मुंबई शहरातील मिरवणुकी आणि ध्वनिक्षेपकावरील वाढत्या आवाजाची पातळी कमी करायला, होईल का नाही विचार? पोलीस नव्हे तर गणेशोत्सव मंडळं आपल्यात स्पर्धा निर्माण करू शकतील का? ज्यांच्याकडे ध्वनिप्रदूषण होणार नाही त्यांना बक्षीस देऊन Positive reinforcement व्हावी की निर्बंध पाळले नाही म्हणून शिक्षा करावी? या दोन्ही गोष्टी न करता मला वाटतं सोसायटीनेच भान ठेवून टिळकांच्या मनात असलेला आणि आज शतकाच्यावर सार्वजनिकरित्या साजरा केला जाणारा उत्सव लोकजागृती आणि संघटित प्रयत्न करण्याकरता वापरला जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आठवड्याची सुट्टी काढून कोकणात, देशावर धाव घेणार्या चाकरमान्यांचा गावचा उत्सव ही शहरी रूप धारण करू लागलाय आणि डीजे तसंच बेन्जो पार्टीचा आवाज सहन करायला गणेशाचे कान सुपासारखे आणि मानवी अपराध पोटात घेण्याचं सामर्थ्य असलं तरी त्याने मानवाला ती ताकद प्रदान केली नाहीये. आवाजाच्या आघाताने कानाचे पडद फाटण्याच्या आधी या विद्येच्या देवताची आराधना, उपासना मनोभावे, मनापासून करूया, ध्वनीची मर्यादा राखून!

इको फ्रेंडली गणेशमूर्ती ९ इंचापासून ते २ फूटापर्यंत रुपये ५०० ते ६००० रुपयांपर्यंत घेतल्या जात होत्या. Plaster of Paris हून अंमळ अधिक भाव असला तरी मनाने पर्यावरणप्रेमी मुंबईकर शक्य असेल तितकी पर्यावरण जागरूकतेची झलक दाखवत आपला खारीचा वाटा उचलताना दिसले. सार्वजनिक उत्सवातही काही मोजक्या ठिकाणी तरी महाकाय मूर्तीऐवजी मध्यम आकाराचा पालापाचोळा, भाज्या इ. गोष्टी वापरून केलेल्या मूर्ती आणि आरास केली आहे. थर्माकॉलचं विघटन करून पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी हातभार लावायला एका भारतीय नागरिकाने मदत केली आहे. थोडक्यात, ‘केल्याने होत आहे रे…’ हे खरंच. कागदी पुठ्याची मखरंदेखील एका मराठी माणसाने अतिशय कल्पकरितीने तयार करून घरगुती गणेशोत्सवाच्या तयारीची रंगत वाढवली आहे. याचं नावच ‘उत्सवी’ ठेवलंय. सांगायचा मुद्दा आहे की, उत्सव हा उत्साहाने भरलेला आरोग्यदायी व्हायला अनेक हात पुढे येताहेत. मात्र तरीही दुसर्या बाजूला मुंबईची तसंच इतर शहराची वाढती लोकसंख्या पहाता गर्दीतून वाट काढताना पुरेवाट होत आहे. आणि त्याचबरोबर वाढलेलं ध्वनिप्रदूषण, बहिरेपणाच्या जवळ असलेल्यांना आणि रक्तदाबाच्या रुग्णांना त्रासदायक ठरतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *