अमेरिकेत आरोग्याबद्दलच्या विमा योजनेच्या धोरणावर ‘शट डाऊन’ घोषित करण्यात आला १७ वर्षांनंतर १७ व्या वेळी! जागतिक पातळीवर याचे पडसाद विविध तर्हेने उमटले. परंतु याचा विचार मी एक भारतीय नागरिकम्हणून केला. तसंच यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालयात काम करताना आणि रुग्णसेवेबरोबरच भावी डॉक्टरांची पिढी तयार होत असताना झालेल्या विचारमंथनातील विचार इथे मांडत आहे.

पाश्चात्यांचं अनुकरण हे सर्वच बाबतीत आरोग्यदायी ठरेल असं नाही. अमेरिकेत ‘ओबामा केअर’ १०० डॉलर्स किंवा त्याहून कमी दरात प्रतिमहिना आरोग्य संरक्षण अर्थात आरोग्याकरताचा विमा देण्याचा मनसुबा प्रत्यक्षात रुजू करण्याचा प्रयत्न होत होता. मात्र त्यावेळेसच तेथील प्रशासनास ‘बंद’ घोषित करायची वेळ आली. अमेरिकेत ही परिस्थिती तर युरोपात नागरिकांकडून घेत असलेल्या विविध करांतून आरोग्यासाठी एक रक्कम घेण्यात येते आणि मग काही वर्षांपर्यंत औषधांचा खर्चदेखील सरकारतर्फे करण्यात येतो. आजमितीस औषधं नागरिकांना विकत घ्यावी लागतात परंतु बाकी खर्चाचा विचार करावा लागत नाही. नागरिकांचं आरोग्य राखण्याकरता एखाद्या देशाने अर्थसंकल्पात किती टक्केराखून ठेवावेत हे राज्यकर्ते ठरवतात. पण आपल्या संसारातील अनेक संकल्प मात्र मानसिक आणि शारीरिक आरोग्याला नवा अर्थ प्राप्त करून देतात आणि यात घरातल्या गृहिणीचा अथवा गृहलक्ष्मीचा वाटा सर्वात मोलाचा ठरतो. आमच्याकडील महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेड्यातून आलेला विद्यार्थी सांगता झाला, ‘कशाला हवा Insurance? Insure करून आयुष्य Ensure करता येणार आहे का? स्वावलंबन महत्त्वाचं! स्वतःचं जेवण स्वतः करायचं असा आमच्याकडे दंडक असल्यामुळे मी १० वर्षांचा असल्यापासून पावसाळ्यात पाणी उकळून गाळून घेण्यापासून ते भाकरीचं पीठ मळून देण्यापर्यंत मदत करत असे. मेडिकलला शिकायला मुंबईला आलो तेव्हा स्वतःसाठी वरणभात करून घेता येत होता मला. मेस बंद असेल तर माझं नाही अडलं कधी. आमच्याकडे मोजके पैसे होते. पुस्तकांना कमी नव्हते पण सिगरेटवर जाळण्याइतके जास्तही नव्हते. जेव्हा मित्रांनी एक झुरका मारायला सांगितला तेव्हा मी झटकन त्यांना सांगता झालो, ‘विकतचं दुखणं घ्यायला माझ्या वडिलांकडे पैका नाही त्यापेक्षा माझ्याबरोबर पाय मोकळे करायला मैदानावर येता तर चला.’ काय संबंध आहे या सार्याचा ‘विम्याशी?’ आमच्या या स्वाभिमानी आणि स्वयंप्रेरित विद्यार्थ्याने मोठी त्रिसूत्री सांगितली आरोग्याच्या विम्याकरता. योग्य प्रतिबंधक उपाय, स्वावलंबन आणि स्वहित जपणं आणि वेळीच प्रलोभनांना नाही म्हणणं… हेच तर महत्त्वाचं आहे, नाही का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *