एकंदरीत काय माझा आता खलनायकांवरचा पण विश्वास उडायला लागलाय. पूर्वी सिनेमा किंवा नाटक बघताना मी रागाच्या भरात त्यांना चार सणसणीत शिव्या द्यायचे. (ते बापडे त्या गोड मानून घेत) बोटं मोडायचे (माझी), शाप द्यायचे. पण ते सगळं तात्पुरतं असायचं. प्रत्यक्ष जीवनात ते खूपच चांगले वागायचे. (तिकडे वाईट वागून वागून त्यांना कंटाळा यायचा बहुतेक) सदाशिव अमरापूरकर आणि निळू फुले यांनी समाजकारणात हिरिरीने भाग घेतला. खूप संवेदनशील व्यक्ती म्हणून ते वावरले. पण परवा ओम पुरीच्या दुसर्या बायकोने नवर्याने मारहाण केल्याची तक्रार केली हे ऐकून माझी वाचाच बसली. (म्हणून लिहितेय)

ओम पुरी अजून भूमिकेतून बाहेर आले नाहीत की काय? की त्यांना कुणालातरी अधूनमधून बदडलं नाही तर अस्वस्थ वाटतं! या मारहाणीच्यावेळी ते आपले जुनेच काही डायलॉग्ज् बोलले असतील की स्वतः नवीन रचले असतील कोण जाणे… अर्थात अशा घरात केलेल्या मारहाणीचे त्यांना पैसे कोण देणार? मग म्हटलं या सगळ्या प्रकरणाची एकदा तडच लावून टाकूया. म्हणून जरा सगळ्या पेपरमधल्या बातम्या वाचल्या तर त्यांच्या पहिल्या घटस्फोटित बायकोने परत यांच्या संसारात नाक खुपसल्यामुळे दुसर्या बायकोला खूप राग आल्याचं कळलं. (त्या नाकात हिर्याची नवी चमकी होती की काय?) पहिल्या बायकोला तीन बेडरूमचा (?) ५० लाखाचा एक बंगला घेऊन दिलाय तर तिने तिथेच गुपचूप राहायचं सोडून परत इकडे यायचंच का? असं हिचं म्हणणं! एकंदरीत हे सवती सवतींमधलं खरं भांडण आहे… जाऊ दे दोघींना दोन छानशा साड्या देऊन, टाका मिटवून! सारख्याच किमतीच्या पण वेगवेगळ्या रंगाच्या घ्या. म्हणजे परत परत भांडणं नकोत. युद्धात जिंकणं सोपं पण घरच्या आघाडीवर जिंकणं कठीण असं म्हणतात, ते काही खोटं नाही. घरी जिंकलं तरी तोंड हरल्यासारखंच पाडावं लागतं, तर कुठे निभाव लागतो. अभिनय काय फक्त अभिनेत्यालाच करावा लागतो? उलट अभिनेते या गोष्टी सामान्य माणसाकडून शिकतात आणि त्याही फुकटात!

बाकी काय चाललंय आपलं! मधेमधे जनजीवन विस्कळीत. मधेमधे सुरळीत. दहीहंडीचा उत्सव यंदाही अत्यंत उत्साहात पार पडला. पैशांचे थरावर थर रचले गेले. एका ठिकाणी तर ५५ लाखांची दहीहंडी बांधली होती. (आत दही पाच रुपयांचं) हे पैसे कोण देतं? म्हणजे एकच माणूस देतो की ५५ माणसं देतात? आणि त्या बदल्यात ते काय घेतात? कारण राजकीय नेते बँकेचं कर्ज काढून नक्कीच दहीहंडी करणार नाहीत. शिवाय कुणाकुणाला नाचवलं बिचवलं त्यांचे पैसे वेगळेच. काही राजकीय नेत्यांचं वागणं ओंगळ होतं तर काही सारखे फॅशन शोसारखे कपडे बदलत होते.

मुलांची मेहनत सच्ची होती. पण पैशांचं प्रदर्शन हिडीस वाटलं. या ५५ लाखांत काय काय आलं असतं. एखादी छानशी सुसज्ज व्यायामशाळा उभी राहिली असती. (माझ्या डोळ्यांसमोर काय नेहमी साड्या आणि दागिनेच येत नाहीत). सकाळ संध्याकाळ मुलांनी तिथे फिटनेसचे धडे घेतले असते. योगाचे क्लासेस चालवता आले असते. बाबा आढावांनी पुण्यात चालवलंय तसं स्वस्त सकस रुचकर जेवणाचं केंद्र चालवता आलं असतं. त्यात दहा बारा बायकांना कायमचा रोजगार मिळाला असता. दहा एक लाख उधळून (हे शब्द उधळायला पण जड वाटतं) उरलेल्या पैशात कायतरी एक चांगलं काम उभं झालं असतं. तर पुढच्या निवडणुकीत त्यांनाच बरं पडलं असतं! निवडणुकीत त्यांनाच बरं पडलं असतं! मी आपलं काय सुचवायचं काम केलं. राजकीय नेते जर काटकसरीने वागले तर ते खर्या अर्थाने जनतेला आपले वाटतील. त्यांच्या बायकांनी याबाबतीत तरी त्यांचे कान भरावेत, ही नम्र विनंती.

या आठवड्यातली चांगली बातमी म्हणजे टुंडानंतर यासीन भटकळला अटक करण्यात आपल्या यंत्रणेला यश मिळालं. किती वेळ माझा विश्वासच बसेना. पण चांगली गोष्ट झाली. शक्ती मिलमधल्या बलात्कार्यांना पण अटक झाली. आता या सर्वांना चांगली घसघशीत शिक्षा लवकरात लवकर होऊ दे. दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातील आरोपींना अजून शिक्षा झाली नाही. शिक्षा लवकर झाली तरच वचक बसेल. उशिराने न्याय म्हणजे एकप्रकारे अन्यायच! हे आता कोणी कुणाला सांगायचं?

बाकी आपलं आमचं म्हणतात तसं बरं चाललेलं आहे. श्रावण महिना संपायला आलाय. हल्ली उपास करायला पण परवडत नाही अशी परिस्थिती आलीय. साबुदाणा आणि शेंगदाणा शंभरीच्या घरात जाऊन बसलेत. कसा करायचा उपास? आणि साबुदाण्याच्या खिचडीशिवाय उपास म्हणजे कुंकवाविना हळदी कुंकू केल्यासारखं आहे. वरीचा तांदूळ पण महाग झालाय. साबुदाण्याची खिचडी जर चांगली झाली तर जिचा उपास आहे तिला ती अगदीच कमी मिळते आणि समजा बिघडली तर एवढी महाग वस्तू म्हणून चावून चावून ताकाच्या घोटाबरोबर गिळावी लागते. एकंदरीत स्त्रियांच्या समस्या वाढतच चालल्यात. तेव्हा मायबाप सरकारने इतर धान्याबरोबर साबुदाणा पण दीड नको निदान सव्वा दोन नाही? बरं अडीच रुपये किलो दराने पुरवायला हवा. म्हणजे दोन लेझची पाकिटं आणि ताटभर खिचडी खाऊन गरिबांना उपास करता येतील.

गरिबांसाठी एवढ्या योजना सरकार काढतंय की उद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही महिन्यातला एक दिवस सरकार जेवण ठेवेल, त्याचं बाई काय सांगता येत नाही. या महागाईच्या दिवसात कामधंदा नोकरी सोडून गरीब होणं हेच फक्त परवडण्यासारखं आहे. शेवटी

ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणतात ना तेच खरं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *