मोतीराम भावे म्हणजे अथांग, व्यापक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व… ज्यांची प्रेरणा आज घेण्याची गरज आहे. १९७३ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि मोतीराम भावेंचा राजकीय आणि सामजिक प्रवास सुरू झाला. बदल घडायला हवेत हे नुसतंच बोलत न राहता बदल घडवण्यासाठी त्यांनी कृती केली. या कृतीतूनच आज वर्सोवाच्या समुद्र किनारपट्टीवरील बरीच गावं मूलभूत सुविधांसह वसली आहेत. भावेंनी ही गावं नुसती वसवली नाहीत तर त्या गावातील मच्छीमारांच्या रस्ते, पाणी या गरजा पूर्ण केल्या. त्याचसोबत मच्छीमारांना त्यांच्या व्यवसायात येणार्या प्रत्येक प्रश्नासाठी, समस्येसाठी ते लढले. अगदी दिल्लीपर्यंत गेले… अंधेरी स्पोर्ट्स क्लब हे भव्य आणि आंतरराष्ट्रीय मैदान त्यांच्याच प्रयत्नाने बांधलं गेलंय. अशा या समुद्रासारख्या अथांग व्यक्तिच्या जीवनावरती साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि साप्ताहिक ‘कलमनामा’चे संपादक युवराज मोहिते यांनी ‘गाथा एका समुद्राची’ हा माहितीपट बनवला आहे. या माहितीपटाचं प्रदर्शन आणि मोतीराम भावे यांचा नागरी सत्कार समारंभ नुकताच वर्सोवा येथील भावेंच्याच प्रयत्नाने उभ्या राहिलेल्या वर्सोवा वेल्फेअर हायस्कूलच्या सभागृहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. आपल्या ग्रामविकास मंत्रीपदाच्या कारकिर्दीत सलग तीन वेळा उत्कृष्ट ग्रामविकासाचा केंद्र शासनाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याला मिळवून देणारे जयंत पाटील हे एकमेव मंत्री… आणि अशा मंत्र्यांच्या हस्ते मच्छीमार नेते आणि माजी नगरसेवक मोतीराम भावे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मुंबईचे महापौर सुनिल प्रभू, मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते शैलेश फणसे हेही उपस्थित होते तर या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी भूषवलं.

कार्यक्रमाची सुरुवात समृद्धी किणी यांनी आपल्या ‘या कोलीवार्याची शान आई तुझं देऊल..’ या गाण्याने केली. समृद्धी यांच्या गाण्यानंतर १९६० साली मोतीराम भावे यांनी स्थापन केलेल्या वीर कोतवाल शाहिरी कला पथकाच्या जगन्नाथ सिद्धे यांनी भावेंच्या आवडीचं ‘धनगर राजा…’ हे गाणं सादर केलं. आणि या गाण्यानंतर युवराज मोहिते यांनी लेखन, दिग्दर्शन केलेल्या ‘गाथा एका समुद्राची’ हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. हा माहितीपट मोतीराम भावे यांच्या संपूर्ण आयुष्यावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर बेतलेला आहे. याचवेळी या माहितीपटाच्या सीडीचंही प्रकाशन करण्यात आलं. मोतीराम भावे, जयंत पाटील, सुनिल प्रभू, शैलेश फणसे, रामभाऊ पाटील, युवराज मोहिते या मान्यवरांनी या सीडीचं प्रकाशन केलं.

आपल्या प्रास्ताविकात युवराज मोहिते यांनी, ‘हा माहितीपट मी माझ्या स्वार्थासाठी बनवला आहे हे सांगत तो स्वार्थ म्हणजे असेही नेते असतात किंवा होते हे माझ्या मुलाला समाजावं…’ असं सांगितलं. भावेंच्या गळ्यातील मफलरच्या निमित्ताने जयंत पाटील यांना युवराज मोहिते यांनीकोपरखळी मारली. ते म्हणाले, ‘पाटील साहेब, तुमचे भुजबळ आता मफलर घालतात. भावेंकडे पहा… तेव्हापासून ते मफलर वापरताहेत…’ भावे सरांचा आदर्श हा नेहमीच आपल्यासोबत असायला हवा असं मत रामभाऊ पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं. तर महापौर सुनिल प्रभू यांनी आपल्या भाषणात युवराज मोहिते यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या केलेल्या कामांचा आढावा घेत त्यावेळेचे वॉर्ड खूप मोठे असूनही भावे सरांनी एवढी प्रगती केली, हा आदर्श आम्ही नेहमीच सोबत बाळगत आलेलो आहोत, असंही सांगितलं. जयंत पाटलांनी युवराज मोहितेंनी बनवलेल्या माहितीपटाचं कौतुक केलं. आपल्या वडिलांचे आणि भावे सरांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं सांगत त्यांचं सामाजिक योगदान कधीच विसरणं शक्य नाही. एवढे वयस्कर होऊनही त्यांच्या परिस्थितीत आणि मनःस्थितीत टीचभरदेखील फरक पडलेला नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. भावेंची ध्येय कधीच बदलली नाहीत, म्हणून ते ग्रेट ठरतात असं म्हणत जयंत पाटील यांनी भावे शंभरी पूर्ण करोत अशा शुभेच्छाही मोतीराम भावेंना दिल्या. मोतीराम भावेंनी आपल्या मनोगतात आपल्या आयुष्याबद्दल सांगितलं. आपल्या पत्नीबद्दल बोलताना ते न चुकता म्हणाले की, ती सोबत होती म्हणून मी उभा राहिलो. तिची साथ नेहमीच होती. राजाराम बापूंची आठवणही यावेळी त्यांनी काढली. तसंच रामभाऊ चेंबुरकर, राम नाईक, अटलबिहारी वाजपेयी, शरद पवार यांचेदेखील भावेंनी आभार मानले. भाई कुंदरकर यांचं स्मरण करून मोतीराम भावे यांनी आपल्या मनोगताची सांगता केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात भाई वैद्य यांनी तीस मिनिटात भावेंचं आयुष्य मांडणं खूपच कठीण काम होतं. मात्र ते कठीण काम युवराज मोहिते यांनी लीलया करून दाखवलंय अशी कौतुकाची थाप दिली. भावेसरांच्या आयुष्याचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला.

अशा स्नेहपूर्ण वातावरणात समुद्राला भिडणार्या मच्छीमार नेते आणि माजी नगरसेवक मोतीराम भावे यांच्या गौरवाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 मकरंद कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *