सप्टेंबर महिना संपत आला की मान्सूनचा पाऊसही आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. हा परतीचा मान्सून खूपच लहरी असतो. तो कधी बरसेल याचा भरवसा नसतो. पण जाताना आपली आठवण राहील असा पडतो. साधारण याच दिवसात आपण गणेशोत्सव साजरा करतो. मुंबईसारख्या शहरांमध्ये तर सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. अशा उत्सवांच्या ठिकाणी अनेक लोक भेट देतात. सगळीकडे माणसांची गर्दी दिसून येते. मात्र या गर्दीचे परिणाम मात्र नंतर दिसून येतात. शहरात तसंच समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला दिसून येतो. त्यामुळे जल प्रदूषण होत असतानाच या काळात ध्वनी प्रदूषणानेही उच्चांक गाठलेला असतो. एकंदरच वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असतात.

आणि तेव्हाच ऑक्टोबर हीटची चाहूल लागते.

ऑक्टोबर महिना आला की हवेत एक प्रकारची उष्णता निर्माण होते. वातावरणातील महत्त्वाच्या बदलाचा हा काळ असतो. परतीच्या मान्सूनच्या उष्ण वार्यांनंतर थंडीला सुरुवात होणार असते. या काळात तापमानात वाढ झालेली असते. जमिनीतला ओलावा कायम असला तरी वाढत्या तापमानामुळे अधिक उष्णता जाणवते. यालाच ऑक्टोबर हीट म्हणून ओळखतात. सकाळच्या वेळात खूप गरम हवामान तर रात्री खूप थंड आणि आल्हाददायक वातावरण असतं. मात्र या हवामान बदलाच्या काळात आरोग्य समस्या निर्माण होतात.

ऑक्टोबर हीटच्या काळात दमट आणि उष्ण हवामानामुळे घाम खूप येतो. यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि थकवा जाणवतो. सतत तहान लागते. त्यामुळे पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं. अशावेळी पाण्याबरोबरच फळांचा रस, नारळ पाणी, बार्ली वॉटर तसंच ताक, गार दूध अशी पेयं घ्यावीत. कोल्डड्रिंक्स घेणं टाळून त्याऐवजी ग्रीन टी, पुदीना घातलेला चहा, कोल्ड कॉफी यांना प्राधान्य द्यावं. कोकम सरबतासारख्या पेयांनी तर तहान भागण्याबरोबरच आपली पचनशक्ती आणि रोगप्रतिकारकशक्तीही वाढत असल्यामुळे अशी पेयंदेखील आवर्जून घ्यावीत. आणि याबरोबरच कलिंगड, संत्र, सफरचंद अशी फळं खावीत. काकडी, गाजर, टोमॅटो यांचाही आहारात समावेश करावा. एकाच वेळेस खूप खाऊ नये तर दोनदोन तासांनी योग्य तो आहार घ्यावा. या काळात सुती आणि सैलसर कपडे घालावेत. तसंच उन्हात फिरताना टोपी किंवा स्कार्फचा वापर करावा. ताप किंवा सर्दी याचा त्रास वाढल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यामुळे तापमानातील या बदलाला सामोरं जाणं सोपं जाईल आणि येणार्या थंडीचं आपण निरोगी वातावरणात स्वागत करू शकू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *