणि नातं नावाची गोष्ट माणसाच्या आयुष्यात निर्माण व्हायला हीच दोन नाती खर्या अर्थाने कारण, कार्यप्रवण असतात. स्त्री-पुरुष किंवा नैसर्गिक शब्दात बोलायचं तर नर-मादी अशी त्यांची ओळख असते आपापली स्वतंत्र आणि तेच त्यांचं नातं असतं. ते नर-मादी म्हणून एकत्र येतात, एक नैसर्गिक कृती करतात मिलनाची आणि त्यातून पुढे नात्यांची गुंतवळ निर्माण होत जाते. त्यातली मादी अपत्य जन्माला घालते आणि तिला आई अशी, तर अपत्याला अपत्य अशी ओळख मिळते. त्याच अनुषंगाने नराला बाप अशी ओळख मिळते.

नात्यांना प्रत्यक्षात काही अस्तित्व नसतं. ती मनाने मानण्याची गोष्ट असते. बाई-बाबाचा समागम होतो आणि बाई अपत्याला जन्म देते, या दोन बारक्या घटना फक्त माणसाशी एकमेकांची जवळीक आहे किंवा संबंध आहे असं दर्शवणार्या आहेत. याव्यतिरिक्त संबंधाची किंवा नात्याची कोणतीही तिसरी शारीरिक घटना माणसाच्या आयुष्यात घडत नाही. आणि तेवढ्या दोन घटनांच्या बळावर माणूस एक नात्यांची लांबड किंवा माळ मानत जातो. पूर्वी, आदिम काळात मी नव्हतो, पण तरीही असं म्हणतात की आणि त्या म्हणण्यावर विश्वास ठेवून म्हणायचं तर, त्या काळात नातीबिती अशी भानगड नव्हती. कुणी कुणाला काहीच मानत नव्हतं. नर-मादी एवढंच नातं. तेही समागमापुरतं आणि मादीने जन्म देण्यापुरतं. त्याउपर एकमेकांशी काही घेणंदेणंच नाही. आज आई म्हणून जी महतीची कवनं रचण्याचा काळ आहे, त्याचा त्या काळी तपासही नव्हता. साक्षात आईलाच अपत्याचं काही घेणं नसे. मुलगा जन्माला आला तर तो नर आणि मुलगी जन्माला आली तर ती मादी.

पुढे माणूस प्रगत झाला आणि त्याला नाती कळून तो एकेका नात्याला नावं ठेवत गेला. ही माणसाची खरी प्रगती म्हणायची. नात्यांची गुंतवळ माणसाने रचली आणि त्या रचनेने माणसाच्या जगण्यात भावनांचा गुंता निर्माण झाला.

आदिम काळात अपत्याला एक वेळ आई कळण्याची शक्यता असेल पण बाप कळण्याची शक्यता अजिबात दुरापास्त असावी. पण माणसाने नात्यांची साखळी साधण्याची प्रगती गाठली आणि अपत्याला बाप कोण, आई कोण हे कळण्याची व्यवस्था झाली.

मग नाती कळण्याच्या त्या व्यवस्थेने कोणत्या नात्याचं काय काम, कर्तव्यं काय, जगणं कसं, वागणं कसं याची व्यवस्था लावून दिली. त्या व्यवस्थेनुसारच आजचा माणूस जगतो-वागतो आणि नाती मानतो. ती मनाने गृहीत धरतो. माणूस जिवंत असेपर्यंत आणि तो मेल्यानंतरसुद्धा त्याच नात्याच्या नावाने ओळखला जातो. त्या नात्याला जे नाव असतं ते पुढच्या कितीही पिढ्या टिकून राहण्याची आता सोय असते.

या सोयीत आजचा माणूस अडकलेला आहे. प्रत्येक नात्याचं काम वाटून देण्याचंही काम त्याने केलेलं आहे. आणि ते काम गृहीत धरण्याचा पगडाही आजच्या माणसाच्या मनावर पूर्ण बसलेला आहे. माणसाच्या जगण्यावागण्याचं व्यवस्थापन आता ठरलेलं आहे. त्यात आई म्हणजे कोण, काय, बाप म्हणजे कोण, काय, आई काय काय करणार, बाप काय काय करणार, अपत्य म्हणजे कोण, काय, अपत्य काय काय करणार, त्यातही अपत्य म्हणजे मुलगा आहे की मुलगी, मुलगा असणं म्हणजे कोण, काय, तो काय काय करणार, मुलगी असणं म्हणजे कोण, काय, ती काय काय करणार, अशा सगळ्या सगळ्या गोष्टी आता ठरलेल्या आहेत, जगभर रुजलेल्या आहेत आणि त्या ठरलेल्या गोष्टींचे संस्कार आई, बाप, अपत्यं, त्यांचीही अपत्यं, अशा सर्वांवर होत राहण्याची पिढ्या न् पिढ्यांची व्यवस्थाही आता समाजात आहे.

आणि या व्यवस्थेनेच आईच्या आईपणाला न् बापाच्या बापपणाला न् त्यांच्याकडून जन्माला येणार्या अपत्यांच्या अपत्यपणाला न् त्यातल्या मुलग्यांच्या मुलगेपणाला न् मुलींच्या मुलीपणाला काही काही मोल देऊन ठेवलेलं आहे आणि या व्यवस्थेतल्याच ज्या मुली आहेत, त्यांच्याशी माझ्या किंवा माझ्याशी त्यांच्या असलेल्या नात्यांबद्दल मी इथे बोलतो आहे.

या तमाम मुलींशी माझी नाती काहीही असली न् त्या नात्यांना काहीही नावं असली तरी, त्या सर्व मुलींना माझ्यातून कायम एक बाप अपेक्षित राहिला, हे मला लक्षात आलेलं इथे सांगायचं आहे.

म्हणजे, असा एक जन्म देणारा बाप, आणि त्याची ठरलेली कामं व्यवस्थेत असताना, त्या मुली – त्यात माझी आई, बहिणी, बायको, मैत्रिणी, प्रेयस्या, वेश्या, अशी सगळी बाईप्रजा आली – माझ्यातही येऊन आणखी एक बाप शोधतात, म्हणजे त्या व्यवस्थेत काही गडबड आहे का?

काही घोळ आहे का? काही न्यून आहे का? की त्या मुलींनी असा दुसराही बाप शोधणं, ही त्या व्यवस्थेची चांगली आणि भरीव गोष्ट आहे? काय आहे काय ही नेमकी भानगड?

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *