दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी समुद्रात गेलेल्या मुंबईकरांना पर्यावरणातील बदलामुळे Stingray च्या ‘स्टिंग’ला सामोरं जावं लागलं. तसंच Eel Fish, Jellyfish  आणि Juvenile Stingray या जातीच्या समुद्रातील जीवांनी त्यांची जैविक साखळी मानवाने बिघडवल्याने की काय समुद्र किनार्याजवळ येऊन गणपती विसर्जनाकरता आलेल्या मुंबईकरांना आपली आठवण करून दिली. मात्र बहुतकरून हे स्टिंगरे विषारी नसले तरी त्यापासून येणारी अॅलर्जिक रिअॅक्शन मात्र त्रासदायक ठरू शकते.

‘स्टिंगरे’चा दंश हा दुखरा असतो. कळ जाते ती त्यातील ‘प्रथिनयुक्त’ Venom  अथवा विषामुळे Venom असलं तरी ३० ते ९० मिनिटं ती कळ कमी व्हायला लागतात आणि तिचा वेगही कमी होतो. परंतु रक्त वहात राहिलं, पायावर सूज वाढू लागली, छाती भरून आल्यासारखी वाटली तर मात्र जवळच्या हॉस्पिटलमध्ये अॅलर्जिक रिअॅक्शन नाही ना याची खात्री करून घ्यावी.

प्रथमोपचारात जितकं सहन होईल तितकं गरम पाणी जखमेवर घातलं किंवा त्याचा ‘शेक’ घेतला तर दुखणं तर कमी होतंच पण विषातलं Protin अधिक तापमानाला Denature झाल्याने त्याचा विषारीपणा निघून जातो. जखमेतून रक्त वहात असलं तर ते थोडं वाहून जाऊन द्यावं आणि मग ती जखम जंतुनाशक सोल्युशनने स्वच्छ करून गरम पाण्याचा शेक द्यावा. Venom हे अॅसिडीक असतं आणि त्यामुळे त्यावर Alkaline सोल्युशनचा वापर केल्याने लवकर आराम मिळतो. गरम पाण्यात बुडवलेला टॉवेल अथवा बादलीत गरम पाणी घेऊन शेकल्याने खूप फायदा होतो. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने Antibiotic घ्यावं, ज्यायोगे इन्फेक्शनचा त्रास टळेल.

मुंबईत गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर ज्यांना या काही दिवसांत समुद्रात उतरावंच लागणार आहे त्यांनी वरून बंद असलेले रबरी बूट वापरले तर माशांचा दंश होण्याचं प्रमाण कमी होईल. मुंबई महानगरपालिकेने आता यासाठी प्रथमोपचार केंद्रं उपलब्ध करून दिली आहेत. पण मुंबईकरांनीही योग्य ती काळजी घेतली तर त्याचा फायदा निश्चितच होईल.

शास्त्रज्ञांनी आणि वैज्ञानिकांनी पर्यावरण साखळीचा अभ्यास करताना कासवांचं आणि Turtles च्या कमी झालेल्या प्रमाणामुळे या Jellyfish, Stingray आणि Eels माशांचं प्रमाण वाढलेलं आहे अशी याची कारणमीमांसा केली आहे. तेव्हा यातून मिळालेला संदेश म्हणजे मला वाटतं आपण सर्वांनी संघटित प्रयत्नाने पर्यावरणाचा होणारा र्हास टाळायलाच हवा असा आहे.

तसंच मुंबईबरोबरच देशातल्या बिघडलेल्या मानवी मनाचे दंश टाळायला आपल्या लेकीसुनांना स्वसंरक्षणाचे धडेही गिरवायला लावायची वेळ आली आहे. स्टिंगरेच्या दंशावर प्रथमोपचार आणि Treatment ने जखम बरी होते. पण मानवी अपप्रवृत्तीचे वाढते अत्याचार रोज वाचताना मनात येतं यावरचा उपाय डॉक्टर म्हणून आमच्या हातात थोडा, तर समाजाच्या हातात अधिक आहे. गणरायाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ हे आवाहन करताना एकच आळवणी… मुंबईचं मानसिक आणि सामाजिक आरोग्य सुधारायची जबाबदारी पार तर पाडता येऊ देच पण त्याचबरोबर मानवनिर्मित आजार टाळण्यात तरी यश येऊ दे ही प्रार्थना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *